जालें साधनाचें फळ

जालें साधनाचें फळ
रमेश देशपांडे
  • January 18, 2026
  • 1 min read

श्रीसमर्थांचे वाङ्मय अफाट आहे. एका जन्मात त्याचा अभ्यास होणे तर केवळ अशक्य आहे. दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ श्रीसमर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहेत. वीस दशक आणि दोनशे समासाचा श्रीमत् दासबोध तर अप्रतिम ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या अखेरच्या ओव्यांमध्ये एक महत्त्वाची ओवी येते. ग्रंथ किंवा समास वाचन झाल्यावर ज्या बारा ओव्या अखेरीस म्हणण्याची प्रथा आहे, त्यातील ही पहिलीच ओवी आहे.

“जालें साधनाचें फळ | संसार जाला सफळ |

निर्गुणब्रह्म तें निश्चळ  | अंतरीं बिंबलें ||२०–१०–२६||”

श्रीसमर्थांनी दासबोध ग्रंथाची फलश्रुती पहिल्याच दशकाच्या पहिल्या समासात सांगितली आहे. आणि या ओवीपासून श्रीसमर्थ आपल्याला काय काय मिळाले याची यादी या ठिकाणी देत आहेत. साधनेचे पूर्णत्व इथे सांगितले गेले आहे. ज्या कोणी श्रद्धेने आणि मनापासून हा ग्रंथ वाचला असेल त्याला याचा अनुभव निश्चित मिळेल. या आधीच्या २५ व्या ओवीमध्ये श्रवण, मननाने विवेक साधतो हे सांगितले आहे. श्रवण, मनन आणि स्वानुभव याद्वारे ज्ञानाचे विज्ञान होते, उन्मनी अवस्था प्राप्त होते. ज्याला उन्मनी अवस्था साधली त्याला साधनेचे फळ मिळाले. निश्चल व निर्गुण ब्रह्म त्याच्या अंतरंगात प्रतिबिंबित झाले. अंतःकरणात ब्रह्म बिंबणे हेच आत्मज्ञान होय. आत्मज्ञान प्राप्त करणे हेच माणसाचे ध्येय आहे.

आत्मज्ञान झाले की निर्गुण ब्रह्म निश्चळ अंतरी बिंबते. या ठिकाणी ब्रह्म निश्चळ आणि निर्गुण आहे असा अर्थ घेता येईल किंवा ब्रह्म निर्गुण आहे आणि अंतःकरण निश्चळ आहे असेही म्हणता येईल. त्या निश्चळ अंतःकरणात निर्गुण ब्रह्म बिंबले असाही अर्थ घेता येईल. ब्रह्म अंतःकरणात बिंबून आत्मज्ञान होणे हेच साधनेचे फळ आहे. इथे मायेचा निरास होतो. सारी तत्त्वे अशाश्वत आहेत हे पटलेले असते. साध्य पदरात पडून सारी साधना विराम पावते. दासबोध ग्रंथ म्हणजे काय असेल ? या ग्रंथाचे कर्तेपण श्रीसमर्थ स्वतःकडे मुळीच घेत नाहीत. श्रीसमर्थ म्हणतात,

“भक्ताचेनि साभिमाने  | कृपा केली दाशरथीने  |

समर्थ कृपेची वचने | तो हा दासबोध ||२०–१०–३०||”

श्रीसमर्थांनी साधना काळात आणि त्यानंतर देखील शास्त्र ग्रंथांचा आणि उपनिषद, रामायण, महाभारत, भागवत आदि ग्रंथांचा भरपूर अभ्यास केला होता. या साऱ्या ग्रंथांचे सार दासबोध ग्रंथात असल्याचे आढळून येते. हा ग्रंथ म्हणजे वेदांत संमतीचा काव्यसिंधू आहे. श्रीसमर्थ याच समासात म्हणतात,

“वीस दशके दोनीसें समास | साधकें पाहावें सावकाश  |

विवरतां विशेषा विशेष | कळों लागें || २०–१०–३२ ||”

श्रीसमर्थांचा खरा भर “विवरतां विशेषा विशेष” वर आहे. या ग्रंथाला जितके जास्त वेळा अभ्यासाल तितका गहन अर्थ सापडत जाईल. दासबोध हा केवळ पारायणाचा ग्रंथ नसून सखोल अभ्यासाचा ग्रंथ आहे. हा बासनात बांधून ठेवायचा ग्रंथ नाही, अभ्यास आणि त्यानुसार साधना अपेक्षित आहे.

साधना सुरू करण्यापूर्वी हा संसार सत्यच वाटत असतो. मनुष्य संसाररूपी मृगजळाच्या मागे ऊर  फाटेपर्यंत धावत असतो. भ्रमाच्या भोवर्‍यात तो वारंवार अडकत रहातो आणि त्याला योग्य वाट मात्र गवसत नाही. साधना पूर्ण होताच त्याचे मृगजळ रूपी हे स्वप्न संपुष्टात येते.

“स्वप्नी जें जें देखिलें | तें तें जागृतीस उडालें  |

सहजचि अनुर्वाच्य जालें | बोलता न यें ||२०–१०–२८||”

मनुष्याला सुरूवातीला मूळमायेपासून चार खाणीपर्यंत साऱ्या गोष्टी सत्य वाटतात, माणूस पूर्णपणे ऐहिक सुख-दुःखामध्ये अडकलेला असतो. साधना करता करता हे सारे विश्व भ्रामक आहे हे लक्षात येते आणि हा साधक मग साध्य गाठायच्या प्रयत्नाला लागतो. स्वप्नात बघितलेले सारे जाग येताच नाहीसे होते, तद्वतच मायेचा निरास झाला की या जगताचे मिथ्यत्व लक्षात येऊ लागते. हे स्वप्न बघणारा जीव, स्वप्न विसरतो आणि अनिर्वचनीय परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतो.

साधकाने मी देह आहे या भूमिकेतून साधना सुरू केली होती. श्रीसमर्थांचा हात धरून ग्रंथ वाचता वाचता एकोणीसावा दशक देखील संपला. अशाश्वत आणि अपूर्ण असे दृश्य बाजूला सारून आता वाटचाल पूर्ण झाली आहे. आणि मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाल्यामुळेच जीव समाधान पावला आहे. या विसाव्या दशकात शाश्वत आणि पूर्ण ब्रह्मवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन या जीवाला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. मला देव हवा ही इच्छा मनाशी धरून साधनेत एक एक पाऊल टाकत हा जीव पुढे गेला. मी कर्ता आहे, मी ते प्राप्त करून घेईन अशी आशा आणि जिद्द मनात होती. पण विसावा दशक येण्यापूर्वीच मी कर्ता नाही, तोच कर्ता आहे ही खात्री पटली. अंतरात्मा किंवा जगदीश्वर कर्ता आहे हे प्रस्तुत दशकात कळायला लागले. अज्ञान अवस्थेत दासबोध हाती घेतला आणि पहाता पहाता ज्ञान दशा प्राप्त झाली. अज्ञानाचे निरसन झाले. ज्ञानक्रिया पूर्ण होत ज्ञानाचे विज्ञान देखील झाले.

या विश्वात वस्तूचे दोन प्रकार आहेत. एक चंचळ आणि दुसरे निश्चळ. चंचळ अंतःकरण प्रथम स्थिर, निश्चळ होते आणि त्यात निश्चळ परब्रह्म बिंबल्यावर पूर्ण विश्रांती लाभते. परब्रह्म अपरंपारपणाने सर्वत्र भरलेले आहे. चंचळ दृश्य त्यावर झाकण घालते. खोल आणि सूक्ष्म विचाराने दृश्य बाजूस सारावे आणि निश्चळ परब्रह्माची भेट घ्यावी. ज्याप्रमाणे रिकामे आकाश चोहीकडे असते त्याचप्रमाणे चंचळ मूळमाया उत्पन्न होण्यापूर्वीच निर्गुण ब्रह्म निश्चळपणे असत असते. दृश्य विश्व आले आणि गेले तरी निश्चळ ब्रह्म जसेच्या तसेच साचलेले रहाते. ज्याप्रमाणे अवकाशमय आकाश सर्वत्र कोंदाटलेले असते, त्याच प्रमाणे परब्रह्म सर्वत्र साठलेले असते. परब्रह्माला ज्या बाजूने पहावे त्या बाजूने ते अपार असते. त्याचा अंत कोणत्याही बाजूला लागत नाही. परब्रह्म अगदी एकजिनसी आहे, स्वतंत्र आहे. त्याच्यावाचून दुसरे काहीही नाही. साधकाने विवेकाने ब्रह्मांडाच्या पलिकडे जावून तेथून ब्रह्मांड झालेच नाही अशी कल्पना करावी. केवळ अवकाशमय रिकामे आकाश पहावे. विश्वाला व्यापून असणारा चंचलपणा तेथे नाहीसा होईल, शून्यवत होईल. नित्यानित्याचा विवेक करून दृश्य नाहीसे करावे. मग सर्वत्र परब्रह्म भरून असल्याचा अनुभव येईल. पण या ब्रह्माची संपूर्ण कल्पना कोणालाही कधीच करता येणार नाही.

ग्रंथराज दासबोधाचा पहिला समास हा प्रस्तावनेचा आहे. याच समासात श्रीसमर्थांनी ग्रंथाची फलश्रुती दिलेली आहे. ग्रंथाच्या सुरूवातीलाच श्रीसमर्थ म्हणतात,

“ग्रंथानाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद  |

येथे बोलिला विशद | भक्तिमार्ग ||१–१–२||

नवविधा भक्ति आणी ज्ञान  | बोलिलें वैराग्याचे लक्षण |

बहुधा अध्यात्मनिरोपण | निरोपिले ||१–१–३||

भक्तिचेनि योगे देव | निश्चये पावती मानव |

ऐसा आहे अभिप्राव  | इये ग्रंथी ||१–१–४||”

ही फलश्रुतीच सांगते की दासबोध अभ्यास आणि त्या अनुषंगाने साधना केल्यास आत्मज्ञान नक्की प्राप्त होईल. श्रीसमर्थ आयुष्याच्या अखेरीस म्हणतात की,

“नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |

तेणे सायुज्यतेची वाट | गवसेल की ||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language