“चिंता करितो विश्वाची” या आंतरिक स्फुरणातून समर्थांनी घर, स्वजन, जन, सर्वांचा अगदी नावाचाही त्याग केला. त्यांना रामभक्तीचे वेड लागले होते. पायी प्रवास करत त्यांनी नाशिकच्या काळारामाचे दर्शन घेतले. सगुणमूर्ती चर्मचक्षुंनी पाहिली पण आपल्या अंत:करणात त्याचे आस्तित्व जाणवले नाही. मनातले दुःख हनुमंताला सांगितले. अंतर्मनात अप्राप्य ते प्राप्य करण्याची मनीषा जागी झाली. विद्याभ्यास, ज्ञानसाधनेची प्रेरणा मिळाली. जे तरुन जाण्यास कठीण, मिळण्यास कठीण, जाणायला कठीण, ते तपाने साध्य होते, हे सत्य कळले व त्यासाठी नाशिक जवळ टाकळी येथे समर्थ पोहोचले. शांत जागा, नंदिनी–गोदावरीचा संगम, तेथे एक जुनी मठी, भोवताली निंब, उंबर, वड या वृक्षवल्लींची साथ. असे स्थान तपश्चर्या व साधनेसाठी मिळाले.
“अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणें कांहीं |
तुजविण मज या जगीं पाहतां कोणीच नाही || १ ||
ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा |
विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वील ठेवा || २ ||
युक्ति असेना बुद्धि असेना शांतिवसेना अंगी |
रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी || ३ ||”
असे स्वतःचे आत्मपरीक्षण त्यांनी श्रीरामासमोर ठेवले व त्याच्याशिवाय कोणी नाही याचे स्मरणही करून दिले.
समर्थांनी शके १५४२, रथसप्तमीच्या दिवशी पुरश्चरण व साधना सुरू केली. पंचपंच उष:काली, पहाटे चार वाजता उठून शौचमुखमार्जन; स्नान; मानसपूजा करून ते १२०० सूर्यनमस्कार घालत. नियमित सूर्यनमस्कार घालत असल्यामुळे, शरीर स्वस्थ; बळकट झाले तर मन एकाग्र; प्रभावी व प्रतिकारक्षम झाले. शरीराच्या अंग–उपांगाचे सामर्थ्य वाढले. सूर्योदयाला सूर्याकडे तोंड करून नंदिनी–गोदावरीच्या संगमात उभे राहून त्यांनी गायत्री पुरश्चरण सुरू केले.
गायत्री या वैदिक मंत्राचा यज्ञाशी निकटचा संबंध असल्यामुळे हा पवित्र मंत्र विश्वातल्या शुभ व दैवी शक्तीचे प्रतीक आहे. या गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाने समर्थांचे मन अतिंद्रीय शक्तीचा अनुभव घेत होते. वाक् सिद्धी, संकल्प सिद्धी, भविष्य ज्ञान या शक्ती समर्थांना प्राप्त झाल्या. अंतरंग सूक्ष्म, संवेदनशील झाले.
गायत्री मंत्राच्या जपानंतर समर्थ “श्रीराम जय राम जय जय राम” या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करत. १२ वर्षे, १३ कोटी जपाचा त्यांचा संकल्प होता. परावाणीतून सहज स्फुरलेला हा तारक मंत्र समर्थांना अखंड श्रीरामाच्या अनुसंधानात रहायला सहाय्यभूत ठरला. श्रीरामाचे गुण त्यांच्या अंगी प्रगट होऊ लागले. ‘नाम’ त्यांच्या मनाच्या सूक्ष्म स्तरात पोहोचले. नामस्मरणाने हा ‘महायोग’ ‘अखंड अनुसंधान’ हा ज्ञानयोग व ‘श्रीराम चरित्राचे मनन’ हा भक्तीयोग समर्थांनी अनुभवला व श्रीराम भक्तांचे लालन, पालन, पोषण व रक्षण या कर्मयोगाचा त्यांनी निश्चय केला. नामस्मरणाने त्यांना अनाहत नादाचा अनुभव आला आणि श्रीरामाशी दासपणाचे नाते दृढ झाले. काया–वाचा–मनाने ते श्रीरामाचे झाले.
समर्थ हनुमंताचे सगुण निर्गुण उपासक होते. टाकळीला त्यांनी गोमयाच्या मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. दोघांनी शक्ती, युक्ती, बुद्धी रामरायाकडून घेतली. बालपणापासून मारुतीने त्यांना पदरात घेतले व रक्षण केले. क्रियाशीलता, गतिमानता, शत्रुभयकारक, ईश्वरकेंद्रित वृत्ती हे गुण त्यांनी आत्मसात केले.
१)नि:स्सीम ब्रह्मचर्य व अचाट शरीर बळ,
२)संकटाने विचलित न होणारी निर्भयता,
३)दुष्टाची कपटनीती ओळखून त्याला प्रतिकार करण्याचे बुद्धीचातुर्य,
४)श्रीराम सेवेला समर्पित जीवन
हे चार पैलू हनुमंत व समर्थांच्या जीवनात आढळतात.
समर्थ रोज पाच घरी भिक्षा मागत. प्रत्येकाकडून १ मूठ पीठ असे पाच मुठींच्या पिठाचे ते पानगे करत. श्रीरामाला नैवेद्य दाखवून ग्रहण करत. भिक्षेत शिजवलेले अन्न मिळाले तर झोळी पाण्यात बुडवून पिळून ते अन्न भक्षण करत. चवीवर व बोलण्यावर नियंत्रण असे. समर्थांनी भिक्षेच्या माध्यमातून व्यक्ती, कुटुंब व समाज यांचे निरीक्षण, लोकजागर व संघटन उभे केले. अनेक महंत त्यांना मिळाले. मठ व मंदिरे उभी राहिली, राष्ट्रप्रेम, धर्म प्रेम जागृत केले. रामदासी संप्रदायाचे भिक्षा हे प्रमुख अंग आजपर्यंत चालू आहे. देशाटनात भिक्षेमुळे अवघा देश स्वदेश वाटला. समर्थ रोज शास्त्री बुवांच्या वेदपाठ शाळेत पुराण श्रवण करायला जात. तेथील अनेक ग्रंथ समर्थ आणत व दुपारच्या वेळी या ग्रंथांचा अभ्यास करत असत.
भगवद्गीता तसेच इतर अनेक गीता, वेद, भागवत, उपनिषदे, वेदांत, श्रुती या ग्रंथांच्या अभ्यासाचा उल्लेख त्यानी दासबोध दशक १ समास १ मध्ये केला आहे. समर्थ रात्री ‘वाल्मिकी रामायण’ ग्रंथाचे लेखन करत. शके १५४४ च्या माघ महिन्यापासून शके १५४६ च्या वैशाखापर्यंत रामायणाची ५ कांडे व तीर्थाटनानंतर १५६७ मध्ये उत्तरकांड व १५७१ मध्ये अयोध्या कांडाचे लेखन समर्थांनी केले. रामायणाची पोथी आजही धुळे येथील ‘वाग्देवता’ मंदिरात पाहायला मिळते. त्यातील वळणदार अक्षर पाहून मन थक्क होते. रात्री समईच्या प्रकाशात टोकदार बोरू व शाईच्या साह्याने समर्थ लेखन करत. प्रत्येक अक्षर घडसून, वळवून काढलेले, वाटोळे, सरळ, मोकळे जणू मोतीच एकापुढे एक ठेवले आहेत असे वाटे. काना, मात्रा, वेलांटी अतिशय घोटीव व प्रत्येक ओळ सुटी. हे अपूर्व लेखन पाहून आनंद वाटतो आणि “दिसामाजी कांहि तरी ते ल्याहावे | प्रसंगी अखंडित वाचीत जावे |” यातील मर्म कळते.
समर्थांच्या साधनेची फलश्रुती – “हृदयस्थ नारायण मला प्रेरणा देतो, सांभाळतो, रस्ता दाखवतो” हा अनुभव समर्थांना आला. हृदयस्थ ईश्वर माझ्या बुद्धीचा प्रेरक, मनाचा चालक व देहाची जीवन ज्योत आहे हा त्यांचा दृढनिश्चय पक्का झाला. तपश्चर्येनंतर समर्थ अध्यात्मिक नेतेपदावर आरूढ झाले. ईश्वराचे अस्तित्व त्यांना सतत जाणवत असल्यामुळे निस्वार्थी प्रेम, निर्भयता, निर्दोष साधुत्व, अखंड आनंद यांनी त्यांचे जीवन काठोकाठ भरले. रात्रंदिवस आपल्या हृदय मंदिरात तो आहे, हा विश्वास निर्माण झाला.
उत्तरेकडून येणारे यात्रेकरू समर्थांना उत्तरेकडे चाललेला विध्वंस सांगत असत. तलवारीच्या धाकाने धर्मांतरण होत आहे, धार्मिक व प्राचीन ग्रंथांची होळी केली जात आहे, स्नान संध्या उपासना करण्याचे स्वातंत्र्य नाही, अन्न वस्त्र निवारा नाही, कोणाचा आश्रय नाही, लोकांना कसे जगावे किंवा मरावे हेही कळत नाही; हे ऐकून समर्थांनी देशाटन करण्याचा निर्णय घेतला. बारा वर्षांच्या तपश्चर्येमुळे त्यांचा रक्षणकर्ता प्रभू रामचंद्र आहे, त्याच्या या सेवकाकडे वक्रदृष्टीने पाहणारा अजून कोणी जन्मला नाही हा विश्वास त्यांच्या मनात होता.
१२ वर्षांनंतर, शके १५५४ च्या फाल्गुन शुक्ल पक्षात एक तपस्वी, मुक्त, निग्रही, रामरंगी रंगलेला, जनांविषयी प्रेम व कळवळ असणारा स्वच्छंद बैरागी, रामराज्याच्या निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून बाहेर पडला, तो समर्थ रामदास स्वामी होता.
“ध्यान करूं जातां मन हारपलें । सगुण तें झालें गुणातीत ॥१॥
जेथें पाहे तेथें राघवाचें ठाण । करीं चापबाण शोभतसे ॥२॥
राम माझे मनीं राम माझे ध्यानीं । शोभे सिंहासनीं राम माझा ॥३॥
रामदास ह्मणे विश्रांति मागणें । जीवींचें सांगणें हितगूज ॥४॥”
|| जय जय रघुवीर समर्थ ||