समर्थांचे मित्र आणि शत्रू

समर्थांचे मित्र आणि शत्रू
श्री. सुरेंद्र देव
  • October 24, 2026
  • 1 min read

एखाद्या ग्रंथाची प्रस्तावना किती सामर्थ्यवान असू शकते याचं उदाहरण म्हणून गेली कित्येक वर्ष मी तरी रणजीत देसाई लिखित श्रीमानयोगी या ग्रंथाचा उल्लेख करीत असे. परंतु गेल्या चार वर्षांमध्ये जसे प. पू. डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख उपाख्य पू. डॉक्टर काका यांचे श्रीदासबोधामृत अथवा गीतादीपस्तंभ या ग्रंथाचे वाचन केले तेव्हापासून मात्र प्रस्तावना किती विवेचनात्मक आणि सविस्तर असू शकते याबद्दल मी ह्या दोन ग्रंथांचा निर्देश करेन.


श्रीदासबोधामृत या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये परमपूज्य डॉक्टर काकांनी श्रीसमर्थांचा वेदांत, त्यांचा मायावाद त्याचप्रमाणे समाजाभिमुख श्रीसमर्थ या सगळ्यांचे अतिशय सुंदर विवेचन केले आहे. समाजाभिमुख श्रीसमर्थांचे वर्णन करताना पूज्य डॉक्टर असे म्हणतात, “महान संतांना मित्र व शत्रू नसतात हे अगदी खरे आहे. पण ते व्यक्तींच्या स्वरूपात नसतात. व्यक्तीच्या गुणावगुणांच्या स्वरूपात असतात.” विवेक, निःस्पृहता व तितिक्षा हे समर्थांचे तीन मित्र असून आळस, संशय व निर्बुद्धपणा हे तीन त्यांचे वैरी आहेत. विवेक हा समर्थांचा पहिला मित्र आहे. व्यवहार, नीती व परमार्थ या तिन्ही क्षेत्रांत त्या त्या विवेकाची आवश्यकता आहे.


“विवेकाचें फळ तें सुख । अविवेकाचें फळ तें दुःख ।

यांत मानेल तें अवश्यक । केलें पाहिजे ।।”

ही ओवी सर्वसमावेशक आहे. येथे विवेकाची व्याप्ती मोठी आहे. ‘सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये‘ हा नैतिक विवेक आहे. पारमार्थिक विवेक मुख्यतः तीन प्रकारचा आहे. पहिला आत्मानात्मविवेक –

“आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचें करावें विवरण ।

तेंचि आतां निरूपण । सावध ऐका ।।”

आत्मा चेतन असून अनात्मा जड आहे. आत्मा स्वयंप्रकाश असून अनात्मवस्तू परप्रकाशित असते.

“निराकार जाणावा नित्य । आकार जाणावा अनित्य ।

यास बोलिजे नित्यानित्य । विचारणा ।।”

हा नित्यानित्यविवेक होय. जे अरूप असते ते निराकार व नित्य असते. जे रूपवान असते त्याला आकार असतो व ते अनित्य असते. निरवयव नित्य तर सावयव अनित्य असते. तिसरा सारासार विचार –

“असार म्हणिजे नासिवंत । सार म्हणिजे ते शाश्वत ।

जयास होईल कल्पांत । तें सार नव्हे ।।”

ज्याला नाश असतो ते असार. उदा. देह. जे शाश्वत असते ते सार होय. उदा. आत्मा. देहात आत्मा असंगत्वाने व्यापून असल्याने देहरूप असार गेले तरी आत्मरूप सार उरते. निःस्पृहता हा समर्थांचा दुसरा मित्र. जीवनात बरेच काही साधून देणारा ! हा वैराग्याचा धाकटा बंधू. त्याचे एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात –

“जेथें तेथें नित्य नवा । जनासी वाटे हा असावा ।

परंतु लालचीचा गोवा । पडोंचि नेदी ।।”

जाईल तेथे हा दरवेळी नव्याने आल्यासारखे त्याचे उत्साहाने स्वागत होते व तो सतत तेथेच रहावा असे लोकांना वाटते ! पण खरा निःस्पृह अशा मोहात कधीच सापडत नाही.

“नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें ।

उदास वृत्तीच्या गुमानें। उठोन जातो ।।”

तो, मुद्दा न सोडता प्रत्येक विषय स्पष्टपणे व अंतःकरणाचा ठाव घेतला जाईल अशा रीतीने मांडतो. स्थल, काल व प्रसंगाचे सतत भान ठेवतो व कार्य संपताच निःस्पृहतेच्या सहज वृत्तीने तेथून निघून जातो.

“प्रत्यये बोलोन उठोन गेला। चटक लागली लोकांला ।

नाना मार्ग सांडून त्याला। शरण येती ।।”

  प्रत्येकाला सहज पटेल असे अनुभवातून बोलणारा निःस्पृह सभेतून निघून गेल्यावर त्याची लोकांना विलक्षण ओढ वाटते. इतर मार्ग सोडून ते त्याच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करतात. व्यक्तिगत व सामाजिक तितिक्षा हा समर्थांचा तिसरा मित्र आहे. ज्या प्रमाणात अहंकार व देहतादात्म्य कमी, त्या प्रमाणात तितिक्षा जास्त असते. प्रबोधनासाठी समाजात उतरावयाचे झाल्यास सर्व प्रकारच्या लोकांशी संबंध येत असल्याने तितिक्षा अनिवार्य ठरते. लोक त्रिगुणात्मक असतात हा विवेक सांभाळला तर सामाजिक तितिक्षा सांभाळणे सोपे जाते.

“मागें ज्ञानी होऊन गेले । तेंहिं बहुत कष्ट केले ।

तरी मग विख्यात जाले । भूमंडळीं ।।”

कायिक, वाचिक व मानसिक तपासाठी अपार कष्ट करावे लागतात. त्यासाठी देहाला अनेक प्रकारे त्रास होतो. तो त्रास विनातक्रार, शांतपणे सोसणे हीच व्यक्तिगत तितिक्षा होय. समाजाच्या प्रस्थापित जीवनाशी विसंगत रहाणाऱ्याला विरोध, कुचेष्टा इ. सोसावे लागते. ही सुद्धा व्यक्तिगत तितिक्षाच आहे. ‘विरक्तें निंदक वंदावें‘, निंदा करणाऱ्यांना वंदन करण्यासाठी मानसिक तितिक्षा हवी. आळस हा समर्थांचा पहिला वैरी होय. दुश्चितपणा किंवा दुर्लक्ष याला ते आळसाचा खास सखा मानतात.  समर्थ म्हणतात – 

“आळसाहातीं प्राणियांला । उसंतचि नाही ।।”

आळसात दंग झाल्याने माणसाला कामाला सवडच मिळत नाही ! दुश्चितपणाबद्दल समर्थ म्हणतात –


“दुश्चीत बैसलाचि दिसे । परी तो असतचि नसे ।”

माणसाचे शरीर श्रवणाला बसल्याचे दिसते खरे पण त्याचे मन कोठे तरी दूरवर हिंडत असते. म्हणजे तो तेथे असून नसतो ! निर्बुद्ध मूर्ख हा समर्थांचा दुसरा वैरी आहे. त्याचेविषयी ढोंगी कळवळा त्यांचेपाशी नाही. मात्र त्याने आपल्या बुद्धीचा विकास करून मूर्खपणा सोडावा असा समर्थांचा आग्रह आहे.


“बुद्धि देणें भगवंताचें । बुद्धिविण माणूस काचें ।

राज्य सांडून फुकाचे । भीक मागे ।।”


अध्यात्माला अनुकूल बुद्धी उपजत असणे ही ईश्वरी कृपा होय. ती नसेल तर माणूस घोटाळ्यात सापडतो व सहज असलेल्या ब्राह्मी स्थितीला मुकून त्यासाठी भलभलती साधने करतो. 


“बुधीविण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ ।

तया मूर्खासीं खळखळ । कोणें करावी ।।”

ज्यांची बुद्धी विकसित नसते असे निर्बुद्ध, उथळ, चंचल व हलक्या विचाराचे असतात. त्यांना कितीही समजावून सांगितले तरी काहीच कळत नाही. त्यांच्याशी हुज्जत घालीत बसू नये. 

संशय हा समर्थांचा तिसरा वैरी आहे. कोणत्याही क्षेत्रातील अनिश्चितपणा, चाचपडणे, स्पष्टतेचा अभाव यामुळे कार्यनाश होतो. ऐकणाऱ्याने स्वतः अभ्यास करून स्वतःचे अचूक व ठाम निर्णय करणे आवश्यक आहे.


“ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।

असार तें जाणोनि त्यागावें। या नांव श्रवणभक्ती ।।”


असार लक्षात घेऊन ते सोडण्यासाठी स्वतःची बुद्धी अभ्यासाने पूर्ण विकसित करणे व ती सत्त्वप्रधान ठेवणे गरजेचे आहे.


“वेर्थ संशयाचा देव । वेर्थ संशयाचा भाव ।

वेर्थ संशयाचा स्वभाव । सर्व कांहीं ।।”

‘देव‘ म्हणजे काय हे माहित नसताना केलेली भक्ती, ‘भाव‘ कशाला म्हणावे हे ठाऊक नसणारे भाविक व्यर्थ जातात. ज्याचा स्वभाव संशयाने भरलेला असतो त्याचे जीवन व्यर्थ जाते. या तीन गुणांचे आणि तीन अवगुणांचे वर्णन समर्थांनी दासबोधामध्ये ठिकठिकाणी केलेले आहे.

 ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

5 2 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Madhavi Panse
Madhavi Panse
3 days ago

छान विवरण 💐 आध्यामिक ग्रंथ वाचल्यावर आपले मत चांगल्या विचारा ने परिवर्तीत होते.

Joshi prakash ramrao
Joshi prakash ramrao
3 days ago

खूप छान सोप्या भाषेत विवेचन केले आहे!🙏🙏जय श्री राम!🙏💐

मंगला चौरे
मंगला चौरे
3 days ago

खूप सुंदर
जय जय रघुवीर समर्थ

Language