समर्थवर्णित अष्टसृष्टी

समर्थवर्णित अष्टसृष्टी
डॉ. सौ. साधना गोखले
  • May 9, 2026
  • 1 min read

दासबोधातील ‘देवशोधन’ या सहाव्या दशकातील ‘सृष्टीकथन’ या सहाव्या समासात श्रीसमर्थानी अष्टसृष्टींचे विवचन केले आहे. ज्ञानी व अज्ञानी यांची विश्वाकडे पहाण्याची दृष्टी श्रीसमर्थ स्पष्ट करीत आहेत. ज्ञानी (जाणते) आत्मज्ञानी असतात, तर अज्ञानी (नेणते) मायाज्ञानी असतात. स्वाभाविकच ज्ञानी परब्रह्माला तर अज्ञानी बाह्य विश्वाला महत्व देतात.  शास्त्रात अन्वय आणि व्यतिरेक अशा दोन पद्धती आहेत. दोन्ही पध्दतींचा पाया ‘कल्पना’ हाच आहे. सर्व दृश्य विश्व आत्मस्वरुपानेच भरलेले आहे, अशी कल्पना करणे हा अन्वय आणि जे जे दिसते ते ते अनात्म आहे. त्या सर्वांचा निरास केला की मग जे केवळ रूपाने शिल्लक उरते, ते आत्मस्वरूप हा विचार व्यतिरेकाचा. दोन्ही विचारांच्या मुळाशी कल्पनाच असते. ह्या कल्पनेच्या खटपटीने आठ प्रकारच्या सृष्टी जन्म पावतात. त्यांची संगती लावत श्रीसमर्थ समजावितात, 

“येके कल्पनेचे पोटीं।बोलजेती अष्ट सृष्टि।

तया सृष्टीची गोष्टी।सावध ऐका।।६-६-५०।।

येकी कल्पनेची सृष्टि।दुजी शाब्दिक सृष्टि।

तिजी प्रत्यक्ष सृष्टी।जाणती सर्व।।६-६-५१।।

चौथी चित्रलेपसृष्टि।पांचवी स्वप्नसृष्टि।

साहावी गंधर्वसृष्टी।ज्वरसृष्टी सातवी।।६-६-५२।।

आठवी दृष्टिबंधन।ऐशा अष्ट सृष्टी जाण ।

यामधें श्रेष्ठ कोण।सत्य मानावी।।६-६-५३।।”


१) कल्पनेची सृष्टी – माणसाची कल्पना शक्ती अक्षरश: सैराट धावत असते. शक्याशक्यतेचा कोणताही मुलाहिजा ती ठेवीत नसते. अगदी सामान्यातला सामान्य माणूसही स्वतःला पंतप्रधानपदी आरुढ झाल्याची कल्पना रंगवू शकतो. मनोराज्ये रचणे, कल्पनेचे इमले रचणे ही कल्पनेतील सृष्टी. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ही हिंदी मालिका त्याचे उत्तम उदाहरण. वास्तवाचे भान आलं की ही कल्पनेची सृष्टी पत्त्याच्या बंगल्यासारखी गडगडते!

२) शाब्दिक सृष्टी – कवी, साहित्यिक आपल्या शब्द सामर्थ्याने त्यांची एक शाब्दिक सृष्टी निर्माण करीत असतात. सुंदर सुंदर काव्ये, नाटके यातील प्रसंगात माणूस एवढा तल्लीन होतो की, सारे सत्यच आहे असे त्याला वाटू लागते. ‘जे न देखे रवी, ते देखे कवि’ असे म्हणतात. त्याला कारण या लेखक कवींचे शब्दसामर्थ्य असते.

३) प्रत्यक्ष सृष्टी – आपण ज्या विश्वात वावरतो, ते सारे विश्व आपल्याला खरेच वाटत असते. डोंगर, दऱ्या, नद्या, सागर, विविध रंगांची उधळण करणारे मेघ, इंद्रधनुष्य, सारे प्राणी जगत, वनस्पती जगत, प्रत्यक्ष नजरेने पहात असल्याने ते खोटे आहे हे मानायला मन तयार होत नाही. पण अध्यात्मविद्येचा अभ्यास करू लागलो, की ही सारी ‘माया’ आहे हे कळू लागते. ‘यदृष्टं तद नष्टम्’ (दिसे ते नासे) हे कळल्याने सृष्टीचे मिथ्यापण समजावून घेऊ लागतो.

४) चित्रलेप सृष्टी – चित्रकारांनी काढलेली चित्रे कधी कधी इतकी हुबेहूब असतात की आपण फसतोच. परवा आम्ही येथील भागवत सृष्टी पहायला गेलो असता तेथील मूर्ती इतक्या सुंदर होत्या की पहात रहावे. शरपंजरी झोपलेल्या भीष्माचार्यांचे डोळे एवढे सजीव वाटत होते की, ते आत्ता आप‌ल्याशी बोलतील असेच वाटत होते. युरोपमध्ये एका संग्रहालयात व्यक्तींचे मेणाचे पुतळे बनविले आहेत. विशेष सन्माननीय व्यक्तींचे ते मेणाचे पुतळे पहाताना मन थक्क होते. क्षणभर का होईना, पण खऱ्याचाच आभास निर्माण करणारी ही चित्रलेप सृष्टी होय.

५) स्वप्नसृष्टी- ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे म्हणतात. कधी कधी मनातील अतृप्त इच्छा, मन स्वप्नाद्वारे पूर्ण करून घेते, असाही विचार मांडला जातो. जोपर्यंत स्वप्न चालू असते, तोपर्यंत ते इतके खरे वाटते की; माणसे स्वप्नात मोठ्याने हसतात, ओरडतात, रडतात, खूप घामाघूम होतात. जाग आल्यावर ते स्वप्न होते, सत्य नव्हते हे जाणवते. ही स्वप्न सृष्टी निर्माण करण्याची किमया आपले सुषुप्त मन (unconscious mind) करते. काही स्वप्न भविष्यसूचक ही असू शकतात. एकूणच स्वप्नसृष्टी कल्पनेचीच कारागिरी असते.

६) गंधर्वसृष्टी – अवकाशात, अंतराळात ज्या मानव योनीपेक्षा वरच्या योनी आहेत, त्यात यक्ष, किन्नर, विद्याधर, अप्सरा, गंधर्व योनी आहेत. त्यांचे होणारे भास काल्पनिकच असतात. कधी कधी आकाशात इतके सुंदर, मनोहर रंग व आकृत्या दिसतात, की त्या पहाताना आपण हरवुन जातो. पण थोड्याच वेळात ते रंग, त्या आकृत्या दिसेनाशा होतात व आपण भानावर येतो व हे सारे कल्पनेचेच खेळ होते हे जाणवते.

७) ज्वर सृष्टी – काही लोकांना अंगात ताप (ज्वर) भरला की बडबडण्याची सवय असते. पुष्कळदा हे बोलणे विसंगत, विस्कळीत असते. पण तो ताप चढलेला माणूस तापाच्या नशेत त्याच्या मनाने रचलेल्या ज्वरसृष्टीत वावरत असतो. ज्वर (ताप) ओसरला की ही ज्वर सृष्टीही नाहीशी होते!

८) दृष्टी बंधन – दृष्टी बंधनाला इंग्रजीमध्ये हिप्नोटाईज करणे असे म्हणतात. ही एक कला आहे. हिला संमोहन कला असेही म्हणतात. हा संमोहित करणारा समोरच्या व्यक्तीला आपल्या दृष्टीद्वारे संमोहित करतो. असा संमोहित माणूस, मग संमोहन करणाऱ्या व्यक्तीच्या आज्ञा निमूटपणे पाळतो. अगदी त्याच्या आदेशाप्रमाणे उठतो, बसतो, चालतो, बोलतो. त्या स्थितीत त्याला स्वतःचे वास्तव भान नसते. जसा जसा संमोहनाचा प्रभाव उतरू लागतो तसे तसे त्याला आपले स्वतःचे भान येऊ लागते. 

या आठही सृष्टी त्या त्या वेळी अगदी खऱ्या वाटल्या, तरी त्या मिथ्या आहेत, काल्पनिक आहेत, हे सत्य समजल्यावर कळते. श्रीसमर्थ म्हणतात, आपण ज्या सृष्टीत वावरतो आहोत ती अशीच मिथ्या आहे, भासमान आहे. आपण अज्ञानामुळे ती सत्य आहे असे समजतो. जाणते, ज्ञानी, संतमहंत मात्र सृष्टीचे हे मिथ्यत्व समजतात. श्रीसमर्थ सांगतात,  “म्हणोनि सृष्टि नासिवंत।जाणती संत महंत।।” या आठ सृष्टींपैंकी कोणती श्रेष्ठ व सत्य मानायची ? याचे उत्तर कोणतीच नाही, हे संत सज्जन जाणतात. श्रीसमर्थांनी हे समजावल्यावर शिष्याने एक आक्षेप नोंदविला. 

तव शिष्यें आक्षेपिलें।सृष्टी मिथ्या ऐसें कळलें।

परी हें अवघें नाथिलें।तरी दिसतें कां।।६-६-५७।।”

श्रीसमर्थ म्हणतात, शिष्या, तू म्हणतोस ते खरे आहे. आपला देह सगुणाचा आहे. म्हणून सगुण देव आपल्याला लवकर कळेल. त्याच्या नित्य उपासनेनंतरच त्यातील निर्गुण, चिरंतन, चैतन्य तत्त्व आकलन होईल. येथे विषयांबद्दलचे (सगुणाबद्दलचे) वाटणारे ममत्व निर्गुण ईश्वरतत्वाकडे वळवायचे आहे. श्रीसमर्थांनी हेच स्पष्ट केले आहे की, माणसाच्या अंगी असलेल्या प्रचंड कल्पनाशक्तीचा वापर ब्रह्माच्या चिंतनासाठी केल्यास माणूस मुक्त होऊ शकेल. त्याने सगुणाचा वापर निर्गुणाच्या प्रातीसाठी करावा. सगुण हे साधन असावे व निर्गुण हे साध्य.


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

1 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Language