पंचमहाभूतांची पंचोपासना पूर्वार्ध

पंचमहाभूतांची पंचोपासना पूर्वार्ध
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • September 13, 2025
  • 1 min read

तत्त्वज्ञान हा कोणत्याही संप्रदायाचा आत्मा असतो. स्वरूप संप्रदाय हा समर्थ संप्रदाय आहे. समर्थांनी जाणीवपूर्वक, नियोजन आखून प्रयत्नपूर्वक हे शास्त्रीय नाव दिले. जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म, यांचे संबंध काय आहेत ? शरीरातील व सृष्टीतील सूक्ष्म घटक कोणता ? अनेकत्व दिसणार्‍या सृष्टीत एकत्व कशात आहे ? सतत परिवर्तन होणार्‍या देहात; सृष्टीत; संसारात अपरिवर्तनीय तत्व कोणते आहे ? जगत माणसात भिन्नत्व का आढळते ? पिंडी ते ब्रह्मांडी याचा नेमका अर्थ काय ? असे प्रश्न “चिंता करितो विश्वाची” यातील स्फुरण असलेल्या नारायण ठोसर किंवा समर्थ रामदासांना पडले. घरच्या चार भिंतीत उत्तर मिळणार नाही, या निश्चयाने ते घराबाहेर पडले. १२ वर्षे तपाचरण, १२ वर्षे देशाटन-निरीक्षण- अभ्यास, गुरु-शिष्य संवाद चर्चा यातून समर्थ वाङ्मयात या प्रश्नांची उत्तरे व विवेचन अभ्यासता येते. 

जीव सृष्टी निर्माण का झाली ? बृहदारण्यक उपनिषद १-४-३ म्हणते “स वै नैव रेमे तस्मादेकाकी न रमते स द्वितीयमैच्छत् ।” एक आहे अनेक व्हावे हे पहिले स्फुरण आहे. समर्थ दासबोधात म्हणतात, “मूळमाया जाणीवेची । मुळींच्या मूळ संकल्पाची ।।१५-७-२।।” ब्रह्म अधिष्ठानरूप असते. निर्मिती पूर्वी अनंत ब्रह्मांडे बीजरूपाने अव्यक्त किंवा सुप्तावस्थेत असतात. ब्रह्मत्वाच्या चैतन्याच्या आश्रयाने राहून माया शक्तिरूपाने जगत निर्माण करते. “ऐशा अनंत शक्ति होती । अनंत रचना होति  जाती । तरी अखंड खंडेना स्थिती । परब्रह्माची ।।६-४-५।।” अनंत शक्तिच्या सहाय्याने पंचमहाभुते आणि सत्व-रज-तमोगुणाने माणसाचे व्यक्तिमत्त्व आकार घेते. ही सृष्टी ईश्वराच्या योजनेनुसार चालते. समर्थ म्हणतात, “त्या तिही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि  पाहतां ।।१८-८-८।।” ब्रह्म-आकाश-वायु तेज-आप-पृथ्वी वनस्पती-जीव अशा क्रमाने सृष्टी निर्माण झाली. हे आवाहन किंवा उभारणी आहे. मूळ मायेपासून विश्वाचा पसारा आरंभ होतो. तिच्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव व साम्यावस्था हेच भगवंताचे स्वरूप होय. दशक १६ मध्ये समर्थ पंचमहाभूतांचा विचार मांडतात तो आपण पाहू या.

 

पृथ्वी – ‘पृथ्वी’ शब्द ‘प्रथ’ धातूपासून तयार होतो. ‘प्रथ’ म्हणजे वाढणे; मोठे होणे; पसरणे. जी सर्व दिशांना पसरलेली आहे ती “पृथ्वी”. पृथू राजाने गोरूपधारी भूमीचे दोहन करून अनेक बीजे उत्पन्न केली. जमीन सारखी करून नगरांची रचना केली. सर्व सचेतन, अचेतन, स्थावर व जंगम पदार्थांना पृथ्वीचा आधार आहे. शुभ्र बर्फाने आच्छादलेले पर्वत, अनेकांना जीवन देणार्‍या नद्या, पाण्याच्या प्रचंड साठयाने भरलेले समुद्र, नाना रंगाची व सुवासाची फुले, नाना स्वादांची फळे, उत्तुंग वृक्ष, रंगीबेरंगी सुस्वर असलेले पक्षी असे अलौकिक सौंदर्य पृथ्वीवर आढळते. समर्थ रामदास तिला “बहुरत्ना वसुंधरा” म्हणतात. पृथ्वी मातेची क्षमा व सहनशीलता अजोड आहे. आपण तिला खोदतो, नांगरतो, घाणेरडे पदार्थ टाकतो; त्याच्या बदल्यात ती आपल्याला अन्नधान्य, वनस्पती, औषधे, खनिज द्रव्ये, फुले, फळे देते. धरणी माता जल देऊन आपले जीवन समृद्ध करते. ही पृथ्वी देव-दानव, मानव, प्राणी, संत व दुष्ट सर्वांना आश्रय देते. रत्ने, हिरे , परिस पृथ्वीत मिळतात. काही लोक जमीन माझी म्हणतात, पण ते गेल्यावर ती रहाते म्हणून ती खरी भगवंताची आहे. पृथ्वीच्या शक्ती व सामर्थ्याचा वापर करून सुद्धा काही तत्त्वचिंतक जगाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतात. किंवा काही अज्ञानी; सत्ता, पैसा यांच्या बेसुमार तृष्णेमुळे पृथ्वीवर अत्याचार करतात व त्यामुळे जीव सृष्टीचा समतोल बिघडतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविध गुण पृथ्वीचे आहेत. स्थूल देहात हाडे, मांस, त्वचा, नाडी, आणि रोम ही पृथ्वी तत्वे आहेत. देहाच्या कर्मेंद्रियांद्वारे कर्म अवलंबले जाते व गृहस्थाश्रमात वंश परंपरा चालत रहाते.

आपतत्त्व – पाणी, नद्या, नाले, ओढे, डोह यातून मिळते. पाण्याचे थंड, उष्ण झरे असतात. ऊसाचा रस, फळाचा रस, गोरस यात पाणी असते. देह व पृथ्वी आपापासूनच बनते. शरीरात पाणी असते, पाण्याजवळ पवित्र तीर्थे असतात. आप तत्त्वात तेज, वायु, पृथ्वी व आकाश तत्त्वही असते. वैदिक ऋषींनी पाण्याचे महत्त्व जाणले होते. वरुण या पाण्याच्या देवतेचे ते पूजन करीत.  पाणी शुद्ध, निर्दोष, मधुर, दोष नाशक, बलदायक व रोग निवारक असते. पृथ्वीचा ३/४ भाग पाण्याने व्यापला आहे. पाणी, उष्णता; वाफ; बर्फ व पुन्हा पाणी हे जलचक्र अव्याहत चालते. सोडीयम, आयोडीन हे क्षार पाण्यातून मिळतात. पाण्याचा गैरवापर, पाण्याचे प्रदूषण व पाणी वाया घालवणे हे प्रकार आजही आपण पाहतो. समर्थांच्या काळात त्यांनी पाण्याच्या  नियोजनाचा विचार सांगितला. समर्थ म्हणतात, 

नदीचे उदक वाहत गेले । ते निरर्थकचि चालिलें ।

ते जरी बांधोन काढिलें । नाना तळी कालवें ।।

उदक निघेने वर्तविले । नाना जिनसी पीक काढिले ।

पुढें उदकचि जाले । पीके सुवर्ण ।।

गोंमुखें पाट कालवे । साधूनि बांधूनि आणावे ।

स्थळोस्थळीं खेळवावे । नळ टाकीं कारंजीं ।।”

या ओव्यांवरून समर्थांचा पाण्याच्या नियोजनाचा विचार कळतो.

तेज किंवा अग्नि – ‘अज’ या धातूपासून हा शब्द तयार होतो.अङ्ग नि ऊर्ध्व, म्हणजे वर जातो तो अग्नि. अग्नि ही इंद्रिय गोचर घटना आहे. दहन व ज्वलन हे तिचे स्वरूप आहे. उष्णता व प्रकाश अग्निमधून मिळतात. अग्नीचा प्रवास असतो. थंड वस्तूमध्ये गरम वस्तूतून उष्णता जाते. गॅसवर भांड्याच्या तळाशी असलेला पदार्थ प्रथम उष्ण होतो, तो वर येतो व वरचा खाली, अशाप्रकारे पदार्थ गरम होतो. अवकाशातूनही उष्णता मिळते. शरीर जिवंत रहाण्यासाठी उष्णता लागते, त्याला शरीराचे स्वाभाविक तापमान म्हणतो. वैदिकऋषींनी अग्नीचे महत्त्व जाणले. म्हणून ऋग्वेदाचा आरंभच अग्निस्तवनाने होतो. यज्ञातील अग्नीला ‘ग्रहपती’ म्हणतात. अग्नि प्रकाश देतो. ईश्वरी ज्ञानात अग्नि आहे तो देहबुद्धी नष्ट करतो. सूर्य व अग्नि ही मोठी दैवते आहेत. अग्नीमुळे अन्नाला चव येते. सागरात वडवानल, भूगोलाबाहेर आवरणानल असतो. आग्या सापाच्या तोंडतील अग्नि डोंगर जाळून टाकतो. अग्नीचे घर्षण करून तयार केलेली वीज, जलावर निर्माण केलेली वीज व अंतरिक्षातील वीज ही अग्नीची तीन रुपे आहेत. तीन लोक, वायु, आदित्य, आप, औषधी, वनस्पति, लाकूड, शरीर ही अग्नीची निवास स्थाने आहेत. काळी, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुचीदेवी या अग्नीच्या सात जिव्हा आहेत. समर्थ दासबोधामध्ये (१६-५-२९) चार शिंगे, तीन पाय, दोन डोकी, आणि सात हात  आहेत असे अग्नीचे वर्णन करतात. अग्नि, ज्ञानी लोकांचा परमेश्वर; गृहस्थाचा पालक; मानवाचा अतिथि आणि पृथ्वीचा रक्षणकर्ता आहे. वास्तूशांतीमध्ये अग्निची पुजा करतात. रामायणात दशरथाच्या यज्ञातून पायस मिळाले आणि श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांचा जन्म झाला. कौसल्या अग्नीत समंत्र हवन करत असे. अग्निला साक्षी ठेवून श्रीराम व सुग्रीव मैत्री झाली. सीतेने अग्निदिव्य केले. अग्निहोत्र व वैश्वदेव या द्वारे अग्नीचे रोज पूजन करण्याची पद्धत होती. महाभारतात खांडव वनाचा दाह करण्यासाठी श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र व अर्जुनाने अक्षय भाता धनुष्य दिले. होलिकेचे पूजन करून, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची पद्धत आजही आहे. पृथ्वी, आप, वायु व आकाश यात अग्नितत्त्व आहे व त्यामुळे सृष्टीत समतोल आहे. अग्नि भक्षकही आहे व त्यामुळे सावधपणे त्याचा वापर आपण करणे गरजेचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात “सर्वभक्षकु त्याची थोरी । काये म्हणोनी सांगावी ।” 

वायू व आकाश या तत्त्वांचा विचार उत्तरार्धात करूया.

जय जय रघवीर समर्थ

Language