नरदेहाची अपूर्वता

नरदेहाची अपूर्वता
सुनंदा क्षीरसागर
  • June 22, 2025
  • 1 min read

धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |

जो जो कीजे परमार्थालाहो |  तो तो पावे सिद्धीतें || १.१०-१ ||

मनुष्यजन्म ही उन्नयन अवस्था होय. ८४ लक्ष योनीतून फिरून, ही अवस्था महत् भाग्याने प्राप्त होते. “पुनरपि जननं | पुनरपि मरणं | पुनरपि जननी जठरे शयनम ||” ह्या चक्रातून मुक्त होण्याची दिलेली संधी म्हणजे मनुष्य जन्म. विचार केला तर या जगात माझे काय आहे? स्पष्ट उत्तर काहीही नाही. मरणाच्या वेळी सोबत असते ती फक्त मन:पूर्वक उच्चारलेल्या रामनामाची… सामन्यांचा जीव मृत्यूच्या कल्पनेने भय व्याकुळ होतो तर संतांना तो अनुपम्य मुक्ती सोहळा वाटतो. आयुष्यभर मी माझे करत जगणाऱ्यांचे आयुष्य जितेपणीचे मरण ठरते. सारे स्वकीय स्मशानापर्यंत असतात. इतर रोज मरणारे असंख्य, कधी आपण; काय सत्कर्म केले याचा विचार करतील काय? 

आला आला जीव, जन्मासि  आला |

गेला गेला बापुडा, व्यर्थचि मेला ||”

जप, तप, तीर्थाटणे, नामस्मरण, हरिकीर्तन, ग्रंथपठण हे परमार्थ योग या नरदेहामुळे प्राप्त होतात. इतर सजीव आहार, निद्रा, भय, मैथुनात रमून मरून जातात, सजीव असूनही ते अज्ञानाने आत्मोध्दार करून घेऊ शकत नाही. आपण आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यात चतुर असतो. आपल्याच कृतीने आत्मघात करून मग फक्त रडत बसतो. परमेश्वराने आपल्याला दिलेले सुंदर शरीर पूर्णपणे वाया जाते. आपला नरदेह संग सोडून देतो. म्हणून समर्थ म्हणतात, “मरणाचे स्मरण असावे” त्यातून ते आत्मोध्दार सुचवतात. त्यासाठी वैराग्य हवे. विषयांची पिलावळ विवेक-वैराग्ययांना पिटाळते वा मानवी मनाला कवटाळते. ज्यातून त्यांचा सर्वनाश घडतो. 

जीवनातले वैराग्य कसे प्राप्त होते? तर मोठ्या कढईतल्या लाह्या भाजताना काही लाह्या ताडताड उडून कढई बाहेर पडतात. त्या सर्वांग  सुंदर लाह्या पांढऱ्या शुभ्र आकर्षक असतात. मात्र न तडतडणाऱ्या कढईतल्या लाह्यांना कुठेना कुठेतरी डाग असतो. संसारातला, मीपणा असणारा  माणूस; बहीणाबाईंच्या भाषेत – “अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर” अशाप्रकारे कलंकित होऊन संपून जातो. 

समर्थ म्हणतात “शरीरासारिखें यंत्र | आणीक नाहीं |” ते देहाला यंत्राची उपमा देतात. विजेवर चालणारी यंत्रे बटन दाबताच कार्यप्रवण होतात, तद्वत मनरूपी बटणाने दहा इंद्रियरुपी यंत्रे कार्यरत होतात. इतर यंत्रे बिघाड झाल्यास दुसऱ्याने दुरुस्त करावी लागतात. मात्र शरीर यंत्रे स्वत:ची दुरुस्ती स्वत: करतात, एका  कालमर्यादेनंतर हा जीवात्मा शरीर सोडून निघून जातो.

अफाट कार्यशक्ती, बुध्दीची देणगी, श्रेष्ठत्व ही या यंत्राची वैशिष्ट्ये. “नर करनी करे तो | नर का नारायण हो जाये |” देहप्राप्ती नंतर या देहाचे सार्थक करावे असा सर्वच संताचा आग्रह आहे. 

जेणें परमार्थ वोळखिला | तेणें जन्म सार्थक केला |

येर तो पापी जन्मला  | कुलक्षयाकारणें || दा. १-९-२५ ||

या नरदेहाद्वारे आनंदप्राप्ती, ज्ञानप्राप्ती साधते. अनेक साधुसंतांनी त्याच्याद्वारे उत्तमगती मिळवली. जन्ममृत्यूचे अरिष्ट चुकवणारा हा नरदेह सर्व देहात वरिष्ठ आहे. त्याला समर्थांनी ब्रह्मांड वृक्षाचे फळ म्हटले आहे. ब्रह्मदेवाने हा वृक्ष (प्रपंच) वाढविला. त्यास मानवरूपी फळ आले. त्यामुळे भगवंतास एवढा आनंद झाला की, मानवयोनीत आल्यावर तो प्राणी स्वस्वरूप जाणून मुक्त होईल. त्याला मन, बुध्दीद्वारे नित्यानित्य, सारासार विवेक करण्याचे वरदान मिळाले आहे. नरदेहाचे सार्थक, अहंकाराचा त्याग करून आत्मानंदाच्या अनुभवाने सुखरूप होण्यात आहे; असे समर्थ दासबोधात मानवी जीवनाची मूळ समस्या मांडताना म्हणतात. सर्वसामान्य माणूस आयुष्यभर सुखासाठी धडपडतो. पण “सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकोनी आले” अशी त्याची अवस्था होते. 

नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ।

मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा ।।

श्रीमद्भागवत ११-२०-१७ ।।”

मानवदेह जसा सुलभ तसा दुर्लभ आहे. चांगला संकल्प हे त्याचे वल्हे तर गुरु सुकाणू धरणारा कर्णधार आहे. भगवंताची कृपा हा वारा आहे. त्या वाऱ्याने ते ढकलले जाणारे जहाज आहे. अशी सगळी मदत असताना जो माणूस भवसागर तरुन जात नाही तो आत्मघातकी होय.   

एक कथा आठवली. एक तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक जंगलातील  रस्त्याने जाताना एक पोते रस्त्यात पडले. तेथे काही मुंग्या आल्या त्यांनी १०-१२ दाणे घेतले व त्या निघून गेल्या. मग उंदीर आला त्याने १००-२०० ग्रॅम खाल्ले व तो निघून गेला. नंतर एक गाय आली तिने एक-दोन किलो खाल्ले  व ती निघून गेली. सर्वांनी पोटापुरते खाल्ले. शेवटी एक माणूस आला अन त्याने ते पोतंच उचलून घरी घेऊन गेला. सृष्टीत सर्व प्राणी पोटासाठी जगतात फक्त आणि फक्त माणूसच स्वार्थासाठी जगतो. म्हणून जवळ सर्व असूनही तो सर्वात असमाधानी,  दु:खी आहे. हे जीवन  खूप  सुंदर आहे. फक्त त्यात समाधानी राहिले पाहिजे. हे समाधान आपणास फक्त संत, ग्रंथच देऊ शकतात.

देहेरक्षणाकारणें यत्न केला | 

परी शेवटीं काळ घेवोनि गेला  |

करीं रे मना भक्ति  या राघवाची | 

पुढें अंतरीं सोडिं  चिंता भवाची || मनोबोध २६||

समर्थ सांगतात, त्या भगवंतावर विश्वास ठेवा; तो सर्वकाही करेल. देहाची काळजी करण्यापेक्षा रामाची भक्ती करा. त्याने तुझ्या देहाचे सार्थक होईल. समर्थ म्हणतात, “देवाच्या सख्यत्वासा|ठी | पडाव्या जिवालगांसी तुटी”  पण माणूस विषयातच रंगलेला दिसतो. खऱ्याखुऱ्या सुखाचा शोध संतांनी लावला आणि चाखलाही. देवाचे नामस्मरण देवासाठी नसून नरदेहाचे सार्थक होण्यासाठी आहे. समर्थ म्हणतात, 

तुला ही तनू मानवी प्राप्त झाली । बहू जन्मपुण्ये फळालागीं आली ।

तिला तूं कसा गोविसी विषयीं रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।।

राममंत्र केवळ सोपा नसून अत्यंत प्रभावी व तारक आहे. “जगी धन्य होईजे रामनामे” असा रामनामाचा महिमा आहे. मानवा, हा नरदेह व्यर्थ जावू देऊ नको रे. त्याचे सार्थक केले तर “नराचा नारायण होशील” असे समर्थ निक्षून सांगतात.

आज विज्ञानाने नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्याच्या सहाय्याने माणसाचे बाह्यजीवन सुखाचे दिसले तरी अंतर्यामी असमाधान, असुरक्षितता, अगतिकता, अशांती घर करून आहे, हे सत्य नाकारता येत नाही. केवळ मी, माझे अशा आत्मकेंद्रित वृतीत माणूस गुंडाळला गेला आहे. समाजातील हे चित्र समर्थांनी ४०० वर्षापूर्वी अवलोकिले. त्यांच्यातील लोकशिक्षक जागा झाला. “चिंता करितो विश्वाची” म्हणून त्यांनी लोकोध्दारासाठी स्वत:ला वाहून घेतले.

समर्थांनी नरदेहाचा वापर करून अवघ्या जगाचा संसार केला. कल्पांतापर्यंत मार्गदर्शन होईल असे वाङ्मय निर्माण करून लोकांना दिशा दाखवली, ती या नरदेहाच्या सहाय्याने. त्यांनी ग्रंथराज दासबोधात मानवी जीवनाची चिरंतन मूल्ये, हितोपदेश सांगितला आहे. म्हणून तो  कधीही कालबाह्य न ठरणारा “यावच्चंद्रदिवाकरौ” असा ताजातवाना ग्रंथ आहे व तो पुढेही मानवजातीस मार्गदर्शन करेल यात शंकाच नाही.

परमार्थीं तो राज्यधारी | परमार्थ नाहीं तो भिकारी |

या परमार्थाची सरी | कोणांस द्यावी || दा.१-९-२३ ||

मी देवच आहे असे समजून आत्मज्ञान करून घेतले तर या नरदेहाचे सार्थक होईल. हा मार्ग फक्त संतच दाखवू शकतात. हे काम राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींनी दासबोध रूपाने दाखवले. शेवटच्या दशकात शेवटी ते म्हणतात,

ग्रंथाचें करावें स्तवन | स्तवनाचें काये प्रयोजन |

येथें प्रत्ययास कारण | प्रत्ययो पहावा ||

वीस दशक दासबोध | श्रवणद्वारें घेता शोध |

मननकर्त्यास विषद | परमार्थ होतो ||

Language