भाग १ व भाग २ मधील आरत्यांचा जर आपण लेखाजोखा घेतला तर आपल्या हे लक्षात येते की, रामदासांच्या आरत्यांमधून १) तत्वज्ञान; २) नीतिचे विवेचन; ३)भक्तीमार्ग; कर्ममार्ग; ज्ञानमार्ग यांचे संतुलन; ४) काव्य-सौंदर्य छंद ही गुण वैशिष्ट्ये आढळून येतात. त्याचा फायदा घेऊन साधक; भक्त; गृहस्थाश्रमी यांची श्रध्दा, ईश्वरावरील निष्ठा; प्रेम; लोभ वृद्धिंगतच होईल. आपण मग असे म्हणू शकतो की, हाच यामागचा रामदासांचा उद्देश-हेतू असावा. त्यांच्या काही आरत्या सर्वश्रूत आहेत तर काही दुर्लक्षित आहेत. त्यांनी नवरात्री; ज्ञानेश्वर; शांतादेवी; आत्माराम; श्रीदेव; सद्गुरु; कृष्णा नदी; गणपती; हनुमंत; नृसिंह; सूर्य व त्यांचे आराध्य दैवत श्रीराम यांच्यावर आरत्या रचल्या आहेत.
समर्थांनी शांतादेवीच्या दोन आरत्या लिहिल्या आहेत. “कवण अपराधास्तव जननी केला तू रूसवा’ या आरतीमध्ये त्यांची भेटीची आर्तता दिसून येते. ते म्हणतात, मला अनंत चिंतांनी ग्रासले आहे. तू माझी माता-पिता आहेस, तूच जर दूर लोटलेस तर त्या चिंतेतून मला कोण सोडवेल ? हा भवसागर मी कसा तरून जाऊ ? देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय परमार्थ साधणार नाही. देहबुद्धी म्हणजे मी देह आहे. मग त्या देहाचे कोडकौतुक करायचे. परंतु हे विश्व नाशिवंत आहे, फक्त तो परमात्मा अविनाशी आहे. मग जे नाशवंत आहे त्याच्या नादी न लागता जे अविनाशी आहे त्याची कास धरायची. म्हणजे मग ईश्वराचा साक्षात्कार होतो व जन्ममरणाच्या फेऱ्यातून, त्रितापातून आपली सुटका होते.
देहबुद्धी म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या ज्ञान देणाऱ्या म्हणजे ज्ञानेंद्रियांचे पाच विषय गुण होत. या पाच विषयांपासून शरीराचा आराम; मान-सन्मान; नावाचा मोठेपणा यापासून सुख घेण्याला भोग म्हणतात. व ते भोग घेण्यासाठी पदार्थ; रुपये; पैसा; घर; इ. जो संग्रह केला जातो त्याला ऐश्वर्य म्हणतात. जे लोक भोग आणि ऐश्वर्य यात गुंग असतात; रममाण असतात, त्यांना देहबुद्धीचे लोक म्हणतात. ते देहाला, शरिरालाच प्राधान्य देतात. आपल्या कल्याणात कोणती बाधा असेल तर ती आहे भोग व ऐश्वर्य म्हणजे संग्रह याची. कोळ्याच्या जाळ्यात जसा कीटक अडकतो व तो सुटू शकत नाही, तसेच भोग आणि ऐश्वर्यात अडकलेल्या माणसाची स्थिती होते. तो परमात्म्याकडे, त्या साधनेकडे वाटचाल करु शकत नाही. समर्थांना या सामान्य माणसाची चिंता आहे. या संकटातून त्यांना त्याला बाहेर काढायचे आहे, लोकसंग्रह करायचा आहे. आईच्या चरणी सर्वांना लीन करायचे आहे. म्हणून त्या सामान्य माणसाला जागृत करण्याच्या हेतूने येथे ती उपाययोजना केली आहे. सर्वांना ते नि:श्रेयस व श्रेयस यांचे संतुलन साधून परमात्म्याकडे वळवू इच्छितात. आणि म्हणून वेद, शास्त्रे, पुराणे यातील तत्वज्ञानाचा पुरावा देऊन ते सुमती मागतात, बुध्दी मागतात.
श्रीरामदास आई शांतादेवीला शांते असे हक्काने म्हणतात. यात त्यांचे तिच्यावरील अनुराग, प्रेम व्यक्त होते. श्रीआद्य शंकराचार्य याला ‘प्रेमयोग’ असे म्हणतात. त्यात ते भगवंतावरील निस्सिम प्रेम हीच मूलभूत कल्पना मांडतात. यालाच सख्यभक्ती म्हणतात.
शांतादेवीवरील दुसऱ्या आरतीची सुरूवात श्रीसमर्थ ‘नवखणांचा पलंग शांते शोभतो बरा’ म्हणून करतात. नऊ खण ही कल्पना अप्रतिम आहे. या ठिकाणी त्यांनी शांतादेवीला मूळमायेच्या रूपात पाहिले आहे. म्हणजे तिच्यातील शक्ती काम करते. अचेतनांमध्ये वीज, उष्णता, ध्वनी, प्रकाश इत्यादी रूपे घेऊन कार्य करते. सचेतना, प्राण, संकल्प, विचार, कल्पना, वासना या रूपांनी ती कार्य करते. परंतु अज्ञानी व्यक्तीला या शक्तीचा प्रत्यक्ष परिचय होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, या नऊ खणांच्या पलंगावर कार्य करीत ही मूळमाया लोकांना दिसत नाही, जणू ती झोपली आहे. तो पलंग तिला शोभत आहे. पुढे ते म्हणतात की, ‘सुमनांचे परिवारी शांते शयन करा’ म्हणजे तुम्ही सु+मने = शुद्ध मने यांचे मनात, वसतीस्थान करा. सौम्य शब्दात तिला या देह-मंदिरात यायची, ते तिला सर्व भक्त, साधक यांच्या वतीने विनंती करतात. पुढच्या पदात तर ते हक्काने लहान मूल जसे आईला, तू आत्ताच्या आत्ता मला जवळ घेच हे फर्मान सोडते, त्याच हक्काने भक्तजनांची ही आज्ञाच आहे असे सांगतात. पुढे ते म्हणतात, ‘मानस सुखी दशम स्थाने निद्रा हो केली’ म्हणजे त्या शक्तीने ५ ज्ञानेंद्रिये व ५ कर्मेंद्रिये उद्दीपित केली तर मनुष्य प्राणी सुखी होईल. कारण आईने निद्रा घेत तेथेच मुक्काम ठोकला आहे. यामुळे त्या इंद्रियांचे मुख बाह्य पदार्थांकडे न वळता अंतर्मुख होईल व आपोआप इंद्रिय निग्रह होईल व मग शांता ध्यानी राहील. म्हणजे देवीची उपासना आपोआप होईल. चरणी मन एकाग्र होईल. म्हणजे समर्थ वारंवार देहबुद्धितून आत्मबुद्धित प्रवास करा हे सांगतात तेच येथेही आरतीतून सांगत आहेत.
श्री समर्थांनी कृष्णा नदीवर आरती करून आपले तिच्या प्रती प्रेम व्यक्त केले आहे. ते या कृष्णा मातेला सुख, समृद्धीची सरिता म्हणतात. त्यामुळे ती गुणसंपन्न आहे. दु:खाचे निवारण करणारी आहे. ज्याने सर्वस्वाचा, त्याग केला आहे अश्यांसाठी ती चिद्गंगा, भवगंगा आहे. सर्वांना पावन करणारी ती नदी आहे. कृष्णा नदीचा संगम हा हरि व हर यांचाच जणू संगम आहे अशी भावना ते व्यक्त करतात. अशा संगमात जे तन; मनाने स्नानादि कर्मे, अर्घ्य देणे, उपासना करणे करतात व त्या संगमालाच आपलेसे मानतात ते पूजनीय वंदनीय असतात. सद्गुरू आरतीमध्ये श्रीसमर्थांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार संतांना सदगुरू मानले आहे. प्रत्येकाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांचे वर्णन केले आहे. त्यांनी या समाजासाठी आपले आत्मजीवन ओवाळून टाकले आहे, असे प्रतिपादन केले आहे.
मुक्ताबाई म्हणजे ब्रह्मीचा म्हणजे साक्षात स्त्री शक्तीचाच अवतार आहे. त्यामुळेच मला सद्गुरू ध्यान प्राप्त झाले असे ते म्हणतात. ब्रह्मी म्हणजे तू मूळमायेचेच रूप आहेस असे ते म्हणतात. चांगदेवांना तुझे अव्यक्त रूप दिसले.
निवृत्तिनाथांबाबत ते म्हणतात की, त्यांच्यामुळे माझ्यातील अहंभाव गळाला. माझा या संसारातील मोह सुटला म्हणजे माझी देहबुद्धि नष्ट झाली. ‘मी म्हणजेच आत्मा’ हा सोsहंभाव माझ्यामध्ये आला. तुम्ही केलेल्या गायत्रीच्या उपासनेने तुम्हांला आदिनाथांचा म्हणजे साक्षात भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळाला व गहिनीनाथांनी अनुग्रह दिला. शारदामातेने आशीर्वाद दिला. तसा तुम्ही मला द्या. सोपान महाराजांना सुध्दा ते धन्य धन्य म्हणतात.
ज्ञानदेवांबाबत ते म्हणतात, ते तर सद्गुरू. सद्गुरूसारखे दैवत नाही. आपण ज्ञानाचे सुद्धा देव आहात. ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण आहात. आपण विदेही आहात. देहबुद्धी मध्ये निर्माण होणारी कल्पना, बद्ध व मुक्त साधक अशी असते. पण ब्रह्मज्ञानी; आत्मज्ञानी हा देहाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माशी समरस झाल्याने तो भेदातीत व संदेहरहित असतो, म्हणजेच तो विदेही असतो. असे आरत्यांद्वारे समर्थ आपणास सांगतात. पुढील भागात आपण हनुमंत आणि श्रीरामांच्या आरत्यांचा परामर्श घेऊ.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।