कार्यप्रेरणा

कार्यप्रेरणा
सौ. प्रविणा कुलकर्णी
  • December 7, 2025
  • 1 min read

“कष्टेंविण फळ नाही । कष्टेंविण राज्य नाहीं ।

केल्याविण होत नाहीं । साध्यजनीं ।।”

 

प्रस्तुत ओवी दशक अठरा, समास सातवा आणि ओवी तिसरी आहे. सातवा समास ‘जनस्वभाव निरूपण’. जगामधील बहुसंख्य लोकांचा स्वभाव स्वार्थी आणि आळशी असून त्यांना काहीही कष्ट न करताच सुख व समृद्धी असे फळ पाहिजे असते. अशा लोकांचा श्रीसमर्थांना अतिशय तिटकारा असून त्यांची संभावना श्रीसमर्थांनी कठोरपणे करंटे अशी केलेली आहे. श्रीसमर्थांचा प्रयत्नवाद, कष्ट व शुद्ध विचार यांच्यावर मोठा विश्वास असून त्यांच्या योगाने श्रमणाऱ्या माणसाला यश प्राप्त होतेच अशी त्यांची निष्ठा आहे. हा विचार या समासात सांगितला आहे.

 

आता आपण वरील ओवीचा अर्थ आणि गर्भितार्थ पाहूया. ही ओवी सुभाषितवजा आहे. अशा कितीतरी सुभाषित ओव्या आपण श्रीमत्  दासबोधात अभ्यासिल्या आहेत. उदा. ‘पेरिले ते उगवते’, ‘केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।’, ‘यत्न तो देव जाणावा । अंतरी धरीता बरे ।’

 

आता वरील ओवीचा सरलार्थ पाहूया. या जगात कष्टावाचून फळ मिळत नाही. कष्टावाचून राज्य मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय जगात कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. 

या ओवीतील प्रत्येक चरणाचा गर्भितार्थ बघूया.

 

‘कष्टेंविण फळ नाहीं’ – समाजात सामान्य माणसे बहुसंख्येने असतात आणि असा हा प्रातिनिधिक माणूस अत्यंत स्वार्थी, लोभी प्रवृत्तीचा असतो. शिवाय स्वतःहून प्रयत्न, विचार, उद्योग, व्यापांचेही त्याला वावडे असते. अशी अज्ञानी माणसे आळशी, निःष्क्रिय आणि तामसी वृत्तीची असतात. अशा अज्ञानी व्यक्त्तींना कष्टाशिवाय फळ नाही, जगात काही फुकट मिळत नाही, मिळाले असे वाटले तरी त्याची कोणत्या ना कोणत्या रूपाने सव्याज परतफेड करावी लागते याचे त्यांना भान, ज्ञान, आकलन काहीच नसते. अशा अज्ञानी माणसांना श्रीसमर्थ अत्यंत कळकळीने सांगतात, बाबांनो कष्टाशिवाय कोणतेही यश प्राप्त होणार नाही.

 

भक्तीमार्गातही भक्ती, उपासना करायची नाही; आणि देवाची कृपा व्हावी अशी इच्छा करायची. तेवढे करून न थांबता, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तुला सव्वा किलो पेढ्यांचा नैवेद्य दाखवीन असा नवसही बोलायचा. पण या कर्मभूमीचा नियम असा आहे की, येथे कष्टावाचून फळ, यश मिळत नाही. ‘कष्टेंविण राज्य नाहीं’ – कष्ट केल्यावाचून, त्यासाठी तन-मनाने झिजल्याशिवाय, लहानमोठे कोणतेच काम; अगदी राज्यप्राप्तीपर्यंत या जगात काहीच साध्य होत नाही. राज्य म्हटल्याबरोबर मला शिवाजी महाराज आठवतात. त्यांची प्रत्येक कृती ही हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाने भारलेली होती. तसेच या ध्येयातच, आपल्या जगण्याचा अर्थ शोधणारी जिवाभावाची माणसे त्यांनी जोडली. आणि शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाने झपाटून जाऊन योग्य दिशेने, योग्य मार्गाने, योग्य प्रकारे अथक कष्ट; जिद्दीने; प्रयत्नाने स्वराज्य निर्माण केले. शिवबाचे चरित्र म्हणजे चालता-बोलता महामंत्र आहे. श्रीसमर्थांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यातून साकार झाले.

 

‘केल्याविण होत नाहीं’ –  श्रीसमर्थ सामान्य, अज्ञानी जनांना सांगतात की, करून पाहिल्या शिवाय त्यातील अडचणी कळणार नाहीत. पण आम्ही म्हणतो,

 

‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्या वरी.’

 

याचा परिणाम अपयश येते. मग आपण अपयशाचे खापर नशिबावर फोडतो. अशा आळशी, सुस्त माणसाच्या दैववादी, नकारात्मक विचारांना श्रीसमर्थांच्या विचारप्रणालीत व उपदेशात काडीचेही स्थान नाही. उलट ‘लहानथोर काम कांही ।केल्याविण होत नाही ।’  श्रीसमर्थांप्रमाणे अनेक संतांनी कष्टाचा महिमा वर्णन केला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, 

 

“असाध्य ते साध्य करता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।”

 

या जगात असाध्य असे काहीच नाही. पण अभ्यास म्हणजे कष्टात सातत्य हवे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “अभ्यासाची कांही सर्वथा दुष्कर नाही ।” कष्टात सातत्य ठेवल्यावर कोणतीच गोष्ट अवघड नाही. श्रीसमर्थही आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहेत की, कष्ट केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की ती मनावर ठसते, ही सामान्य जनांची मानसिकता श्रीसमर्थांनी ओळखली होती. कारण ते मानसतज्ञ होते.

 

‘साध्यजनीं’ – साध्य म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे. यासाठी कष्ट व प्रयत्नांची जोड हवी. इथे मला जपानचे उदाहरण द्यावेसे वाटते. हिरोशिमा आणि नागासाकी वरील अणूबाँबच्या हल्ल्यानंतर जपानने अपार धैर्याने स्वतःचा पुनर्विकास सुरू केला. शिक्षणाची मशाल, श्रमांची ताकद आणि जिद्दीचा किल्ला उभारून त्यांनी इतिहासाला नव्याने वळण दिले. या सर्व प्रयत्नांमुळे जपान कांही दशकातच एक आर्थिक महासत्ता बनला. आणि राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखा तेजाने झळकला.

 

आपले ध्येय गाठण्यासाठी कष्टाचीच कास धरावी लागते. यासाठी माझ्या वाचनात आलेले एक पुस्तक, ते म्हणजे वीणा गवाणकर लिखीत, ‘गोल्डा एक अशांत वादळ’ यातील एक सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी या विचाराने, ध्येयाने झपाटली जाते. साध्या राहणीने आणि सहज वाणीने, अपार कष्ट करून आपला स्वतंत्र ठसा उमटवते. ज्यूंसाठी इज्रायल देश उभा करते. इज्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणारी ती एकमेव स्त्री ठरली. सत्तरी नंतरही पंतप्रधान होते. हे तिच्या कष्टाचेच फळ नव्हे का ? आपल्या देशावर ब्रिटिशांनी दिडशे वर्षे राज्य केले. त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी जीवनाची आहुती दिली आणि स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी स्वत:चा प्रपंच केला नाही तर देशाचा केला. म्हणून आज आपण स्वातंत्र्याची फळे उपभोगत आहोत. आजच्या घडीलाही आजच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय पुढाऱ्यांनी, आणि सामान्य जनतेने कष्टाची कास धरली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर आपला भारत महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.

थोडक्यात या ओवीचा श्रीसमर्थांनी सांगितलेला मतितार्थ म्हणजे, ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.’ तशीच ती अनर्थकारक आहे. जगाच्या या कर्मभूमीत लहान मोठे कोणतेही कार्य ठरवून केल्याशिवाय होत नाही हे न उमजणाऱ्या प्रवाहपतित दुर्देवी माणसाच्या मानसिकतेवर श्रीसमर्थांनी कळकळीने चिंतन केले आहे. सामान्यजनांनी स्वतःची प्रगती करून सुखाने रहावे या पोटतिडकीने, वृत्ती; प्रवृत्तीवर; स्वभावावर प्रकाश झोत टाकला आहे.

 

श्रीसमर्थांनी बारा वर्षे भारताच्या कानाकोपऱ्यात आसेतु हिमाचल अशी एकट्याने खडतर पायी यात्रा केली. त्या पदभ्रमणात श्रीसमर्थींनी ठिकठिकाणच्या लोकांचे, समाजाचे सूक्ष्म अवलोकन केले. त्यांचे गुणदोष हेरले आणि त्या अनुभवाचे शब्दरूपातून अधिकार वाणीने वर्णन, विवेचन, विश्लेषण केले आहे. हे साडे तीनशे वर्षापूर्वीचे विचारधन, हा उपदेशाचा गाभा आजच्या काळापुरताच नव्हे तर भावी काळात, तसेच मानवाचे मूलभूत गुणदोष कायम असेपर्यंत दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहेत असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.  

 

चला तर, हे विचारधन अंतरी बाणवूया, अंतर्मूख होऊया. आपल्या आचरणात बदल करूया, आणि हीच या ओवीची खरी फलश्रुती ठरेल असे मला वाटते.

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language