संकल्प म्हणजे काय? संकल्प मोडण्यासाठी असतात असे खूप वेळा आणि खूप लोकांकडून ऐकले आहे. असे ऐकले की वाईट वाटते. कुठे चालली आहे आपली संस्कृती? पण ही वेळीच सुधारली पाहिजे. आधी आपण स्वतः बदलण्याचा संकल्प केला पाहिजे. तसे प्रयत्नपूर्वक केले पाहिजे. लोकांकडे जास्त (रिकामटेकड्या, आळशी) लक्ष न देता आपण आपले मन चांगल्या विचारात,bवाचनात गर्क केले पाहिजे. हाच संकल्प करावा. आपल्या सगळ्या संतांचे विचार हेच होते. आपण वेगवेगळ्या शाह्यांमध्ये अडकलो होतो. फक्त उदरनिर्वाह हेच ध्येय होते. पण देवाने बुध्दि, कल्पना, विचार करण्याची क्षमता फक्त मानवाला दिलेली देणगी आहे. त्याचा योग्य वापर केला पाहिजे. तर संकल्प, म्हणजे एखादी कृती करण्याचा निश्चय. रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांना संकल्प करायला सांगितले, आठवतं का? मूठभर मावळ्यांनी संकल्प केला म्हणून तर आपल्याला (महाराष्ट्र) स्वराज्य मिळाले, त्याचे आपण सुराज्य करायला हवे. तुम्ही म्हणाल येवून जावून ही समर्थांचे विचार सांगते. पण आज ती काळाची गरज आहे. आम्ही चांगले वाचून त्यावर मनन चिंतन करून ते समाजापुढे, आपल्या नवीन पिढीला सांगितले तर काहीतरी ठीक आहे. तर, समर्थांच्या प्रस्थानत्रयीतील, म्हणजे मनोबोध आणि दासबोध यातील शिकवण आजही ३५० वर्षांनंतरही लागू पडते. समर्थाच्या दासबोधात शिकवण निरुपणाचे २ समास आहेत. त्यातील दशक ११ समास ३ यात आखिव दिनचर्या आहे. आताच्या काळानुरूप, आपल्या दिनक्रमात अंतर्भूत करून घेता येईल हाच संकल्प, यालाच गीतेत युक्त विहार म्हटले आहे. समर्थ रामदास म्हणतात,
“आळस उदास नागवणा । आळस प्रेत्नबुडवणा ।
आळसें करंटपणाच्या खुणा । प्रगट होती ॥११-३-१२||”
पुढे जाऊन समर्थ रामदास एक सरळ, साधा उपाय सांगत आहेत; आणि तो म्हणजे ‘आपण जे जे काही करतो, ते देवाचे कार्य आहे या दृढ भावनेने करावे’. त्यामुळे संसारात किंवा परमार्थात उद्वेग निर्माण होणार नाहीत व आपणास काहीही बाधा होणार नाही. समर्थ म्हणतात की,
“आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें ।
मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥११-३-२८॥”
मनोबोधात पण २ श्लोक आहेत. १) ५ , २) १३० थोडेसे त्या संदर्भात पाहू.
“मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥”
सरळ अर्थ:- ‘हे मना, जो जो पापी विचार असेल त्याचा त्याग कर आणि जो सद्विचार आहे (परमात्मस्वरुपाचे ज्ञान करून घेणे) त्याची कास धरून रहा. विषयी गोष्टींचाच नेहमी विचार करत राहिलास तर विकारांचे प्राबल्य वाढेल आणि सरतेशेवटी जनमानसात नामुष्कीच होईल.’
आता थोडेसे विवरण पाहू. पाप-पुण्याची कल्पना, धर्म व नीती या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. आचार, विचारात विधिनिषेधांमध्ये चमत्कारिक विविधता आढळते. उदा. कोकणस्थ ब्राह्मण जिला मामेबहीण म्हणतो ती मामाची मुलगी ऋग्वेदी देशस्थ ब्राहृमणांत विवाहासाठी योग्य मानतात. पापपुण्य ही कल्पनाच वाईट आहे असे म्हटले तर आपल्याला जगताच येणार नाही. माणसाच्या हातून पातक घडते. त्यामागे पातकासंबंधीचा संकल्प असतो. छोटेसे उदा. पाहू. भूक लागते, खावेसे वाटते; खाण्याचा पदार्थ चिवडा असेल तर बरे असा विचार मनात येतो; खावेसे वाटते इथपर्यंत ठीक. बहुतेक वेळी अनावश्यक आणि अनारोग्य खाणे होते. हा या प्रकरणातील पापसंकल्प. (हे सगळ्याच बाबतीत लागू होते.) आधी पापसंकल्प होतो व त्यानंतर पाप घडते. पापसंकल्प उत्पन्न झाला नाही, तर पाप घडणार नाही. म्हणून समर्थ अधिक सावधपणे पाप सोडून द्यावे असे म्हणण्यापेक्षा पापसंकल्प सोडून द्यावा असे म्हणतात. आता अजून थोडे विस्ताराने पाहू या. मानवी देहामध्ये असणाऱ्या चंचल मनाला संकल्प-विकल्पात्मक मन: असा बहुमान मिळाला आहे. बाहेरच्या कोणत्याही विषयाचा प्रथम संबंध मनाशीच येत असतो. अशा प्रसंगी हे मन प्रथम बाहेरच्या विषयांचा संकल्प करीत असते. त्या विषयांचा संकल्प करून झाला, म्हणजे हे मन त्वरित त्याच विषयाचा विकल्प करू लागते. आपल्या देहात असणारा जीवात्मा हा अनेक विषयसुखांचा रसास्वाद घेऊन बध्द झालेला असतो. हे मन अनेक विषय विकारांनी व्यापलेले असते. प्रत्यक्ष शरीराने घडणाऱ्या पापापेक्षांहि, पापाचे चिंतन परमार्थ दृष्ट्या घातक ठरते. म्हणून समर्थांनी पापसंकल्प सोडून दे असे आग्रहाने सांगितले आहे. मन कधी रिकामे राहू शकत नाही. यासाठी काय टाकावे हे सांगितल्यानंतर लगेच काय घ्यावे हेही सांगितले पाहिजे. समर्थ म्हणतात, ”मना, सदा सर्वकाळ सत्य विषयांचा संकल्प करीत जा.” शरीराने चांगले घडविण्यासाठी मनाने सतत चांगले विचार करीत असले पाहिजे. सत्य शब्दाचा मूळ अर्थ केवळ अस्तित्व असाच आहे. नियमितपणा, व्यवस्थितपणा, अनुशासन, उद्योगशीलता, स्वच्छता इ. सत्यसंकल्पाचे विषय होऊ शकतात. भक्तिमार्गामध्ये भगवंतास विसरून दृश्याच्या नादी लागणे यास पाप म्हणतात. भगवंतास न विसरता कर्तव्यापुरते देहसुख घेणे यास पुण्य म्हणतात. आता १३० वा श्लोक पाहू.
मना अल्पसंकल्प तो ही नसावा । सदा सत्य संकल्प चित्तीं वसावा ।
जनीं जल्प वीकल्प तो ही तजावा । रमाकांत येकांतकाळीं भजावा ॥
वायफळ बोलण्याने माणसाची फार मानसिक शक्ति खर्च होते. व्यवहारात बोलल्याशिवाय चालणार नाही. पण वाजवीपेक्षा अधिक न बोलण्याने व्यवहार पण बिघडत नाही. आहे त्या पेक्षा वेगळे मनात येणे हा विकल्प. अनुकुल घडावे असे वाटत राहणे हा संकल्प. आता व्यवहारातील, रोजच्या जीवनातील पाहू. समजा मी एखादी वस्तू एखाद्याला दिली किंवा एखाद्या करिता थोडेसे काही केले, की त्याने कृतज्ञता व्यक्त करावी असे मला वाटते, म्हणजे संकल्प. पण, जर का तसे म्हटले नाही, की ते जाणवते. साधा शिष्टाचार पण पाळता येत नाही, शिष्ठ आहे! हा झाला विकल्प. कोणाबद्दल त्याच्या मागे बोलणे, निंदा करणे टाळावे म्हणजे विकल्प वाढत नाहीत. मन निर्विकार व्हावे, मनामध्ये नेहमी चांगलेच विचार यावेत, विकल्पाची शक्यता उणी, कमी होत जावो यासाठी समर्थ रामदास उपाय सांगतात की एकांतात जाऊन ईश्वराचे भजन, स्मरण करावे. अजून महत्वाचे समर्थांनी सांगितले आहे की, परमार्थाची वाटचाल करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी मनोबल असावे लागते, मनोधैर्यही असावे लागते आणि मनाचा सरळपणा, समतोलपणाही असावा लागतो. कारण, सरळ वागणाऱ्या साधकाची विचार करण्याची उंची वाढलेली असते. समाधानासाठी विहंगम मार्गाचा सद्विचार हा अत्यंत महत्वाचा ठरतो. म्हणून साधकाने सद्विचारांचा संग धरुनच आपला परमार्थ करावा हाच सत्य संकल्प आहे.
आजच्या काळात (विषाणू) जरी कुठे बाहेर जाता येत नसले तरी विज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळ्या देवस्थानच्या संकल्प प्रक्रियेत सहभागी होता येते, ते ही घरबसल्या, ही सद्गुरू कृपा आहे.