प. पू. आक्कांचे भागवत

प. पू. आक्कांचे भागवत
श्रीमती माधुरी गाडगीळ
  • October 19, 2025
  • 1 min read

प. पू. आक्का म्हणजे दासबोध सखोल अभ्यासाच्या संयोजिका कुमारी आशालता चिंतामणराव वेलणकर, अंबरनाथ. प. पू. आक्कांनी जे ग्रंथ लेखन केले त्यात आनंद सरिता, आनंद सागर इ. काव्यसंग्रह, पडवीवरचा दासबोध, स्वयंपाकघरातील दासबोध, बलराम चरित्र, भागवत पुष्पमाला इत्यादी ग्रंथ आहेत. त्यात ‘भागवत पुष्पमाला’ या ग्रंथाला विशेष असे स्थान आहे. भागवत महापुराण आहे. त्यामध्ये बारा स्कंद, अठरा हजार श्लोक आहेत. ते अतिशय लोकप्रिय असून ते संस्कृत भाषेमध्ये आहे. अनेक ठिकाणी क्लिष्ट आहे. “बुडते हे जन न देखवे डोळा । म्हणोनि कळवळा येत असे ।” संतांचे हृदय अतिशय कोमल असते. त्यांना सामान्य जनांचे दुःख पहावत नाही. या दुःखी कष्टी जीवाला धावपळीच्या जीवनात आनंद हा हवासा वाटतो. सद्गुरूकृपेने प. पू. आक्कांना या आनंदाच्या झर्‍याचा शोध लागला. तोच आनंद त्यांनी त्यांच्या भागवत सप्ताहातून लुटला. पण जे सप्ताहाला येऊ शकत नाही पण आनंद तर हवा आहे अशांसाठी आनंदाची, विश्रांतीची जागा म्हणजे आक्कांचे भागवत म्हणजे ‘भागवत कथा पुष्पमाला’ हा ग्रंथ होय. प्रत्यक्ष बाळकृष्णाचा कृपाप्रसाद या ग्रंथाला लाभलेला आहे. प. पू. आक्का ग्रंथाचे लेखन करीत असताना वहीवर प्रत्यक्ष बाळकृष्णाचे पदचिन्ह उमटलेले अनेकांनी पाहिले आहे. प. पू. आक्का या शिक्षिका होत्या. त्यामुळे कठीण विषय सहज सोपा करून सांगण्याची हातोटी आपल्याला या ग्रंथात दिसून येते. या पुष्पमालेत ३१ पुष्प गुंफलेली आहेत, रेखाचित्रे आहेत. संतांची, कवींची पदे तसेच स्वतः आक्कांनी रचलेली पदे या ग्रंथाची शोभा वाढवतात. साध्या, सोप्या, सरळ शब्दातून अतिशय गहन तत्वज्ञान या पदांमधून सांगितले आहे. उदा. धृतराष्ट्र व गांधारी महाभारत युद्धानंतर पांडवांजवळ रहात असत. धर्मराज रोज त्यांना वंदन करीत असे. भीमाला राग यायचा तेव्हा धर्मराज म्हणतो, “कशाला दोष द्यावा दुसऱ्याला । कर्म आपुले दैव आपुले । परब्रम्ह सर्वत्र संचले । दूर करू मोहाला । कशाला दोष द्यावा दुसऱ्याला ।।” त्याचप्रमाणे या ग्रंथातील वाक्यरचना देखील विचार करायला लावणारी आहेत व जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारी आहेत. असे काही अमृत विचार जे चिंतन करायला लावणारे आहेत, त्याचा आता विचार करूया. 

१) मनुष्य, नष्ट होणाऱ्या शरीराला पुष्ट करण्यासाठी कष्ट करतो पण दुष्ट वासना त्याला टाकतात. मृत्यू समयाला जी वासना उद्भवते त्याप्रमाणे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून नाश पावणाऱ्या शरीरावर अतोनात प्रेम करून पुन्हा पुन्हा संसारात पडण्यापेक्षा याच शरीराचे सहाय्याने भगवंताची प्राप्ती का न करून घ्यावी ? 

२) एक दिवस भरपूर पाणी घालून चार दिवस न घातले तर साधे रोपटे सुद्धा सुकून जाते, वाढत नाही; तसेच भक्तीचे आहे. भक्ती ही सातत्याने असावी. आपल्या दुःखावरून दुसऱ्याचे दुःख जाणावे हेच खरे भक्तीचे लक्षण. जग सुखी असू दे मी दुःखात राहूनही दुसऱ्याचे सुख पाहू शकेन, समाधानी राहीन; हा आदर्श सदैव डोळ्यासमोर ठेवायला नको का ? 

३) एखादी गोष्ट मनाने घेतली तर जगात अवघड काय आहे ?

४) जितक्या गरजा कमी तितके सुख अधिक. आयुष्याचा क्षण अन् क्षण नामस्मरणात जावा. अध्यात्म श्रवणाची गोडी वाढवावी म्हणजे विषयांची आवडी कमी होईल.

विषय सेवनाने चित्त मलीन होते. भागवत कथा श्रवणाने ते शुद्ध होते. चित्ताची आत्यंतिक शुद्धता म्हणजे मोक्ष. आत्म्याच्या बंधाला व मुक्तीला कारण चित्तच. विषयांचे ठिकाणी आसक्त झाले की बंध. ईश्वराचे ठिकाणी रत झाले तेच चित्त मुक्तीला कारण. 

५) स्थूल देह व सूक्ष्म देह कार्य करण्यास अयोग्य झाले की तेच जीवात्म्याचे मरण. पुन्हा दोन्ही देह उत्पन्न झाले की जीवात्म्याचा जन्म. म्हणून जगण्याबद्दल दैन्य दाखवू नये. मरणाबद्दल भय मानू नये. 

६) वासनारुप मळ धुतला गेला पाहिजे. भगवंताचे ठिकाणी प्रीती असली तर मळ लवकर धुतला जातो.  देहावरची प्रीती कमी व्हावी, आत्मस्वरूपाबद्दल प्रेम उत्पन्न व्हावे हाच खरा कल्याणकारक साधन मार्ग होय. नामस्मरणाने वासना क्षीण होतात. नामाला कधीच सोडू नये.  

७) कामात सफलता प्राप्त होईपर्यंत प्रयत्न करावा.  

८) स्तुतीच्या वर्षावाने मनुष्य कर्तव्य विसरतो. कृष्ण पूर्ण कर्तव्यदक्ष. 

९) झाले गेले विसरून जायला मन मोठे असावे लागते. असे मनच विश्वमन होऊ शकते. 

१०) मनुष्य विलासात राहिला की ज्ञानावर आवरण येते. सद्गुरूकडूनच हे आवरण दूर होते. 

११) मनुष्य शरीर दुर्लभ आहे हे सदैव ध्यानात ठेवावे. मनुष्य शरीर म्हणजे संसार सागर तरून जाण्याची नाव. अनन्य शरणागती आली की सद्गुरू नावाडी होतात. 

अशा प्रकारच्या मौलिक विचारांची पेरणी आक्कांच्या भागवतात पानोपानी आहे. कृष्णकथा मुळातच गोड. त्यात प. पू. आक्कांसारख्या कृष्णभक्तांनी आळवल्यामुळे अधिकच गोड झाली आहे. भागवताचा नायक भगवान श्रीकृष्ण आहे. त्याचे चरित्र या ग्रंथात विस्तृतपणे सांगितले आहे. त्याचबरोबर अनेक राजांच्या कथा, भगवंताच्या अवतार कथा, सुकन्या चरित्र, ध्रुव बाळाची कथा, कपिल मुनींनी मातेला केलेला उपदेश, इ. मागचे रहस्य सोप्या भाषेत उलगडून दाखवले आहे. या कथांमधून आपण काय घ्यायचे हे पण स्पष्ट केले आहे. 

भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा संगम म्हणजे भागवत कथा पुष्पमाला. या त्रिवेणी संगमात नित्य स्नान करायला हवे. प. पू. आक्कांनी तीनशेच्या वर भागवत सप्ताह केले. अगदी खेड्यापाड्यात त्यांनी सप्ताह केले. अनेक भागवतकार तयार केले ‘भागवत कथा पुष्पमाला’ या ग्रंथाद्वारे त्यांचे भागवत आजही उपलब्ध आहे. आपण त्याचे श्रवण, मनन, निदिध्यासन करून स्वानंद लुटावा. ज्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली त्या सद्गुरू माऊलीला त्रिवार वंदन ! 

गोपाल कृष्ण भगवान की जय ।

सद्गुरूनाथ महाराज की जय ।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language