योगीराज श्रीकल्याण स्वामी, श्रीसमर्थ रामदासस्वामी यांचे पट्टशिष्य ! त्यांच्याबद्दल श्रीसमर्थ रामदासस्वामी म्हणतात,
“विश्रांती मज बहूयाचेनि सखया । सेवक न देखो ऐसा दुजा ।।”
आदर्श सद्गुरु-शिष्य जोडीमध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते म्हणजे सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी आणि सच्छिष्य योगीराज श्रीकल्याणस्वामी यांचे ! कारण योगीराज श्रीकल्याणस्वामी यांची सद्गुरूंप्रती असलेली अतुलनीय निष्ठा. सद्गुरू वचनांवर पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि सद्गुरूंपुढे संपूर्ण शरणागती या गोष्टींमुळे ते सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या कृपेस पात्र झाले. इतकेच नाही तर सद्गुरूंचे ते बहिश्चर प्राणच झाले. दिवस रात्र अखंड त्यांना सद्गुरू श्रीसमर्थांचाच वेध लागलेला असे.
योगीराज श्रीकल्याणस्वामींच्या वाङ्मय संपदेमध्ये श्रीसमर्थांवर एकूण २४ पदे आहेत. आणि ‘गुरूसेवा‘ यावर ४ पदे आहेत. त्यातीलच हे पहिले पद म्हणजे “मम स्वामी” येथे देत आहे.
“मज तो आवडतो मम स्वामी । निशिदिनीं अंतर्यामीं ।।धृ.।।
अक्षै पदाचा सुखदाता । निरसोनी माया ममता ।।१।।
भक्तीमार्गाच्या गजढाला। चालवील्या आढाला ।।२।।
कायें बोलों मी कीर्तीसी । न दिसे तुळणेसी ।।३।।
छेत्र बहुताचें दासाचें । धाम चि कल्याणाचे ।।४।।”
प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या सद्गुरूंबद्दल कृतज्ञतेचा भाव असतो. कारण सद्गुरूकृपेमुळे तो परमार्थ अधिकारी होत असतो. तोच भाव स्वामी आपल्या या पदामधून व्यक्त करतात. योगीराज श्रीकल्याणस्वामींना वयाच्या १०-१२ वर्षापासून सद्गुरूंचा सहवास आणि त्यांची सेवा करणाचे भाग्य लाभले. अर्थातच त्यामुळे ते सद्गुरू कृपेस पात्र झाले. सद्गुरू शरणता हा सहज स्वभाव असल्यामुळे सद्गुरू श्रीसमर्थांच्या पायी चित्त जडले. मग काही काळानंतर, आपला हा शिष्य गुरूत्व धारण करण्यायोग्य झाला आहे याची खात्री पटताच, सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी योगीराज श्रीकल्याणस्वामी यांच्याकडे स्वतःच्या हातातील जपमाळ देऊन, परंडा-डोमगांव प्रांती जाऊन जगदोद्धार करावा अशी आज्ञा केली.
“जपमाळ स्वकरिंची वोपुनि उदार्यें ।
वाढवी म्हणतिलें पारंपर्य ।। दासविश्राम धाम १७०-१३०।।”
सद्गुरू श्रीसमर्थांच्या पायी चित्त जडलेले असताना अचानक स्वामींनी दूर जाण्याची आज्ञा केली, म्हणजे आता स्वामी चरणांचा वियोग होणार, या कल्पनेनेच योगीराज श्रीकल्याणस्वामींचा जीव व्याकूळ झाला. पण सद्गुरू आज्ञा पालन करणे तर आवश्यक होते. डोमगांवी आल्यानंतर सद्गुरूंच्या आठवणीने, त्यांच्या काळजीने ते व्याकूळ होत. नेत्रातून अश्रूधारा वहात, अशाप्रकारे सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी यांचा योगीराज श्रीकल्याणस्वामींना ध्यास लागे, मनामध्ये सदैव त्यांचीच मूर्ती असे, त्यांचे गुणवर्णन आठवत असे. म्हणूनच ते म्हणतात,
“मज तो आवडतो मम स्वामी । निशिदिनीं अंतर्यामीं ।।”
माझे सद्गुरू स्वामी मला अत्यंत प्रिय आहेत आणि मला त्यांचा रात्रंदिवस ध्यास लागलेला आहे. ते कसे आहेत तर,
“अक्षै पदाचा सुखदाता । निरसोनी माया ममता ।।१।।”
अक्ष पद देणारे आहेत ज्याचा कधीही नाश होत नाही, असे अढळ ध्रुवपद. ते पद देण्यापूर्वी सद्गुरू श्रीसमर्थांनी योगीराज श्रीकल्याणस्वामींच्या आत्मस्वरुपावर पडलेलं मायेचं आवरण दूर केलं. माया-ममतेचा, देहबुद्धीचा निरास केला. कारण योगीराज श्रीकल्याणस्वामींनी स्वत:ला सद्गुरूचरणी समर्पित करून आत्मनिवेदन साधले होते. ब्रह्मज्ञानी सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी सदैव ब्रह्मभावाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ असून, तो आनंद/ते सुख; ते सदैव भोगत असत. तेच सुख, तोच आनंद ते आपल्या सत्शिष्यांना उपभोगायला देत असत. तेच सुख त्यांनी योगीराज श्रीकल्याणस्वामींना दिलं. या ब्रह्मानंदामध्ये सदैव रहाणे म्हणजे अक्ष पद. तेच सद्गुरूंनी योगीराज श्रीकल्याणस्वामींना दिले आहे.
दारात हत्ती झुलणं हे ऐश्वर्याचे प्रतिक आहे. सद्गुरू श्रीसमर्थांनी भक्तिमार्ग आसेतुहिमाचल वाढवून ऐश्वर्य संपन्न केला.
“इवलेसे रोप लावियेले द्वारी । तयाचा वेलू गेला गगनावरी ।।”
सद्गुरू श्रीसमर्थांनी भक्तिमार्ग आकाशाला जाऊन भिडवला. म्हणूनच योगीराज म्हणतात,
“भक्तीमार्गाच्या गजढाला । चालवील्या आढाला ।। २।।”
म्हणूनच विदेशातून ठिकठिकाणी लोक, दासबोध अभ्यास मंडळातून श्रीसमर्थ वाङ्मयाचा अभ्यास करतात. दासबोधातून श्रीसमर्थांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. श्रीसमर्थांनी दासबोधामध्ये पहिल्या दशकातील पहिल्याच समासामध्ये म्हटले आहे.
“भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ।।१-१-४ ।।”
श्रीसमर्थांकडे जो कोणी येई, मग तो स्त्री असो, पुरुष असो, कोणात्याही वर्णाचा असो, त्या प्रत्येकाला त्यांनी ‘आपला‘ म्हटला आणि त्याला ईश्वराच्या मार्गावर घालण्याचा मनापासून प्रयत्न केला. अशाप्रकारे त्यांनी भक्तिमार्ग ऐश्वर्य संपन्न केला.
“माझ्या सद्गुरूंची कीर्ती मी कशी वर्णन करू ? कारण माझी वाणी तिथे अपुरी पडत आहे, तसेच सद्गुरूंच्या बरोबर तुलना करण्यायोग्य मला कोणीही दिसत नाही” असे स्वामी म्हणतात.
“कायें बोलों मी कीर्तीसी । न दिसे तुळणेसी ।। ३ ।।”
१२ वर्षाच्या तीर्थयात्रेच्या काळात श्रीसमर्थांनी जनतेची अवस्था स्वतः बघितली होती. जनता अस्मानी-सुलतानीने पिचून गेली होती. अशा या मृतवत, पाषाणवत, दिङ्मूढ होऊन पडलेल्या जनतेमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं मोठं काम श्रीसमर्थांनी केलं. संपूर्ण समाजामध्ये आपल्या दैवी वाणीने स्वसामर्थ्याची चेतना निर्माण केली. त्यांच्या या कार्याबरोबर तुलना करण्यायोग्य कोणीही नाही. आदरणीय बाबा बेलसरे म्हणतात, “फुलांतून अत्तर कोणीही काढेल, पण मातीतून अत्तर काढणारा श्रीसमर्थांसारखा एखादाच.” म्हणूनच स्वामी म्हणतात, “अशा या सद्गुरूंची कीर्ती मी कशी व किती वर्णन करू ?”
श्रीसमर्थांनी आपल्या श्रीरामभक्तीचा, आपल्या साधनेचा उपयोग स्वत:साठी न करता समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी केला. जो कोणी त्यांच्याकडे शरणागत भावाने आला, त्या सर्वांवर त्यांनी आपले कृपाछत्र धरले आणि कल्याणाचे तर ते परमधामच आहेत.
“छेत्र बहुताचें दासाचें । धाम चि कल्याणाचें ।।४।।”
असे योगीराज श्रीकल्याणस्वामी म्हणतात.
श्रीसमर्थांच्या महानिर्वाणानंतर जवळपास ३३ वर्षे योगीराज श्रीकल्याण स्वामी यांनी परंडा-डोमगाव प्रांतातील श्रीसमर्थ कार्य समर्थपणे सांभाळले. सद्गुरूंबरोबर स्वामींचे ऐक्य कशा प्रकारे होते, हे त्यांच्या महानिर्वाणाच्या प्रसंगावरून लक्षात येते.
श्रीसमर्थांच्या निर्वाणानंतर, त्यांच्या अस्थी चाफळ येथील वृंदावनामध्ये ठेवल्या होत्या. केशवस्वामी (स्वामींचे शिष्य) दरवर्षी योगीराज श्रीकल्याणस्वामींना, श्रीसमर्थांच्या अस्थी विसर्जनाबद्दल विचारत. कारण त्या गंगेमध्ये विसर्जित करायच्या होत्या. स्वामी दरवर्षी “पुढे बघू” असं म्हणत. शके १६७६ अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी, या दिवशी केशवस्वामींनी, स्वामींना न विचारताच वृंदावनातूत अस्थी बाहेर काढताच परंडा येथे योगीराज श्रीकल्याणस्वामींनी योगबलाने आपले प्राण पंचत्वात विलीन केले.
“ऐसे कोठे नाही हो वर्तले । सांगायासी ऐकायासी गोष्टी झाली ।। दास विश्रामधाम ।।”
म्हणून योगीराज श्रीकल्याणस्वामी म्हणतात, माझे सद्गुरू, त्यांचे चरण हेच माझे परमधाम आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।