दि. ०७/१२/२०२४
(चंपाषष्ठी)
राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र, वाङ्मय आणि या श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथत्रयींचा चिकित्सक अभ्यास म्हणजे “दासबोध सखोल अभ्यास उपक्रम”! श्री समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणार्या अनेक व्यासपीठांमध्ये “दा.स.अ.” फाउंडेशन गुणवत्ता आणि शिस्त या दोन्ही आयामांवर उच्चस्थानी विराजमान आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.
विश्वातल्या सहा देशांमध्ये आणि देशातल्या नऊ राज्यांमध्ये अभ्यासार्थी असलेले “दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशन” आता आपली कार्यध्वजा “संकेतस्थळाच्या” माध्यमातून जगभरातील साधकांपर्यंत सहजपणे फडकवित ठेवणार याचा मोठा आनंद वाटतो आहे. “दा.स.अ. संकेतस्थळाच्या” रुपाने समर्थ रामदासस्वामींचे तत्वज्ञान संपूर्ण विश्वातील मानवाला ऐहिक आणि पारमार्थिक पातळीवर उच्चस्थान मिळवून देईल यात शंका नाही. “मागील पाच हजार वर्षात श्री दासबोधासारखा मानवी जीवनाच्या प्रत्येक आयामाला स्पर्श करुन ते जीवन सुखकर करणारा ग्रंथ झाला नाही” या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या मुखारविंदातून निघालेल्या वाक्याचे मला येथे स्मरण होत आहे. साध्या यःकश्चित भाजीच्या व्यवहारापासून मानवी जीवनाचे अंततोगत्वा ध्येय म्हणजे मोक्षा पर्यंतचा विचार ज्या अलौकिक आणि अद्भूत वाङ्मयात केला , ते म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले ४५००० हजार पेक्षा जास्त ओवी संख्या असलेले हे साहित्य !
मानवी जीवनाचे आत्मभान जागृत करणारे हे अक्षर वाङ्मय प.पू. अक्कास्वामी तथा आशालता चिंतामणराव वेलणकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी रुजवलेल्या “दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशन संकेतस्थळाच्या” रुपाने जगासमोर येत आहे याचा सात्विक अभिमान आणि आनंद आम्हास वाटतो.
“दा.स.अ. संकेतस्थळासाठी” कार्यरत असलेल्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो. या अलौकिक व अथक कार्यासाठी अभिनंदन करण्याचे आणि धन्यवाद देण्याचे भाग्य मला मिळाले हा माझ्यासाठी कृतार्थ क्षण होय !
– विजय लाड
।। जय जय रघुवीर समर्थ ।।