राम

राम
श्रीमती नीला अभ्यंकर
  • July 11, 2026
  • 1 min read

रामकथा कोणाला माहित नाही ? सर्वाना माहित आहे. राम हे केवळ राजपुत्राचे नाव नाही तर राम हा आपल्या संस्कृतीचा प्राण आहे. राम म्हणजे जीवन, जिवंतपण !! ज्याच्यात काही राम नाही म्हटल्यावर ती वस्तू सगळी बेकाम. राम राम म्हणजे अभिवादन, रामबाण म्हणजे अचूक, अमोघ. रामराज्य म्हणजे न्यायाचे राज्य. आपलं वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन उजळून टाकण्यासाठी राम कथा वाचणे व आचरणात आणणे आवश्यकच आहे.

समर्थ म्हणतात, कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा कौरव-पांडव, माधवाची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची समस्तांमध्ये गोड कथा राघवाची ! सर्वोच्च गुणांचा समुच्चय म्हणजे रामाचे चरित्र होय. राम चरित्राइतके पवित्र चरित्र जगात क्वचितच पहायला मिळेल. दोष काढायचे म्हटले तरी दोष पहायला मिळणार नाहीत. रामाच्या कोणत्या गुणांचे वर्णन करावे हेच समजत नाही. उत्कृष्ट राजा की उत्तम योद्धा ? उत्कृष्ट कर्मयोगी म्हणून स्तुती करावी ? कोणतेही संकट आले तरी न डगमगता तो पार करणारा म्हणून वर्णन न करावे ? अशा अनंत गुणसंपन्न असणाऱ्या रामाला केवळ मी नमस्कार करते. 

रामाचे व्यक्तिमत्त्व जीवनाच्या प्रत्येक बाबतीत प्रगट झालेले आहे. लोकोत्तर बंधू, लोकोत्तर पुत्र, लोकोत्तर शत्रू, लोकोत्तर मित्र, लोकोत्तर शिष्य, लोकोत्तर राजा, लोकोत्तर वल्लभ, लोकोत्तर धर्मनिष्ठा इत्यादी सर्वच लोकोत्तर आहे; परंतु वाल्मिकींनी स्वतःच्या महाकाव्यात नायक म्हणून जे रामाचे चरित्र चित्रण केले आहे त्याचे कारण राम देव होता हे नाही तर संकटे सहन करता करता, फटके खाता खाता दुःख भोगता भोगता देवत्व मिळवलेली व्यक्ती म्हणजे राम ! या दृष्टीने वाल्मिकींनी रामाचे चरित्र लिहिले आहे. 

१. कर्तव्य निष्ठा – कर्तव्य निष्ठा हे रामाच्या जीवनाचे प्रमुख ध्येय होते. दशरथाने ठरवले की आपण पायउतार होऊन रामाला राज्याभिषेक करायचा. सर्वांचे मत विचारले. सर्व मंत्री, नागरिक जन, ऋषी गण वगैरे सर्वांनी मिळून हो सांगितले. नित्य सावधान, गुणवान, धैयवान, बुद्धीमान, अतिरथी, शीलवान, निरोगी, वादविवादपटू, तेजःपुंज, सुंदर इत्यादी गुण असलेला रामच राजा हवा. अशाप्रकारचे प्रेम रामाने प्रजेकडून, मंत्र्यांकडून मिळवलं होतं. पण त्याच वेळी कैकेयी दोन वर मागते. एका वराने भरत राजा होणार व दुसऱ्या वराने १४ वर्ष रामाला  वनवासात जायला लागणार. लगेच वल्कले घालून वडिलांच्या, नागरिकांच्या मनाविरुद्ध राम वनात जायला निघतो. चेहऱ्यावर मुळीच दुःखाचे भाव नव्हते. पितृभक्ती, अशा तऱ्हेची प्रसन्नता म्हणजे राम. म्हणूनच, ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’, असे समर्थ म्हणतात. रामाला परत न्यायला भरत आला पण कर्तव्य परात्पर राम त्याच्याबरोबर गेला नाही. वडिलांचा शब्द म्हणजे ब्रह्म वाक्य. सीता पूर्ण शुद्ध, पवित्र आहे याची खात्री असूनही लोकापवाद टाळण्यासाठी रामाने सीतेचा त्याग केला हीच कर्तव्य निष्ठा !

२. लोकोत्तर बंधू – तीनही भावांवर रामाचे अतूट प्रेम होते. भरत राज्याभिषेक करून घेणार नाही याची खात्री रामाला होती. राम कैकेयीला म्हणतो दोन वर मागायची काहीच आवश्यकता नव्हती. मी भरताचा राज्यभिषेक होऊ दिला असता. लक्ष्मण म्हणजे तर रामाचा बहिष्चर प्राण. रामाने वडिलांचा, सीतेचा, कोदंडाचा त्याग सहन केला पण लक्ष्मणाबरोबर रामानेही शरयूत देहत्याग केला.

३. लोकोत्तर मित्र – उच्चतर नव्हे तर उच्चतम मानवाचे चित्र म्हणजे राम. सुग्रीव-गुह हे त्याचे दोन खास मित्र होते. भिल्लांचा राजा निशाद, याला  गेल्याबरोबर रामाने मिठी मारल्याने सर्वांनाच त्याचा आदर करावा लागला. इथे सर्वधर्म समभाव दिसून येतो. सुग्रीव रामाचेही अभेद प्रेम होते. त्याची बायको, गेलेले राज्य रामाने सुग्रीवाला मिळवून दिले. सुग्रीवाच्या डोळ्यात पाणी आल्यावर रामाचे डोळे देखील पाणावयाचे. रामाने शरयूत देह ठेवल्यावर सुग्रीवानेही देह ठेवला. सुग्रीवाने जगाच्या इतिहासात मित्रत्वाचा अमर लेख लिहिला आहे. असे राजद्वारापासून सुरुवात करून स्वर्गदारापर्यंतचे सहजीवन कुठेही पहायला मिळत नाही.

४. लोकोत्तर शत्रु – मारीच रामाच्या उदात्त, भव्यतेचे वर्णन करताना म्हणतो की मित्र असावा रामासारखा, आणि शत्रू असावा तो सुद्धा रामा सारखाच. रावण वधानंतर रावणाची अंतक्रिया करायला कोणीच घरात उरले नव्हते व बिभीषण तर त्याला हात लावायलाही तयार नव्हता. राम म्हणतो, तुझ्या नाही पण माझ्या भावाचा म्हणून तू अग्नि संस्कार कर. ‘मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्’ असे उदात्त विचार केवळ रामच करू शकतो.

५. लोकोत्तर धर्म निष्ठा – रामाने लंकेचे, किष्किंधेचे राज्य स्वतः न घेता, बिभीषणाला, सुग्रीवाला राजा बनवले. १४ वर्ष वनवासात असताना कोणत्याही नगरीत त्याने प्रवेश केला नाही. त्याच्या धर्मनिष्ठेला, न्यायप्रियतेला नमस्कार.

६. अलौकिक  राजा – रामासारखा राजा झाला नाही, होणार नाही. राम म्हणजे राष्ट्र.  राम नरकात गेला तर नरक पण राष्ट्र. कर्तव्या पुढे प्रेमालाही स्थान नाही. राम वनात जायला निघाल्यावर सर्व अयोध्यावासीही निघाले. रामाने शरयूत प्रवेश केल्यावर सर्व आयोध्यावासीनींही महाप्रस्थान केले.

७. अढळ आत्मविश्वास – रामाकडे अढळ आत्मविश्वास होता. शिवधनुष्य भंग, परशुरामाचा पराभव, त्राटिका वध, वालीसारख्या पराक्रमीचा एका बाणाने वध करणे. लंकेत प्रवेश करायच्या पूर्वीच बिभिषणाला राज्याभिषेक करणे कारण मी रावणाला मारणार हा आत्मविश्वास होता.

८. लोकोत्तर वल्लभ – म्हणजे राम !  रामाचे सीतेवर अलौकिक व अमर्याद प्रेम आहे. रामाने पत्नीचा त्याग नव्हे राजाने राणीचा त्याग केला होता. यज्ञाच्या वेळी दुसरे लग्न न करता सीतेची सोन्याची प्रतिमा तयार करून यज्ञ केला. राम लोकोत्तर शिष्य होता. विश्वामित्रांच्या सहा दिवसांच्या यज्ञाचे रक्षण केल्याने ५४ अस्त्रे त्याला ऋषींनी दिली. अचूक शरसंधान करून त्राटिकेचा वध करणारा पुरुषार्थी राम आणि अहिल्योद्धार करणारा पतितोद्धारक राम, ही दोन्ही रूपे रामाचीच आहेत. रामावतारात सेतूबंधन ही लीला प्रसिद्ध आहे. विश्वमित्र, वसिष्ठ या दोघात वैर असतानाही वसिष्ठांनी रामाला विश्वामित्रांबरोबर आग्रहपूर्वक पाठवले.गुहाला रामाने मिठी मारून उच्चनीचतेची दुरी कमी केली. सुग्रीव रामाच्या मैत्रीमुळे सर्व वानरसेना अयोध्येशी जोडली गेली. बिभीषणाला जवळ केले म्हणजे असुर जोडले गेले. उत्तरेकडचे स्वतःला सुसंस्कृत समजायचे. रामाने दक्षिण उत्तरेकडच्या लोकांना एकत्र आणले. लंकेत जायला प्रेमामुळे अफाट वानर सेवा जमवली. पाच दिवसात सागरावर सेतू बांधला. मुख्य म्हणजे सर्वाच्या मनाला मन जोडून महत्त्वाचे सेतुबंधन केले.

प्रभू रामाचे चरित्र म्हणजे जीवनाची समग्रता आहे. नराचा नारायण बनण्याची गुरुकिल्ली आहे. रामाच्या चरित्राचे मनन करून, कथेचे पारायण करून, राम परायण व्हावे व शेवटला राम म्हणण्यापूर्वी याची देही याची डोळा राममय व्हावे यातच राम आहे ना ! 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

4.3 7 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
15 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vijay lad
Vijay lad
15 days ago

श्री रामाचे गुण वर्णन….अप्रतिम झाले आहे

Joshi prakash ramrao
Joshi prakash ramrao
15 days ago

श्री प्रभू रामचंद्राचे खूप माहितपूर्ण वर्णन केले आहे.
जय श्री राम!🙏🙏

सौ. मीनल नं. वैद्य.
सौ. मीनल नं. वैद्य.
15 days ago

राम चरित्र खुप सुंदर. कितीही वेळा वाचले तरी वाचत रहावेसे वाटते. रामाचे गुणवर्णन अगदी योग्य शब्दांत केले आहे. *जय श्रीराम*

सौ मगला अजित कवठेकर
सौ मगला अजित कवठेकर
15 days ago

जय श्रीराम🙏
सकलजनांना वंदनीय असलेल्या आणि जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनास व्यापून असलेल्या श्रीरामांचे चरित्रवर्णन अप्रतिम झाले आहे आहे. त्यात ही विशेष जाणवले ते म्हणजे “संकटे सहन करता करता, फटके खाता खाता, दुःख भोगता भोगता देवत्व मिळवलेली व्यक्ती म्हणजे राम !” असे वाल्मीकिकृत रामचरित्रवर्णन👌🙏
॥जय जय रघुवीर समर्थ🙏

ज्योती भिडे
ज्योती भिडे
15 days ago

संपूर्ण राम जीवन – मोठाच आदर्श आहे 🙏

Anant Suratran
Anant Suratran
Reply to  ज्योती भिडे
15 days ago

सुरेख सुंदर प्रभूंचे श्रीराम प्रभूंचे वर्णन. आनंद वाटला. जय श्रीराम

Mohini Khot
Mohini Khot
15 days ago

नीलाताई राम गुणवर्णन खूप खूप सुंदर

Shubhada Thite
Shubhada Thite
15 days ago

जय श्रीराम
सर्व गुणांचा समन्वय, राम चरित्र प्रेरणादायी

Anil Sadhale
Anil Sadhale
15 days ago

अप्रतिम राम वर्णन 🙏🙏

Meenakshi chandrashekhar Khairnar
Meenakshi chandrashekhar Khairnar
15 days ago

फारच सुंदर श्रीरामाचे गुणवर्णन

Janhavi Shriram Oak
Janhavi Shriram Oak
15 days ago

खूप छान अभ्यासपूर्ण लिहिले आहे
१) कर्तव्य निष्ठा यात कर्तव्य तत्पर राम असे हवे का
तिथे परात्पर राम असे आहे योग्य काय ते सांगावे.

भिडे जयश्री निरंजन
भिडे जयश्री निरंजन
15 days ago

खूप सुंदर लेख..

surekha mahajan
surekha mahajan
14 days ago

प्रभु रामाचे चरित्र म्हणजे जीवनाची समग्र या आहे. रामाचे समग्र वर्णन खूप आवडले. 🙏

dr. sadanand chavare
dr. sadanand chavare
14 days ago

अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. श्रीरामांचे सद्गुण खूप छान समजावून सांगितले आहेत.
जय जय रघुवीर समर्थ.

Nayana Soman
Nayana Soman
7 days ago

श्रीराम गुणवर्णन खूपच सुंदर

Language