समर्थांचा पत्र प्रपंच

समर्थांचा पत्र प्रपंच
सौ. अश्विनी कुलकर्णी
  • October 17, 2026
  • 1 min read

समर्थ रामदास स्वामी रचित दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम आणि अशा कितीतरी वाङ्मयांपैकी त्यांचा पत्र प्रपंच हा साहित्यप्रकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एकाच व्यक्तीने विविध व्यक्तींना, विविध प्रसंगी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह, मालिका किंवा साखळी म्हणजे पत्र प्रपंच होय ! समर्थांच्या इतर सर्व प्रासादिक ग्रंथांप्रमाणेच हा विषय देखील सूक्ष्मरित्या अभ्यासण्यासारखाच आहे. पण तुलनेने कमी चर्चिला गेलेला पैलू म्हणजे त्यांचा पत्र प्रपंच ! 

‘समर्थांचा पत्र प्रपंच‘ हा विषय डोळ्यासमोर येताच मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते की समर्थांना इतक्या मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार करण्याची गरज का भासली ? यासाठी तत्कालीन परिस्थितीचा विचार करणे रास्त ठरेल, नव्हे; तर त्यातूनच आपल्या प्रश्नाचे नेमके उत्तर आपल्याला मिळणार आहे. समर्थांच्या काळात आपल्या देशात राजकीय अस्थिरता आणि सामाजिक अध:पतन होत होते. लोकांमध्ये नैतिक मूल्यांची कमतरता जाणवत होती. अशा बिकट परिस्थितीत समर्थांनी पत्रांच्या माध्यमातून लोकांना योग्य मार्ग दाखविण्याचे महान कार्य केले. त्यांच्या पत्रात धर्म, कर्तव्य, संयम, शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठा यांचा प्रभावी उपदेश आढळतो. भाषा साधी सरळ आणि ओजस्वी असल्यामुळे ती थेट मनाला भिडते.

या पत्र प्रपंचात समर्थांनी आपल्या शिष्यांना, मठाधिपतींना, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांसारख्या नेतृत्वाला लिहिलेल्या पत्रांचा समावेश होतो. ही पत्रे केवळ हालहवाल विचारणारी, सर्वसाधारण आपण लिहितो तशी वैयक्तिक संवाद साधणारी पत्रे नव्हती; तर या पत्रांमधून समर्थांनी मठव्यवस्था, शिस्त, धर्मकार्य समाज जागरण, राष्ट्रधर्म, राष्ट्रधर्म जागरण या गहन विषयांचे मार्गदर्शन केले आहे. एकूणच काय तर, त्यांच्या प्रत्येक पत्रातून तत्कालीन, सामाजिक, राजकीय परिस्थितीचे दर्शन घडते. त्यामुळे हा पत्रसंग्रह मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेवा मानला जातो. विशेष म्हणजे समर्थांची पत्रे साधी, स्पष्ट व आदेशात्मक असून त्यातून त्यांची दूरदृष्टी, व्यवहारज्ञान व संघटन कौशल्य दिसून येते.राष्ट्र जागरणाचे प्रभावी साधन म्हणजेच समर्थांचा हा पत्र प्रपंच असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये.

अशा या अमूल्य ठेव्यात समर्थांनी मुख्यत्वे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना तत्कालीन राजकीय परिस्थिती, राज्य कारभार आणि नीती विषयक मार्गदर्शन करणारी पत्रे लिहिली आहेत, असे या विषयाचा सूक्ष्म अभ्यास करताना दिसून येते. यातील एका प्रसिद्ध पत्रात शिवाजी महाराजांचा “जाणता राजा” असा उल्लेख आहे तर संभाजी महाराजांना त्यांनी सावधगिरीचा आणि लोकसंग्रहाचा मोलाचा सल्ला दिला आहे.

“निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

परोपकाराचिया  राशी । उदंड घडती जयासी ।

तयाच्या गुण महत्त्वाची । तुळणा कैची ।।

नरपती हयपती गजपती । गडपती भूपती जळपती ।

पुरंदर आणि आदिशक्ती । पुष्ठीभागी ।।

यशवंत कीर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।

पुण्यवंत नीतीवंत । जाणता राजा ।।”

ही बिरुदावली आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी समर्थांनी लिहिलेली ! मुळात समर्थांनी छत्रपतींना लिहिलेल्या एका पत्रातील हा एक भाग आहे. हा अंशात्मक भाग वाचूनही समर्थांच्या दिव्यदृष्टीचा प्रत्यय येतो. किती अद्वितीय विशेषणांनी राजांचा गौरव समर्थांनी केला आहे !  

समर्थांचे हे पत्र ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे तथापि, ते त्यांनी आपल्या मनातील भाव सरळपणे व्यक्त करण्यासाठी लिहिले आहे. समर्थांसारख्या नि:स्पृही, स्पष्टवक्ता समकालीन संताने शिवरायांचे केलेले अप्रतिम गुणवर्णन दुसरे कुठेही सापडणार नाही. यात शिवरायांचे अलौकिकत्व स्पष्टपणे समर्थांनी मांडले आहे. त्यातील त्यांचे उत्स्फूर्त उद्गार आणि भावनेचा अविष्कार समर्थ भाषेला साजेसाच आहे. अशी अनेक पत्रे, समर्थांनी छत्रपतींना पाठविलेली आहेत. याच पत्रात,

“कित्येक दुष्ट संव्हारिला । कितेकांसी धाक सुटला ।

कितेकांसी  आश्रयो जाला । शिवकल्याण राजा ।।”

असेही म्हटले आहे. अशा प्रकारची समर्थांची भाषा अगदी सहजपणे कळणारी आहे. या पत्रात त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र धर्माचा उल्लेख केला आहे. त्यानंतर राजधर्म, शास्त्र धर्म, अखंड सावधानता अशा विषयांवर याच प्रकारे काव्यरूपात महाराजांना पत्रे लिहिली आहेत. अशा स्वरूपाच्या विविध पत्रांमधून समर्थ रामदासांचा आणि शिवरायांचा ऋणानुबंध किती निकटचा होता हे प्रत्ययास येते.

राजधर्म विषयी लिहिलेल्या पत्रात समर्थ म्हणतात,

“आधी मनुष्य ओळखावे । योग्य पाहुनी काम सांगावे ।

निकामी तरी ठेवावे । येकीकडे ।।

न्यायसीमा उल्लंघू नये । उल्लंघिता होती अपाय ।

न्याय नसता उपाय । होईल कैचा ।।

उदंड मुंडे असावी । सर्वही येक न करावी ।

वेगळाली कामे घ्यावी । सावधपणे ।।”

अशा युक्तीच्या गोष्टी ते राजांना सांगत असत. 

“रायानी करावे राजधर्म । क्षत्री करावे क्षात्रधर्म ।

ब्राह्मणी करावे स्वधर्म । नाना प्रकारे ।।

असेही समर्थ शिवबांना लिहिलेल्या या पत्रात म्हणतात.

“देवमात्र उच्छेदिला । जित्यापरीस  मृत्यू भला ।

आपुला स्वधर्म बुडविला । ऐसे समजावे ।।”

असे सांगताना ते म्हणतात, 

“मराठा तितका मेळवावा । आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।”

समर्थ हे संत, योगी तर होतेच पण अध्यात्मिक कवीही होते. छत्रपतींशी त्यांचा ऋणानुबंध असल्यामुळे ते प्रसंगी राजांना भेटत, चर्चा करीत. त्यांच्या आध्यात्मिक व्यासंगातून ‘सांगेन युक्तीच्या चार गोष्टी‘ सांगत. शिवाजीराजे शूरवीर, पराक्रमी योद्धा होते. ते राज्यकारभारात निपुण होते. पण हे सारे असतानाही समर्थ सांगतात –

“सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।

परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।”

कोणतेही सामर्थ्याचे, क्षत्रिय धर्माचे काम करताना अधिष्ठान मात्र परमेश्वराचे हवे, असे समर्थ राजांच्या आवर्जून लक्षात आणून देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्र, चाहते, सल्लागार, गुरु असलेले समर्थ त्यांच्यावर येणाऱ्या संकटातूनही त्यांना सावध करण्याचा आगळा वेगळा मार्गही प्रसंगी अवलंबित असत. त्याचेच हे एक उदाहरण –

अफजलखान हा महाराजांच्या दिशेने निघाला असल्याची सूचना कर्णोपकर्णी होऊ नये म्हणून ते त्यांच्यातला कवी कसा जागवत असत पहा –

“विवेके करावे कार्य साधन । जाणार नरतनु हे जाणोन ।

पुढील भविष्यार्थी मन । रहाटोचि नये ।।

चालू नये असन्मार्गी । सत्यता बाणल्या आंगी ।

रघुवीरकृपा ते प्रसंगी । दासमाहात्म्य वाढवी ।।

रजनीनाथ आणि दिनकर । नित्य करिती संचार ।

घालिताती  येरझार । लाविले भ्रमण जगदिशे ।।

आदिमाया मूळ भवानी । हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।

येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ।।”

या काव्य संदेशात प्रत्येक ओवीचे आद्याक्षर घेतल्यास ‘विजापूरचा सरदार निघाला आहे’ असा निरोप देऊन पूर्ण विचारांती योजना आखावी असेही समर्थांनी छत्रपतींना सुचविले आहे. केवढी ही समर्थांची काव्य प्रतिभा !! इतर पत्रातही समर्थांची काही ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात. छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या निधनानंतर एक २१ कलमी उपदेश पर पत्र समर्थांनी लिहिलेले आहे. या पत्रात समर्थांनी केलेल्या सूचना खालील प्रमाणे आहेत.

  • सतत सावध रहाणे (उद्योगाचे बळ )
  • लोकसंग्रह करणे. (लोकांना एकत्र ठेवणे)
  • मोगलांशी सावधगिरीने वागणे.
  • चुका सुधारून ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे आणि लोकांची मने जिंकण्याचे महत्त्व समजावून सांगितले होते.

समर्थांनी आपले शिष्य कल्याणस्वामी, उद्धवस्वामी यांनाही वेळोवेळी पत्रांद्वारे किंवा काव्यरचनेतून मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे समर्थ शिष्य दिवाकर गोसावी यांचे व्याही रघुनाथ भट यांना गद्यात लिहिलेले पत्र देखील उल्लेखनीय आहे. वरील प्रमाणे समर्थांच्या पत्रांचा सूक्ष्मरित्या अभ्यास केला तर असे दिसून येते की, समर्थांचा पत्र प्रपंच हा आदर्श जीवनमूल्य, नीतिमूल्य आणि राष्ट्रधर्माचा संदेश देणारा आहे. आजच्या यंत्र-तंत्र युगातही त्यांच्या पत्रातील विचार प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे त्यांचा पत्र प्रपंच मराठी साहित्य आणि समाज जीवनात सदैव स्मरणीय राहिल. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

3 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Sunanda Shamrao Kshirsagar
Sunanda Shamrao Kshirsagar
10 days ago

खुप खुप सुंदर!!!!! जय जय रघुवीर समर्थ*

रविंद्र कुलकर्णी
रविंद्र कुलकर्णी
10 days ago

समर्थाचा पत्र प्रपंच हा खुप मोठा विषय आहे. आपण त्याचा छान आढावा घेतला आहे. समर्थ आणि छत्रपती शिवराय यांचे संबंध कसे हृद्य व ऋणानुबंधाचे होते हेही विशेषत्वाने दाखवून दिले आहे.

Language