राम मंत्र श्लोक १६-१७-१८

राम मंत्र श्लोक १६-१७-१८
सौ. स्नेहल पाशुपत
  • October 11, 2025
  • 1 min read

नको फार मंत्राग्निच्या मंत्रदीक्षा ।

नको जारणा-मारणादी अपेक्षा ।

कळायुक्त चातुर्य तें विकळा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १६ ।।

सरळ अर्थ – भगवंताला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध अंतःकरण, शुद्ध भाव, शुद्ध कर्म याचे फार महत्व आहे. यांशिवाय केलेल्या कर्मकांडात यांत्रिकता येते. भाव-भक्ती शिवाय केलेले यज्ञयागादी उपचार असोत की, सदगुरूंकडून मिळालेल्या मंत्रदीक्षेचा जप यासारखी सात्त्विक उपासना सुद्धा असो; भावा अभावी  तितकीशी प्रभावी ठरत नाही. तसेच जारणमारणादी, जादूटोणा किंवा मंत्र-तंत्र साधना यांसारख्या तामसी पूजा-साधनाही यशस्वी ठरत नाहीत. तेव्हा ‘हरे राम’ हा सोपा मंत्र जपावा हेच उत्तम होय.

श्रीसमर्थांचा बोध – ईश्वराची पूजा हे अध्यात्माचे एक प्रधान अंग आहे. सर्वच शास्त्र-पुराणात सांगितलेल्या यज्ञयागादी सकाम  व्रताचरणात, मंत्रोच्चार; पूजासाहित्य इत्यादि अचूक कर्मकांडाला फार महत्व असते. ते एक महत्त्व पूर्ण शास्त्र आहे. आज वैज्ञानिक ज्या निष्ठेने, अथक प्रयत्नाने संशोधन करतात तसेच इथेसुद्धा शास्त्र ग्रंथात सांगितल्याप्रमाणे शास्त्र शुद्ध विधीविधान केले तरच कामना सिद्धी होते. या क्रियेला श्रीसमर्थ  ‘कळायुक्तचातुर्य’ असा शब्द वापरतात. असफल प्रयोग म्हणजे ‘विकळा’. काही  सूक्ष्मातिसूक्ष्म त्रुटी सुद्धा असफलतेचे कारण बनतात व मनी धरलेली कामना/हेतु पूर्ण होऊ शकत नाही आणि हाती काही लागत नाही. मग नैराश्य येते, कामना पूर्ण झाली नाही म्हणून देवावरचा विश्वास उडतो.  या  उलट नामसाधना माणसाला निष्काम  बनवते. प्रपंचात सतत काही तरी हवेच असते, ते हवेपण; अपेक्षा सदासर्वदा नाम घेतल्याने कमी कमी होत जाऊन विरून जाते. मन रामचरणी हळूहळू स्थिर होऊ लागते, शांत होते. कामनाच नाही म्हणून सकाम साधना करावीशी वाटतच नाही. ही मनाची स्थिती कायम राहावी, समाधान लाभावे या साठी सतत अभ्यास करणे गरजेचे असते. तेव्हा श्रीसमर्थ  नाममहात्म्य पटवूवुन देताना म्हणतात,  “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे”.

 

“नको योग अष्टांग तो रोध प्राणा ।

नको कृच्छचांद्रायणी हट्ट जाणा ।

अपभ्रष्ट हा मार्ग की वोखटा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १७ ।।”

सरळ अर्थ – अष्टांगयोगातील कठीण असा प्राणनिरोध किंवा हटयोगातील कठोर अशा व्रतांचे आचरण केल्यानेच फक्त पापनाश होतो व परमेश्वराजवळ जाता येते ही समजुत मिथ्या आहे. हा मार्ग  चुकीचा आहे. श्रीरामाचे पवित्र , सोपे, सरळ नाम श्रद्धेने, निष्ठापु पुर्वक,शुद्ध अंतःकरणाने, भावभक्तीने सतत घेतले तर आणखी काही वेगळे करण्याची आवश्यकता नाही.

श्रीसमर्थांचा बोध – भगवंत प्राप्तीचे ज्ञान, योग, कर्म, भक्ती असे अनेक मार्ग आहेत. आपापल्या स्वभावधर्मानुसार, वृत्तीनुसार, आवडीनुसार मार्ग निवडून माणूस साधना करत परमेश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असतो. यातील सगळेच मार्ग खडतर आहेत. या श्लोकात श्रीसमर्थ हटयोग व त्यातील कठोर व्रताचरणाचा उल्लेख करतात. या मार्गात शारीरिक आणि मानसिक दोन्ही शक्तीची कसोटी लागते. अष्टांग योगातील प्राणनिरोध करणे सर्वसामान्यांना सहजसाध्य नक्कीच नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी आठ अंगे त्यांच्या क्लिष्ट  नियमासह आचरण करणे तेवढेच कठीण असते. हातून कळत नकळत घडलेल्या पापाच्या क्षालनार्थ स्कंदपुराणात अनेक खडतर व्रते सांगितलेली आहेत, त्यातीलच चांद्रायणी व्रताचा उल्लेख श्रीसमर्थ येथे वानगीदाखल करतात. यात कृच्छचांद्रायणी व मृदचांद्रायणी असे प्रकार आहेत. हे व्रत चंद्राच्या साक्षीने केले जाते. चंद्रकलेप्रमाणे आहार घ्यायचा. संध्येची एक पळी किंवा एक घास जो संकल्प केला असेल तसे पहिल्या दिवशी अन्न प्राशन करायचे वाढवत जाऊन पौर्णिमेला पंधरा पळी/घास अन्न घ्यायचे तर कृष्ण प्रतिपदेपासून एकेक पळी/घास अन्न कमी करत अआमावस्येला निराहार रहायचे. अशाप्रकारे सहनशक्तीची, संयमाची, निश्चयाची कसोटी पहाणारी कठोर व्रते करणे सामान्य जनांना साध्य होत नाही. तेव्हा हा मिथ्या/वोखटा मार्ग धरण्यापेक्षा सहज, सुलभ अशा नामसाधनेने तीच सारी फळे कष्ट न करता मिळत असताना तोच मार्ग अनुसरावा हे योग्य नव्हे का ? म्हणूनच “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे” असे श्रीसमर्थ काकुळतीतेने सांगतात. 

 

“कदापी घडेंना व्रतें यज्ञदाने ।

नसे द्रव्य गांठी करावें जयाने ।

घडे ना घडे  यद्यपी कां फुका रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १८ ।।”

सरळ अर्थ – व्रते, उद्यापने, दान-धर्म, यज्ञ-याग इ. करण्यासाठी मुबलक द्रव्य गाठीशी असणे आवश्यक आहे. प्रत्येकालाच  ते जमणे शक्य होत नाही. म्हणून त्याने उपासना करू नये का? श्रीसमर्थ  म्हणतात श्रीराम नाम अखंड घेणे हा सोपा उपाय आहे ना ! रामनामाच्या उच्चाराने सगळ्याच साधनाचे फळ अनायासे मिळते म्हणू म्हणूनच “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे”.

श्रीसमर्थांचा बोध – नामसाधना हा भगवंताच्या प्राप्तीचा सहज-सोपा-सुलभ मार्ग आहे. त्यामध्ये कष्ट नाहीत,  अव्यवहारीपणा नाही, प्रपंच सोडावा लागत नाही, पैसा खर्च करावा लागत नाही, नीतीमत्ता उल्लंघन नाही, लौकिक ज्ञान आवश्यक आहे असेही नाही, स्थळ-काळाचे बंधन नाही; कुठलेही भौतिक बंधन किंवा अटी नाहीत. एवढी मुभा असताना लोक मात्र देवभेटीसाठी नाही तर आपल्या इच्छापूर्तीसाठी खडतर व्रते, उद्यापने, तीर्थयात्रा, यज्ञ-याग अशा सकाम उपासना यांच्याच पाठी लागतात, अट्टाहास करतात. सर्वच संत नामाचे महत्त्व आग्रहाने प्रतिपादन करतात, तरीही आम्हाला आमचे खरे हित कळत नाही. याचे कारण जे सहजतेने उपलब्ध आहे त्याचे महत्त्व वाटत नाही. शिवाय आम्हाला परमार्थाचा सुद्धा इव्हेंट/समारंभ करायचा असतो. महापूजा-अभिषेक करताना त्यात मन नसतेच फक्त देखावा करायचा असतो. आम्ही धार्मिक आहोत, आम्ही देवाचे किती करतो, हे जगाला दाखवायचे असते. अंतःकरणात परमेश्वर प्राप्तीची तळमळ नसते. देव भावाचा भुकेला आहे. त्याला मी भक्ती करतो असे गर्जना करून सांगण्याची गरजच नसते. अंतःकरणात रामाचे नित्य स्मरण असेल तर केलेले प्रत्येक सत्कर्म रामकार्य होते. म्हणूनच श्रीसमर्थ आग्रहाने प्रतिपादन करतात की, असे समारंभ साजरे करून पैसा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language