पूजनीय आक्कांचे कार्य

पूजनीय आक्कांचे कार्य
सौ. रंजना पाटील
  • October 17, 2025
  • 1 min read

पूजनीय आक्कांच्या चरित्राचा विचार आपण केला तर तो कालावधी हिंदू संस्कृती नुसार महत्त्वाचा आहे कार्तिक कृष्ण तृतीया हा आक्कांचा जन्म दिन तर धनत्रयोदशी  हा निर्याण दिन!  या कालावधी मध्ये घरोघरी दीप उजळले जातात. प्रकाशाचा हा सण. आपल्याकडे असे म्हटले जाते की 

असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय।।

म्हणजे ही वैदिक प्रार्थना आपल्याकडे अतिशय पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. याचा अर्थ असत्यापासून मला सत्याकडे ने, अंधाराकडून मला प्रकाशाकडे ने, आणि मृत्यू पासून मला अमरत्वाकडे ने, अशी ही भव्योदात्त प्रार्थना दिवाळीच्या सणात प्रतिबिंबित झाली आहे.  असत्याच्या, अशाश्वताच्या आणि अज्ञानाच्या अंधारापासून प्रत्येक मनुष्यमात्राची सुटका व्हावी, अशी प्रार्थना या त्रिपदीत आहे. दिवाळी हा तर दिव्यांचा सण संस्कृत मध्ये दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ – दिव्यांची रांग. ह्या दिवाळीच्या सणामागे केवढे तरी प्रचंड तत्त्वज्ञान आहे आणि आपण जे कार्य या भूतलावर येऊन करणार आहोत ते कार्य करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे दिवस पूजनीय अक्कांनी म्हणूनच ठरवले असावेत असे वाटते कारण त्यांना प्रत्येक मनुष्याच्या अंत:करणात ज्ञानदीप प्रज्वलित करायचा होता आणि प्रत्येकाची ब्रह्मजिज्ञासा जागृत करण्याची अनिवार ओढ होती. त्यांची ही ओढ बालपणापासून तीव्र होती. त्यामुळे त्यांनी पुढे तसेच कार्य केले.

 

ज्ञानदीप लावू जगी

हाच त्यांनी घेतलेला वसा होता आणि यासाठी त्यांनी अतिशय विचारपूर्वक योजनाबद्ध रीतीने दासबोध सखोल अभ्यास याची आखणी केली आणि हे कार्य यावत्चंद्रो दिवाकरौ…याप्रमाणे चालू राहील समर्थ संप्रदायामध्ये असे कार्य आपल्याला एकमेवच म्हणता येईल अतिशय शिस्तबद्ध, नेटके, सर्वसमावेशक आणि तरीही प्रत्येक माणसाची ज्ञान जिज्ञासा जागृत करण्याचं कार्य पूजनीय आक्का या उपक्रमा मार्फत आजही करत आहेत. एका मध्यम वर्गीय सामान्य कुटूंबात जन्मलेल्या आक्का! परंतु त्यांचा कल, बुद्धिची झेप, रोख-ठोकपणा, निर्भिडपणा इ. विशेष गुण जाणून माता-पित्यांनी उच्च नीतिमूल्यांचे संस्कार त्यांच्यावर केले.घरची आर्थिक स्थिती बेताची होती.त्यामुळे शालेय शिक्षणासाठीही त्यांना फार कष्ट घ्यावे लागले. एकाच वेळी आक्कांनी ज्ञानार्जनही केले अन् ज्ञानदानही ! कमवा आणि शिका हे धोरण त्यांनी अवलंबले.

आयुष्य उमलत असताना मनात अनेक भावनांचा कल्लोळ उठत होता, स्रीसुलभ स्वभावानुसार अंतःकरणात अनेक इच्छा प्रबळ होत असत…संस्कारांचे शिंपण करणारे वडिल यातील वैय्यर्थ पटवून देत असत. त्यांच्या पश्चात हे कार्य आजी-आई दोघी करत. कधी आक्का याबाबत नाराजी व्यक्त करत. असा संघर्ष होता-होता.एक निश्चय पू.आक्कांनी ठामपणानं केला शिक्षण घेउन स्वतःच्या पायावर उभे रहायचे आणि आजन्म अविवाहीत राहून समाजसेवा करायची! 

नाथ महाराज म्हणतात तसे, मन जिंकावें पां आधीं।तेणें तुटेल उपाधी।। एकाजनार्दनीं मन। दृढ ठेवावें बांधून।। मनाच्या चंचलतेचा अनुभव आक्का स्वतः घेत होत्या आणि त्याचवेळी साक्षीभावानं ही त्या मनाचे खेळ न्याहाळत होत्या. १९५६ मध्ये अकस्मात झालेली सद्गुरु भागिरथी आई वैद्य यांची भेट आक्कांच्या जीवनाला अमूलाग्र कलाटणी देणारी ठरली.

जप, ध्यान, चिंतनाने प्रयत्नपूर्वक वाटचाल सुरु झाली.आणि त्यांनी शिष्यादिच्छेत् पराजयं अशी जी प्रत्येक गुरुंची इच्छा असते ती पू. आक्कांनी पूर्ण केली. अल्पावधीतच सद्गुरु हृदय जिंकले. सद्गुरुंचा सहवास अवघा दोन वर्ष लाभला. शिक्षिकेची नोकरी करत. शरीर,मन,बुद्धि,आत्मा या सर्वांच्या संतुलनातून आक्कांचे व्यक्तिमत्व अधिक उजळून निघाले. सद्गुरु आज्ञेनं भागवत सप्ताह सुरु झाले. समाजसेवा, भगवद्सेवा कार्य सुरु झाले.सर्व ग्रंथात ग्रंथराज दासबोध आणि भागवत याचा सतत अभ्यास, मनन, चिंतन सुरु झाले. साधारण १९७९ पासून प दा अ.चे केंद्रप्रमुख म्हणून कार्य सुरु झाले. दासबोध प्रचार प्रसार सुरु असतानाच भागवत सप्ताह होउ लागले. आक्कांनी केवळ स्वतःच भागवत सप्ताह न करता अनेक प्रापंचिक महिलांना भागवतकार म्हणून घडवले, तयार केले.

१९८४ मध्ये दासबोध सखोल अभ्यासास प्रारंभ झाला. स्वतः समीक्षण करु लागल्या. परंतु बघता-बघता याचा विस्तार खूप झाला. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यांत अभ्यासार्थी अभ्यास करु लागले. आज भारतभर अनेक राज्यांत अभ्यासार्थी आहेत तसेच विविध परदेशातही दासबोध सखोलचे अभ्यासार्थी विखुरले आहेत. या अभ्यासाद्वारे उत्तम साधक घडावे या करिता साधना सप्ताहाचे आयोजन केले १९८५ पासून अव्याहतपणानं साधना सप्ताह सुरु आहे. यापुढेही सुरु राहील. मनुष्य प्राणी जन्माला येतो तो कोऽहं कोऽहं म्हणत. हा शोध आपल्या आकलना पलीकडचा आहे. याची यथातथ्य जाणीव ज्यांना असते तेच महानुभाव, संत होय. जाणे तोचि महानुभाव।- इति समर्थ

पू. आक्कांचा दासबोध सखोल अभ्यास उपक्रम म्हणजे रामदासाची उपमा। ग्राम नाही कैची सीमा।। समर्थांच्या भाषेत सीमा नसलेले गांव. आपण जेथून आलो ती जागा असीम आहे, अनंत आहे. हे जाणले तरी पुष्कळ झाले. विश्वाच्या अगडबंब आणि अफाट पसार्‍यात आपण किती लहान आहोत आणि अफाट पसार्‍यात आपण किती लहान आहोत अन् त्या सर्वेश्वराचे एक अंश म्हणून आपण किती मोठे आहोत, याची विनम्र पण साभिमान जाणीव आपल्या मनात असली पाहिजे. आपले सगळे जीवन, सगळे आयुष्य हे सीमा नसलेले गाव आहे. ते म्हटले तर क्षणभंगुर म्हटले तर अनादि-अनंत! दा स अ.परिवार एक सीमा नसलेले गांव होय! याचे कोडे उकलण्याचे तंत्र आणि मंत्र दासबोध सखोल अभ्यास शिकवतो. कोऽहं पासून सोऽहं पर्यंत कसे पोहोचायचे? देहेबुद्धि ते आत्मबुद्धी करावी। या करिता पू.आक्कांनी दासबोधातील प्रत्येक समासावर एक अशा २०० प्रश्नपत्रिका काढल्या. तसेच ते तपासण्यासाठी समीक्षक नेमले, तयार केले. इतकेच नव्हे तर समीक्षकांचा अभ्यास कायम Update रहावा म्हणून समीक्षकांच्या १८ प्रश्नपत्रिका काढल्या. या प्रश्नपत्रिका अभ्यासाला आव्हानात्मक असल्या तरीही बरोबर समास सापडल्यावर होणारा आनंद अनिर्वचनीय आहे.

दासबोध सखोलचे २०० स्वाध्याय पूर्ण झाल्यावर त्याच समासांचा अधिक सूक्ष्मपणे अभ्यास व्हावा म्हणून ४९ पुरवणी प्रश्नपत्रिका काढल्या.या सर्व उपक्रमावरुन पू. आक्कांचा शिक्षकी बाणा लक्षात आल्याशिवाय रहात नाही. हीच ज्ञानाची ज्योत पू.आक्कांनी प्रज्वलित केली हे त्यांचे अजोड अद्वितीय कार्य!  आ.तात्यासाहेब गाडगीळ, आ.आगरकर सरांनी तेवत ठेवले आणि सद्या ही धुरा विद्यमान संचालक आ.लाड सर समर्थ पणानं पेलत आहेत. अनेक आघाड्यांवर दा स अ. परिवार अग्रणी होत आहे. हे पाहून पू.आक्का शाबास! शाबास! शाबास म्हणत असतील. ज्ञानाचा अमृत कलश घेउन अवतीर्ण झालेल्या आक्का तो अमृतकुंभ रिता करुन धनत्रयोदशी दिनी धन्वंतरीला भेटायला गेल्या. जाताना भागवताचा अमृतकुंभ आमच्याकडे सोपवून गेल्या. अशा आक्कांच्या चरणी कोटि कोटि वंदना !

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language