रामायणातील प्रमुख व्यक्तींची चरित्रे आपण बघत आहोत. रावणाशिवाय रामायण पूर्ण होणार नाही, म्हणून रावणाचे चरित्र आपण पाहूया.
विश्रवा हे अतिशय श्रेष्ठ तपस्वी महर्षि पुलस्त्य यांचे पुत्र. विश्रवा यांनी सुमालीची मुलगी कैकसी या असुर कन्येशी विवाह केला. कैकसी विश्रवा यांच्या गळ्यात पडली, त्यामुळे ऋषींना कैकसीशी लग्न करावे लागले. त्यांना ४ मुले झाली त्यापैकी बिभीषण वडिलांवर गेला. तो पूर्ण सात्त्विक होता. दुसरा रावण हा रजोगुणी, आईप्रमाणे कामुक व वडिलांप्रमाणे तपोनिष्ठ. तिसरा कुंभकर्ण, तो तमोगुणी होता. चौथी मुलगी शूर्पणखा. ती आईप्रमाणे पूर्णपणे कामुक. तीनही मुलांना वडिलांनी गोकर्ण महाबळेश्वरला तपासाठी पाठविले. तिघांनीही घोर तप केले.
तपाने शक्तीसंचय होतो. जीवनात तपाला फार महत्त्व आहे. रावणाची शक्ती तपाने वाढली. पण त्याची वृत्ती शुद्ध नव्हती. त्याने ब्रह्मदेवाकडे अमरत्व मागितले. ते शक्य नाही हे पाहून रावण म्हणतो, मला देव; दानव; गंधर्व; यक्ष यांच्यापासून मृत्यू येऊ नये. नर व वानर हे त्याच्या खिजगणतीतही नसल्यामुळे त्याने या दोघांचा उल्लेख केला नाही. कुंभकर्णाने आराम मागितला. सहा महिने झोप, म्हणजे खा-प्या-मजा करा ! एक दिवस सदस्यत्व टिकवण्यासाठी संसदेत सही करायला जायचे. बिभीषणाने भक्ती मागीतली, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यावर रावणाने कुबेरावर स्वारी करून सोन्याची लंका मिळविली व पुष्पक विमानही घेतले. सर्व राजांना पराभूत करून रावणाने स्वर्गावर स्वारी करून देवांना अंकित केले. बुद्धीची देवता गणपतीला गाढवे वळायचे काम दिले. वायूदेवांना रस्ते झाडायचे काम दिले. अग्निदेवांना कपडे धुवायचे काम तर शनीला सिंहासनाच्या खाली पालथे निजवले. रावणाकडे शास्त्रबळ व मंत्रबळ मुबलक होते. मुळात रावण प्रकांड पंडित होता. लवकरात लवकर प्रसन्न होणारे महादेव आहेत हे जाणून त्याने कैलास पर्वतासहित महादेवांना उचलायचा प्रयत्न केला. अर्थात रावण महादेवांपुढे हरला. एकदा पार्वतीच्या इच्छेखातर कुबेराच्या मदतीने महादेवाने एक राजवाडा बांधला. त्याची वास्तूशांत रावणाने केली व दान दक्षिणा म्हणून मला हा राजवाडा आणि पार्वती द्या अशी मागणी केली. याला म्हणतात रावणीवृत्ती !
रावणाइतका अत्याचारी व महापापी दुसरा नाही. दुसऱ्याची संपत्ती व स्त्रिया लुटणे हाच रावणाने आपला धर्म मानला होता. रावणाने आपले हस्तक संपूर्ण भारतभर पेरले होते. असंख्य लोकांना रावणाने लुटले होते. त्याच्या जाचाला कंटाळून कितीतरी महिलांनी स्वतःला जाळून घेतले होते. रावण म्हणजे चंगळवादी मनोवृत्ती !रावणाला जेरीला आणणारे दोन जण होते.
१. वाली – एकदा वालीने रावणाला तबेल्यात उलटे टांगून ठेवले होते.
२. दत्तभक्त सहस्त्रार्जुन – सहस्रार्जुनाने त्याला सहा महिने तुरुंगात टाकले होते.
रावणाच्यावेळी पापाचे साम्राज्य सगळीकडे वाढले होते. गोहत्या होत होत्या. वनवासी लोकांवर अनेक अत्याचार करत त्यांची संपत्ती हडप करावी, बायकांना उचलून न्यावे, त्यांची अब्रू लुटावी असे अनेक दुष्ट प्रकार चालू होते. म्हणून सर्व देवांनी, पृथ्वीने; भगवान श्रीविष्णूची प्रार्थना केली व भगवंतांनी अयोध्येमध्ये रामावतार घेतला.
“परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥”
साधुसज्जनांचे रक्षण व दुष्टांच्या विनाशासाठी भगवंताचा अवतार होतो. वाल्मिकी रामायणामध्ये रावणाला १ डोके व १० हात असे वर्णन आहे. पण १० डोकी व २० हात असणे शक्य नाही. दशानन म्हणजे १० डोकी नसून १० शिरांच्या बरोबरीचा, १० प्रकारे विचार करणारा,१० कामे एकदम करणारा. रावणाची बहीण शूर्पणखाचा पती विद्युत्जिव्ह याचा मृत्यू रावणाच्या हातून होतो. भावाने विधवा केले म्हणून शूर्पणखा लंकेत येते. तिला रावण १४ हजार फौजेसह खर, दूषण, त्रिशिराबरोबर जनस्थानात ठेवतो. ती रामाला पहाते व कामांध होते. रामाशी लग्न करायला निघते. शेवटी लक्ष्मण तिचे नाक-कान कापतो. ती लंकेत जाते व अत्यंत कामी असलेल्या रावणाजवळ सुंदर सीतेचे वर्णन करते. त्याप्रमाणे रावण दंडकारण्यात साधू बनून येतो व सीतेला पळवून लंकेत आणतो. अशोकवनात अक्राळ-विक्राळ राक्षसींच्या कडक पहाऱ्यात तो सीतेला ठेवतो. तिचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न करतो. पण करारी, तपस्विनी सीता बाणेदारपणे त्याला प्रत्युत्तर देते. एकदा रामाचे रूप घेऊन सीतेपाशी गेल्यावर त्याच्या मनातले कामच नष्ट होते. कोणत्याही स्त्रीच्या मनाविरुद्ध जवळीक केलीस, बलात्कार केलास तर तुझे तुकडे तुकडे होतील, असे सीता म्हणते; म्हणून तो सीतेवर बलात्कार करू शकला नाही. एकदा, रामाचे मायावी शिर घेऊन तो सीतेला दाखवतो. बिचारी सीता रडू लागते, रावणाला म्हणते माझ्या माहेरचे कोणी नाही, तूच माझा भाऊ समजून; मला सतीची वस्त्रे आणून दे. क्षणभर रावणालाही दुःख होते. सासरे, बायको मंदोदरी, बिभीषण, कुंभकर्ण इ. खूपजण त्याला समजावतात की सीतेला परत कर व लंकेला वाचव. पण रावणाला ते पटत नाही व युद्धासाठी राम लंकेत येतो.
एकदा आधी वनवासात असताना राम रामेश्वरची स्थापना करतात. त्यावेळी आचार्य म्हणून रावण येतो. पूजा झाल्यावर राम सीता आचार्यांना वंदन करतात. रावण आशीर्वाद देतो. ज्या हेतुने पूजा केली तो हेतु सफल होणार. राम विचारतो दक्षिणा काय देऊ ? रावण म्हणतो, अरे वनवासी; तू काय मला दक्षिणा देणार ? पण माझ्या अंतिम क्षणी तुम्ही दोघे भाऊ माझ्यासमोर उभे रहा.
सीतेचा शोध घेत, समुद्रावर सेतू बांधून राम लंकेत आले. रामाने अल्पावधीमध्ये एवढी अफाट वानरांची मने एकमेकांना जोडून जी सेना उभी केली व समुद्रावर जो सेतू बांधला त्याचे रावणाला खूप आश्चर्य वाटले. रामाने रावणावर विनाकारण आक्रमण केलेले नाही. दुसऱ्याच्या धनाचा अपहार करणाऱ्या, महर्चा वध करणाऱ्या, तामसी, निर्लज्ज, कामूक, व्याभिचारी, न्याय-अन्याय यांचा विवेक नसलेल्या, स्त्रीच्या शीलाची कल्पनाच नसलेल्याला मारण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते सर्व नैतिकच होते, तेच रामाने केले. एकंदर ८७ दिवस युद्ध झाले. रावणाची सर्व मुले, जावई, भाऊ, आप्तस्वकीय युद्धात ठार झाले. ७५ दिवसानंतर रावण सर्व शक्तीनिशी युद्धाला निघाला. सरळ सरळ दोन शक्तींची टक्कर म्हणजे राम रावण युद्ध !
समुद्राला, आकाशाला जशी काही उपमा नाही तसे राम-रावण युद्ध अनुपमेय ! दोघेही तुल्यबळ. शेवटी अगस्ती ऋषींनी दिलेला बाण रामाने सोडला व महापराक्रमी रावण खाली कोसळला. मरण्यापूर्वी रावणाने रामाला विचारले की, रामा, मी सर्व बाबतीत श्रेष्ठ आहे, कुळाने, बुद्धीने, धनाने, पराक्रमाने, राजा म्हणूनही श्रेष्ठ आहे तरी हा फरक का ? राम म्हणाला बरोबर आहे तू ब्राह्मण आहेस पण तू तुझ्या भावाला लाथ मारून हाकललेस, मी माझ्या भावासाठी १४ वर्ष वनवासात आलो व तो भाऊ माझी येण्याची वाट पहात आहे, हाच दोघात फरक आहे. रावण पडल्यावर मंदोदरी बघायला येते की, इतक्या शूर पराक्रमी माझ्या नवऱ्याला कोणी मारलं ? रामाने एका स्त्रीची पडछाया पाहिली व म्हणाला, नमस्कार आई ! आपण कोण आहात ? ती म्हणते, तुझ्यात काय आहे जे माझ्या पतीत नाही ते पाहायला आले !
“मना सांगपां रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले ।
म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी ।
बळे लागला काळ हा पाठीलागी ।।”
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुंदर
रावणाचे व्यक्तिमत्व छान उकलून सांगितले आहे. धन्यवाद!
छान उपयुक्त दशानन अर्थपूर्ण रजोगुणी माणसं मनाने अस्थिर असतात त्यांचा एकही विचार स्थिर नसतो निश्चय दृढ नसतो.
अभ्यासपूर्ण लेख, ज्ञानात भर पडली
अभ्यासपूर्ण लेख ! निलाताई नमस्कार !
अतिशय सुरेख रावणाचे व्यक्तीमत्व साकारले आहे.राम व रावणाचे वेगळेपण छान अधोरेखित केले आहे