संत रामदास स्वामी यांच्या रचना – भाग एक

संत रामदास स्वामी यांच्या रचना – भाग एक
सौ.स्वरूपा कुलकर्णी
  • April 11, 2026
  • 1 min read

जो जन्मला घेऊनी हृद‌यात रा‌म।

ज्याने जनास दिधले ते रामनाम।

साक्षीस नित्य असता नभि चंद्र-भानु।

त्या रामदास संता मी काय वानू।।

श्रीरामाचे अत्यंत श्रेष्ठ उपासक म्हणजे श्रीरामदास स्वामी. स्वतःच्या नावातच रामदास ही बिरुदावली ठेवून श्रीसमर्थांनी आपण श्रीरामरायाचे दास आहोत हे सिद्ध केले. त्यांनी ते केवळ जगाला दाखवण्यासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनात राम उतरवून दाखवला. रामाप्रती असणारा त्यांचा निर्मळ भक्तीभाव त्यांच्या वाङ्‌मयात पदोपदी जाणवत रहातो. राम हीच आपली माऊली, राम हीच कृपेची साऊली हे त्यांनी अक्षरक्षः जगून सांगितलं. श्रीसमर्थ अद्वैत वेदांती आहेत. निर्गुण निराकार परब्रह्म, भक्तासाठी सगुण साकार झाले. त्या सगुण साकार ईश्वराला शब्दांच्या कक्षेत आणून श्रीसमर्थांनी श्रीविष्णूंच्या राम या अवताराचा महिमा पदोपदी गायला.

श्रीसमर्थ आपल्या विपुल साहित्यात  मनाचे श्लोक, आत्माराम, दासबोध, करुणाष्टके, सवाया, आरत्या, भजन, अभंग, रामायण, मानसपूजा अशा विविधांगी प्रकारातून प्रभू रामचंद्रांचे रसभरीत वर्णन करतात. श्रीसमर्थांनी अतिशय ताकदीने व शब्दसौंदर्याने भरलेल्या लेखणीने आपल्या परमप्रीय रामरायाचे गुणवर्णन  केले आहे. मनाच्या श्लोकांची रचना करताना श्रीसमर्थांनी मनाला रामरायाची भक्ती करण्याचा उपदेश केला आहे. त्यात २०५ श्लोक रचताना मुमुक्षूने सिद्धावस्थेपर्यंत कसे जावे याची वाट रचून दिली आहे. श्रीसमर्थ आपल्या पहिल्याच श्लोकात म्हणतात – 

“गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा।।”

श्लोकाचा सरळ अर्थ : इंद्रियांचा स्वामी सर्व गुणाचे अधिष्ठान तसेच निर्गुणाचा आरंभ, मुळपुरुष असा जो गणेश आणि चारही वाणींचे मूळ असणारी शारदा, या दोघांना मी नमस्कार करतो. अनंत ईश्वराचा (रामरायाचा) मार्ग मी समजावून देतो आहे. श्रीसमर्थांनी केलेले हे मंगलाचरण असून ज्ञानरुपी ईश्वर व शक्तिरूप शारदा यांना वंदन केले आहे. तसेच, राघवाच्या भक्तीचा मार्ग आता मी विषद करतो आहे, असे ते म्हणतात. श्रीसमर्थ पुढे तिसऱ्या श्लोकात रामरायाचे चिंतन कधी करावे ते सांगतात.

प्रभातें मनीं राम चिंतीत जावा। पुढें वैखरीं राम आधीं वदावा।

सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो।।

अंतःकरणात भगवंत भरून रहाणे याचे नाव भक्ती. रात्रीची झोप संपून, प्रसन्न सकाळी आधी रामाचे नाव घ्यावे असे ते सांगतात. नंतर चिंतनात जो राम आहे तो वैखरीने गावा, मुखाने रामाचे नाव घ्यावे हे सदाचारी माणसाने कधी सोडू नये. तोच जगात धन्य होतो. श्रीसमर्थांना सांगायचे आहे की, वैखरीला सवय अशी लावा की मुखाने आधी राम येईल व मग इतर विषय येतील. श्रीसमर्थ ३० व्या श्लोकात म्हणतात –

समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळीं कोण आहे?।

जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।

आपल्या भक्तांसाठी संकटात धावून जाणारे भगवंत, ज्यांना पाहून काळही थरथरतो, त्यांना तू शरण जा. कारण ज्याचा त्राता-कैवारी-भगवंत आहेत, त्याला भीती कसली. त्याच्याकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहू शकत नाही. कृपाळू दयाघन रामाला अनन्य भावाने शरण जा, कारण माझा राम भक्ताभिमानी आहे. तो खऱ्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही. श्रीसमर्थांनी आपल्या भक्तिरचनांत रामाच्या भूपाळ्या लिहील्या आहेत. प्रसन्न सकाळी रामरायाला आळविण्यातली गोडी काय असते ते या भूपाळ्यांमधून श्रीसमर्थ सांगतात.

“उठिं उठिं बा रघुनाथा।विनवी कौसल्या माता।

प्रभात जालीसे समस्तां।दाखवीं आतां श्रीमुख।।ध्रु.।।

कनकताटीं आरतीया।घेउनि क्षमा शांति दया।

आली जनकाची तनया।ओंवाळाया तुजलागीं।।१।।

जीव शिव दोघे जण।भरत आणि तो शत्रुघ्न।

भाऊ आला लक्ष्मण।मन उन्मन होऊनियां।।२।।

विवेक वसिष्ठ सद्गुरु।संत महंत मुनीश्वरु।

करिती हरिनामें गजरू।हर्षे निर्भर होऊनियां।।३।।

सुमंत सात्त्विक प्रधान।घेऊनि नगरवासी जन।

आला वायूचा नंदन।श्रीचरण पाहावया।।४।।

माझ्या जिवींच्या जिव्हाळा।दीनबंधु दीनदयाळा।

भक्तजनांच्या वत्सला। देई दयाळा दर्शन ।।५।।

तंव तो राजीवलोचन।राम जग-त्रय जीवन।

स्वानंदरूप होऊन।दासा दर्शन दिधलें।।६।।”

अशाप्रकारे पंच पंच उषःकाली आपल्या लाडक्या रामरायाला झोपेतून उठवताना श्रीसमर्थांनी लडिवाळपणे  रामरायाला प्रार्थना केली आहे. नंतर काकडा घेऊन भल्या पहाटे श्रीसमर्थ काकड आरतीची तयारी करतात. त्यांनी रामरायासाठी रचलेली काकड आरती पहा –

“काकड आरती परमात्मा श्री रघुपती।

जिवाजिवां प्रकाशसी कैसी निजात्म ज्योती।।धृ.।।

त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबिला।

उजळिली निजात्मज्योती तेणे जळोनि गेला।।१।।

काजळी ना म्हैस नाही जळजळ ढळमळा।

अवनी ना अंबर प्रकाश निघोट निश्चला।।२।।

उदयो ना अस्तु तथा बोध: प्राप्तकाळी।

रामी रामदासी सहजी सहज वोवाळी।।३।।”

श्रीसमर्थ जीवाला परमार्थ म्हणजे काय ते या काकड्यातून समजावून देतात. श्रीसमर्थ प्रार्थना करताना म्हणतात- 

भजा राम विश्राम योगेश्वरांचा।

जपू नेमिला नेम गौरीहराचा।

स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी।

तुम्हा सोडवी राम हा अंतकाळीं॥१॥

सदा सर्वदा योग तूझा घडावा।

तुझे कारणी देह माझा पडावा।

नुपेक्षी मज गुणवंता अनंता।

रघुनायका मागणे हेचि आतां।।२।।

समर्था मनीं सांडि माझी नसावी।

सदा सर्वदा भक्तचिंता असावी।

घडेना तुझा योग हा प्राप्त खोटें।

उदासीन हा काळ कोठे न कंठे।।३।।”

श्रीसमर्थ या प्रार्थनेत श्रीरामराय व स्वतः श्रीशंकरांची गुरुशिष्याची जोडी आहे, हे सांगत आहेत. राम हा अंतकाळी सोडवणारा आहे, असे ते सांगतात. सदैव रामा तुझाच संग घडो. तुझ्यासाठीच देह झिजो. गुणवंत रामराया, माझी उपेक्षा करू नकोस. अशी करूण प्रार्थना श्रीसमर्थ करतात. रामराया, तुझ्या भेटीसाठी जीव कासावीस होतो, असे श्रीसमर्थ म्हणतात.


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Language