जीव ईश्वर जगत संबंध

जीव ईश्वर जगत संबंध
सुमेधा बापट
  • May 8, 2026
  • 1 min read

जीव गेला असे आपण म्हणतो किंवा ऐकतो पण जीव मात्र अजून कोणी पाहिलेलाच नाही ! आपण म्हणतो माझा पाय, माझे शरीर, माझी मुलं आणि मग मी कोण प्रश्न पडतो ! नुकतेच मृत झालेल्या व्यक्तीचे डोळे काढून रोपण करून एक एक डोळा दोन जणांना देता येतो. ज्याचे डोळे होते तो तर मृत झाला. त्याला त्या डोळ्यांनी अर्थातच काहीही दिसत नाही, पण ज्यांना डोळा दिला जातो त्या दोघांनाही जग दिसतं ! मग पुन्हा प्रश्न पडतो की हा पाहणारा कोण ? एकदा  शास्त्रज्ञांनी प्रयोग केला. एका अगदी आता मरेल की मग मरेल अशा स्थितीतल्या माणसाला एका काचेच्या पेटीत ठेवलं. मग त्याचा जीव गेल्यावर त्या काचेला तडा गेल्याचे दिसलं पण जाताना मात्र काहीच दिसलं नाही. मग दिसत नाही पण आहे ते काय ? अर्थातच तो आहे आत्मा. देहात आहे तोपर्यंत माणूस जिवंत अन्यथा तो देह म्हणजे प्रेतच !!

माणूस म्हणजे, देह आणि आत्मा यांचा संयोग. आत्मा देहात राहून अनेक प्रकारचे सुखदुःख भोगतो, पण त्यामुळे आत्मा सुखी; दुःखी होणार आहे का ? तो देहात बंदिस्त असल्यामुळे आपण तसं म्हणतो एवढेच ! वास्तविक तो निर्गुण, निराकार, निर्विकार असाच आहे. ही सारी त्या ब्रह्माची लक्षणे आहेत. संपूर्ण दासबोधात समर्थ आपल्याला ‘तत्त्वमसि’ महावाक्याचाच उपदेश करत आहेत. तत् म्हणजे ते, ते म्हणजे ब्रह्म. मग ब्रह्म आणि आत्मा दोन्ही निर्गुण निराकार असे झाले, पण हे काही खरं नाही. कारण शास्त्र काय सांगते ? ब्रह्म एकमेव अद्वितीय असेच आहे. मारुतीरायाने एकदा प्रभूरामचंद्रांना उत्तर दिलं होतं, 

“देहबुद्धया तु दासोऽहं जीवबुद्ध्या त्वदंशकः।

आत्मबुद्ध्या त्वमेवाहमिति मे निश्चिता मतिः।।”

इथे आता परमात्म्याचा अंश हे कसं काय ? कारण परब्रह्म तर फुटत नाही, कशाने तोडता येत नाही कारण, “नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः” असे भगवद्गीता सांगते! पण ब्रह्मच देहात सीमित झाले म्हणून त्याला अंश म्हणायचं एवढेच. या जीवाला आपण तीन प्रकारे पाहूया. एक स्वप्नात रमणारा, दुसरा व्यावहारिक जगात रमणारा, तिसरा परमार्थिक ! जाग आली स्वप्न संपले, की तो जीव आता दृश्य जगात जगतो; तो स्वतःच म्हणतो की स्वप्नात पाहिलं ते काही खरं नाही. पण परमार्थाचा अभ्यास करणारा म्हणतो व्यवहारात जे काय चाललंय ते मिथ्या म्हणजे दोन्ही मिथ्या झाले. स्वप्नातील आणि व्यवहारातील सारं काही मिथ्याच आहे हे समजले.

ईश्वर – ब्रह्म सर्व काळात आहे. म्हणजे ‘असतचि असे’ असे म्हणतात. या ब्रह्माच्या अनेक शक्ती आहेत, त्यांना माया म्हणतात; मुख्य आहे ती मूळमाया. समर्थ दासबोधात सांगतातच, “मूळमाया तोचि मूळपुरुष” अर्थातच ही मूळमाया सुद्धा दिसत नाही. ती अदृश्य, अव्यक्त, निराकार अशीच आहे. जेव्हा ब्रह्मामध्ये संकल्प झाला, “एकोsहम बहुस्यां” तेव्हा त्याच्यात खळबळ झाली. निश्चळ आकाशात चंचल वायू निर्माण होतो, तसे निश्चल ब्रह्मामध्ये वायूमुळेच मूळमाया आहे. त्यातूनच गुणक्षोभिणी, जडमाया निर्माण झाल्या. ब्रह्मातच गूढ सुप्त स्वरूपात होतीच. तीच मूळपुरुष, तोच सगुण निराकार ईश्वर होय. ब्रह्मदेव, विष्णू, महेश यांची निर्मिती ही त्यानंतरची ! यापैकी ब्रह्मदेव जाणीव नेणीव मिश्रित म्हणजे रज आणि तम गुणाचा. विष्णू शुद्ध सत्वगुणाचा, तो भरणपोषण करतो आणि महेश हा तमो गुणाचा स्वामी ! तो लय करतो. ब्रह्मदेवाने सारी सचेतन अचेतन सृष्टी निर्माण केली, मग विष्णू सर्वत्र व्यापून राहिला. याची एक कथा सांगितली जाते. ब्रह्मदेवाने सारी निर्मिती केली आणि मग विष्णूंनी नारदमुनींना बोलवून घेतले, साऱ्या पृथ्वीवर मला रहाण्यासाठी उत्तम जागा शोध, असे त्यांना सांगितले. जिथे कोणीही मला त्रास देणार नाही, ही अट मात्र घातली. नारदमुनी संपूर्ण पृथ्वीवर हिंडून परत आले आणि त्यांना अशी काही जागा सापडली नाही. तेव्हा ते भगवान विष्णूंना म्हणाले की,  “तुम्ही माणसाच्या शरीरात रहा म्हणजे कोणी कितीही शोधलं तरी सापडणार नाहीत, मग तुम्हांला कसलाही त्रासही नाही.” विष्णूंना ते पटलं. समर्थ सांगतातच,

“पृथ्वीमधें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें । देह देऊळ आत्मा देव ।”

सचेतन अचेतन सृष्टी निर्माण झाली तेच जगत, पण शास्त्र काय सांगते ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ जे निर्माण झाले ते नाशवंत आहे, तर समर्थ दासबोधात असे म्हणतात,   

“अरे जे जालेंचि नाहीं । त्याची वार्ता पुससी काई ।”

अर्थातच सारं काही ब्रह्मच आहे दुसरं काहीच नाही. (‘रिता ठाव या राघवेंवीण नाही’ असे मनोबोधात म्हटले आहेच) ब्रह्माला कोणतीच उपाधी नाही, तर मूळमाया तोच ईश्वर; तोच परब्रह्म; परमात्मा; शिवशक्ती; अर्धनारीनटेश्वर; इत्यादी म्हणजे मायोपाधित ब्रह्म तोच ईश्वर होय. प्रलयानंतर तो ब्रह्मात लय पावतो. ईश्वर सगुण तर ब्रह्म निर्गुण म्हणूनच ईश्वर सगुण निराकार आणि जीव सत्व, रज, तम या गुणांचे मिश्रण आहे पण एक येता दोन जाती ।


कोणताही पदार्थ दिसतो त्याला पाच अंगे असतात. अस्ति, भाति, प्रिय, नाम आणि रूप. अस्ति, भाति आणि प्रिय ही अर्थातच परब्रह्माची लक्षण आहेत, ते सत्, चित्, आनंद या स्वरूपात ! तर नाम आणि रूप हे मनुष्य प्राण्याचे आणि अचेतनाचं लक्षण आहे. जगात म्हणाल तर प्रत्येकात सत्त्व, रज, तम हे गुण असतातच. तसेच प्रत्येकाला नाम आणि रूप हे सुद्धा आहेत. वारा वाहतो, कधी जोरात, कधी मंद वाहतो. त्यामुळे वादळ निर्माण होते आणि विध्वंस होतात. हे रज, तम गुण होत. पाणी संथ वाहते, खळाळतेहि, पाण्याचा खरा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी, बांधकामासाठी, स्वच्छतेसाठी असा सगळा केला जातोच, पण जेव्हा ढगफुटी होते, महापूर येतो, समुद्रात लाटा उसळतात त्यावेळी प्राण्यांचा जीव सहज घेतला जातो. 

ही सारी सृष्टी आपण कधीपासून पाहतो ? अर्थात आपल्या जन्मापासून ! कधीपर्यंत पाहतो ? तर मृत्यूपर्यंत ! आपल्याही आधी अनेक लोकांनी जगत बघितले. त्या वेळेपासून आजपर्यंत अनेक बदल झाले, पुढे होत राहतील. बदल म्हणजेच विकार, तर विकार कोणाला असतात ? अर्थात माईक पदार्थांना ! सारे जग माईकच आहे, सगुण साकार आहे. अर्थात या सृष्टीला अधिष्ठान आहे भगवंताचे ! पण प्रलय काळी पंचभूते, गुणक्षोभिणी माया, ईश्वर परब्रह्मातच लय पावतात. 

मग माणसाच्या आयुष्याचे सार्थक कशात आहे ? तर ज्ञान प्राप्त करायचे, जीव ब्रह्मैक्य साधायचे. “ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान।पाहावें आपणासि आपण।” हे शब्दाने कळलं पण आता तद्रूप व्हायचंय, कारण “स्वरूपीं राहाणें हा स्वधर्म” म्हणूनच “मी कोण ऐसा हेत। धरून, पाहातां देहातीत। आवलोकितां नेमस्त। स्वरूपचि होये ।।” वास्तविक ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे आणि तेच आपल्यात आहे. जीव, शिव इत्यादी कल्पना आहेत; तसा भेद नाहीच. मानवी जीवनाचा हेतू जीव ब्रह्मैक्य आहे “मी तू पणाची बोळवण” करायची आहे. ती उपाधीचा निरास करून आत्मनिवेदनाने साधेल. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

3 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Language