समर्थांचा भक्तीमार्ग – भाग ४ नामस्मरण भक्ती

समर्थांचा भक्तीमार्ग – भाग ४ नामस्मरण भक्ती
श्री. अनिल वाकणकर
  • July 4, 2026
  • 1 min read

आपण समर्थांनी सांगितलेल्या भक्तीमार्गाचे विवेचन करीत आहोत. आतापर्यंत आपण श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती संबंधी विचार केला. आता या लेखात आपण नामस्मरण भक्तीसंबंधी विचार करणार आहोत. 

नामस्मरणाबाबत असे म्हणता येते की, अव्यक्त एकमेव परब्रह्माला ‘एकोऽहं बहुस्याम’ अशी स्फूर्ती झाली. हीच ज्ञानमय, शक्तीमय, आनंदमय, मूळमाया. ही अमूर्तातून मूर्त होते, त्याला दृश्य म्हणतात. या दृश्यातली अनंत रूपे म्हणजे उदा. श्रीगणेश, शंकर, विष्णु इत्यादी रूपे होत. या रूपांना नाम असते. त्याला आठवणे, त्याचा जप करणे, तोच सर्व कर्ता आहे हे समजून उमजून करणे, म्हणजे नामस्मरण. यामुळे नाम व दैवत यांचा संबंध जुळतो. यालाच नाम-नामी संबंध म्हणतात. हा संबंध जुळला की भगवंताशी अद्वैत साधते. जीवाचा धर्मच नामस्मरण करण्याचा आहे. प्रत्येक श्वासाबरोबर नामस्मरण करावे. प्रत्येक व्यवहार त्याच्या स्मरणात करावा. हेच नामस्मरण होय. आपल्याला भावणाऱ्या, आवडणाऱ्या देवतेचे सतत नामस्मरण करणे म्हणजे नामस्मरण भक्ती. नामस्मरण करण्यासाठी अमुक एका देवाचे नाव घ्यावे ही अट नाही. आपल्याला आवडेल त्या कुठल्याही देवाचे निष्काम भावनेने नामस्मरण करावे. समर्थांनी नामस्मरण भक्ती निरूपण या दासबोधातील समासात नामस्मरण भक्तीची व्याख्या अशी केली आहे, 

“स्मरण देवाचें करावें।अखंड नाम जपत जावें।

नामस्मरणें पावावें।समाधान।।४-३-२।।”

नामस्मरणाइतके सोपे साधन कोणतेच नाही. पंचसमासी या लघु प्रकरणामधील भक्ती निरूपण या समासात समर्थ नामस्मरण भक्ती विषयी म्हणतात, 

“ऐक तिसरीची स्थिती।सर्वकाळ आदरे चित्तीं। नाम असावें।।१३।।”

शिवथरघळ येथे दैनंदिन उपासनेत हा श्लोक म्हटला जातो.

“राम राम वद गे सखे जिव्हे। राघवाविण तुझे यश नोहे।

भक्षिसी मधुर तू न ये कामा। राम नेईल तुला निजधामा।।”

तो अतिशय अर्थपूर्ण आहे. मुखातून सतत रामनाम आले तर दुसरे काहीच गोड वाटत नाही. ‘कर्ता राम असावे अभ्यंतरी’ हे मनात ठसले व त्या प्रमाणे आचरण घडले तर प्रत्येक कार्यांत रामनाम मुखात येते. मी कर्ता नसून रामकर्ता आहे ही भावना निर्माण होते. त्यामुळे अभिमानाची, अहंकाराची बाधा होत नाही. नामस्मरण हे अतिशय सोपे साधन आहे. ते कसेही केले तरी त्याचा चांगला परिणाम होतो. वाल्याकोळ्याला राम हा शब्द उच्चारता येत नव्हता, महर्षी नारदमुनींनी त्याला ‘मरा मरा असे म्हटलेस, तरी चालेल’ असे म्हटले. तरीही त्याचा भाव व तपश्चर्या पाहून भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले, त्याचे वाल्मिकी ऋषींमध्ये परिवर्तन झाले. मुलाच्या प्रेमापोटी अजामेळाने अंतसमयी नारायणाचे नाम घेतले त्याला, त्या जन्मात नाही परंतु पुढील जन्मी योग्य उपासनेच्या नंतर उत्तम गती प्राप्त झाली. नामस्मरण भक्तीची वैशिष्ठे पुढील प्रमाणे आहेत. नामस्मरण कुठेही, कधीही करता येते. समर्थ म्हणतात,

“नित्य नेम प्रातःकाळीं। माध्यानकाळीं सायंकाळीं।

नामस्मरण सर्वकाळीं। करीत जावें।।४-३-३।।

सुख दुःख उद्वेग चिंता। अथवा आनंदरूप असतां।

नामस्मरणेंविण सर्वथा। राहोंच नये।।४-३-४||

हरुषकाळीं विषमकाळीं। पर्वकाळीं प्रस्तावकाळीं।

विश्रांतिकाळीं निद्राकाळीं। नामस्मरण करावें।।४-३-५।।”

नामस्मरण करण्यासाठी कुठल्याही विशिष्ट स्थानाचे बंधन नाही. अगदी अंथरूणावर बसून नाम घेतले तरी चालते. मनाची कोणतीही अवस्था असली तरी नाम घेतले तरी चालते. मन नाराज असेल, मनात काही सल असेल रामनामाने त्यावर मेडिटेशन सारखा परिणाम होतो. नामस्मरण करण्याला वयाचे बंधन नाही, बालापासून ते वृद्धापर्यंत कोणीही नाम घेऊ शकतो. धृवबाळाची कथा आपल्याला माहित आहेच. नामस्मरणाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्याला कोणतेही साधन लागत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाला कोणतेही कर्मकांड नाही. समर्थ म्हणतात,

“चहुवर्णा नामाधिकार। नामी नाही लहान थोर।”

नामस्मरण करायला जात, धर्म, पंथ यांचा अडसर येत नाही. नामस्मरणाचे मुख्यत: दोन प्रकार आहेत. पहिला आहे वैखरी वाणीने माळेच्या सहाय्याने जप करणे. दुसरा आहे, अजपाजप. अजपाजप हे नामस्मरणाचे उच्च परिमाण आहे. तो सहज साध्य नाही, परंतु असाध्य देखील नाही. मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सतत श्वास घेतो आणि उच्छवास बाहेर टाकतो. या क्रियेमध्ये जर जप बसविला तर अखंड नामस्मरण चालू राहते. समर्थ म्हणतात, या करिता मनाची एकाग्रता असणे आवश्यक असते. 

“येकांतीं मौन्य धरून बैसे।सावध पाहातां कैसें भासे।

सोहं सोहं ऐसे।शब्द होती।।१७-५-७।।

धरितां सो सांडितां हं।अखंड चाले सोहं सोहं।

याचा विचार पाहातां बहु।विस्तारला।।१७-५-११।।”

शंकराचार्यांच्या कैवल्याष्टक या अष्टकामध्ये ते म्हणतात, 

“दीयतां दीयतां कणों नीयतां नीयतां वच।

गीयतां गीयतां नित्यं हरेर्नामैव केवलम्।।७।।”

अर्थात केवळ हरीचे नाम कानांनी ऐका. वाणीने हरीचेच नाम घ्या आणि या हरिनामाचेच नित्य गुणगान करा. कारण

“हरिः सदा वसेत् तत्र यत्र भागवता जनाः।

गायन्ति भक्तिभावेन हरेर्नामैव केवलम्।।५।।”

ज्या ठिकाणी भक्तजन भक्तिभावाने हरीच्या नावाचे गुणगान करतात, तिथेच भगवान राहात असतो.

“नाम स्मरे निरंतर।ते जाणावे पुण्य शरीर।

माहादोषांचे गिरिवर।रामनामें नासती।। ४.३.२२।।”

ज्याच्या मुखातून अखंड नामजप चालू आहे, तो अतिशय पुण्यवान असतो. नामाच्या एकेका अक्षरातून त्याचे पापांचे डोंगर नाहीसे होतात. नामस्मणाचा मुख्य फायदा आहे, नामस्मरणाने उत्तमगती प्राप्त होते. नामस्मरणाचा हा अध्यात्मिक फायदा झाला परंतु प्रापंचिक दृष्टीने विचार केला तर नामस्मरण हे एक उत्तम मेडिटेशन आहे. नामस्मरणाने चित्ताचा प्रकोप शांत होतो.  नामस्मरणाचे वैशिष्ट्य असे आहे की, रामनामाने जड असणारे पाषाण तरले. माणसाला परमेश्वराने बुध्दीची देणगी दिली आहे, त्याच्या योगे तो आपला उध्दार करू शकतो परंतु अविद्येने अथवा अज्ञानामुळे तो पाषाणासारखा जड झालेला असतो, तो नामस्मरणाने हा भवसागर सहज तरून जातो. नामस्मरणाने मला काय मिळेल हा सर्वसामान्य भक्ताचा प्रश्न असतो. वास्तविक कुठलीही भक्ती कुठलीही अपेक्षा न ठेवता करायची असते, तरीही समर्थांनी नामस्मरणाने काय प्राप्त होते ते सांगितले आहे. ते म्हणतात, नामस्मरणाने अनेक प्रकारची संकटे नाहिशी होतात, विघ्नांचा नाश होतो. उत्तम पद प्राप्त होते. भूत पिशाच्च, ब्राह्मण समंध, आसूरी मंत्रांचा प्रभाव रामनामाने दूर होतो

“कांहींच न करूनि प्राणी।रामनाम जपे वाणी।

तेणें संतुष्ट चक्रपाणी।भक्तांलागीं सांभाळी।।४-३-२१।।”

कुठलीही दुसरी उपासना कर्मकांड न करता केवळ रामनामच घेतले तर त्या भक्ताची चिंता भगवंताला लागते.  नामस्मरण भक्तीच्या समासाचा समारोप करताना समर्थ म्हणतात

“म्हणौन नाम अखंड स्मरावें।रूप मनीं आठवावें।

तिसरी भक्ती स्वभावें।निरोपिली।।४-३-२५||”

अशाप्रकारे सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने मी नामस्मरण भक्ती या बद्दल विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे, तो त्यांनाच अर्पण करीत आहे. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

4.1 13 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
20 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vijay lad
Vijay lad
23 days ago

नामाची महती छान सांगितली

Aparna Wangikar
Aparna Wangikar
Reply to  Vijay lad
23 days ago

नामाची महती उत्तम प्रकारे विषद केली आहे.
सर्वंकष विचार मांडले आहेत.

ज्योत्स्ना निरंतर
ज्योत्स्ना निरंतर
23 days ago

नामाची महती छान सांगितली आहे.

सौ.श्रद्धा लांडगे अमरावती
सौ.श्रद्धा लांडगे अमरावती
23 days ago

समर्थांचा भक्तीमार्ग, खूप छान ब्लॉग आहे.

Vrinda Joglekar
Vrinda Joglekar
23 days ago

नामाचा महिमा छान सांगितला आहेत.
ते घ्यायला सोपे असले तरी सहज घेतले जात नाही. प्रयत्न लागतातच .

सौ. मीनल नं. वैद्य.
सौ. मीनल नं. वैद्य.
23 days ago

अगदी खरे आहे जर सुरवातीला प्रयत्नाने भगवंताला आठवत नाम घेत राहिले तर रात्री झोपताना व जाग आल्यावरही त्याचेच नाम मुखात येते. निरुपण खुप छान केले आहे.

Vinaya Vidwans
Vinaya Vidwans
23 days ago

छानच झाले विवेचन

LochanKate
LochanKate
23 days ago

सुरेख विवेचन आहे

Madhuri Gadgil
Madhuri Gadgil
23 days ago

नामस्मरण भक्तीची महत्त्वाचे छान विषद केली

Shamie Shailesh Harchekar
Shamie Shailesh Harchekar
23 days ago

अप्रतिम विवेचन

Meera Mohan Shete
Meera Mohan Shete
23 days ago

नामस्मरण महती छान विशद केली. कलियुगात नामस्मरण हीच भक्ती सहज शक्य होते.

sunanda
sunanda
23 days ago

नामाचा महिमा छान विशद केला

रेणुका देऊळगावकर
रेणुका देऊळगावकर
23 days ago

नामस्मरणाचा महिमा समजून सांगताना.. श्री शंकराचार्यांचे अष्टक छान सांगितले…

Janhavi Shriram Oak
Janhavi Shriram Oak
23 days ago

नामस्मरण महती खूप छान सांगितली
विशेषत: जिव्हे चे उदा.आवडले

pradip ganorkar
pradip ganorkar
23 days ago

नामाचा महिमा
सुंदर लेख

Madhavi Panse
Madhavi Panse
23 days ago

कर्मकोड न करता नुसते नामस्मरण केले तरी भंगवताला त्या भक्ताची चिंता लागते. छान माहिती

मीरा इनामदार
मीरा इनामदार
23 days ago

नामस्मरणाचे महात्म्य…सुंदर विवेचन.

surekha mahajan
surekha mahajan
23 days ago

शंकराचार्यांचे अष्टक वापरून नामस्पमरण खूप सुंदर रितीने सांगितले छान

मीरा इनामदार
मीरा इनामदार
23 days ago

‘नाम महात्म्य ‘ विवेचन सुंदर..!

nishavghne@gmail.com
nishavghne@gmail.com

नामस्मरणावर सुंदर विवेचन राम नामा वद 👌गे

Language