“नरदेह परम दुल्लभ । येणे घडे अलभ्य लाभ ।
दुल्लभ तें सुलभ । होत आहे ।। दासबोध २०-६-२५ ।।”
मानवी शरीराचा लाभ होणे अतिशय दुर्लभ आहे, पण त्यातच मोक्षाचा लाभ होतो. तो फार दुर्लभ असला तरी या शरीरातच सहजसाध्य आहे. मनुष्य शरीरातच आत्मा अधिक स्पष्ट झाला आहे. कळलेले बोलणे, कालची गोष्ट आज आठवणे, प्रकाश व अंधार यांचे ज्ञान, मर्त्य शरीराच्या सहाय्याने अमृत आत्म्याच्या प्राप्तीची इच्छा करणे, इत्यादी योग्यता असलेले हे शरीर आहे. भगवान शंकराचार्यांनी तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहेत.
१) मनुष्य जन्म, २) मुमुक्षुत्व (मोक्षाची इच्छा), ३) सज्जन संगती.
मनुष्य शरीर ईश्वराच्या अनुग्रहानेच प्राप्त होते. अनेक योनीतून फिरता फिरता पाप-पुण्याची समानता झाल्यावर नरदेह प्राप्त होतो. मनुष्यशरीर निर्माण केल्यावर ईश्वरालाही आनंद झाला कारण या शरीरातच आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य आहे.
“या नरदेहाचेनी कारणे । सच्चिदानंद पदवी घेणे ।
एवढा अधिकार नारायणे । कृपावलोकने दिधला ।।”
या ध्येयसिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे क्रियमाण स्वातंत्र्य माणसाला आहे. जीवनाला सुंदर घाट देण्याचे सामर्थ्य सर्व जीवात आहे, पण अज्ञानाने ते कसे सुंदर करावे हेच कळत नाही. कोणीही मनुष्य उपजत शहाणा असणे दुर्मिळच असते. कारण मनुष्याचा जन्मच अज्ञानावस्थेत होत असतो. मनुष्य पुढे स्वप्रयत्नांनी, संत संगतीने व सद्गुरुकृपेने शहाणपण शिकत जातो. शहाणपण नित्य अभ्यासानेच प्राप्त होते, म्हणून सत्संगतीला जीवनात फार महत्व आहे. सत्संग हा परमार्थाचा पायाच आहे. सत्संगतीशिवाय जीवनात खरी प्रगती होऊ शकत नाही.
“अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती ।”
अवगुण सोडायचे म्हटले तर सोडता येतात व उत्तम गुण अभ्यासाने प्राप्त करून घेता येतात. जो माणूस प्रयत्न करीत नाही, कष्ट करीत नाही, शहाणपण शिकत नाही, उत्तम गुणांकडे दुर्लक्ष करतो, कळूनही त्यांचा स्वीकार करत नाही, तो नेहमी दुर्मुखलेला, चिडचिडलेलाच रहातो. परंतु यातून बाहेर पडायला केवळ आणि केवळ सज्जन संगतीच कामी येते. त्यांच्या सहवासातून, विचारातून मनाचा पालट होण्याचे सामर्थ्य असते.
“संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ।
मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे |।।”
कोणत्याही जीवाचा सत्संगामुळे उद्धार होतो. संत हे परमेश्वराचे अवतार आहेत. संत म्हणजे सत्पुरुष, दोष नसलेले.
“अहंकार नाहीं दुराशा अंतरीं । ममता हे दुरी मोकलीली ।।१।।
मोकलिली भ्रांती शरीरसंपत्ती । वैभव संतती लोलंगता ।।२।।
लोलंगता नसे ज्ञानें धालेपणें । ऐसीं हीं लक्षणें सज्जनाचीं ।।३।।”
जे संत सज्जन असतात ते अहंकार विरहित, आसक्ती विरहित, ममतेपासून दूर, वैभव, संपत्ती यापासून दूर, अनासक्त, अपेक्षा विरहित असतात. संत हे समाजाचे भूषण व वैभव आहे. ते भोगवादापासून समाजाला दूर ठेवून, ईश्वरनिष्ठ करून मोक्षाची सोपी वाट दाखविण्याचे महत् कार्य करतात.
“संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ ।
नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ।।”
संतांचे जीवन आनंदमय असते. सुखच जणू त्यांच्या रूपाने आकाराला येते. त्रिविध ताप नष्ट करून सर्व प्रकारे संतुष्ट जीवन जगण्याची विद्या, कला संतांकडूनच शिकावी. संत श्रीमंत व उदार असतात म्हणून अतिशय दानशूर असतात. यांनी कितीही दिली तरी त्यांची ज्ञानरूप संपत्ती कधीच संपत नाही. सज्जन संगतीत सर्व गोष्टींचे मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था आहे.
संत सज्जनांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी वेद, उपनिषदे, गीता, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगितला. संस्कृत भाषेतील ज्ञान त्यांनी प्राकृत भाषेत सांगून ज्ञानाचे भांडारच सर्वांसाठी खुले केले. याशिवाय अभंग, ओव्या, भारुड, श्लोक, भजने, गवळणी, स्फुटकाव्ये, गोंधळ, जागर, पोवाडे, आरत्या, भूपाळ्या अशा विविध रचनांच्या माध्यमातून समाजावर उत्तम संस्कार व्हावेत या दृष्टीने ते अखंड कार्यरत राहिले. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा इत्यादी ग्रंथातून ज्ञानाची गंगा लोकांना उपलब्ध करून दिली.
आता खरा प्रश्न असा आहे की, या संत साहित्याची, सज्जन संगतीची समाजाला गरज आहे का ? तर याचे उत्तर नक्कीच होय असे आहे. कारण आम्ही फारच भोगसंस्कृतीकडे वळलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट मला मिळायलाच हवी. मी, माझे, माझा प्रपंच, माझे घर, माझी मुले, माझा पैसा अशी लालसा वाढत चालली आहे. प्रसंगी गैरमार्ग जरी अवलंबावा लागला तरी चालेल, पण मला सर्व सोयी मिळायलाच हव्यात. हक्कासाठी माणूस जागृत असतो पण कर्तव्य मात्र विसरतो किंवा त्याला त्याचे महत्त्वही वाटत नाही. ही समाजाची बिघडत चाललेली घडी संत सज्जनांच्या मार्गदर्शनाशिवाय, त्यांच्या विचारांशिवाय बदलणे फार कठीण आहे. श्रीसमर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात सांगतात –
“नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अतिस्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे ।”
अनैतिक मार्गाने मिळवलेले धन शेवटी पापास कारणीभूत होते. संत तुकाराम महाराजही म्हणतात, “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ।।” संतांचे विचार फार मोलाचे असतात पण ज्ञानी जीवांना मात्र पटत नाहीत. त्याला काय होते ? असे सगळे वागतात, असे म्हणून ते आपलेच खरे करतात व आपलेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात.
वास्तविक नरदेह हा देहधारी जीवांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण ईश्वराने मानवाला दोन अलौकिक शक्ती दिल्या आहेत. १) परमेश्वराने माणसाला विवेक करण्याची शक्ती दिली, २) त्याला वैखरी वाणीची देणगी प्राप्त आहे. भगवंताचे नाव घेण्याची व्यवस्था या देहातच आहे. नरदेह मोठे घबाड आहे. ही एक मनुष्यदेहातील महान देणगी आपल्याला लाभली आहे पण विषयात व वासनेत अडकलेल्या जीवाला नरदेहाचे महत्त्व कळत नाही, त्यामुळे चांगला देह (अव्यंग) मिळूनही तो सत्कारणी लागतोच असे नाही. जीवनातील अस्थिरता, चंचलता, भोगलालसा, आसक्ती, स्वार्थीपणा, अहंकार, हव्यास, द्वेष, मत्सर, हेवेदावे, गर्व, मीपणा इत्यादी अनेक दुर्गुण दूर करून आनंदी जीवन कसे जगावे ? प्रपंच करता करता परमार्थही कसा साध्य करावा ? देवाची भक्ती कशी करावी ? खरा देव कोठे आहे ? त्याला कसे ओळखावे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, मनातील शंका, संशय दूर करण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त सज्जनसंगतीतच आहे.
“जगाच्या कल्याणा संताच्या विभूती । देह कष्टविती उपकारें ।” जीवाचे अज्ञान दूर करून त्याचा उद्धार करणे ही तळमळ त्यांना लागलेली असते, पण संतांची थोरवी, महती कळायला पुण्याई लागते हे मात्र खरे ! म्हणूनच मानवी जीवनात सज्जन संगतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
हा देह ईश्वर भक्तीसाठी, परमार्थ साधनेसाठी वापरायचा आहे. साधना नसेल तर या देहाला किंमत नाही. या नरदेहाला साधनधाम म्हटले आहे. या देहाच्या आधारानेच शुद्ध जाणीवरूप असणाऱ्या अंतरात्म्याचा शोध घेण्यात खरे समाधान आहे. सगुणाच्या आधाराने भक्ती करत करत निर्गुण तत्त्व जाणायचे आहे व यासाठी सज्जन संगतीची फार आवश्यकता आहे.
संतांच्या, सद्गुरूंच्या सांगण्यानुसार वाटचाल केली, संतांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवून त्यांच्या बोधानुसार वागत राहिलो तर निश्चितच खऱ्या देवाचे दर्शन घडते. “भाग्य आले संतजन । तेही देवाचे दर्शन ।।” असे श्रीसमर्थांनी अभंगात सांगितले आहे.
“देहादी सृष्टी असू दे खुशाल । हाती असू दे विवेकी मशाल ।
पुढे वाकडे कोण करील कैसे । तनु रोमरोमी आनंद पैसे ।।”
प. पू. डॉक्टर देशमुख काका यांच्या या काव्यातून माणसाने आनंदी जीवन कसे जगावे याचे उत्तम मार्गदर्शन मिळते. या सौंदर्यशाली सृष्टीच्या झळकणाऱ्या पडद्यामागे दडलेला ईश्वरच आहे. ही सृष्टी त्याची वस्तूप्रभा आहे, म्हणून विवेकरूपी मशाल हाती घेऊन सृष्टीमध्ये वावरावे. सगळ्याचा आनंद घ्यावा पण मनाने मात्र कशातच गुंतू नये. ही भगवंताची लीला आनंदाने पहावी. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेली नित्यकर्मे प्रामाणिकपणे, कौशल्यपूर्ण व आनंदाने करावी. प्रपंचही अगदी मनापासून करावा पण मनात मात्र भगवंताशी अनुसंधान असावे. ज्याने हे शरीर दिले, बुद्धी दिली, कार्य करण्यास लागणारी शक्ती दिली, उत्साह दिला, प्रेरणा दिली, त्याचे अनुसंधान अखंड असावे. भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवून प्रेमाने, भावपूर्णतेने केलेली सेवा भगवंतापर्यंत पोहोचते.
“शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ।।”
सर्वसामान्य जनांना संतांच्या संगतीतच खऱ्या देवाचे सामर्थ्य कळू शकते/लागते. संत या चराचरात व्यापून असलेल्या ईश्वराला पाहण्याची दृष्टी देतात. सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना त्रिवार वंदन करूया.
जय जय रघुवीर समर्थ