माझ्या आक्का

माझ्या आक्का
श्रीमती नीला अभ्यंकर
  • October 18, 2025
  • 1 min read

मागील वर्षी म्हणजेच २०२४ साली नोव्हेंबर महिन्यात दा.  स. अ. चे अभ्यासार्थी, समीक्षक अयोध्येला दासबोध पारायणाला गेलो होतो. अयोध्येसारख्या पवित्र ठिकाणी नवीन रामांच्या मंदिराजवळ आम्ही ३ दिवसाचे पाराय‌ण केले. प.पू. आक्का वेलणकरांनी घळीत सकाळची जशी उपासना नेमून दिली आहे, त्याप्रमाणे काकड आरती वगैरे केली. सर्वजण एका वेगळ्या आनंदात होतो. प.पू. आक्कांची सर्वांना खूप आठवण येत होती कारण त्यांच्या प्रेमळ छत्राखाली आम्ही सारेजण जमलो होतो. त्यांच्या व रामाच्या कृपेमुळे तीन दिवसाचे पारायण निर्विघ्नपणे पार पडले. १९८४ साली नागपूरला माझ्या आईच्या एकसष्टीसाठी मी आक्कांना भागवत सांगायला बोलावले होते. स्टेशनवर त्यांना पाहिल्यावर मनात विचार आला की या काय भागवत सांगणार? पांढरे शुभ्र लुगडे, हातात कापडी पिशवी, लहान ट्रंक, गाडीतत्या प्रवासाने थकलेल्या, ते रूप पाहून वरील विचार मनात आला.  मी त्यावेळी वयाने लहान, अज्ञानी, अपरिपक्वच होते. पण चंदन उगाळल्यावर जसा सुवास सुटतो, तसा दोन दिवसात आक्का माझ्याच नव्हे, तर आमच्या सर्वांच्या झाल्या. 

१९८५ साली माझे आई-वडील अंदमानला गेले असताना तिथेच माझ्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकून आक्का आमच्या घरी आल्या. त्यांच्या नुसत्या असण्याने आमचे घर शांत झाले. त्यावेळी त्या आईच्या सद्गुरू झाल्या. नागपूरात त्यांची कोणाशीच ओळख नसल्याने त्या आमच्या घरीच घरच्यासारख्या रहायच्या. पण पुढे मात्र आक्का सर्वांच्या झाल्या. चालता-बोलता, खाता-पिता, उठता-बसता त्या अनेक गोष्टी शिकवायच्या. त्यांचं अक्षर सुंदर होतं, त्या सुरेख रांगोळी काढायच्या. अंघोळ केल्यावर पांढरं शुभ्र नऊवारी लुगडं  चापून चोपून नेसल्यावर दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच असायचं. रुपवान होत्या. हातात माळ असायची, सतत जप करायच्या. पुढे अभ्यासार्थी वाढल्यावर वेळ मिळेल तेव्हा स्वाध्याय तपासायच्या. ‘रिकामा जाऊ नेदी क्षण’ असा कधी वेळ घालवायच्या नाहीत. कोणी कधीही प्रश्न विचारल्यावर, त्या समोरच्याचे समाधान करायच्या.

तरुण वयात त्या अत्यंत रागीट स्वभावाच्या असल्याने त्यांना फिटस् यायच्या. साधनेने, ध्यानाने त्यांनी क्रोधावर मात केली व फिटस् येणे थांबवले. एकदा रेल्वेलाईन ओलांडताना त्या पडल्या, पाय फ्रॅक्चर झाला. पण व्यायाम करुन त्यांनी पाय बरा केला व नंतर तीन तास मांडी न हालवता भागवत सांगायच्या. संतांचे जीवन आम्ही जवळून पाहिले आहे. एकदा द्वारकेहून आल्या तेव्हा तापाने फणफणल्या होत्या. सर्दी, खोकला प्रचंड झाला होता. सकाळी औषध घेऊन झोपल्या. दुपारी सर्व शिष्यवर्ग भेटायला आला. सोलीव सुखावर अडीच तास बोलल्या. ताप अंगात होताच. कोणाला या आजारी आहेत हे समजले नाही. देहबुद्धी ते आत्मबुद्धी कशी करावी ते आम्ही पाहिले.

एकदा आमच्या घरी भागवत स‌प्ताह सुरु होता. पाचव्या दिवशी अंगात ताप खूप होता, दम लागला होता. त्या देवघरात गेल्या, पाट मांडला; कृष्णाला म्हणाल्या, तीन तास माझा ताप जाऊ दे, असे म्हणून व्यासपीठावर बसल्या व त्या दिवशी कृष्ण जन्म, त्याच्या लीला अतिशय रंगवून सांगितल्या. वेगळेच तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. झाल्यावर म्हणाल्या, नीला माझा कृष्ण मला सांभाळतो गं! किती विश्वास कृष्णावर! अनेकवेळा बालरूपातल्या कृष्णाने त्यांना दर्शन दिले आहे. सज्जनगडावर गेल्या असताना भागवताच्या वहीवर कृष्णाचे पाऊल उमटलेले सर्वांनी पाहिले आहे. तीनशेच्या वर त्यांचे भागवत सप्ताह झाले. पन्नासच्या वर भागवतकार त्यांनी तयार केले. भागवताचा पैसा त्या अनेक संस्थांना, गरीबांना दान करायच्या. साधना सप्ताह घळीत व्हायचा त्याचा खर्च त्या स्वतः करायच्या. 

आक्का अत्यंत निःस्पृह, निष्काम, निर्लोभी, निर्मत्सरी होत्या. पुढे पुढे माझ्या लक्षात आले की त्या संत आहेत. रहाणी अत्यंत साधी, निगर्वीपणा, निर्मळ मनाच्या, शुद्ध अंतःकरणाच्या, रसाळ वक्त्या होत्या. एकदा गुरुपौर्णिमेला त्या घरी आल्यावर, मी फुलांच्या पायघड्या घालून स्वागत केले. “आज हे काय खूळ ?”,  त्यांनी विचारले. गुरुपुजन केले. “अगं मी काही तुझी गुरु नाही”. “आक्का माझ्या गुरूंना मी तुमच्यात पाहते” असं मी म्हटल्यावर त्यांनी मला मिठीच मारली. मनात विचार केला त्या नुसत्या आक्का नसून आक्कास्वामी आहेत, माझ्या आहेत. संताचे जीवन जनसामान्यांना सुसंस्कारीत करते. त्यांच्यातील भक्ती, नीती, प्रीती जागृत करतात. जीवन कस जगायचं ते स्वतः जगून, जगाला शिकवतात. त्यांनी सखोल दासबोध अभ्यासक्रम सुरू केल्याने घराघरात दासबोध सखोल अभ्यास झाला. प्रवचनकार, कीर्तनकार तयार झाले. दुख्खितांचे अश्रू पुसले गेले, अनेकांना जीवन जगायला उमेद मिळाली. विदर्भातल्या लहान लहान खेडेगावात आक्का गेल्या, भागवत केले. अनेक ग्रंथांवर प्रवचने केली, बायका तयार केल्या. पुढे पुढे आक्का ध्यानाला बसल्या की, दोन दोन तास त्या ध्यानात आत आत शिरलेल्या मी पाहिल्या आहेत. तेव्हा त्या अत्यंत तेज:पुंज, सुंदर दिसायच्या. 

एका दिवसात एक अशी एकशे तेरा दासबोधाची पारायणे मी नागपूरात एकशे तेरा घरी केली. शेवटच्या पारायणाला त्या गडावर आल्या. आक्का डोलीतून चला, पण जिद्दी आक्कांनी ऐकले नाही. प्रत्येक पायरीवर बसत-बसत रामनाम घेत दीड दोन तास चढण चढत होत्या. एकशे चौदाव्या पारायणाला मध्यभागी मी, एका बाजूला माझे सद्गुरू प.पू. अण्णाबुवा कालगावकर, दुसऱ्या बाजूला प.पू. आक्कास्वामी अशा थाटात पारायणाची समाप्ती केली. सर्वांना स्वर्गीय सुख मिळाले. अजूनही तो दिवस आठवला की आनंद होतो. आक्का मागे लागल्या म्हणून मी भागवत करायला लागले. १९९८ साली आईच्या पंचाहत्तरीला आक्कांनी नागपूरला रामाच्या मंदिरात भागवत केले. एकदा भागवत सांगताना मला म्हणाल्या, नीला आता मी मेले तर तू काय करशील?, काही नाही; मला खाली ठेवायचे व भागवत पूर्ण करायचे. चार महिन्यांनी असेच झाले, नांदेडला भागवत सुरू असताना त्यांनी देह ठेवला. आपुले मरण पाहिले म्या डोळा.. आज त्या आपल्यात नाहीत पण दा. स. अ. च्या रुपाने त्यांचे नित्य स्मरण आपण करतो. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्यांना माझा    शि. सा. नमस्कार.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language