शरीर व मनाची शुद्धी :
समर्थांनी मानव शरीराला घबाड म्हटले आहे. केवळ मानवी शरीराद्वारेच भगवंताची प्राप्ती होऊ शकते. अन्य कोणतेही शरीर या कामास उपयुक्त नाही. म्हणूनच तर “या शरीरा ऐसे यंत्र आणीक नाही” असे समर्थ म्हणतात. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याकरिता स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन दोन्ही आवश्यक आहेत. मन चंचल आहे ही तक्रार तर अर्जुन गीतेमध्ये करतो आणि यावर उपाय म्हणून “अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते ॥ ” असा उपाय भगवंत सांगतात. मन स्वस्थ ठेवायचा अभ्यास करायचा असेल तर मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवायला हवेत. आज आपण शरीर आणि मनाच्या शुद्धीचे उपाय थोडक्यात बघणार आहोत.
मन आणि शरीर :
मन आणि शरीर हे वेगवेगळे नाहीत, ते एकमेकांशी संलग्न आहेत. ते सायकोसोमेटिक आहे. आपले शरीर व मन एकत्रच आहेत. शरीराचा अत्यंत सूक्ष्म भाग मन आहे तर मनाचा स्थूल भाग शरीर आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की मन-शरीर हे वेगळे नाहीत. म्हणून जे शरीरात घडते, त्याचे परिणाम मनात प्रतिध्वनित होतात. आणि जे मनात घडते त्याचे परिणाम शरीरावर पहायला मिळतात. मन जर आजारी असेल तर शरीर अधिक काळ स्वस्थ्य राहू शकणार नाही. शरीर आजारी झाले तर मन अस्वस्थ होईल.
शरीर शुद्धीचे उपाय :
शरीराला जे होते त्याचे परिणाम मनावर आणि मनाला जे होते त्याचे परिणाम शरीरावर होत असतात. आपण जसा आहार घेऊ तसे मन बनते. म्हणून आहारात विवेक बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात आहार, विहार, कर्म आणि निद्रा यांचे योग्य असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
“युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ।। गीता ६-१७।।”
अर्थ – “दुःखांचा नाश करणारा योग तर यथायोग्य आहार आणि विहार करणाऱ्यांना, कर्मात यथायोग्य व्यवहार करणाऱ्यांना तसेच यथायोग्य झोप व जाग्रण करणाऱ्यांना सिद्ध होतो.”
भोजन कसे असावे ? – सत्य आणि न्यायाने मिळविलेल्या धनातून मिळविलेले भोजन असावे. ते सात्विक, पवित्र असावे, स्वादबुद्धी अथवा पुष्टबुद्धीने भोजन करू नये. तर ते साधन बुद्धीने केले जावे. जितके सहज पचेल तेवढेच भोजन घ्यावे. भोजन शरीराला अनुकूल, हलके, आणि मित असावे. भोजन केल्यावर आळस येऊ नये, अशा प्रकारे केलेले भोजन यथोचित, शुद्ध आहार म्हटले जाते. विहार म्हणजे चालणे-फिरणे व व्यायाम. स्वास्थ्यासाठी हितकर असेल तेवढे चालावे, व्यायाम व योगासने देखील योग्य प्रमाणात असायला हवीत.
कर्म :
आपल्या वर्णाश्रमाला अनुकूल, देश, काल, परिस्थितिनुसार शरीर निर्वाहासाठी कर्म करणे आवश्यक आहे. यथाशक्ति कुटुंबियांची आणि समाजाची हित बुद्धीने सेवा करावी. परिस्थितिनुसार जे शास्त्र विहित कर्म आपल्या वाट्याला येईल ते प्रसन्नचित्ताने करावे. याला युक्तचेष्ट म्हणतात.
निद्रा :
झोप इतकीच असावी की जाग आल्यावर निद्रा किंवा आळसाने सतावू नये. दिवसा जागत रहावे व रात्रीच्या मध्यकाली झोप घ्यावी. रात्री लवकर झोपावे व प्रातःकाली लवकर उठावे म्हणजे स्वास्थ्य उत्तम राहिल. उत्तम मनःस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य सकाळी लवकर उठणे व व्यायामाने प्राप्त होते. ह्यातील आहार, विहार आणि निद्रा हे उपाय शरीर शुद्धीचे आहेत. साधकाला शरीर शुद्धीचे उपाय करणे आवश्यक आहे. या शिवाय विचार शुद्धी आणि भाव शुद्धी देखील साधनेसाठी आवश्यक आहे. त्यांची चर्चा आपण पुढे करणार आहोत.
भाव शुद्धी :
साधनेसंबंधी आता आपण भाव शुद्धीवर चिंतन करणार आहोत. साधनेमध्ये भाव शुद्धी सर्वाधिक महत्वपूर्ण आहे. शरीर आणि विचार या दोहोंपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. गरूड़ पुराणात एक सुभाषित येते.
“न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये ।
भावे तु विद्यते देवस्तस्मात् भावो हि कारणम् ।।”
देव लाकडात, पाषाणात किंवा मातीत नसतो, देव भावात असतो म्हणून भावच कारण आहे. ‘भाव तेथे देव’ ही म्हण आपल्याला माहित आहे. माणसाचं जीवन विचाराने कमी तर भावाने अधिक व्यापलेले असते. मनुष्य बुद्धिमान प्राणी जरूर आहे पण त्याचे भाव विश्व त्याच्या बुद्धीवर, विचारांवर मात करते. तुमचे दैनंदिन जीवन व्यतीत करतांना कित्येक वेळा भावना तुमच्या विचारांवर मात करतात. आपण घृणा करतो, क्रोध करतो, प्रेम करतो हे सारे करतांना भावना प्रबळ असतात, विचार तिथे गौण ठरतात.
जीवनातील अधिकांश क्रिया आपल्या भावनांवर अवलंबून असतात. काय होतं की, कधी कधी आपण विचार करून एक निर्णय घेतो पण प्रत्यक्ष कार्य घडतांना वेगळेच कार्य घडते, याला ऐनवेळी आलेल्या भावना कारणीभूत असतात. मी आज क्रोध करणार नाही हे ठरवतो. क्रोध वाईट आहे, पण प्रसंग असा येतो की आपले विचार आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही व नकळत आपण क्रोध करून जातो. भावनेच्या विश्वात जोपर्यंत आपण परिवर्तन घडवून आणत नाही तोपर्यंत विचारांचा उहापोह काहीही कामाचा नाही. म्हणून भावनांना फारच महत्व आहे. भाव शुद्धी फार आवश्यक आहे.
भावाच्या विविध दिशा आहेत, त्यातील चार दिशा महत्त्वाच्या आहेत. अशुद्ध भावांचा उदय याच चार तत्वांपासून होत असतो. हे चार भाव असे –
प्रथम भाव : मैत्री.
द्वितीय भाव : करूणा.
तृतीय भाव : प्रमुदिता अर्थात् आनंदाचा बोध, प्रसन्नता, प्रफुल्लता.
चतुर्थ भाव : कृतज्ञता.
हे चार भाव जी व्यक्ति आपल्या जीवनात आणू शकेल त्याला भाव शुद्धी उपलब्ध होऊ शकेल. ज्याचे जीवनात याचे विपरीत भाव असतील त्याचे भाव अशुद्ध आहेत असे समजावे. कोणते आहेत ते अशुद्ध भाव ? मैत्रीच्या विरूद्ध घृणा किंवा वैर. करूणाच्या विरूद्ध क्रूरता, हिंसा, अदया. प्रमुदिताच्या विरुद्ध उदासी, विषाद, संताप. आणि कृतज्ञतेच्या विरूद्ध अकृज्ञता. आमच्या भावाचे विश्व कोणत्या गोष्टींनी प्रभावित आहे ? आमच्या जीवनात मैत्रीपेक्षा वैर प्रभावी ठरते काय ? क्रोधात शक्ती असते पण मैत्री मध्ये देखील शक्ती आहे. आपण मैत्रीची शक्ती वापरू इच्छित नाही काय ? असे असेल तर आम्ही जीवनाच्या फार मोठ्या लाभापासून वंचित ठरतो. महावीर, बुद्ध आणि येशू यांनी मैत्रीच्या शक्तीला प्रतिष्ठित केले. साधारण मनुष्य जेव्हा शत्रुत्वाच्या भावात असतो तेव्हा तो बलवान असल्याचे त्याला जाणवते. या उलट जेव्हा तो कोणा प्रति शांत किंवा प्रेमाने भरलेला असेल तेव्हा तो त्यापेक्षा कमजोर असल्याचे त्याला आढळते. याचा अर्थ असा आहे की हा मनुष्य जेव्हा शत्रुत्वाच्या भावात असेल तेव्हा तो अशुद्ध भावाने प्रभावित झालेला असतो. असा मनुष्य स्वतःच्या अंतरंगात जाऊ शकत नाही. शत्रुत्व बाह्यकेंद्रित असते. कारण शत्रु बाहेर असतो, आत नसतो. या उलट प्रेम हे हृदयात असते. कोणी असो वा नसो हृदय प्रेमाने भरून राहू शकते. म्हणून प्रेम हे अंतर्केंद्रित असते. मैत्री अंतरकेंद्रित असते. प्रेम हे दिव्याच्या प्रकाशासमान असते. कोणी असो वा नसो दिवा प्रकाश देणारच. प्रेमाची देखील अशीच वृत्ती असते. साधूचे मन प्रेमाने भरलेले असते. समोर प्रेम घेणारा असो अथवा नसो प्रेम ओसंडून वहात असते. प्रेम उचंबळून आले की द्यावे लागते, घेणारा समोर असो नसो, साधूचा स्वभाव प्रेम वाटणे असतो.
साधकाला साधना करतांना या शुद्धींचे भान ठेवणे आवश्यक आहे. या शुद्धी साधणारा साधक लवकर प्रगती करीत असतो. शरीर, मन किंवा भाव शुद्ध नसतील तर साधनेमध्ये प्रगती होणे दुरापास्त आहे.