समर्थांनी १६४८ मध्ये चाफळ येथे मठ स्थापन केला, तो प्रमुख मठ होता. १६५० मध्ये शिंगणवाडीच्या मारुतीची स्थापना केली. छोट्या खडीच्या डोंगरावर लपलेला म्हणून याला खडीचा मारुती म्हणतात. पण या मारुतीत प्रचंड शक्तीचा अविर्भाव आहे. शिंगणवाडीच्या या मारुतीचे बालस्वरूप खूप विलोभनीय आहे. मुलांना बालपणापासूनच उपासनेचे संस्कार द्यावेत, व्यायामाने शरीर सशक्त ठेवावे, हाच संदेश समर्थ या मारुती स्तोत्रातून देतात. मारुती सारखे धाडस हवे, कर्तृत्व हवे; हे शिकवताना मुलांना जीवनात माता, पिता, गुरु यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे हे सुद्धा समजवावे. या सगळ्या गोष्टींसाठी समर्थांनी दुसऱ्या मारुती स्तोत्राची सुरुवात अंजनी मातेच्या ईश्वरी रूपाचा गौरव करून केलेली आहे.
जनी ते अंजनी माता । जन्मली ईश्वरी तनु ।
तनु-मनु तो पवनु । एकची पाहतां दिसे ।
समर्थ म्हणतात, ‘अंजनी माता’ म्हणजे जणू काही ‘ईश्वरी तन’ म्हणजे ‘ईश्वराचा अवतार’ आणि अशा ईश्वरी अवतारात ‘तन’ म्हणजे ‘शरीर’ आणि मन सुद्धा वाऱ्यासारखा असणारा हनुमंत जन्माला आला. समर्थांनी दुसऱ्या श्लोकात हनुमंताला ‘मारुती’ आणि ‘वातनंदनु’ म्हटले आहे. किती सुंदर विशेषणे वापरली आहेत. ‘मरुत’ म्हणजे ‘वारा’ म्हणून तो मारुती आणि ‘वात’ म्हणजे सुद्धा ‘वारा’ म्हणून तो ‘वातनंदन’. समर्थ चाफळ ते रामघळ या मार्गावर एकांत आणि आत्मचिंतनासाठी येत असत. समर्थांच्या हृदयातील अपार करुणा, वात्सल्य, प्रेम तिथल्या कणाकणात जाणवते. म्हणूनच समर्थांनी या मारुतीची स्थापना बालरूपात केली असेल असे वाटते. मूल कितीही मोठे झाले तरी ते आईला लहानच असते. हा भाव या स्तोत्रात जाणवतो.
चळे ते चंचळे नेटे । बाळ मोवाळ साजिरें ।
चळताहे चळवळी । बाळ लोवाळ गोजिरें ।
या श्लोकातून मारुतीच्या सौंदर्याचे, त्याच्या गोंडस स्वरूपाचे दर्शन होते. हे स्तोत्र म्हणताना मनात निरागस भाव निर्माण होतो. तसेच मारुतीचे गुण वर्णन आत्मबल प्रदान करते. आणि समर्थांच्या काव्य प्रतिभा शक्तीचे दर्शन घडते. या एका श्लोकात ‘ळ’ या अक्षराचा दहा वेळेस उपयोग करून समर्थांनी अनुप्रास अलंकार साधला आहे. धन्य ते समर्थ ! हा मारुती स्थापन करण्यात समर्थांची भावना खूप विशाल झाली आहे. मारुतीला माता, पिता, बंधू, सखा या रूपात पाहणारे समर्थ या स्तोत्रात मात्र त्याच्याकडे मातेच्या प्रेमाने, वात्सल्याने पहात आहेत. भगवंतासह सर्वसृष्टी त्यांना पुत्रवत भासत होती. जीवाच्या कल्याणासाठी त्यांचे मातृ हृदय महान झाले होते. हा केवढा गोड विलक्षण आणि महान भाव आहे. पुढील श्लोकात समर्थांनी हनुमंताच्या अवयवांचे वर्णन करताना म्हटले आहे –
हात कि पाय कि सांगों । नखे बोटे परोपरी ।
दृष्टीचे देखणे मोठें । लांगूळ लळलळीतसे ।
हात, पाय, नखे, बोटे, दृष्टी या सर्व बाबतीत हनुमंत देखणे आहेत. आणि त्यांची शेपटी त्यांच्या पाठीमागे लोंबकळत असते. समर्थांनी बाल मारुतीची स्थापना केली त्यामागे सुद्धा त्यांचे काहीतरी उद्दिष्ट होते हे आपल्याला स्तोत्रातील या श्लोकावरून समजते.
बाळाने गिळीला बाळू । स्वभावे खेळता पहा ।
आरक्त पीत वाटोळे । देखिले धरणीवरी ।
पूर्वेसी देखता तेथे । उडाले पावले बळे ।
पाहिले देखिले हाती । गिळीले जाळीले बहू ।
बाल हनुमंताची ही अद्भुत लीला सगळ्यांना माहित आहे. जन्मल्याबरोबर फळ समजून सूर्याला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे सूर्याच्या, इंद्राच्या क्रोधाला त्यांना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागला. त्याची कथा अशी आहे की, हनुमंतांना भूक लागली तेव्हा सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने ते सूर्याकडे धाव घेऊ लागले. परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीमुळे चळाचळा कापू लागले. त्यामुळे ते सूर्यापासून थोडे लांब झाले. परंतु त्यांना तो खेळच वाटू लागला. ते सूर्याला पकडायचे आणि सोडून द्यायचे. त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरू लागला. असे करीत असताना त्यांनी सूर्याला गिळले. ते बघून इंद्रा सहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानाच्या हनुवटीला मार लागला आणि ते बेशुद्ध पडले. नंतर देवांनी भीतीमुळे त्याला शाप दिला की तुला आपल्या सर्व शक्तीचा विसर पडेल. पण अंजनी मातेच्या विनंतीवरून पुन्हा उःशाप दिला की कोणीतरी आठवण करून दिल्यावर त्याला आपली शक्ती आठवेल. ही कथा विद्यार्थ्यांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा प्रेरणा देणारी आहे. समर्थांना हेच सांगायचे आहे की हनुमंताने उत्तमाचा ध्यास घेतला, उत्तुंग ध्येय समोर ठेवल; ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धाडस सुद्धा दाखवले. पण त्याचबरोबर सारासार विचार सुद्धा करता आला पाहिजे. सूर्याकडे झेपावल्याने होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार हनुमंताने केला नाही. प्रत्येक जीवामध्ये बालपणापासून ऊर्जा असतेच. सारासार विचार करून त्या ऊर्जेचा उपयोग करून घेतला पाहिजे. मोठेपणी सुद्धा जो लहान बालकासारखा निरागस आणि सरळ हृदयी असतो तोच अध्यात्मिक होऊ शकतो. या दृष्टिकोनातून समर्थांनी बाल मारुतीची स्थापना केली.
“उड्डाण पाहता मोठे । झेपावे रविमंडळा ।”
या ओळीवरून हनुमंताच्या शक्तीची कल्पना येते. हीच शक्ती आपल्याला शिवाजी महाराजांमध्ये सुद्धा दिसते. वाऱ्याच्या वेगाने राजे गडकोट काबीज करत होते, गनिमीकाव्याने शत्रूला नेस्तनाबूत करून डोंगर कपारीमध्ये लपून बसत होते, या डोंगरावरून त्या डोंगरावर, या गडावरून त्या गडावर ‘हरहर महादेव’ ही गर्जना करत स्वराज्याचा विस्तार करीत होते. शिवाजी राजांच्या कर्तुत्वाचा समर्थांनी उल्लेख केला आहे की, पवनासारिखा धावे । वावरे विवरे बहू । सुंदरकांडात मारुतीच्या लीला रामाला खूप आनंद देतात. म्हणूनच त्या संपूर्ण अध्यायाला श्रीराम लीलाचे कांड म्हणून ‘सुंदरकांड’ असे प्रेमाने म्हणतात. श्रीराम आईप्रमाणे बाळाचे, त्याच्या गुणांचे, कर्तुत्वाचे कौतुक भावपूर्ण करतात. तोच भाव या स्तोत्रात आपल्याला जाणवतो.
पळही राहिना कोठे । बळेची घालितो झडा ।
कडाडां मोडती झाडे । वाड वाडें उलंडती ।
या श्लोकातून सुद्धा मारुतीच्या कामाची तळमळ आपल्याला दिसून येते. प्रभू रामरायाची आज्ञा झाली की पळही म्हणजे एक क्षणभर सुद्धा वेळ न दवडता श्रीलंकेत जाऊन कडाडा मोडती झाडे, म्हणजे अशोक वनातील झाडे मोडली आणि वाड्या मागून वाडे ओलांडून रावणासमोर गेला. हेच हनुमंताचे स्वामी आज्ञा पालन खऱ्या दासाचे लक्षण आहे. जीवाच्या कल्याणासाठी, रामकार्यासाठी चिरंजीव झालेला हनुमंत क्षणभर सुद्धा उसंत घेत नव्हता. त्याचप्रमाणे हनुमंताच्या झंजावाती प्रतापाप्रमाणे शिवाजी राजे सह्याद्रीचे स्वातंत्र्य खेचून आणत होते. रामराज्याचे स्वप्न साकारताना पाहून आनंदित होत होते. या त्यांच्या कार्याला यश, कीर्ती, प्रताप, बल, सामर्थ्य देणारा शिंगणवाडीचा खडीचा मारुती बालरूपात दुडूदुडू धावत होता. मनातल्या मनात प्रसन्नपणे हसत होता. समर्थ सुद्धा मातृ हृदयाने आनंदी होते ही गाथा आहे. एका मारुती रूपाची मातृप्रेमाची आणि भक्ती-शक्तीच्या कार्याची ओळख म्हणूनच या मारुतीचे महत्व आहे. शिंगणवाडीच्या या मारुतीला शतशः प्रणाम !