राम मंत्र श्लोक २५-२६-२७

राम मंत्र श्लोक २५-२६-२७
सौ. स्नेहल पाशुपत
  • July 25, 2026
  • 1 min read

दशग्रीव लंकापुरीं मस्त जाला।अकस्मात गेला पुरीमाजि घाला।

चिरंजीव दे राज्य बीभीषणा रे।हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे।।२५।।” 

सरळ अर्थरावण जो अत्यंत विद्वान, प्रकांड पंडितनिस्सीम शिव भक्त, ज्याच्या राज्यात भौतिक सुखे ओसंडून वहात होती, ज्याची प्रजा त्याच्यावर खूष होती असा यशस्वी राजा. त्याची सुवर्णनगरी लंका वैभव-ऐश्वर्य युक्त, त्याबरोबरच अभेद्य संरक्षण कवच लाभलेली होती. केवळ प्रचंड अहंकार, ‘आणखी हवेचा हव्यास, अनैतिकता आणि दुसऱ्याचे ओरबाडून घेण्याची आसुरी वृत्ती यामुळे चौदा चौकड्यांचे रावणाचे राज्य अकस्मात सारे रसातळाला जाते, आणि सदाचारी, रामभक्त बिभीषणाला ते राज्यपद त्याबरोबरच चिरंजीवपद अनायासे मिळते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात हरे राम हा सोपा मंत्र अखंड जपावा हेच खरे.

श्रीसमर्थांचा बोधदशग्रीव रावण सुवर्ण लंकानगरीचा अधिपती, महातपस्वी, महादेवाचा अनन्य भक्त, प्रकांड पंडित, ज्ञानी, शूर-वीर, एवढ्या गुणांनी युक्त होता. रावणाचे राज्य सुख समृद्धीने परिपूर्ण होते. सर्वच भौतिक सुखे रावणाच्या लंकेत होती. ही एक बाजू, तर त्याबरोबरच अहंकार; दंभ; दर्प; हव्यास; अनैतिकता; व्यसनाधीनता; त्याची घमेंड या मुळे काळवंडलेली दुसरी बाजू. समोरच्याला तुच्छ समजणे, दुसऱ्याच्या अंतःकरणाचा विचार न करता मला हवे ते येनकेन प्रकारेण मिळवणे व उपभोग घेणे, हीच ती रावणी वृत्ती; त्याच्या सर्वनाशाला कारणीभूत झाली. त्याचे राज्य श्रीरामभक्त बिभीषणाला चिरंजीवपदासह न मागता मिळाले. आजही ही वृत्ती संपलेली नाही. आपल्या आजूबाजूला ही वृत्ती फोफावताना दिसते आहे. याच वृत्तीने समाजाची अधोगती होत असते. श्रीसमर्थ या श्लोकातून हेच समजावून सांगतात की, वर वर पहाता अनीतीने लाभलेली सुखसमृद्धी शेवटी दुःख पर्यवसानीच ठरते. पापाचा एक अटळ नियम आहे. त्याचे परिणाम कधी ना कधी भोगावेच लागतात. आज जास्तीतजास्त लोक व्यसनाधीनता, निद्रानाश, मानसिक अशांती, अपचन, रक्तदाब, मधुमेह, आम्लपित्त, इ. रोगांनी ग्रस्त असलेले दिसून येतात. त्याचे दुष्परिणाम होण्यापूर्वीच प्रत्येकाने सावध व्हावे, आपला रावण होऊ नये याची काळजी घ्यावी. म्हणजे काय करायचे, तर “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे.”

अधोमूख विष्ठेमधें मायपोटीं।पचे पिंड हा सोसुनी दुःख कोटी।।

स्मरेना कशी लाज नाही तुला रे।हरे राम हा मंत्र सोपा जपा रे।।२६।।”

सरळ अर्थमाणसाच्या जन्माचे सोहळे साजरे केले जातात; पण जन्मापूर्वी आईच्या गर्भात तो जीव हाल हाल सोसत असतो. ते अर्भक नऊ महिन्यांपर्यंत अक्षरशः खाली डोके वर पाय असे उलटे टांगलेले असते. त्या अंधारकोठडीत कोंडलेला जीव तळमळत असतो व देवाला विनवीत असतो माझी लवकर येथून सुटका कर रे देवा, मी तुझाच अंश आहे (सोऽहं). बाहेर पडल्यानंतर मी स्वतःचे कल्याण करून घेईन. मात्र बाहेर येताच या मृत्युलोकाचा वारा लागतो आणि देवाला दिलेले वचन जीव विसरतो. कोण मी(को ऽहं) म्हणत त्याच चक्रात अडकतो. श्रीसमर्थ म्हणतात, परतपरत त्याच चक्रातून फिरताना लाज कशी वाटत नाही ? आता तरी हरे राम या सोप्या मंत्राचा जप कर आणि कल्याण साधून घे.

श्रीसमर्थांचा बोधश्रीसमर्थ  दासबोध ग्रंथातील जन्मदुःखनिरूपण समासात मानवी जन्माचे, त्याच्या दुःखाचे अगदी तपशिलवार, सविस्तर वर्णन करतात. वाचताना अंगावर काटा येतो. स्वतःची किळस वाटते, शिसारी येते. जन्म दुःखाचा अंकुर, शोकाचा सागर, भयाचा डोंगर, काळाची जाचणी, कुविद्येचे फळ म्हणत म्हणत शेवटी जन्म हा अतिकुश्चिळ नर्कपतन असे म्हटले आहे. आईच्या गर्भात जीवाला होणाऱ्या यातनांचे श्रीसमर्थांनी केलेले वर्णन वाचले तर आपलीच आपल्याला घृणा वाटते. आईचे मल-मूत्र-वमन रूपी पाणी जे जठराग्नीच्या उष्णतेने गरम झालेले असते, त्या पाण्यातच जीव नऊ महिन्यांपर्यंत पोसला जातो. त्यातच गुदमरून कासावीस होतो. 

मनोबोधातही श्रीसमर्थ वर्णन करतात –

बहू हिंपुटी होइजे माय पोटीं।

नको रे मना यातना तेचि मोठी। 

निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं। 

अधोमूख रे दुःख त्या बाळकासीं।।”

त्याही परिस्थितीत जीवाला देवाची आठवण असते. गर्भोपनिषदात असे म्हटले आहे की, गर्भाशयातील जीवाला आत्मसुखाचे भान असते. म्हणूनच तो देवाला विनवतो सोऽहं, मी तुझाच अंश आहे. देवा येथून सुखरूप सुटका कर मी तुझे सदैव ध्यान करेन, चिंतन करेन आणि स्वतःची सुटका करून घेईन पण, जन्माला येताच दुःखरूप जगाचे वारे लागल्याबरोबर सारे विस्मृतीत जाते. कोऽहं, कोण मी चा उद्घोष सुरू होतो. विषय-विकाराची-मोहाची कोमल झुळूक नकळत मोहात अडकवते, देवाचे विस्मरण होते आणि या मृत्युलोकातील जीवनाची सुरवात होते ती मृत्यूच्याच दिशेने. श्रीसमर्थ या श्लोकातून सांगतात की, जितक्या लवकर देवाचे स्मरण केले जाईल तेवढे लवकर जन्माचे कल्याण होईल. त्यासाठी एकच गोष्ट प्रामुख्याने करावी. ती म्हणजे “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.”

असे भोगुनि पंचचत्वारि मासी।पुढें दैवयोगें सख्या जन्मलासी।।

कसा वीसरे ध्यान सोहं पुढें रे।हरे राम हा मंत्र सोपा जपा रे।।२७।।”

सरळ अर्थया आधीच्या श्लोकात वर्णन केलेले गर्भावस्थेतील दुःख नऊ महिने सहन केल्यानंतर नाना दिव्य पार करत शेवटी हा दुर्लभ मनुष्यजन्म/नरदेह मिळतो. मात्र माणूस, गर्भात असताना आठवणारा सोऽहं चा जप; जन्म घेताच विसरून जातो आणि को ऽहं म्हणत आपणच आपले अनहित करून घेतो. आपले खरे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर सदा सर्वदा “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.”

श्रीसमर्थांचा बोध – “जन्म घ्यावा लागे । वासनेच्या संगे” या नुसार जन्माला येण्यापूर्वी प्रत्येकच जीव गर्भवासाचे असहनिय दुःख भोगत असतो. आपापल्या कर्मानुसार आणि पुर्वसुकृतानुसार त्या त्या योनीची निवड होते. गर्भवासाचा कालावधीही वेगवेगळा असतो. मानवी/नरदेह धारणेसाठी पंचचत्वारीम्हणजे नऊ महिन्याचा कालावधी लागतो. त्या अवधीत त्या जीवाला अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागतात. दासबोध द. ३ स. १ मध्ये याचे सविस्तर वर्णन श्रीसमर्थ करतात. गर्भोपनिषदात असे म्हटले आहे की, गर्भाशयात जीवाला आत्मसुखाचे भान असते, व म्हणुनच तो जीव भगवंताची करूणा भाकतो. सोऽहं मी तुझाच अंश आहे, म्हणत या त्रासातून लवकर; सुखरूप सोडव; मी माझे कल्याण करून घेईन असे भगवंताला आश्वासनही देतो. अनेक दिव्यातून पार पडत दैवयोगाने जन्माला येतो मात्र, मृत्युलोकाचा वारा लागतो, विषय-विकाराची थंडगार झुळुक अंगावर येते, त्या क्षणी भगवंताला दिलेले आश्वासन, सोऽहंचे ध्यान विसरतो आणि जन्म-मृत्युच्या चक्रात फसतो. कोऽहं – कोऽहं चे गाणे गाऊ लागतो. बालपण नेणताजाते. पुढे सर्वच संत जीवाला जागे करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतोच, भौतिक सुखाची चटक लागते, संतांच्या सांगण्याकडे लक्ष दिले जात नाही. श्रीसमर्थ या श्लोकातून हेच सांगतात की, दुर्लभ असा नरदेह लाभला आहे त्याचे सार्थक करायचे तर एकच प्रभावी उपाय आहे. “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.”

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

5 3 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Language