विष्णूचा सातवा अवतार म्हणजे इक्ष्वाकु कुलाचे वंशज तसेच अयोध्या नगरीचे महाराज दशरथ आणि महाराणी कौसल्या यांचे सुपुत्र श्रीराम. महर्षि वाल्मिकी लिखित रामायण ग्रंथाचा नायक श्रीराम असून या विशाल रचनेतून श्रीरामाची ऐतिहासिक, परिपूर्ण आणि आदर्श व्यक्तिरेखा महर्षींनी साकारलेली दिसते. त्यांनी वर्णन केलेला श्रीराम हा पूर्ण मानवी मर्यादांचे पालन करताना दिसतो. जगातील श्रेष्ठ आणि सर्वोच्च गुणांचा समुदाय म्हणजे श्रीरामांचे चरित्र.
महर्षि वाल्मिकींनी दशरथनंदन श्रीरामाच्या चरित्रातून आपल्यातील उत्तम गुणांचा वापर करून देवत्व कसे प्राप्त करून घेता येते याचे दर्शन घडवले आहे. अनेक उत्तम गुणांची खाण असलेला कौसल्यानंदन हा उत्कृष्ट प्रजादक्ष राजा, उत्कृष्ट योद्धा, उत्तम कर्मयोगी, एक मानव म्हणून देखील श्रेष्ठ आहे. वास्तविक सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्याच्या आयुष्यात संकट आली, दुःखाचे प्रसंग आले, विरहाचे दुःख पदरी पडलं, मोहाचे, लोभाचे क्षण आले आणि श्रीरामाने या सर्वांचा स्वीकार केला. या सर्वांना ते सामोरे गेले. मानवी जीवनाशी ते इतके एकरूप झाले की त्यांना आपल्या देवत्वाचादेखीलविसर पडला. उत्तम आचार, उत्तम विचार कसा असावा याचा आदर्श म्हणजे श्रीराम आहेत. श्रीरामांनी धर्मरक्षणार्थ आणि लोकहितार्थ आपलं जीवन व्यतीत केलं.
श्रीराम अत्यंत नम्र आणि नित्य शांत असून त्याची वाणी अत्यंत मधुर आणि गोड आहे. निंदा, द्वेष, कपट करण्याची त्याची वृत्ती नाही.लोकांची मने जपणारा श्रीराम लोकांमध्ये मिसळून त्यांची दुःख जाणून,त्यांच्या समस्या सोडवून त्यांची दुःख दूर करण्यासाठी सतत तत्पर राहणारा आहे. सर्वांना आनंद देणार्या श्रीरामाला ‘लोकाभिराम’ हे विशेषण सार्थ आहे.
‘सत्य वचन’ हा रघुवंशाचा गुणविशेष श्रीरामांमध्ये पूर्णपणे उतरला होता. आपल्या वडिलांचे शब्द खोटे ठरू नयेत यासाठी श्रीराम प्रयत्नवादी आहेत. ज्यादिवशी राज्याभिषेक होणार होता त्याच दिवशी श्रीरामाला १४ वर्षे वनवास स्वीकाराला लागला. पण त्यांचा विशेष हा की त्यांनी आनंद आणि दु:खाचे हे दोन्ही प्रसंग शांत मनाने सहज स्वीकारले. स्थिरबुद्धीच्या श्रीरामांची स्वतःच्या बळावर राज्य हिसकावून घेण्याची वृत्ती नाही. आधाशीपणा, वखवख या दुर्गुणांना त्यांच्या ठिकाणी थारा नाही. अत्यंत समाधानी, शांत, पूर्ण संयमी असे हे व्यक्तिमत्व सर्वांच्या मनाला आजही भुरळ घालते.
अत्यंत दयाळू अशा श्रीरामांच्या मनात कोणाविषयी राग नाही. सर्वांना क्षमा करण्याची त्यांची वृत्ती आहे. माऊलीनी ‘अनाक्रोशे क्षमा’ अशा सुंदर शब्दात क्षमेचे वर्णन केले आहे. अनाक्रोशे क्षमा म्हणजे कोणाबद्दल कुठलाही राग नाही, चरफड नाही. सहजपणे आणि शांतपणे केलेली क्षमा. याच वृत्तीतून त्यांनी कैकयी मातेला माफ केले, तिच्या वर्तणुकीबद्दल श्रीरामांच्या मनात कुठेही कटुता नाही. रावण वधानंतरही आपल्याला त्यांच्या क्षमाशीलतेचे दर्शन घडतं. रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाने रावणाचा अग्नी संस्कार करण्यास नकार दिला. तेव्हा ‘मरणाबरोबर माणसाचं वैर संपतं’ ही विचारधारा असणार्या प्रभूनी बिभीषणाची समजूत घालून रावणाचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केला. शत्रूविषयी देखील उदात्त भाव ठेवणारे असे हे श्रीराम.
श्रीराम हे आदर्श शत्रू आहेत. रावणवधानंतर त्यांनी बिभीषणाला लंकेचे राज्य दिले. वालीवधानंतर सुग्रीवाला राज्य दिले आणि वालीपुत्र अंगद याचा युवराज पदावर राज्याभिषेक केला. ‘तोडणे’ यापेक्षा ‘जोडणे’ यावर श्रीरामांचा अधिक भर होता.
दशरथनंदन श्रीराम यांच्यामधील महत्वाचे रूप म्हणजे कोदंडधारी राम. श्रीराम अत्यंत नम्र, सदाचारी, नीतीने वागणारा आहे पण त्याचबरोबर धर्मरक्षक देखील आहे. अन्यायविरोधात उभा ठाकणारा पराक्रमी, बलसंपन्न असा श्रीराम अत्यंत बलवान असून त्याचा त्याला अहंकार नाही, तो शत्रूला कधीच क्षुद्र लेखत नाही. धर्मरक्षणासाठी, प्रजेवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात, साधू संतांच्या रक्षणासाठी,त्यांनी कोदंड हाती धरलं आहे. विशेष म्हणजे आपल्या सामर्थ्याचा उपयोग त्यांने दुर्बलांवर कधीच केला नाही. त्याने पराक्रम गाजवला तरी तो शत्रूवर अन्याय करत नाही . लुटालुट, जाळपोळ असे विध्वंसक प्रकार श्रीरामाकडून कधीच घडले नाहीत. क्रूरता हा दुर्गुण श्रीरामांमध्ये नाही.
स्वामी गोविंददेवगिरी म्हणतात त्याप्रमाणे, कोदंड हे श्रीरामांच्या जीवनातील महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे. श्रीराम हे सज्जन आहेत आणि शक्तीचे उपासकही आहेत.शक्तीची साधना म्हणजे गुंडगिरी नसून अन्यायाला प्रतिकार करण्याची ताकद निर्माण करणारी सकारात्मक ऊर्जा आहे. रामायणाचा आढावा घेतला तर श्रीरामाने अनेक गोष्टींचा त्याग केलेला दिसतो. अयोध्येचा, मातापित्याचा इतकेच नाही तर भगवती सीतेचा,परम प्रिय लक्ष्मणाचा देखील त्यांना त्याग करावा लागला.पण त्यांनी आपल्या कोदंडाचा कधीच त्याग केला नाही. म्हणून भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, ‘शस्त्र धारण करणाऱ्या लोकांमध्ये मी कोदंडधारी राम आहे’.
श्रीराम हे पतितपावन आहेत पश्चाताप झालेल्या भक्तांना ते अभय देतात . महर्षी वाल्मिकी, आहिल्या हे रामायणातील पश्चातापदग्ध व्यक्तीमत्व आहेत. ज्यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे. असं पाप पुन्हा घडणार नाही हे वचन त्यांनी श्रीरामांना दिलं आहे. या शरणांगताना प्रभुंनी मनापासून स्वीकारलं आहे. श्रीरामांचा अजून एक विशेष म्हणजे त्यांच्यामधील उत्तम नेतृत्व गुण. पुढच्या माणसांच्या गुणांचा ते विकास करतात, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवतात. सुग्रीव अत्यंत भयभीत झाल्याने त्याला आपल्या सामर्थ्याचा विसर पडला तेव्हा त्याला त्याच्या गुणांची जाणीव करून देऊन त्याचा आत्मविश्वास त्यांनी वाढवला.
श्रीरामचंद्र हे उत्तम संघटक होते. रावणावर चाल करून जाताना खूप मोठे सैन्य त्यांच्याबरोबर होतं पण त्यांचं वैशिष्ट्य हे की यामध्ये १४ वर्षात जे आदिवासी, वंचित समाजातील तरुण, वानरगण या सर्वांचे त्यांनी संघटन केले होते त्यांचा समावेश होता. गुह, सुग्रीव, हनुमान या सर्वांना घेऊन त्यांनी आपली सेना बनवली होती. एक तप म्हणून स्वीकारलेल्या भगवंताचा वनवास हा धर्म रक्षणार्थ, कर्तव्य पालनासाठी, वडिलांना दिलेल्या वचन पूर्ण करण्यासाठी आहे.
विशेष म्हणजे रामराज्यामध्ये जनहितार्थ, जनता जनार्दन या शब्दाला तेव्हाचे राजे प्रामाणिक होते.कुटुंबापेक्षा, स्वहितापेक्षा जनतेचे कल्याण याला त्याकाळात अधिक प्राधान्य होते. किंबहुना प्रजेचे हित हे राजाचे प्रथम कर्तव्य होते. त्यामुळे प्रजेमध्ये भगवतीबद्दल शंका आहे लक्षात आल्यानंतर प्रजेच्या कल्याणासाठी वैयक्तिक सुखाचा विचार न करता त्यांनी आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला.
धर्माच्या सर्व मर्यादा पाळणार्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे नावच मनाला शांति देणारे आहे. साधकांसाठी, भक्तांसाठी तो दशरथनंदन न राहता सर्वत्र व्यापून असणारा असा आत्माराम होतो. अणुरेणूमध्ये तो वसला आहे हीच त्यांची धारणा होते. इतकं राममय जीवन होऊन जाते.“ राम विश्राम देवांचा ” अनेक श्रेष्ठ देवांना देखील श्रीराम आश्रय स्थान वाटतो. ज्याच्या ठिकाणी मन स्थिर झाले असता शांतता प्राप्त होते असा हा श्रीराम सर्वांचे विश्रांतीचे स्थान आहे.
समर्थ म्हणतात,
ऐसा पुरुष धारणेचा | तोची आधार बहुतांचा ||
दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा ||
आजच्या काळात आत्मारामाबरोबर अन्यायाला विरोध करणाऱ्या रणकर्कश्य आवेशाची गरज आहे. केवळ आयोध्येला जाऊन त्यांचे दर्शन घेणे इतकाच भाव न ठेवता त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या आचरणातून तसे व्यक्त होणे हीच खरं त्या प्रभू रामचंद्रांची उपासना होय.