माहिती

दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या संस्थापक

परमपूज्य आदरणीय आशालता उर्फ अक्का वेलणकर यांचा अल्प परिचय

संत आनंदाचे स्थळ। संत सुखचि केवळ । नाना संतोषाचे मूळ। ते हे संत ।। दासबोध ।।

महाराष्ट्र ही संतभूमी आहे. ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामी महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आदि थोर संत येथे होउन गेले. परमपूज्य अक्का वेलणकर, या अशा आत्मज्ञानी संतांपैकी एक होत्या. परमपूज्य अक्कांचे वेलणकर घराणे मूळचे गुहागर जवळील वेळणेश्वरचे. सात पिढ्यांपूर्वी ते इचलकरंजी येथे स्थलांतरित झाले, त्यानंतर पोटापाण्याच्या निमित्ताने अक्कांचे वडिल चिंतामणराव जळगावला आले. भक्तिमय वातावरण असलेल्या वेलणकरांच्या घरात अक्कांचा जन्म शके १८४४ म्हणजेच २३ ऑक्टोबर १९२२ रोजी जळगावला झाला. मूळच्या भगवद्भक्त असलेल्या अक्कांचा ओढा घरातील सात्विक वातारणामुळे अधिकाधिक भक्तीमार्गाकडेच दृढ होत गेला. रोखठोक स्वभाव, सखोल ज्ञानप्राप्तीची तळमळ, कुशाग्र बुद्धिमत्ता, शिस्तप्रियता असे त्यांचे विशेष गुण. अकरावी पर्यंतचे शिक्षण जळगांवमध्ये झाल्यानंतर अंबरनाथ (जि.ठाणे) येथे त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. त्या नोकरी निमित्ताने अक्कांनी अंबरनाथ येथे आई भावंडासह स्थलांतर केले आणि तिथेच त्या सेवानिवृत्त झाल्या. अक्कांनी आपला देह नांदेड येथे १९९८ मधील धनत्रयोदशीच्या दिवशी भागवत सप्ताह सुरू असताच ठेवला. हा झाला त्यांचा लौकिक जीवनाचा परिचय. त्यांना परमपूज्य भागीरथीबाई वैद्य यांनी अनुग्रहीत केले होते. भागीरथीबाई वैदय या इंदोरच्या बलभीम महाराजांच्या शिष्या. त्यांनी चाफळ येथे सज्जनगडचे अधिपती तात्यास्वामी यांच्याकडून समर्थसंप्रदायाचा अनुग्रह घेतला. या दीक्षेचा आरंभ स्वतः समर्थापासून झाल्याचे परंपरा मानते. या संप्रदायाच्या मान्यतेप्रमाण अक्कांनीही ‘क्षेत्र प्रयाग’ येथे स्वतःचे स्वयंश्राद्ध केले. त्यामुळे त्यांचा मान हा समर्थसंप्रदायातील  ‘कफनीधारी’  बुवांएवढाच आहे.

कार्य – आपल्या सद्गुरूंच्या आदेशाने त्यांनी तीनशेपेक्षा जास्त भागवत सप्ताह केले. सुमारे ४५ प्रापंचिक महिलांना भागवत कथाकार म्हणून घडवले. त्या पदाअच्या अनेक वर्षे केंद्रप्रमुख होत्या. उत्कट साधक निर्माण व्हावे म्हणून १९८४ साली त्यांनी दासबोध सखोल अभ्यासक्रमाची निर्मिती केली. त्यांनी आपल्या हयातीतच “दासबोध सखोल अभ्यास” या उपक्रमाची धुरा आदरणीय समर्थभक्त वसंत उर्फ तात्या गाडगीळ यांच्यावर सोपवली होती. त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलदादा चिंचोळकर यांच्याकडूनही दरवर्षी शिवथर घळ येथे होणाऱ्या साधनासप्ताहात उपस्थित रहाण्याविषयी कबुल करून घेतले होते.

परमपूज्य अक्कांची ग्रंथ संपदा

  • पडवीवरचा दासबोध
  • दासबोध माझे माहेर
  • स्वयंपाकघरातील दासबोध
  • भागवत कथा पुष्पमाला

काव्य संग्रह

  • आनंदसागर
  • आनंद सरिता
  • आनंद संजीवनी
Language