साधनेच्या सुरुवातीच्या काळात समर्थांची मानसिक अवस्था संभ्रमित होती. त्या काळाचा जर आपण विचार केला तरलग्नमंडपातून पळून जाणे, तेही दूर नाशिक कडे, हे खूप धाडसाचे काम होते. वय लहान, कोणी ओळखीचं नाही, खाण्या-पिण्याची विवंचना, अशा कितीतरी गोष्टी होत्या. समर्थ चांगले उंचेपुरे होते. व्यायामाचं शरीर होतं, त्यामुळे वयापेक्षा ते मोठे दिसत. टाकळीला आल्यानंतर समर्थांनी गावाबाहेर एका गुहेत राहून श्रीराम प्रभूंची उपासना चालू केली. पहाटे पहाटे सूर्यनमस्कार, त्यानंतर गायत्री पुरश्चरणआणि मग माध्यान्हीला अगदी पाच घरी भिक्षा मागत आणि आलेल्या भिक्षेतून श्रीरामाला नैवेद्य, पाण्यातील जीवाला अन्न,मग उरलेलं स्वतः असे तीन वाटे करत.
समर्थ जेव्हा भिक्षेला जात,तेव्हा भिक्षा सहज मिळत नसेल तर त्याबरोबर उपहास,टोमणेही ऐकून घ्यावे लागत. लोक म्हणत, एवढा धिप्पाड, धडधाकट आहेस,घरी आई-वडिलांची सेवा करायची सोडून इकडे कशाला आलास? कामधंदा नको,आयतं खायला पाहिजे म्हणून ही नाटकं. तेव्हा समर्थांना वाईट वाटे. अशावेळी आपली व्यथा ते श्रीरामांसमोर सांगत असत. त्यातूनच करुणाष्टकांचा जन्म झाला. रामाशिवाय आता अन्य कोणीच त्राता नाही. माय,बाप,बंधू,सखा,सगळं काही तोच आहे. म्हणून अगदी आर्त आणि करुण स्वरात समर्थ श्रीरामाला म्हणतात,रघुनायका तूच सांग आता मी काय करू?खरंच माझं काही चुकतंय का? समर्थ रामरायाची आळवणी करतात ते या करुणाष्टकातून पाहूया.
उदासीन हा काळ जातो गमेना|
सदा सर्वदा थोर चिंता शमेना|
उठे मानसी सर्व सांडोनी जावे|
रघुनायका काय कैसे करावे||१||
घरदार सोडून आल्यामुळे सुरुवातीला एकटेपणा वाटत होता. समर्थ श्रीरामांना सांगतात की, मला जीवनात खूप उदासीनता आली आहे. वेळ सरता सरत नाही. जणू तो थांबलाय की काय? असं वाटतं. माझ्या मनातील चिंता दिवस-रात्र मला त्रास देत आहे. ती कशानेही शांत होत नाही, अन् कमीही होत नाही. मी घरदार, जवळची माझी माणसंसोडून आलो, ती चूक तर केली नाही ना? असं लोकांच्या टोमणे देण्यावरून वाटतं. हे सगळं सोडून परत जाऊ की काय? असे विचार ही माझ्या मनात येत आहेत. रघुनायका तूच मला मार्ग दाखव, आता मी काय करु?
जनी बोलता चालता वीट वाटे|
नसे अंतरी स्वस्त कोठे न कंठे|
घडीने घडी चित्तकीती धरावे|
रघुनायका काय कैसे करावे||२||
पुढे समर्थ रामरायाला म्हणतात,मला या लोकांमध्ये वावरण्याचा वीट आला आहे. त्यांच्याशी बोलण्याचा उबग आला आहे. त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचाही कंटाळा आलाआहे कारण ते सगळे सारखं टोचून बोलतात.माझी चेष्टा करतात.खिल्ली उडवतात.त्यामुळे मी एकटा बसलो तरीही माझ्या मनाला अजिबात स्वस्थता, शांती मिळत नाही.मी माझ्या अशांत मनाला कसे आवरू? हे रघुनायका मी काय करू? तुम्हीच मला मार्गदर्शन करा.
अवस्था मनी होय नाना परीची|
किती काय सांगो गती अंतरीची|
विवेकेचि या मानसा आवरावे|
रघुनायका काय कैसे करावे||३||
समर्थ रामरायाला सांगत आहेत,माझ्या मनात सतत वेगवेगळे विचार येत असतात.माझ्या या मनस्थितीबद्दल मी तुम्हाला कसे आणि काय सांगू?मला हे माहीत आहे की, विवेकानेच मन मनातील विचारांवर ताबा मिळवता येतो. पण कितीही प्रयत्न केले तरी मला हे जमत नाही. तुम्हीच सांगा ना रघुनायका आता मी काय करू?
विचारे तऱ्हि अंतरी कोंड होतो|
शरीरासी तो हेत सांडूनि जातो|
उपाधीस देखोनि वाटे सरावे|
रघुनायका काय कैसे करावे||४||
समर्थ म्हणतात साधना करायची ठरवली किंवा काही अभ्यास करायचा, वाचन करायचे ठरविले,तरी मनात अनेक इच्छा निर्माण होतात.या इच्छा मनाला त्याच्या मूळ ध्येयापासून, हेतूपासून दूर नेतात. संसारातील बंधने मला नको आहेत.मला या सगळ्यांपासून अलिप्त राहायचं आहे. पण लोकांच्या बोलण्यामुळे मी पुन्हा तिकडे वळेनकी काय?पण मला नको हे सगळं. रघुनायका तूच सांग मी आता काय करू? यातून सोडवणारा फक्त तूच आहेस. तूच मला मार्ग दाखव, मार्गदर्शन कर.
म्हणे दास ऊदास जालो दयाळा|
जनी व्यर्थ संसार हा वायचाळा|
तुझा मी तुला पुसतो सर्व भावे|
रघुनायका काय कैसे करावे||५||
समर्थ आपले आराध्य प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतात. विनवणी करतात.ते म्हणतात,या प्रपंचातील माया संसारातील मिथ्यत्व, व्यर्थत्वलक्षात आल्यामुळे मी दुःखी झालो आहे.मला खूप उदास वाटत आहे. मी तुम्हालाच माझे सर्वस्व मानले आहे.मी फक्त तुमचाच आहे.म्हणून मी सर्व भावे श्रद्धायुक्त अंत:करणाने तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही मला तुमचा समजून मार्गदर्शन करावे. हे रघुनायका आता मी काय करू?
|| जय जय रघुवीर समर्थ ||
तपश्चर्या काळातील समर्थांची मनाची अवस्था काय होती हे या करुणा षटक मधून कळून येते.
Khup. Chan
जय जय रघुवीर समर्थ!
खूप छान. समर्थांच्या त्या काळातील मन:स्थितीचं वर्णन फार सुंदर केले आहे. धन्यवाद 🙏🙏