रघुनायका मागणे हेचि आता

रघुनायका मागणे हेचि आता
सुमेधा बापट
  • June 13, 2026
  • 1 min read

९ श्लोकांच्या या करुणाष्टकात प्रत्येक श्लोकाचे ४थे चरण रघुनायका मागणे हेचि आता असेच आहे. संत म्हणतात – कोणाजवळ काही मागू नये आणि देवाजवळ मागायला लाजू नये. तुकाराम महाराज म्हणतात – भिक्षापात्र अवलंबिणे | जळो जिणें लाजिरवाणें | पण तेच एका अभंगात म्हणतात, 

||हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||

पण साधकाने भगवंताजवळ काय मागावे, काय मागू नये हे त्याला समजावे म्हणून समर्थ रामरायाजवळ म्हणत आहेत; अगदी तळमळीने, आर्ततेने म्हणतात, रघुनायका मागणे हेचि आता रघुनायका’ म्हणतात ते रामरायाला. रघुवंशाचा नायक-कॅप्टनच तो!! रघुवंशातील रघुराजा प्रसिद्ध होताच. पण रामराया हा साक्षात भगवंत, परमात्म्याचा मानवी अवतार, मर्यादा पुरुषोत्तम! आदर्श राजा – राज्यकर्ता. म्हणून तो ‘रघुनायक’. आपण समर्थ ‘काय-काय नको म्हणतात’ ते आधी पाहूया. परमार्थी व्हायचे, भक्ती मार्गी व्हायचे, साधना करीत राहायचे. यासाठी सदाचार संपन्न व्हायचं, तर परमार्थाला जे-जे प्रतिकूल ते त्याज्यच ठरते ना!! काय-काय प्रतिकूल सांगितलंय? तर मला द्रव्य नको, दारा नको, पत्नी नको. हा संसार नकोच. कारण तीच मोठी अडचण आहे. संसारात सतत अडचणी, संकटे येतातच. त्यातून मार्ग काढणे, दुःख शोक न करणे हे एक वेळ सोप आहे. पण या भवसागरात पडणे, जन्माला येणे; ते तर आपल्या हातात नाही. म्हणून रामरायाला म्हणतात, ‘जन्म -मरणाच्या चक्रातूनच सोडव’- येरझारा नकोतच!  

तुकाराम महाराजांसारखे संत गर्भवास मागतात, म्हणजे पुन्हा-पुन्हा जन्म मागतात. कारण भगवंताजवळ कायम राहावे म्हणून, भक्ती करता यावी म्हणूनच मागतात. एकदा का भगवंत हृदयात दृढ झाला की इतर वासना, कल्पना, संशय; कशाला जागाच राहत नाही. त्यांचे स्फुरण, त्यांची ये-जा थांबतेच. म्हणूनच समर्थ म्हणतात, मनीं कामना कल्पना ते नसावी | पण विचार तर उठतातच ना! ते सद्विचार व्हावेत. विचार पक्का  करतच बुद्धी निर्णय घेते. म्हणूनच समर्थ म्हणतात, कुबुद्धी कुडी वासना नीरसावीं  | अर्थातच कुबुद्धी आणि कुडी वासना परमार्थाला प्रतिकूलच आहे.

जराश्या ज्ञानाने गर्व अभिमान बाळगणारे समर्थांनी पाहिले होते. आजही आहेतच. जरा एखाद-दुसरा शास्त्र ग्रंथ वाचला, की ती व्यक्ती इतरांसमोर आपले ज्ञान पाजळतेच. त्या अर्धवट ज्ञानाने जो अभिमान, गर्व होतो तो परमार्थाला प्रतिकूलच आहे. तो अडथळा आहे आपल्या भक्तिमार्गातील, ज्ञानमार्गातील!! जसे कितीही वेळेला नोकरी बदलली तरी प्रत्येक वेळी प्रत्येक नोकरीत प्रशिक्षण हे असतेच. त्यासाठी सुरुवातीचा काही काळ राखीव असतो. असं म्हणून चालत नाही की, ‘माझी इतकी वर्ष नोकरी झाली आहे, मला प्रशिक्षणाची गरजच काय?’ ‘माझी इतकी वर्ष नोकरी झाली’ हा अभिमान बाजूला सारावाच लागतो. मगच ती व्यक्ती नवीन कंपनीत नवीन गोष्टी शिकू शकते. म्हणूनच समर्थ म्हणतात, 

नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा|

आता समर्थ परमार्थाला अनुकूल असे काय-काय मागत आहेत ते पाहू. ते म्हणतात, माझी वृत्ती उदासीन असावी, तरच मला अलिप्त राहणे साधेल. मी उदासीन रहावे’ असे समर्थ म्हणत नाहीत. जसे संत तुकाराम महाराज म्हणतात –  साधकाची दशा असावी उदास| तोच अर्थ इथे आहे. तुकाराम महाराज असे म्हणतात, वृत्ती न फिरे माघारी कुठून? तर विठ्ठलापासून! सामान्य साधकाचं कसं होतं, भगवंताची पूजा, अर्चना, प्रार्थना, सगळं झालं की वृत्ती भगवंताच्या चरणापाशी, मूर्तीत राहतच नाही. हा चंचल मनाचाच परिणाम आहे. म्हणून ‘मी कायम तुझी सेवा करावी, तुझी भक्ती करावी, तुझीच प्रतिमा मनात साठवून तुझे गुण आठवत राहावे, तुझ्या सगुण रूपाचा मला छंद लागो.  त्यातूनच निर्गुणाकडे जाता येईल.’ समर्थ दासबोधात म्हणतात – सगुणाचे नि आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे|

रामराया, तुझे नाम घेतल्यावर तूच माझ्या अंतरी बसावे. कलियुगात नामस्मरण हे उत्तम-श्रेष्ठ साधन सांगितले आहे. नाम घेता घेता तुझी सगुण मूर्तीच अंतरी दृढ होते. मग इतर कशाला जागा राहील का? म्हणूनच रामराया तू मला भक्तीमार्गीच कर!! माझ्या मनी वासना सुद्धा तुझीच असावी कारण; जन्मा यावे लागे वासनेच्या संगे. पण ती वासना तुझीच असली की दुसरं काही तिथे येणारच नाही. ना बसणारच नाही. मग अंत:काली सुद्धा तुझेच नाव येईल. अन्ते मति: सा गति:| मग मला मुक्ती मिळेलच, तेच तर नरदेहाच सार्थक आहे ना!! 

तरीही समर्थ म्हणतातच रामराया, रघुनाथा, समर्था तुझ्याकडे काय मागावे हे मला कळतच नाही. मनातील दुराशा तर जातच नाही, अनेक संशय संकल्प उठतच राहतात. त्यातूनच मग काय होईल? कसं होईल? अशी चिंता पोखरत राहते. ती तू दूर कर! समर्थ अतिशय लीन दीन होऊन रामरायाला त्याचेच ब्रीद काय आहे, ते सांगतात. म्हणतात, 

ब्रिदा कारणे दीन हाती धरावे |

तुला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणे, त्यांचा उद्धार करणे असे तुझेच ब्रीद आहे. तू जर माझ्यापासून दूर झालास तर तुझ्या ब्रिदाचे काय होईल? म्हणूनच माझ्या सर्व चिंता दूर करून माझा उद्धार कर. मला मुक्ती दे, माझी जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका कर. साधकाने देवाजवळ काय व कसे मागावे हेच समर्थांनी यातून सांगितले. सामान्य माणूस पैसा, प्रपंच, ऐश्वर्य, व्यवसायात भरभराट, नोकरीत प्रगती आणि व्यक्ती जर राजकारणी असेल तर सत्ता मागते. मग पैसा मिळतोच. अन्य सुख सोयी सुद्धा मिळतात. हे सगळंच अर्थात  परमार्थाला प्रतिकूल आहे. ते मागितले जाते अज्ञानातून. आणि अज्ञान हाच परमार्थात आणि व्यवहारात ऐहिकात मोठा शत्रूच आहे. ज्या ठिकाणी, ज्यासंबंधी काम करायचे त्याचे ज्ञान मिळवावेच लागते. समर्थ दासबोधातही सांगतातच- ज्ञानेविण मुक्त झाले | हे तो घडेना | वशिष्ठ ऋषी स्वतः श्रीरामाला सांगतात, 

सर्व संसार रघुनाथा | असे जाण वासनेच्या माथा |

वासना क्षयी जीवन मुक्तता | बाणे जाण तू|

हे साधकांनी लक्षात ठेवायचं. म्हणून समर्थ पुन्हा-पुन्हा रामरायाजवळ मागणं मागतात, 

मनी वासना भक्ती तुझी करावी | कृपाळूपणे साधके पुरवावी |

वसावे मज अंतरी नाम घेता | रघुनायका मागणे हेचि आता ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

5 4 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Jyoti Dabhade
Jyoti Dabhade
1 month ago

सुंदर विवेचन!

Vinaya Vidwans
Vinaya Vidwans
1 month ago

खूपच छान विवेचन केले आहे

Language