हा अभंग समर्थ रामदास यांनी रचलेला असून, या अभंगातून ते आपल्याला परमेश्वराकडे काय मागावे याची अत्यंत सुंदर शिकवण देतात. प्रत्यक्षात हे मागणे त्यांनी स्वतःसाठी केले असले, तरी त्यातून संपूर्ण समाजाला मार्गदर्शन मिळते. श्रीरामावर असलेली त्यांची अखंड भक्ती सर्वश्रुत आहे. त्यांनी रामभक्तीवर अनेक अभंग रचले आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.
समर्थांचा अभ्यास अत्यंत सखोल होता. ते कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाऊन विचार मांडत. आपण बहुतेक वेळा रामाला एका मूर्तीमध्ये, एका ठिकाणी, एका चौकटीत पाहतो. परंतु राम हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून एक विश्वव्यापक तत्त्व आहे. तो संकुचित नाही; तो सर्वत्र आहे. त्यामुळे रामाचे दर्शन घेण्यासाठी आपली दृष्टी व्यापक करणे, अंतःकरण विशाल करणे आवश्यक आहे. वेद, उपनिषदे, शास्त्रे आणि पुराणे ज्या रामतत्त्वासमोर नतमस्तक होतात, त्या रामाला समजून घेण्यासाठी आपल्यात ती दृष्टी निर्माण झाली पाहिजे. खरे तर रामतत्त्व आपल्यामध्येच आहे; फक्त आपली दृष्टी ‘राममय‘ होण्याची गरज आहे.
समर्थ रामदास जेव्हा काळाराम मंदिर येथे श्रीरामासमोर उभे राहून प्रार्थना करतात, तेव्हा ते म्हणतात –
“कोमल वाचा दे रे राम विमल करणी दे रे राम ।”
ते रामाला विचारतात – “हे रामा, माणूस जन्माला येतो तेव्हा त्याची वाणी किती कोमल असते; मग पुढे ती कठोर का होते ?”
समाजात वावरताना बाह्य परिस्थितीचा प्रभाव पडतो आणि माणसाची वाणी राकट होते.
एखाद्या वास्तूची किंवा ठिकाणाची शुद्धता, पवित्रता तसेच तेथे रहाणाऱ्या लोकांची वर्तणूक किती चांगली आहे हे ओळखायचे असेल, तर ते त्यांच्या वाणी आणि कर्मांवरून सहज लक्षात येते. आपण एखाद्या घरी गेलो असता, त्या घरात एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. याचे कारण म्हणजे तेथील लोक एकमेकांना आदर देतात, प्रेमाने नाती जपतात आणि सांभाळतात. त्या चांगल्या भावनांचा प्रभाव त्या वास्तूतही जाणवतो, जणू त्या भिंतींमध्येच ती सकारात्मकता साठलेली असते.
यामागील मुख्य कारण म्हणजे तेथे वापरली जाणारी कोमल आणि मृदू भाषा. कारण भांडणेही
भाषेमुळेच होतात आणि नातीही भाषेमुळेच घट्ट होतात. आपल्या रागाचा थेट परिणाम आपल्या वाणीवर होतो. म्हणूनच भाषेला एक प्रकारचे वैभव प्राप्त आहे. पूर्वी या भाषेचा योग्य वापर होत असे. मात्र आजच्या काळात तो कमी प्रमाणात दिसून येतो.
ज्या वाणीने आपण ईश्वराचे नामस्मरण करतो, त्याच वाणीने जर आपण इतरांची निंदा केली, तर त्या नामस्मरणाचे खरे फळ मिळत नाही; असे समर्थ रामदास सांगतात. म्हणूनच संतांच्या सहवासात रहावे, कारण त्यांच्या विचारांमध्ये, भाषेमध्ये आणि वर्तनामध्ये शुद्धता व पावित्र्य असते. त्यांची वाणी आणि आचरण दोन्हीही विमल आणि आदर्श असतात.
समर्थ म्हणतात की, ते भारत भ्रमणासाठी निघाले आहेत, समाजाशी संवाद साधणार आहेत. असा समाज, जो आपल्या वागण्याप्रमाणेच प्रतिसाद देतो. आपण गोड बोललो, तर समोरचाही गोड बोलतो. आपण कठोर बोललो, तर तसाच प्रतिसाद मिळतो, हा जगाचा नियम आहे. मग कर्कश वाणीने जर इतरांना दुःख होत असेल, तर ती का वापरावी ? कठोर शब्दांनी जर अंतःकरण दुखावते, तर असे बोलणे का करावे ? ईश्वराने दिलेली कोमल वाणी आपणच आपल्या वागणुकीने मलिन करत आहोत, असे समर्थांना वाटते. म्हणून ते रामाला विनंती करतात की, “मला अशी वाणी दे, जी कोमल, मधुर आणि
निर्मळ असेल.” त्यांना समाजाशी संवाद साधायचा होता, मठ उभारायचे होते आणि लोकसंग्रह करायचा होता. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक माणूस हा रामाचा अंश होता.
भिक्षा मागून संप्रदाय चालवूनही त्यांना कोणतीही कमतरता नव्हती; परंतु राष्ट्रप्रेम आणि समाजकार्याची ओढ यामुळे त्यांनी भ्रमण केले. रामनामाचा प्रसार केला. त्यांच्या प्रत्येक कृतीत निःस्वार्थ भाव होता. म्हणूनच ते म्हणतात – “माझ्या हातून जे कर्म होईल, ते शुद्ध, निःस्वार्थ आणि समाजहिताचे व्हावे. त्यासाठी माझी वाणी मधुर असू दे.” कारण जिथे स्वार्थ असतो, तिथे वाणी कठोर होते. हे टाळण्यासाठी समर्थ रामदास रामाला प्रार्थना करतात,
“हे श्रीरामा, मला कोमल वाणी आणि निर्मळ आचरण दे.”
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
रामदासस्वामींचे सर्वच साहित्य वाचल्यानंतर कायिक,वाचिक व मानसिक अवस्थांमध्ये सकारात्मक बदल खात्रीने होतो.
समर्थांनी कोमल वाणीची मागणी का केली यासंबंधीचे समर्पक विवेचन आपल्या या लेखणीतून स्पष्ट केले आहे. अप्रतिम असा ब्लॉग झाला आहे. जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏