सरळ अर्थ – अर्भक आईच्या पोटातून बाहेर येते आणि आईशी जोडलेली नाळ कापली जाते, तेव्हा ते बालक स्वतंत्र श्वास घेते. मृत्यूलोकी पहिला श्वास घेतला की तुटलेल्या नाळेसोबत पुर्वस्मृतींशी असलेला संबंध देखील तुटतो. आतापर्यंत सोऽहं म्हणणारा जीव कोऽहं म्हणू लागतो, जोरात रडू लागतो. पुढे जीवनभर अनेक प्रकारचे उद्योग/खेळ करायचेच असतात. ते करीत असताना जर ‘हरे राम’ हा सोपा मंत्र मुखी असेल तर जीवनातील दुःखे सुसह्य होतील व जीवाचे कल्याण होईल.
श्रीसमर्थांचा बोध – श्रीराममंत्राचे हे जे श्लोक आहेत, ते ग्रंथराज दासबोधाच्या तिसर्या दशकातील एकेका समासाचे सारांशरूप आहेत. जिज्ञासूंनी दासबोधातील हा तिसरा दशक जरूर वाचावा. माणसाच्या जीवनाची ही चित्तरकथा आपल्या प्रत्येकाच्याच अनुभवाची आहे. प्रत्यक्ष आपला जन्म आपल्याला आठवत नसला तरी, प्रत्यही आपल्यासमोर ते घडते आहे, दिसते आहे आणि तरीही आपण त्यातून काहीच धडा घेणार नसू, तर आपल्यासारखे करंटे आपणच. विष घेतल्यावर मरण येते हे सर्वांना माहित असते. म्हणून स्वतः विष घेऊन बघायची गरज नसते ! हे तसेच आहे. जन्माला आल्यानंतर पालक त्या बालकाचे लाडकोड पुरवितात. त्याला जोजवतात, खेळवतात, लालन-पालन करून त्याला सक्षम बनवतात. पुढे हेच बालक आपल्या कर्तृत्वाने आपल्याच पालकांना वेगळ्याप्रकारे खेळवते. हे आपण अनुभवतो. दुसरीकडेे विश्वमोहिनी माया सुद्धा त्याला नाना प्रकारे खेळवत असते. आपल्या प्रभावाखाली ईश्वराचा विसर पाडते. जीवाला ईश्वरापासुन दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी विषयांची, विकारांची अनेक खेळणी तीच माया याच्यासमोर टाकतअसते. खेळण्यांच्या या चकचकाटाला, झगमगाटाला माणूस भूलतो. त्यांच्याशी खेळताना भान हरपतो आणि भगवंतापासून कोसो दूर जातो. असे होऊ नये यासाठीच श्रीसमर्थ म्हणतात, “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.”
“दिसंदिस मातापिता बंधु जाणे।परी रोग नाना करी तेथ ठाणें।
जरी दैवयोगें पुढें वाचला रे।हरे राम हा मंत्र सोपा जपा रे।।२९।।”
सरळ अर्थ – जन्मानंतर दिसामासाने बालक मोठे होत असते, तसतसे प्रथम आपल्या आईला व नंतर वडिलांना आणि घरातील अन्य सदस्यांना ओळखू लागते. सहवासाने प्रेम वाढते, जवळीक साधली जाते. बाळ थोडे मोठे होते. बरोबरीचे सवंगडी जमतात. सर्वकाळ काही सुखाचा नसतो. दात पडतात,पोट खराब होते, आजारपण येते. त्यातून कर्मधर्म संयोगाने निरामय स्थिती प्राप्त होते. भगवंताचे स्मरण मात्र होत नाही. तेव्हा आता तरी “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे,” असे श्रीसमर्थ सांगतात.
श्रीसमर्थांचा बोध – आपण यापूर्वीच्या श्लोक निरूपणात बघितले की, हे श्लोक दासबोधाच्या तिसर्या दशकातील जन्मदुःख निरूपणाच्या एकेका समासाचे साररूप आहेत. प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या परिस्थितीतून जावे लागते. आपला जन्म कसा होतो याचा आढावा श्रीसमर्थ येथे घेतात. कारण आपण मागचे सर्व विसरतो. आपल्याला त्याची जाणीव श्रीसमर्थ मुद्दाम करून देतात की, ज्या देहाचे आपण भरपूर कोडकौतुक करतो तो देह मुळात किती घाण आहे, वरवर स्वच्छतेचा आव आणला तरी आतून ते नरकाचे पोतडेच कसे असते ? प्रत्यक्ष जन्माला येताना आईबरोबर बाळालासुद्धा मोठ्या दिव्यातून जावे लागते, यातना सोसाव्या लागतात. बरं नंतर तरी सुख लागावे, तेही नाही, पुढे होणाऱ्या आधी-व्याधींचे वर्णन सुद्धा श्रीसमर्थ विस्ताराने करतात. हे समजल्यावर तरी या देहाचे आकर्षण कमी व्हावे, देहबुद्धी कमी होऊन,माणसाची आत्मबुद्धी वृद्धिंगत व्हावी आणि माणुस ईश चिंतनाला लागावा. या ओव्या किंवा हे श्लोक माणसाने निराश व्हावे म्हणून नाहीत तर वास्तवाचे ज्ञान व्हावे, विषयविकारात न गुंतता भगवद्भक्ती करून जन्म-मृत्यूच्या दुष्ट चक्रातून स्वतःची सुटका करून घ्यावी याकरीता लिहिलेले आहेत. म्हणूनच श्रीसमर्थ पुन्हा पुन्हा सांगतात “हरे रामहामंत्र सोपा जपा रे.”
“करी लग्न मुंजी पितामाय त्याचें।करी शाहणा मारुनी रूप साचें।
करी पोटधंदा भला चांगला रे ।हरे राम हा मंत्र सोपा जपा रे।।३०।।”
सरळ अर्थ – बालक हळूहळू मोठा होते. त्याकाळात यथासमयी आई-वडिल बालकाची मुंज करून व्यावहारिक शहाणपण यावे म्हणून शालेय शिक्षणासाठी गुरूगृही/गुरूकुलात पाठवत असत. शिक्षण घेऊन परतल्यानंतर तो पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आपल्या उदरभरणासाठी सांभाळू लागतो. यथावकाश माता-पिता त्याचा विवाह करून देतात.या सगळ्यात नामस्मरण कसे करणार ?
श्रीसमर्थांचा बोध – आज मूल दोन अडीच वर्षाचे होते तोच ‘नर्सरी’, ‘प्लेगृप’ ला अडकवले जाते. श्रीसमर्थांचा काळ चारशे वर्षांपूर्वीचा. माणसाला चाकरमानी बनवणारे शालेय शिक्षण तेव्हा सुरू झाले नव्हते. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे आईवडील योग्य वयात मुलाची मुंज करून देत व त्यानंतर गुरूकुलात शिक्षणासाठी पाठवले जाई. तेथे विद्यार्थ्याला कठोर परिश्रम, सेवा, एक प्रकारे तप करून विद्यार्जन करावे लागे. बालकाच्या कुवतीप्रमाणे आणि गरजेनुसार वैदिक, व्यावहारिक, तांत्रिक, कलात्मक असे शिक्षण दिले जात होते, जीवनात सक्षम बनवले जात होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरी परतल्यावर आपापला पारंपारिक व्यवसाय तो करू लागे. त्यावेळी आजच्यासारखा ‘बेरोजगारी’ नावाचा महाराक्षस जन्मालाच आला नव्हता. यथावकाश माता-पिता योग्य वधू पाहून त्या मुलाचे लग्न लावून देत व त्याचा गृहस्थाश्रमात प्रवेश झाला की, येथे आई-वडिलांची जबाबदारी संपून ते देव-धर्मकार्य करण्यासाठी उद्युक्त व्हावेत अशीही समाजरचना होती. पण..
माणूस विषय सोडायला तयारच होत नाही. या सगळ्या चक्रात इतका गुरफटून जातो की, देवाची आठवण करायला वेळच मिळत नाही. नव्हे, त्या भ्रामक सुखात गुंतल्यामुळे त्याला देव आठवत नाही. दुःखाच्या प्रसंगी मात्र पहिला देव आठवतो. या श्लोकातून श्रीसमर्थ सांगतात की, अशी वेळ येण्यापूर्वीच प्रत्येकाने “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे” चा जप करावा.
।।जय जय रघुवीर समर्थ।।
राम मंत्र सोपा का घ्यावा छान विवरण
खूपच सुंदर! श्रीराम मंत्र हा सोपा!! त्याचे निरूपण नेमक्या शब्दात मांडले आहे.
तिसऱ्या दशकातील स्वगुण परिक्षेचे चारही समास. वाचनीय आहे.
श्री राम
निरूपण उत्तम केले आहे. परंतु सुरवातीचा श्लोक क्रमांक २८ लिहायचा चुकून राहिला असं दिसतंय.
सुंदर विवेचन