परम पूजनीय आक्का वेलणकर

परम पूजनीय आक्का वेलणकर
Dr. Vijay Lad
  • October 22, 2025
  • 1 min read

 

परम पूजनीय आक्का वेलणकर अर्थात तीर्थरूप आशालता चिंतामणराव वेलणकर या थोर कृष्ण भक्त होत्या. पण त्यांनी आपले आयुष्य समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्यात घालवले. पू. आक्कांनी जवळपास ५०० भागवत कथा केल्या. भागवत कथा पुष्पमाला आणि इतर काव्यमय ग्रंथांची रचना त्यांनी केली. पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमानंतर साधकांच्या मागणीप्रमाणे त्यांनी १९८४ मध्ये ‘दासबोध सखोल’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. पाहता पाहता ४० वर्ष या उपक्रमाला झाली. समर्थ वाङ्मयाचा सखोल आणि शिस्तबद्ध अभ्यास करणाऱ्यांचा परिवार म्हणून दासबोध सखोल उपक्रमाकडे पाहिले जाते.

पू. आक्कांना मी पहिल्यांदा नांदेड येथे ‘आत्माराम’ या ग्रंथावर त्यांची प्रवचने चालू असताना पाहिले. नऊवार पांढरी साडी, तिला बारीक निळे काठ, नेसलेली एक सोज्वळ मूर्ती मी पाहिली आणि माझ्या मनात अत्यंत सात्त्विक भाव निर्माण झाला.

आत्माराम ग्रंथावरचे त्यांचे प्रवचन मला त्यावेळी तसे फारसे उमगले नाही. पण त्यांची छबी मात्र माझ्या मनावर कायमची कोरली गेली. प्रवचनासाठी एकदा मांडी घातली की दोन अडीच तास ती हलत देखील नसे. नांदेड शहरात ज्यांनी दोन तपे समर्थ संप्रदायाचा प्रचार प्रसार केला, त्या माढेकर परिवारांच्या घरी  पू. आक्का रहात असत. मी नांदेडला ज्या भागात राहत होतो तेथे आजूबाजूला शेती असल्यामुळे मी पू. आक्कांना स्कूटरवरून घरी नेऊ शकलो नाही. पू. आक्कांची पाय धूळ माझ्या घरी पडली नाही हे माझे दुर्दैव.

वंदनीय आक्का यांनी दासबोध सखोल अभ्यास उपक्रम सुरू केला, त्यानंतरचे पहिले संचालक आदरणीय वसंतराव तथा तात्यासाहेब गाडगीळ; समर्थ रामदास स्वामी आणि मी; आंम्हा सगळ्यांचे गोदावरीशी एक वेगळे नाते आहे. पू. आक्कांनी नांदेडला देह ठेवला आणि मी सुद्धा नांदेडला नाभीस्थान असलेल्या गोदाकाठीच रहात असे. आता संभाजीनगरला आलो असलो तरी येथून जवळच गोदावरी आहे. 

तीर्थरूप तात्यासाहेब गाडगीळ यांनी घालून दिलेल्या शिरस्त्याप्रमाणे आणि पू. आक्कांच्या शिस्तीप्रमाणे दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची यशोगाथा चढत्या वाढत्या आलेखाने समर्थ संप्रदायात चालू आहे. या उपक्रमाचा कुटुंब प्रमुख म्हणून मला मोठा अभिमान आणि समाधान आहे. समर्थ संप्रदायामध्ये दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन म्हणून नोंदणी झाली. उपक्रमातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ जाणकार यांनी तयार केलेल्या रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळाचे चढते वाढते कार्य पाहून, समर्थ संप्रदायच नव्हे तर इतर अनेक संतांची काव्य आणि वाङ्मय यांचा सुद्धा संकेतस्थळावर समावेश केला आहे. या संकेतस्थळामुळे अध्यात्मिक क्षेत्रात अनेक गोष्टी सहज आणि सुलभ झाल्या आहेत. 

दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या उपक्रमातील अनेक साधक आणि समीक्षक हे लेखक, प्रवचनकार व निरूपणकार म्हणून समाजात पुढे येत आहेत. २०२१ मध्ये पू. आक्कांची जन्म शताब्दी मोठ्या उत्साहाने देश, विदेशात साजरी करण्यात आली. पावणे दोनशे वर्षांपूर्वी पूजनीय योगीराज महाराजांनी हैदराबाद येथे समर्थांचे ओवीबद्ध चरित्र सांगितले तो ग्रंथ म्हणजेच श्री दासलीला आणि इतर अनेक ग्रंथांचे प्रकाशन या वर्षभरात फाउंडेशन तर्फे करण्यात आले. 

श्री सुंदरमठ सेवा समिती, शिवथरघळ येथे आलेला मोठा प्रलय आणि झालेली पडझड यात खारीचा वाटा म्हणून पू. आक्कांचा दास्य भक्तीचा आदर्श घेऊन दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन तर्फे रुपये अकरा लाख एवढा निधी तेरा दिवसांमध्ये जमा झाला, ही एक मोठी उपलब्धी होय. त्याचप्रमाणे पूजनीय स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी अयोध्येत समर्थांच्या नावे वेद पाठशाळा काढण्याचे  घोषित केल्यानंतर आपला खारीचा वाटा म्हणून अकरा लाख रुपयांचा निधी स्वामीजींना पुण्यातील मोशी येथील दिमाखदार सोहळ्यात श्री दासनवमी अर्थात २२ फेब्रुवारी, २०२५ या दिवशी अर्पण करण्यात आला. त्यापूर्वी फाउंडेशनच्या शंभर साधकांनी नोव्हेंबर मध्ये अयोध्येत जाऊन समर्थ संप्रदायातील प्रस्थानत्रयी ग्रंथाचे पारायण केले. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची आकाशात फडकत असलेली ही ध्वजा पाहून  पू. आक्कास्वामी वेलणकरांना नक्कीच आनंद होत असणार. फाउंडेशनचा हा उपक्रम अभ्यासाची खोली आणि शिस्तीची पातळी वर्धिष्णू ठेवत दातृत्व संपन्न असा ‘समर्थ भक्तांचा परिवार’ समाजापुढे येतो आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करीत कोजागिरी पौर्णिमेपासून पासून सात दिवस साधना सप्ताह साजरा करणारा  समर्थ भक्तांचा हा मेळा पू. अक्का स्वामींच्या ध्येयाप्रमाणे उत्कट साधक तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

Language