प. पू. आक्का स्वामींची काव्यसंपदा

प. पू. आक्का स्वामींची काव्यसंपदा
सौ. स्मिता मुंडले
  • October 20, 2025
  • 1 min read

श्रीसद्गुरू देशमुख काका व आक्का स्वामींना वंदन ! या लेखातून प. पू. आक्कास्वामींच्या ‘आनंदसागर’ या काव्यसंग्रहातील काही निवडक काव्यांचा परिचय करून घेणार आहोत. संतांच्या काव्यातून विशेष आनंद प्राप्त होतो, कारण; त्यात सुंदर अर्थ दडलेला असतो व मनाला बोधही केलेला असतो. ‘आनंदसागर’ या काव्यसंग्रहाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना प. पू. आक्कास्वामी म्हणतात, “प्रभू कृपेने आनंद संजीवनी व आनंद सरिता याचे जनता जनार्दनाने स्वागत केले. म्हणून आता आनंद सागरही तोच निर्माण करत आहे, या आनंद सागरात डुंबूया. ही अल्पशी कृती सद्गुरूंना अर्पण.” असा शरणागत भाव या मनोगतातून व्यक्त केला आहे. या आनंदसागर काव्यसंग्रहात भगवान शंकर, गौरी, वासुदेव, भागवत धर्म, देहबुद्धी, मायेची करामत, नामाचा महिमा, गणेश वंदन अशा अनेक विषयांवर काव्यरचना केलेल्या आहेत. यातील काही निवडक काव्ये व त्या काव्यावर थोडक्यात निरूपण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी श्रीसद्गुरू डॉ. देशमुख काका, श्रीसमर्थ रामदास स्वामी व अनेक संतांच्या साहित्याचा आधार घेतला आहे. या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन !

पहिले काव्य – गणेश वंदन :

“नमुया प्रेमे गणरायाला । सकळ मिळूनी अजि हो ।

आपण सकळ मिळूनी अजि हो । दुर्गुण त्यजूनि सद्भावाने स्मरू देवराया ।। १ ।।

भाव मनीचे जुडी दुर्वांची वाहू गणेशाला ।। २ ।।

प्रभू कार्यास्तव देह झिजवू या संघटित होऊया ।। ३ ।।

प्रार्थिते आशा श्रीगणेशा तनमन अर्पुया | आपण सगळे मिळूनी अजि हो ।। ४ ।।”

सगुण गणेशाची पूजा अगदी प्रेमाने, आनंदाने साग्रसंगीत करावी. त्यामुळे मन प्रसन्न होते, सात्त्विक भाव निर्माण होतो, समाधान मिळते. भगवंताच्या अस्तित्त्वाबद्दलची श्रद्धा वाढते. तोच मला सांभाळतो, प्रेरणा देतो, स्फूर्ती देतो असा विश्वास वाटू लागतो. पुढे सगुणातून निर्गुणाकडे कसे जायचे तर, दुर्गुणांचा त्याग करायचा, राग, लोभ, द्वेष, मत्सर इ. षड्रिपूंपासून दूर रहायचे. सर्वांनी एकत्र संघटित होऊन देवाचे कार्य सर्वांच्या सहकार्याने करायचे ही महत्त्वाची शिकवण या काव्यातून व्यक्त केली आहे.

(लेखाची शब्द मर्यादा लक्षात घेऊन काव्याचा थोडक्यात सारांश लिहिला आहे)

 

दुसरे काव्य –  नाम महिमा :

“नाम प्रभूचे गोड रे मना । नाम प्रभूचे गोड ।। धृ. ।।

भक्तीपंथाने जाता निशिदिनी । मिळेल हरीची जोड ।।१ ।।

पथ्य एकची पाळ सख्या तू । निंद्य अवघे सोड ।। २ ।।”

सर्वच संतांनी मानवाला दिलेली एक लौकिक देणगी म्हणजे ‘नाम’. नामाचा अधिकार तर सर्वांनाच आहे. या साधनेला काही खर्च नाही, मांडामांड नाही. माळ असली अथवा नसली तरी मुखाने नामस्मरण करता येते. या कलियुगात चिरंतन सुखाची प्राप्ती करून घेण्याचा नाम हा सर्वात सोपा मार्ग आहे. माया मोहाच्या बंधनात अडकलेल्या जीवाला हरिनामच बंधनातून मुक्त करू शकते. या मार्गात काही पथ्ये पाळावी लागतात. निंद्य गोष्टींचा त्याग करायचा, वेद वंद्य कर्म करायचे, विषयाची आसक्ती, हव्यास कमी करायचा. यामुळे मनाला स्थिरता येते. मनाला भगवंत रूप करणे हीच भक्ती.

“आवडीने भावे हरिनामा घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।”

प्रेमपूर्वक नामस्मरण केल्याने नामधारकावर भगवंताची कृपा होते. त्याच्याच कृपेने ज्ञान होते. म्हणून प्रापंचिकांसाठी नाम हे उत्तम साधन आहे.

 

तिसरे काव्य –  देवाचे नवलाव :

“पहा कसा तो देव नाना नवलाव करितो ।। धृ. ।।

जलधीचे जल खारट असता । मधुर होईल गगनी जाता ।

अवनी वरती सिंचन करिता । मनी मोद होतो ।।

देहा ऐसे यंत्र बनवीतो । साधन करुनी साध्य साधितो ।

आशा म्हणे मग शांती देतो अनुभवा येतो ।।”

या निसर्गात किती सौंदर्य आहे, किती विविधता आहे, किती नावीन्य आहे. झाडे, वेली, पशु-पक्षी, नद्या, डोंगर, धबधबे, तलाव, फळे-फुले किती वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. ही सारी देवाची सौंदर्याने नटलेली सजलेली धरणी माता पाहून मन प्रसन्न होते. समुद्राचे पाणी तर खारट असते. त्याचे ढग बनवायचे, त्याचे गोड पाण्यात रूपांतर करून पृथ्वीवर जलधारांच्या रूपात पाठवायचे. पाणी म्हणजे अमृत. तहानलेल्याची तहान भागवते. धनधान्य पिकतात, फळाफुलांना बहर येतो आणि आपले जीवन तर पाण्यावर अवलंबून आहे. कुठल्याही कारखान्यात पाणी तयार होत नाही. ही भगवंताची कृपाच आहे, ही देवाची नवलाईच आहे. झाडांचे महत्त्वही एका कडव्यात वर्णन केले आहे. शेवटच्या कडव्यात नरदेहाचे महत्त्व सांगितले आहे. या देहातूनच खऱ्या देवाची ओळख करून घेण्याचे सामर्थ्य आहे. या देहात बुद्धीची महान देणगी लाभली आहे. म्हणून उत्तम कर्मे करून, सदाचाराने वागून देहाचे सार्थक करावे. तरच जीवनात सुख शांती समाधान लागणार आहे. 

प. पू. अक्कास्वामींचे दैवत म्हणजे बाळकृष्ण. कृष्णावर त्यांचे अतिशय प्रेम. तोच त्यांचा सखा, गुरू, मित्र, माता-पिता अशा अनेक नात्यात त्यांनी त्याचेच रूप पाहिले, त्याच्याशी सुख संवाद केला. माझा सखा’ या काव्यात त्या म्हणतात, “कृष्णजीविता सखा हो माझा । कृष्णजीवीचा सखा ।।” प्रत्यक्ष बालरूपात दर्शनाचा योग त्यांच्या जीवनात आला, साक्षात्कार झाला. आक्का लिहित असलेल्या भागवतावर चंदनाची केशरट रंगाची पावली उमटली. असा सुखद अनुभव भगवंत कृपेने त्यांच्या जीवनात आला. या सावळ्या बाळकृष्णाच्या अनेक लीला त्यांनी काव्यातून व्यक्त केल्या आहेत, ही एक गौळण –

“सखे ग हरी खोड्या करी अनिवार ।

लावी कलागती खटनट श्रीपती ।

त्वरित होई पसार । सखे ग हरी ।। १ ।।

आशा म्हणे अशी हरीची लीला ।

गावी अपरंपार सखे ग हरी ।। २ ।।”

आनंद सागर या काव्यसंग्रहात एकूण पन्नास काव्ये आहेत. यातील काही काव्यांचे थोडक्यात विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यांच्याच भजनाने या लेखाचा समारोप करत आहे. 

“सद्गुरुनाथ माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ।

इंदूरच्या जीजीआई । मजला ठाव द्यावा पायी ।।”

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

Language