मायेने ओतप्रोत भरलेल्या या विविधरंगी जगामध्ये जसे सगळीकडे एकजिनसी परब्रह्मच भरलेले अंती आढळून येते, तसेच नाना विषयांचे प्रतिपादन जरी दासबोधात केलेले असले तरी या सर्व प्रतिपादनातून ‘आधी केले मग सांगितले’ असा श्रीसमर्थांच्या आत्मप्रचितीचा रंग उधळलेला दिसून येतो. जगात वावरताना पदोपदी आपल्याला मूर्ख व्यक्ती भेटत असतात. अशा व्यक्ती ओळखायच्या कशा? याबद्दल श्रीसमर्थांनी या दशकात सविस्तर सांगितले आहे.
श्रीसमर्थांनी दासबोधामार्फत, आपल्यातील माणूसपण जागवायला शिकवले. श्रीसमर्थांनी व्यक्तिमत्त्व विकासाची विविध अंगे यांत उलगडून दाखवली आहेत. जीवन म्हणजे बाहेरून थोपलेली गोष्ट नाही तर ती आतून उमलण्याची प्रक्रिया आहे. पारमार्थिक होण्यापूर्वी आपण आधी प्रामाणिक मनुष्य झाले पाहिजे, असे श्रीसमर्थांना वाटते. मूर्खलक्षणे सांगताना, निंदा करणे किंवा टिंगल उडवणे हा श्रीसमर्थांचा हेतू खचितच नाही. माणसाचे जीवन बदलावे, नरदेहाचे सार्थक व्हावे, हा त्यांचा प्रधान हेतू आहे. ज्या माणसाला स्वतःचे हित कळत नाही त्याला ते ‘मूर्ख’ म्हणतात. खडे काढल्यावाचून धान्य वापरता येत नाही, तसेच दोष काढल्यावाचून प्रवृत्ती मार्ग शुद्ध होत नाही. शास्त्राप्रमाणे सद्वर्तन होण्यासाठी दोषत्याग केलाच पाहिजे. माणसाने प्रयत्नपूर्वक आत्मपरीक्षण करून स्वतःतील दोष समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या खाजगी जीवनात शुद्धता आणि सार्वजनिक जीवनात व्यवहार चातुर्य संपादन करण्यासाठी परिश्रमपूर्वक मूर्खपणाचा त्याग केला पाहिजे, असे श्रीसमर्थ म्हणतात. श्रीसमर्थ सांगतात,
येक मूर्ख येक पढतमूर्ख | उभय लक्षणीं कौतुक |
श्रोतीं सादर विवेक | केला पाहिजे || २-१-४ ||
श्रीसमर्थांनी जवळ जवळ सत्तर ते पंचाहत्तर प्रकारची मूर्खलक्षणे सांगितली आहेत, ती अशी –
बायकोच्या सांगण्यावरून स्वतःच्याच आई–वडिलांशी वाकडेपणा घेणारा, बाईलबुद्धीने वागून सर्व आप्त मित्रांशी संबंध तोडणारा, नित्य सासुरवाडीला जाऊन राहणारा, परस्त्रीशी लघळपणा करणारा, सामर्थ्य नसता सत्ता गाजवणारा, आपल्याच तोंडाने स्वतःचीच स्तुती करणारा, स्वतःचा नाकर्तेपणा दिसत असतानाही उगीच घराण्याच्या – वाडवडिलांच्या फुशारक्या मारणारा, कुणी विवेकविचार सांगितला असता न मानणारा, अनेकांशी शत्रूत्व असणारा, आपल्याच माणसांशी फटकून वागणारा आणि परक्यांशी मैत्री करणारा, इतरांच्या दोषांचे त्यांच्या पश्चात काथ्याकूट करणारा, परक्या ठिकाणी वचावचा जेवणारा, आपला मान अपमान स्वतःच्याच तोंडाने उघड करणारा, द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परद्रव्य हरण, परद्वारगमन या सर्व व्यसनात रमणारा, स्वतः काहीही न करता; दुसऱ्याच्या सहाय्याची आशा धरून आळशीपणात आनंद मानणारा, घरात शहाणपणाच्या गोष्टी सांगणारा पण सभेत, चारचौघात सांगताना लाजणारा आणि बोलताना घाबरणारा, कुणी शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या तरी लक्षात न घेणारा, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांसमोर घोटाळ्यात पडणारे वर्तन करणारा, निर्लज्जपणे बेलगाम वागणारा, रोग असून औषध न घेणारा, पथ्य न पाळणारा, प्राप्त परिस्थितीत आनंद न मानणारा, स्वभाव न समजून घेताच संगत किंवा मैत्री करणारा, सर्वकाळ दुश्चित्त किंवा कुढ्या मनाचा असणारा, कारणांचा विचार न करता किंवा अपराधावाचून दंड करणारा, शक्ती नसताना मध्येच तोंड घालून बोलणारा, घरच्या माणसांवर तोंडसुख घेणारा व बाहेर गोगलगायी सारखा वागणारा, स्वतः कुणावरही उपकार न करणारा, आणि दुसऱ्याने जरी याच्यावर उपकार केले तरी त्याची फेड अपकाराने करणारा, कृतीशून्य पण वाचाळ असणारा, तापट, खादाड, आळशी, घाणेरडा, दुष्ट, भित्रट, निलाजरा, लबाड, झोपाळू ही सर्व मुर्खलक्षणे होत; असे श्रीसमर्थांचे सांगणे आहे. पुढे ते सांगतात, विद्या, वैभव, संपत्ती, पराक्रम, सामर्थ्य यापैकी काहीच नसताना कोरडा अभिमान वहाणारा, चव्हाट्यावर शौचविधी किंवा लघुशंका करणारा, सदा नग्नप्राय दिसणारा, तो मूर्ख होय. अपशकुन झाले तरी ते न मानता आपलेच नुकसान करून घेणारा, मायेच्या माणसांना सुखाचा शब्दही न देता छळणारा, नीच लोकांशी नमून असणारा, शरण आलेल्यांस झिडकारणारा, स्त्री, पुत्र, कुटुंब हेच खरे मानून परमेश्वराला विसरणारा, जसे करावे तसे भरावे म्हणजेच, पाप अथवा पुण्य याचे फळ भोगावे लागते हेच ज्याला कळत नाही तोही मूर्खच होय. दुर्जनांच्या सल्ल्याने वागून अमर्यादपणा करणारा, विचार न करता वाटेल ती पापकर्मे दिवसाढवळ्या करणारा, देव, गुरू, माता-पिता, ब्राह्मण व स्वामी यांच्याशी द्रोह किंवा कपट करणारा, दुसऱ्याच्या दुःखात सुख व सुखामध्ये दुःख मानणारा, हरवलेल्या वस्तूचा शोक करणारा, ऐकणाऱ्याचा आदर नसला तरी बोलणारा, न विचारता साक्ष देणारा, ज्याला स्वतःची पत सांभाळता येत नाही, स्वतः नेहमी दुसऱ्यांची थट्टा मस्करी करतो; पण दुसऱ्यांनी केली असता लगेच चिडतो व वर्दळीस येतो तो मूर्ख. कारणाशिवाय बडबड करतो व जरूर तिथे तोंडात मिठाची गुळणी धरतो, भाऊबंदांवर विश्वास ठेवतो तो मूर्ख ! दृष्टीस पडलेली प्रत्येक गोष्ट मागणारा, रागाच्या भरात आपलेच नुकसान करून घेणारा, हलक्या लोकांशी बरोबरी करणारा, चढेल पणाने बोलणारा, आपल्या योग्यतेस न झेपणाऱ्या दुष्प्राप्य वस्तूंचा हेवा करणारा, स्वतःच्याच घरात चोरी करणारा, सदैव तलवारीच्या धारेवर धरल्याप्रमाणे दुसऱ्याचा छळ करणारा, विश्वासघातकी तसेच थोरांच्या मर्जीतून उतरलेला, उलटसुलट वागून सभेचा रसभंग करणारा, मुक्या प्राण्यांस क्रूरपणे मारणारा, खरे माहीत असतानाही खोटे सहन करणारा, संपत्ती प्राप्त झाली असता मागील ओळख विसरणारा, आपले काम होईपर्यंत नम्रपणे वागणारा, पण नंतर दुसऱ्यांचे काम न करणारा, स्वतः पुस्तके न वाचणारा, पण दुसऱ्यालाही वाचायला न देणारा, तो मूर्खच होय; असे श्रीसमर्थ म्हणतात.
तर अशी ही श्रीसमर्थांनी सांगितलेली नुसती मूर्खांची लक्षणे वाचूनच दमायला झाले; नाही का ? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, संपर्कात अशी मूर्खांची लक्षणे असलेली व्यक्ती कधी ना कधी आलेली असतेच.. होय ना ? यातील कितीतरी लक्षणे आपल्यातही असूच शकतात. ती जाणून घेऊन, ते दोष दूर करणे महत्त्वाचे, किंबहुना हेच श्रीसमर्थांना अभिप्रेत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||