“कल्याण करी रामराया” ही प्रार्थना श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेली एक आगळी-वेगळी आर्त ‘आळवणी’ आहे. ही सर्वसाधारण प्रार्थनेप्रमाणे किंवा आरतीप्रमाणे इष्टदेवतेच्या सगुण स्वरूपाचे रूपसौंदर्य वर्णन करणारी; अथवा त्या त्या देवतेचे गुण वर्णन करणारी नाही. या प्रार्थनेला पसायदान म्हणावे, तर इतर पसायदानाप्रमाणे केवळ मांगल्याचे, सुख-शांतीचे मागणे यात नाही. या प्रार्थनेत तत्कालीन समाजाचे, धर्मस्थितीचे आणि परकीय राज्यसत्तेचे जळजळीत दर्शन व्यक्त होते.
आक्रमक, निष्ठुर, निर्दयी अशा यावनी सत्तेपुढे हतबल झालेली प्रजा, धार्मिक स्थळांचा विध्वंस, स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे आणि आपलीच माणसे यवनांची चाकरी करून स्वतःचे स्वत्व विसरून, स्वधर्माला विसरून शिरजोर झालेल्यांचे वर्णन यात सूचकपणे व्यक्त झाले आहे. यामुळे श्रीसमर्थांना एकच आशेचा किरण दिसतो आहे, तो म्हणजे रामराया ! कोदंडदारी, महाप्रतापी, प्रभूरामचंद्रच यातून वाचवू शकतील; अशा आर्त भावनेने ते म्हणतात, “कल्याण करी रामराया ! हे रामराया, तूच आता यातून आम्हाला वाचव. तूच आमचा तारणहार, कर्ता आहेस.” या घडीला केवळ लौकिक भक्तिमार्ग समाजाला तारू शकणार नाही. या दृढ मनोधारणेने, जनजागृतीसाठी; समाजामध्ये कर्तव्याचा; बलाचा आणि स्वाभिमानाचा स्फुल्लिंग फुलवण्यासाठी श्रीसमर्थांनी आपल्या स्वतंत्र विचारसरणीच्या रामदासी पंथाची उभारणी केली. भक्ती मार्गातूनच आपल्या ईप्सित ध्येयाचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला. त्या ध्येयाला अनुसरून ही प्रार्थना त्यांनी लिहिलेली असावी. त्यांनी आपल्या भारत-भ्रमणामध्ये जी विदारक स्थिती पाहिली; ती त्यांनी नोंदवून ठेवली आहे. ते म्हणतात,
“पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशचि उरला ।
येणेकरिता बहुतांला । संकट जालें ।।”
त्यांनी धार्मिक स्थळांचा विध्वंस, स्त्रियांवरील अत्याचार आणि सामान्य प्रजेची दैना पाहून अखेरीस भगवंताला कळकळीची आळवणी केली. ते म्हणतात,
“दास म्हणे रे भगवंता । किती पाहसी सत्त्व ।
काय वांचुनि वांचुनि । नुपरते जीवित्व ।।”
आता जगून वाचून तरी काय करावे ? अशी अवस्था प्राप्त झाली आहे. हे भगवंता, तू तरी किती सत्त्व पाहणार आहेस ? अशी आर्त हाक ते मारतात. अशावेळी दुष्टांचा संहार करून प्रजेचे कल्याण करणारा निष्काम, महाप्रतापी योद्धा, शक्तिशाली रामराया त्यांना उपासनेसाठी आदर्श वाटला आणि त्यादृष्टीने त्यांनी जे कार्य केले ते पाहता, श्रीसमर्थ हे राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक आहेत असे म्हणणे सार्थ ठरेल. त्यांचे कार्य आणि तळमळ पाहून आपण नतमस्तकच होतो.
याच भावनेतून श्रीसमर्थानी लिहिलेली ही प्रार्थना, इतर प्रार्थना किंवा सर्वसाधारण आरत्यांप्रमाणे भगवंतावर स्तुती-सुमने उधळणारी किंवा त्याच्या सगुण स्वरूपाचे गुणवर्णन करणारी नसणे हे ओघाने आलेच. तत्कालीन समाजाचे दारुण चित्र सुचकरीत्या व्यक्त करताना, त्यांचे शब्द-सामर्थ्य आणि आंतरिक तळमळ अतिशय प्रभावीपणे, प्रत्ययकारी स्वरूपामध्ये व्यक्त होते. या प्रार्थनेतून त्यांना स्वतःला किंवा आपल्या पंथासाठी काहीच मागावयाचे नाही. ते समाजाचे, धर्माचे म्हणजे पर्यायाने राष्ट्राचे कल्याण; श्रीरामांकडे मागतात. यातही त्यांची धगधगीत वैराग्य दृष्टीच व्यक्त होते. ते प्रार्थना करतात, “जनहित विवरी कल्याण करी रामराया” ही प्रजा, समाज, धर्म, सारे संकटात सापडले आहेत. दुष्टांचे निर्दालन करून भक्तांना तारणार्या हे रामराया, आमच्या संकटाचे तूच निवारण कर. तुझ्या धनुष्याचा टणत्कार ऐकून प्रत्यक्ष काळ देखील थरारून जातो, अशी तुझी कीर्ती आहे. समाजाची स्थिती पाहून माझ्या जीवाची तळमळ होत आहे. आता या दुःखी जनास तूच हाती घेऊन आधार दे, असे ते म्हणतात. त्याला तुझ्या करुणेच्या पंखाखाली घे, असे आर्जवाने म्हणतात. यातून श्रीसमर्थांची श्रद्धा आणि दृढ विश्वास व्यक्त होतो. ते पुढे म्हणतात, अपराध, अन्याय करणारे; अपराध करतच आहेत. अन्याय, जुलूम, अत्याचार करून जनतेला हवालदिल करत आहेत. रयत गांजून गेली आहे. हे रामराया, आता तूच त्यांना सावर ! त्यांना आधार दे ! त्यांना प्रेरणा देऊन उभे राहण्याची शक्ती दे ! या संकटामध्ये वाईटात अधिकच वाईट घडावे, अशी कठीण परिस्थिती होत चालली आहे. त्यामुळे रयतेपुढे निराशेचा अंधार पसरला आहे. आशेचा किरणही कुठे दिसत नाही. परचक्र निरूपणात ते म्हणतात,
“ऐसें जालें वर्तमान । पुढेचि अवघ्या अनमान ।
सदा दुश्चित अवघें जन ।उद्वेगरुपी ।।”
म्हणून ते पुढे म्हणतात “कोठे जावे, काय करावे ?” जनसामान्यांना आगीतून निघावे तर फुफाट्यात पडावे, अशा अवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. आता कुठे जायचे ? आणि कसे वाचायचे ? ह्या केविलवाण्या अवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. स्त्रिया-मुलींना जगणे अशक्य झाले आहे. अशा भयानक स्थितीत आत्महत्येशिवाय मार्ग उरलेला नाही.
ते म्हणतात. “आरंभिली बोहरी” याला संदर्भ राजपुतान्यातील सैनिकांनी केसरीया धारण केल्यानंतर स्त्रियांनी जौहार करून अग्नी-प्रवेश केला होता त्याचा आहे. परचक्र निरूपणात ते म्हणतात,
“कितेक अनाचारी पडिली । कितेक यातिभ्रष्ट जालीं ।
कितेक विषे घेतली । कितेक जळी बुडाली ।
जाळिली ना पुरिली । किती येक ।।
येक म्हणती कोठें जावें । येक म्हणती काये करावें ।।”
अशा भयावह अवस्थेमध्ये श्रीसमर्थांना रामराया हाच आधार, तारणहार वाटतो. म्हणून ते म्हणतात, “कल्याण करी रामराया !” आणि शेवटच्या चरणात ते आशादायी सकारात्मक विधान करतात. आपल्या प्रयत्नांना, तपश्चर्येला फळ लाभल्याचे समाधान; आनंद ते व्यक्त करतात. याचा संदर्भ छत्रपती शिवरायांच्या प्रतापाचा आणि धर्मरक्षणाच्या यशस्वी कार्याशी आहे, असे अनुमान काढता येते. आनंदभुवनी या स्फुट काव्यात ते म्हणतात,
“स्वप्नी जे देखिलें रात्री । तें तें तैसेचि होतसे ।।”
आपल्या तपश्चर्येचे फळ, भगवंतच शिवरायांच्या रुपाने अवतरला आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात,
“मनासी प्रचिती आली । शब्दीं विश्वास वाटला ।
कामना पुरती सर्वे । आनंदवनभूवनी ।।
बंड पाषाण्ड उडाले । शुद्ध अध्यात्म वाढले ।
रामकर्ता रामभोक्ता । आनंदवनभूवनी ।।”
आपल्या स्वप्नांना आणि ध्यासाला रामरायाचा आशीर्वाद शिवरायांच्या रूपाने लाभला आहे. आपण जे जे प्रयत्न केले, त्याचे फळ आपण अनुभवतो आहोत अशी समाधानाची भावना ते व्यक्त करतात. “आम्ही केले, पावलो” अशी भावना ते शेवटच्या चरणात आनंदाने शब्दांकित करतात. शिवरायांचे राजकारणाच्या क्षितिजावरती यशस्वी पदार्पण हा ईश्वरी संकेतच श्रीसमर्थांना वाटतो.
“कल्पांत मांडिला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडावया |
कैपक्ष घेतला देवी | आनंदवनभभूवनी ।।”
म्हणून ते अभिमानाने सांगतात, “आम्हाला मिळालेल्या या कृपाशीर्वादाला कशाचीही सर येणार नाही, असा तो अलौकिक आहे. अशी ही छोटेखानी प्रार्थना तत्कालीन समाजाच्या भीषण स्थितीचे आणि श्रीसमर्थांच्या ध्येय स्वप्नांचे चित्र उभी करणारी आहे, तितकीच स्फूर्तीदायी; प्रेरणादायी देखील आहे!
।। जय जय रघुवीर समर्थ ।।