समर्थ रामदास स्वामींचा जन्म इसवी सन १६०८ मध्ये चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी राम जन्माच्या वेळेस झाला. प्रभू श्रीराम व समर्थ रामदास या दोघांची जन्म तिथी व जन्मवेळ एकच असल्याचा योगायोग अपूर्व आहे. त्यांचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब या गावी झाला. आज या गावाला जांब समर्थ असेही म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. दासबोध – मनाचे श्लोक – करुणाष्टके मारुती स्तोत्र – भीमरूपी, मारुती आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, आणि आपण रोज म्हणतो ती सुखकर्ता दुःखहर्ता आरती, आदि प्रसिद्ध रचना त्यांनी केल्या आहेत. या ग्रंथातून अध्यात्माबरोबर सामाजिक प्रबोधन पण केले आहे. भक्ती भाव आणि सामाजिक ज्ञानाच्या प्रसारात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी इसवी सन १६८१ ला सज्जनगडावर समाधी घेतली, तो दिवस होता माघ कृष्ण नवमी. त्या दिवसाला दासनवमी म्हणतात. समाधी घेण्याआधी पाच दिवस त्यांनी अन्न व पाणी यांचा त्याग केला होता. या विधीला “प्रायोपवेशन” म्हणतात. असो. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थांची समाधी सज्जनगडावर बांधली.
त्यांच्या ग्रंथ परिवारातील मनाचे श्लोक यावर मी भाष्य करणार आहे मनाचे श्लोक वाचताना त्यातील वाच्यार्थ व लक्ष्यार्थ जाणून घेणे महत्त्वाचे असते. शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योगासने, व्यायाम, प्राणायाम यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्याच प्रकारे मनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या मनाने, आपल्या जाणिवेने, रामाशी सतत अनुसंधान जोडणे आवश्यक असते. खरं म्हणजे भगवंताचे रूप अणूपेक्षाही सूक्ष्म व आकाशाहून विशाल आहे. तरीसुद्धा समर्थांनी संपूर्ण रूपातील रामाचे दर्शन आपल्याला घडवले आहे. ते म्हणतात,
घनश्याम हा राम लावण्यरूपी ।
महा धीर गंभीर पूर्णप्रतापी ।
करी संकटीं सेवकाचा कुढावा ।
प्रभातें मनीं राम चिंतित जावा ।।
या ठिकाणी प्रभातेचा अर्थ सातत्याने व कुढावाचा अर्थ रक्षण करणे असा होतो. समर्थ म्हणतात “सदा राम निष्काम चिंतीत जावा” याचा म्हणजे निष्काम महत्त्वाकांक्षेचा अनुभव, आपल्या सर्वांना अयोध्येच्या प्रभूराम मंदिरामुळे आला. अयोध्या हे प्रभूरामाचे जन्मगाव. तिथल्या मंदिरात २२ जानेवारी २०२४ ला रामलल्लाची म्हणजे बालक रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याचे ७०० वर्षांपासूनचे बंदीवासातले वास्तव्य संपुष्टात आले. सोबत केदारनाथचे शिवमंदिर, आदि शंकराचार्यांचे मंदिर यामुळे देवस्थानाला जागृती आली आहे. काशी विश्वनाथ धामचा जीर्णोद्धार झाला आहे. आपल्या या पौराणिक वर्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. हे निष्काम कर्माचेच फलित आहे.
समर्थांनी सुद्धा निष्काम कर्मयोग्याप्रमाणे टाकळी गावापासून मानसरोवरापर्यंत मजल दरमजल केलेली आहे. तिथून सागर तीरावरून पदभ्रमण करत ते रामेश्वरला पोहोचले. तिथून कोल्हापूर, चिपळूण याला पण भेट दिली. दिल्लीला गेले असताना तिथल्या बादशहाने धर्मप्रचारासाठी फकिरांचा गट तयार केला होता, हे पाहून समर्थांना सुद्धा हिंदू धर्मियांचा असा गट असावा, असे मनापासून वाटू लागले होते. परंतु हिंदू तन-मन-धनाने त्यांच्यापेक्षा अशक्त वाटत होते. त्यासाठी त्यांनी प्राप्त झालेला नरदेह सुदृढ व्हावा म्हणून सामर्थ्याचा उद्घोष केला. शरीर साधना आवश्यक आहे हे सर्वांना पटवून दिले. त्यासाठी भारतभरात ५०० मारुतींची स्थापना केली. मंदिरात भजन सुरू केले. भजनाचे सुरुवातीचे बोल आहेत.
भेटो कोणी येक नर । धेड महार चांभार ।
त्याचें राखावें अंतर मन । याचें नाव भजन ।।
तसेच त्यांनी “आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।” यासाठी लोकजागरण केले. हळूहळू त्यांचा शिष्य परिवार जमा झाला. कित्येक माता, भगिनी पण त्यांच्या शिष्य परिवारात होत्या. समर्थ रामदास स्वामी स्वतः स्थितप्रज्ञ, आत्मज्ञानी पुरुष होते. लोकांना मार्गदर्शन करणारे आदर्श मार्गदर्शक होते. त्याकाळी त्यांनी जे सामाजिक प्रबोधनाचे काम केले, ते आजच्या काळीही अत्यंत उपयुक्त आहे. फक्त रामाची मानस पूजा करून कर्म करण्याची इच्छा पाहिजे, तर सारे जण सर्वोत्तम बनतील. समर्थ एका श्लोकात म्हणतात, जाणता भक्त – न लिंपे कदा दंभ वादे विवादे ।
दंभ म्हणजे फसवा युक्तिवाद. जे नाही ते दाखवणे. अशा खोट्या अपप्रचाराला आज सुद्धा अनेक जण बळी पडतात. राष्ट्रद्रोही लोक रघुपति राघव राजाराम या गाण्यात “ईश्वर अल्ला तेरो नाम”
असे शब्द घुसडतात. दांभिकपणे लोकांची मने घुसळतात. असे होऊ नये म्हणून समर्थ म्हणतात, हे सज्जन मना, सत्यापासून दूर पळू नकोस. समर्थांचा उपदेश ध्यानी धरावा हे उत्तम. समर्थ म्हणतात, आपला राम हा निधीचा साठा आहे. तो कल्पतरू, कामधेनू आहे. तो श्लोक असा –
मना राम कल्पतरु कामधेनु ।
निधी सार चिंतामणी काय वानूं ।।
समर्थ म्हणतात, सदा सर्वदा राम सन्निध ठेवला तर आपल्या हातूनच कल्पतरूचे बीज पेरता येते. आपल्या हातूनच कामधेनूचे दोहन करता येते. आपल्या हातून असेच चिंतामणी सारखे चिंता हरण करणे सहज शक्य होते. समर्थ भारत बनवण्याचे स्वप्न साकार करणे हे एकट्या सरकारचे काम नाही, तर राष्ट्र सर्वप्रथम या नात्याने जनतेचा सहभागही आवश्यक आहे.
समर्थांना बालवयातच श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र स्फुरला होता. परमेश्वराशी संवाद करण्यासाठी त्यांनी बारा वर्षाचा काळ घालवला होता. समर्थ रोज वीस तास काम करत असत. समर्थ महापुरुष होते. महापुरुष आणि धबधबा स्वतःचा मार्ग शोधत असतात. समर्थ वस्तुनिष्ठ होते. उदंड ऐकत होते. पण खरे खोटे तपासून पहात होते. प्राचीन ग्रंथाचा अभ्यास विज्ञाननिष्ठेनी करत होते. त्यांना परमेश्वराची प्रत्यक्ष गाठ भेट हवी होती. त्यासाठी ते प्रयत्नशील होते. समर्थांचे गुरु कोण होते माहित नाही. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते. असा कुठलाही नरदेह समर्थांचा गुरु नव्हता. प्रभूरामचंद्र हेच त्यांचे गुरु. या दृष्टीने समर्थ हे स्वयंभू होते. पूर्णावस्था प्राप्त झाल्यावर देखील समर्थ जग पहायला हवं, म्हणून चालत राहिले. समाजजीवनाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्यांनी जग पाहिले. ते अनेक प्रांतात फिरले. भाषा अनेक, संस्कृती एक असा त्यांना अनुभव आला. सर्व भाषिकांसाठी त्यांनी “राम कृष्ण हरी” हा पण मंत्र तयार केला. असे हे त्यांचे मनाचे श्लोक मनाचिये गुंफी गुंफण घालतात. गोफ विणतात, आपणही विणू या.
विणू बाई गोफ विणू । आनंदाचा गोफ विणू ।।
गोफ विणू बाई गोफ विणू । कौशल्याने गोफ विणू ।
मनाचिये गुंफी गोफ विणू । राष्ट्र सर्वप्रथमचा गोफ विणू ।।
।। जय रघुवीर समर्थ ।।