आता आपण महाकारण देह बघूया. जेव्हा मनुष्य देहातच माणसाला आत्मज्ञान होते, ते जागृत असे आत्मज्ञान त्याला महाकारणदेह असे म्हणतात. आत्मज्ञान होण्यासाठी समर्थ चार पायऱ्या सांगतात. श्रवण, मनन, निधीध्यासन आणि रोकडा आत्मसाक्षात्कार. आपण बघितले की, ज्ञानाचा विचार फार सूक्ष्म आहे. आणि तो जितका सूक्ष्म आहे, तितकाच त्यावर मनन करण्यासाठी सूक्ष्म विचार करावा लागतो. आपण परमार्थात आत्मस्वरूपावर विचार करतो, तेव्हा असे लक्षात येते की, अंतरात्मा हा युगानयुगे विश्व चालवत असतो. त्यासाठीच जगातील मोठे-मोठे पुरुष, संतमहात्मे जगले. अंतरात्मा जर नसेल तर सारे व्यर्थ जाते. म्हणूनच तर सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. जो अत्यंत मननशील आहे, विवेकसंपन्न आहे, त्याला पंचभूतांच्या पलीकडे स्वतःपाशीच तो आत्मा सापडतो. त्यासाठी सूक्ष्मात शिरणे फार गरजेचे आहे. पण या मायेच्या गुंत्यामुळे सूक्ष्मामध्ये लक्ष गुंतवणारी माणसे फार कमी असतात. कारण हा अंतरात्मा फार सूक्ष्म आहे आणि आपला देह तर अत्यंत जड आहे. अंतरात्मा हा खरा देव आहे. माणसाला दृश्याचे आकर्षण असते, पण दृश्य हे नाश पावणारे आहे. त्यामुळे हा लोक आणि परलोक दोन्हीही मिळत नाही. सगळ्या कल्पना बाजूला सारून स्वच्छ ब्रह्माचाच शोध घ्यावा. आपण सारखे बघत आहोत की, तत्त्वज्ञानापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. आत्मज्ञान झाले की मूळमायेपर्यंत जाता येते. प्रथम स्फुरण आढळते. त्या संकल्पाला उपासनेच्या सहाय्याने मिठी मारावी.
“उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो ।
उदंड केलें तरी तो जयो । प्राप्त नाहीं ।। १६-१०-२९ ।।”
उपासनेत मी उपासक असतो आणि अंतरात्मा उपास्य असतो. मी अंतरात्म्याशी तदाकार झालो की, उपासना फळास आली असे समजावे. आता अंतरात्म्याच्या पलीकडे अगदी एकरस निर्गुण, निर्मळ व निश्चळ परब्रह्म आहे. येथून तेथ पर्यंत ते ब्रह्म सगळीकडे दाट भरलेले आहे. समर्थ म्हणतात, ते नाही अशी जागाच नाही. सर्व प्राण्यांना ते सर्वकाळ भेटते. सर्व पदार्थांना ते आतबाहेर व्यापून आहे, लागून आहे, सर्व ठिकाणी व्याप्त आहे. ब्रह्म सर्वत्र आहे आणि श्रेष्ठ पण आहे. पण ते कसे आहे ? तर ते सूक्ष्मातिसूक्ष्म असे आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला बघितले, तसा सूक्ष्म विचारच करावा लागतो. याठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, जेव्हा साधक आत्मनिवेदन करतो तेव्हा, त्याचा “मी” नष्ट होतो आणि त्याला खऱ्या मी चे दर्शन होते. यासाठी फार सुंदर ओवी आहे.
“आपणांस निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती ।
तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो ।। ८-८-१० ।।”
यावरून आपल्या असे लक्षात येते की, “मी” चे विसर्जन फार गरजेचे आहे. अनेकजण भक्ती करताना नकळत स्वतःच्या अहंकाराची जोपासना करीत असतात. त्यातून देहबुद्धीच घट्ट होत जाते. समर्थांनी आपल्याला पुन्हा पुन्हा “देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी” असे सांगितले आहे. पण असे आहे की, फारच थोडे साधक अहंकाराचे विसर्जन करून उपासना करतात. अशांनाच आत्मदर्शन घडते. म्हणून भगवंताने लक्षावधी लोकांमध्ये एखाद्यालाच मी प्राप्त होतो असे म्हटले आहे.
“मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।। भ. गीता ७-३ ।।”
आत्मदर्शन म्हणजे काही शाब्दिक संकल्पना नाही. ती प्रत्यक्ष अनुभूती आहे. त्यासाठी बुद्धी संपूर्ण नाहीशी झाली पाहिजे आणि मी स्वतःच भगवत्स्वरूप आहे अशी ठाम धारणा झाली पाहिजे. नदी समुद्राला मिळाल्यावर वेगळी दाखवता येत नाही. तसेच साधक एकदा भगवत्स्वरूप झाला की, भगवंतापेक्षा वेगळा रहात नाही. असे अद्वैत साधल्या शिवाय खरे आत्मनिवेदन घडत नाही. यासाठी समर्थांनी एक फार सुंदर दृष्टांत दिला आहे. सगळे सैन्य मेल्यावर राजेपद प्राप्त झाले तर यात काय अर्थ आहे ? सैन्य असतानाच राजेपद असणे महत्त्वाचे. कारण सैन्याच्या सहाय्याने सत्ता गाजवून राज्य करावयाचे असते. तसेच माया अस्तित्वात असताना मायेवर मात करून मुक्ती मिळवायची असते. अज्ञानामुळे आपल्याला मायेचा धाक वाटतो. जोपर्यंत दोरी वरती सापाचा भास होत असतो, तोपर्यंत सापाची भीती वाटते. परंतु एकदा साप नसून दोरीच आहे, हे लक्षात आल्यावर दोरीची अडचण दूर होते. त्याचप्रमाणे आत्मदर्शन झाले की, मायेचा पडदा दूर सारला जातो. ग्रंथराज दासबोधात दशक आठ समास आठ ओवी क्रमांक ६१ ते ७० मध्ये आत्मदर्शनाचे फार सुंदर वर्णन समर्थ करतात. आत्मस्वरूप मुळात देहातीत आहे. देहबुद्धीमुळे आत्मा स्वतःला देह समजतो. आत्मदर्शन होते तेव्हा, हे वाटणे बंद होते. अशी आत्मस्वरूपाची जाणीव म्हणजेच महाकारण देह होय.
याच सूत्रानुसार परब्रह्माला मी एकमेव “परब्रह्म” आहे हे स्फुरण होते. असेच स्फुरण होते असे मानल्यास, त्या जाणीवेला ब्रह्मांडाचा महाकारणदेह म्हणावे लागते. या स्फुरणालाच मूळमाया म्हणतात. परब्रह्म स्वरूपाशी संत तदाकार झालेले असतात. त्यामुळे त्यांना जेथे तेथे एकचएक घनदाट, निर्मळ, निष्चळ, निर्गुण आणि गगनासारखी वाड अशी चिन्मय वस्तू प्रचितीस येते. कारण त्यांनी ईश्वराची कृपा प्राप्त करून घेऊन शुद्ध परब्रह्म प्राप्त केलेले असते. महाकारणदेहाच्या पलीकडे केवळ ब्रह्म असते. ईश्वराला त्याच्या स्वरूपाचे स्फुुरण सुद्धा नसून ते त्यांच्या अनादी निर्गुण मूळ स्वरुपात असतात.
अशा अवस्थेत ब्रह्मांडाच्या चारही देहाचा निरास झालेला असतो आणि यालाच परमात्मा म्हणतात. आणि याच अवस्थेला पिंडाच्या संदर्भाने अंतरात्मा म्हणतात. माणसाचे सर्वश्रेष्ठ जीवनध्येय काय आहे ? तर अनात्म्यास विन्मुख होऊन आत्मस्वरूपास सन्मुख होणे हे आहे. समर्थ सांगतात, मानव शरीर म्हणजे ब्रह्मांडवृक्षाचे उत्तम फळ आहे. आपल्याला आत्मस्वरूप जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण साधकाची भूमिका कशी असावी ते बघूया. तर ती भूमिका विश्वस्तांची असावी. त्याला वस्तूचा वापर योग्य प्रकारे करता येतो, पण दुरूपयोग करता येत नाही. आपल्याला मिळालेल्या सर्वच वस्तू आपण भगवंताचे विश्वस्त म्हणून सांभाळायला हव्यात. स्वामी विवेकानंद कर्मयोगात छान सांगतात. ते म्हणतात, “मुलगा असू द्या पण माझा मुलगा म्हणू नका, रामरायाचा म्हणा. घर असू द्या पण माझे घर म्हणू नका, रामरायाचे म्हणा. पावसचे स्वामी स्वरूपानंद एका अभंगात म्हणतात,
“धन सूतसुत दारा । असू दे पसारा ।
चित्ती त्यासी थारा ।देऊ नको ।।”
हेच जड आत्मनिवेदनाचे रहस्य आहे. माझ्या अंतर्यामी परमात्मा आहे. त्याप्रमाणे तो सर्वांच्या अंतर्यामी आहे. आणि तोच खरा परमात्मा आहे. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती स्थूल देहाच्या जागृती मध्येच सर्व क्रिया घडत असतात. सूक्ष्मदेहाच्या स्वप्नावस्थेत मनाचे चलनवलन होत असते. कारणदेहाच्या सुषुप्तीमध्येच अज्ञानात वासना रहात असते. महाकारणदेहाच्या तुर्यावस्थेत शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होत असते. या सर्व अभ्यासातून आपल्या लक्षात येते की, स्वयंप्रकाश, आनंद स्वरूप अंतरात्मा आपणच आहोत. हे सारे लक्षात घेऊनच आपल्या दृष्टीसमोर, आपल्या प्रयत्नांमध्ये मोक्ष प्राप्तीचेच ध्येय असावे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।