“येके ठाईं बैसोन राहिला | तरी मग व्यापचि बुडाला |
सावधपणें ज्याला त्याला | भेटि द्यावी ||१५–१–३४||”
समर्थांनी गृहत्याग केल्यावर बारा वर्षे स्वतः साधना केली. साधनेने एक तेजस्वी, विवेकी, तीक्ष्ण नजरेचा, बलदंड शरीराचा, हनुमंताचा भक्त समर्थ रामदास असे परिवर्तन त्यांच्यात घडले. नाशिकमध्ये पूर्ण देशातून यात्रेकरू येत असत. त्यांच्याकडून उत्तरेकडे चाललेला विध्वंस, मूर्तींची विटंबना, देवालय नष्ट करणे, स्त्रियांना पळवणे, सक्तीचे धर्मांतर या गोष्टी कळल्या. स्वतः पहावे, काही उपाय करावा, लोकजागर करावा यासाठी पायी देशाटन करण्याचे समर्थांनी ठरविले.
एक तप:पूत, विरक्त, मुक्त, रामभक्तित रंगलेला, करुणेनी व्यथित झालेला महंत रामदास, त्र्यंबकेश्वराला पोहोचला. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना तो एकनाथ व निवृत्तीनाथांची शिकवण आठवत होता. सप्तशृंगीचे दर्शन घेताना, उग्र रूपाच्या; हातात आयुधे असणाऱ्या त्या अष्टभुजाधारिणीकडे त्यांनी सामर्थ्य मागितले. प्रवास करत त्यांनी पोहून तापी नदी ओलांडली. नाझीर साहेब बळजबरीने यात्रेकरूंची तपासणी करत होते. समर्थांनी त्याला विरोध केला. त्यांच्या दृष्टीत थोडा क्रोध, निर्धार, प्रतिकाराची सिद्धता होती. सर्व यात्रेकरू निर्भय झाले. नंतर समर्थ नर्मदा तीरी आले. ओंकारेश्वराचे दर्शन घेतले. आद्य शंकराचार्यांचे स्मरण केले. तेथे मठ स्थापला. चरणदास याला मठपती नेमले. उज्जैनी, ग्वाल्हेरला गेले, महांकालेश्वराचे आशीर्वाद घेतले. सर्व ठिकाणी सत्ता, स्वार्थ, यवन सत्तेचा अत्याचाराचा वरवंटा अमानुषपणे फिरताना समर्थांनी पाहिला. समर्थ चित्रकुटावर, त्यांच्या प्रभूच्या वनवासभूमीत पोहोचले. तेथे श्रीराम वास्तव्याच्या अनुभवाने शक्ती मिळाली. मथुरेला मठ स्थापला. रुद्र प्रयागला स्नान करून, बद्रीनारायण; गंगोत्री; यमुनोत्री; केदारनाथाचा प्रवास केला. परतीच्या प्रवासात वाराणसी, अयोध्या पाहिली. काशीक्षेत्री मंदिरात चिरेबंदी मशिद पाहून ते व्यथीत झाले. अयोध्येत श्रीराम लल्लाच्या मंदिराशेजारी तेच होते. त्यांना वाटलं माझा देश, माझा धर्म काहीच राहिला नाही. लोकांना साधं, शांत, स्थिर, निर्भय जीवन कष्ट करून जगता येत नाही. “आश्रयो पाहता नाही” असं झालं आहे. वाराणसीत मठ स्थापला. माझा स्वरूप संप्रदाय, अयोध्या मठ; “जानकी देवी श्री रघुनाथ दैवत | मारुती उपासना नेमस्त” असा असेल असे हितगुज त्यांनी श्रीरामाशी केले.
समर्थांनी कर्नाटकातील विजयनगर येथील संपन्न बाजारपेठा, प्रशस्त शहर, नामघोषाने दुमदुमलेली मंदिरे पाहिली. बेंगळूरला न्यायी व शूर शहाजीराजांची नगरी पाहून त्यांना आनंद वाटला. शहाजीराजांच्या भेटीत समर्थांनी स्वतः पाहिलेले क्रौर्य, दुष्काळ, कल्पान्त, धाडी, ओस पडलेली गावे, जीवघेणे आकांत त्यांना कथन केले. शहाजीराजांनी, समर्थांना मांसाहेब जिजाबाई; पुत्र शिवबा व त्यांचे पुणे येथील जहागिरीची माहिती दिली. त्या स्वराज्याचे व सुराज्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना आशीर्वाद द्यावेत असे समर्थांना सांगितले.
देशाटनामुळे समर्थांचे अनुभव विश्व वाढले, अस्मिता वाढली, शक्ती वाढली. कुरुक्षेत्री संघर्षाचे स्फुल्लिंग चेतवले गेले. “हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा” हे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले. समर्थ महाराष्ट्रात आले. जांबेला मातोश्रींना भेटले. चाफळचे मंदिर व ११ मारुतींची स्थापना वेगाने झाली. ११०० मठांची उभारणी व महंतांची साखळी उभी राहिली. चिपळूणला परशुरामांचे आशीर्वाद घेतले. महाडला शिवथरघळीत दासबोध लेखन केले. अफजलखानाच्या वधाने शिवाजीराजांच्या पराक्रमाने “स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेचि होतसे” असा प्रत्यय समर्थांना आला. या देशाटनातून संघटना, लोकशिक्षण व भक्तीमार्गाचा प्रसार, लोकजागर झाला. समाजात स्वातंत्र्याचा वन्ही चेतवला गेला. परकीय सत्तेविरुद्ध संघर्षाला लोकांची मने, मेंदू, मनगटे तयार झाली. “बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्तान बळावले | अभक्तांचा क्षयो झाला | आनंदवन भुवनी ||” हे स्वप्न सत्यात उतरले.
एक डोळस दृष्टीने केलेले देशाटन म्हणून समर्थांच्या या प्रवासाची इतिहासाला नोंद घ्यावीच लागेल. या देशाटनामुळे स्वातंत्र्यसंग्रामाचे बीज रोवले गेले, व त्यातूनच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांना प्रेरणा मिळाली. इतिहासाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य या देशाटनाने दिले.
“जेथे जावे तेथे राम समागमी | आता कासयां मी खंती करू ||१||
खंती करू ज्याची तो समागमेची | वाहाता सुखाची घडी होये ||२||
होये देव खरा भूमंडळवासी | जातां दिगंतासी सारीखाची ||३||
सारीखाची तो जनी वनी वनांतरी | गिरिकंदरी तो सारीखाची ||४||
सारीखाची तो कडांकपारी पाहाता | राम आठवितां दास म्हणे ||५||”
|| जय जय रघुवीर समर्थ ||