आजची स्त्री सर्व क्षेत्रात आघाडीवर दिसून येते. राजकारणातील तिचा सहभागही वाढलेला दिसून येतो. परंतु राष्ट्रोन्नतीच्या कार्यात भाग घेण्यास पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा अवसर ठेवला पाहिजे हा विचार श्रीसमर्थ रामदासस्वामींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी कृतीत आणला. आपल्या जंबूद्वीपात (भारतखंडात) गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, अरुंधती, अपाला, उभयाभारती, इ. सारख्या अनेक विदुषी होऊन गेल्या. पण काळाच्या ओघात स्त्रियांचीही विद्वत्ता झाकोळली गेली.
एका प्रतिकूल कालखंडात महात्मा फुले,सावित्रीबाई, भारतरत्न अण्णासाहेब कर्वे यांनी स्त्रीशिक्षणासाठी जे परिश्रम केले ते नि:संशय गौरवास्पदच आहेत. परंतु या कालखंडा पूर्वीही स्त्रीशिक्षणचा पुरस्कार झालेला दिसून येतो. परंतु त्यावर काळाचा पडदा पडल्यामुळे ते लक्षात येत नाही. स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते म्हणून ज्यांचे नाव घ्यावे लागेल ते म्हणजे श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचे.
भारतीय इतिहासाच्या एका अत्यंत भयावह कालखंडात स्त्रियांच्या उद्धाराचा श्रीसमर्थांनी केलेला विचार आणि कृती अधिक गौरवास्पद आहे. श्रीसमर्थांचा काळ म्हणजे भारतवर्षावरील यावनी आक्रमणाचा काळ. हे आक्रमण फक्त भौगोलिक नव्हते, तर ते आक्रमण समाजाच्या मनावर, बुद्धीवर आणि विचारांवर होते. समाज सत्त्वहीन झाला होता. समाजामध्ये अनेक अनिष्ट प्रकार होत होते. त्यात कठोरता, निंद्यता होती. बालविधवांची समस्या अत्यंत गंभीर होती. या बालविधवांना उठता–बसता अपमानाची वागणूक सहन करावी लागत होती. ज्या वयात विवाह म्हणजे काय, हेही माहित नाही, त्या वयात विधवा होण्याचे संकट त्यांच्यावर येत असे. गोठ्यातील जनावरांप्रमाणे त्यांचे हाल होत असत. अशा सर्व स्त्रियांना श्रीसमर्थांनी आपल्या संप्रदायात सामील करून त्यांना आत्मनिर्भर बनविले. त्यांच्यावर प्रेमळ पित्या प्रमाणे माया केली.रामायण, महाभारत, भागवत, गीता इत्यादींचे शिक्षण या अबलांना देऊन त्यांना सबला बनविण्यावर श्रीसमर्थांचा भर होता. यातील काही स्त्रियांना त्यांनी मठाधिपती बनविले. बाइयाबाई, अक्काबाई, अंबिकाबाई, द्वारकाबाई, मनाबाई, आपाबाई, सखाबाई, अंताबाई, कृष्णाबाई, इत्यादी अनेक स्त्रिया रामदासी संप्रदायात मानाचे स्थान मिळवून होत्या.
श्रीसमर्थ शिष्या वेण्णाबाईंनी दोनशेहून अधिक ग्रंथ लिहून काढले. त्या मिरज मठाच्या मठाधिपती होत्या.स्त्री–महंतां पैंकी कीर्तन करण्याचा अधिकार फक्त वेण्णाबाईंना होता. तेंव्हापासूनच स्त्री कीर्तनकार परंपरा सुरू झाली असावी. वेण्णाबाईंनी लिहिलेला “सीता–स्वयंवर” हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.अंबिकाबाई दोन मठांच्या मठाधिपतीही जबाबदारी सांभाळत होत्या. श्रीसमर्थशिष्या अक्काबाई यांनी श्रीसमर्थांच्या हयातीत चार दशके आणि निर्वाणा नंतर चार दशके सज्जनगड आणि चाफळच्या मंदिर–मठाची व्यवस्था उत्तम रीत्या पार पाडली. अक्का आणि वेण्णाबाई यांच्या शिवाय श्रीसमर्थांच्या अनुगृहीत स्त्री शिष्या व त्यांचा अनुग्रह घेतलेल्या अनेक स्त्रियाच नव्हे, तर पुरुषही होते. यावरून या स्त्रीशिष्यांचा अधिकार लक्षात येईल. याचे मोठे उदाहरण म्हणजे श्री समर्थ चरित्रकार ‘समर्थप्रताप‘कार गिरिधर हे होत. गिरीधर यांचीही ग्रंथसंपदा मोठी आहे. त्याची ओवी संख्या २४ हजारांवर आहे. अशा ग्रंथकाराला अनुग्रह देणाऱ्या बाइयाबाई व त्यांच्याही गुरू वेण्णाबाई यांचा पारमार्थिक अधिकार किती मोठा होता याची कल्पना करता येते.
स्त्री कितीही आत्मनिर्भर झाली तरी तिने आपल्या मनातील स्त्रीसुलभ वात्सल्य भावना जपलीच पाहिजे.जन्मापूर्वी आणि नंतर बाळाला पोषण देऊन वाढविण्याचे कार्य केवळ माताच करू शकते. आजच्या काळातील स्त्री हे काही अंशी विसरली आहे की काय असं चित्र सध्या समाजात दिसत आहे. जणू हे भविष्य जाणूनच की काय श्री समर्थ दास बोधात म्हणतात,
“प्रपंच विचारें पाहातां।हें सकळ जोडे न जोडे माता।
हें शरीर जयेकरितां।निर्माण जालें।।३–४–३८।।“
एकंदरीत प्रपंचाबद्दल विचार केला तर असे दिसून येते की, प्रपंचात सर्व काही मिळेल; पण या शरीराला (आपल्याला) जिने जन्म दिला ती आई मात्र (एकदा गेली की) पुन्हा मिळणार नाही.”
बाळकास वाढवी जननी।हें तों नव्हे पुरुषाचेनी।
उपाधी वाढे जयेचेनी।ते हे वनिता।।१७–२–२६।।
वीट नाहीं कंटाळा नाहीं।आलस्य नाहीं त्रास नाहीं।
इतुकी माया कोठेंचि नाहीं।मातेवेगळी।।१७–२–२७।।
नाना उपाधी वाढऊं जाणे।नाना मायेनें गोऊं जाणे।
नानाप्रीती लाऊं जाणे।नाना प्रपंचाची।।१७–२–२८।।“
वात्सल्य हा प्रेमाचा प्रकार असल्याने आई मुलाला सांभाळते. पुरुषाला ते जमत नाही. आई झालेल्या पत्नी मुळेच प्रपंचाचा विस्तार होतो. मातेला मूल सांभाळण्याचा वीट येत नाही. कंटाळा, आळस, त्रास यातील काहीच होत नाही. हे प्रेम आई शिवाय इतरत्र कोठेच दिसत नाही. स्त्रीला प्रपंचाचा व्याप कसा वाढवावा व सांभाळावा ते कळते. वात्सल्य, प्रेम, ओढ, कणव, इ. प्रकारे कुटुंबातील सर्वांना ती एकत्र ठेवते व सर्वांना प्रपंचा विषयी प्रेम निर्माण करते. उल्लेखनीय अशी गोष्ट म्हणजे ज्या काळात स्त्री म्हणजे परमार्थ मार्गातील धोंड समजली जात होती,
स्त्रियांचा तो संग नको नारायणा।काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या।
दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे।लावण्य ते खरे दुःखमूळ।।
असे सर्वच मानत होते, त्या काळात श्रीसमर्थ स्त्रियांबद्दल गौरवोद्गार काढतात. स्त्रियांविषयी एकही अनुद्गार समग्र श्रीसमर्थ वाङ्मयात दिसून येत नाही. उलट स्त्रीनिंदा करणाऱ्या वयोवृद्धलोकांना ते म्हणतात,
“बहुता दिसांच्या वयवृद्धमुला।
जनीं बायकांच्या गुणें जन्म जाला।
तये जननीच्या कुळा निंदितोसि।
वृथापृष्ट तूं मानवांमाजि होसी।।१।।“
वयोवृद्ध होऊनही तुला अजून अक्कल आली नाही. मुला प्रमाणेच तुझी बुद्धी अपरिपक्व आहे. ज्या स्त्रीमुळे तुला जन्म आला त्या जननीच्या कुळाला म्हणजे स्त्री–जातीला तू निंदितोस त्या अर्थी मनुष्यामध्ये तू वृथापुष्ट झालास. शरीर वाढले तरी विवेक वाढला नाही.”
जनी पाळिती सर्वनारी नराला।
तया निंदिती शुद्धि नाहीं खराला।।५।।“
पुरुषांना स्त्रियाच वाढवितात. त्यांची निंदा करणारे गाढव पुरुष शुद्धीवर नसतात. या ओव्यांवरून श्रीसमर्थांचा स्त्रीविषयक उदार दृष्टिकोन स्पष्ट होतो. भगवंताच्या उक्तीला अनुसरून स्त्रीला परमार्थ मार्गातील धोंड न समजता त्यांनाही भगवत्स्वरूपाच्या प्राप्तीचा अधिकार आहे असे ते मानत होते.
“स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्।।गीता९ – ३२।।“
।।जय जय रघुवीर समर्थ।।