हनुमंता रामदूता – भाग २

हनुमंता रामदूता – भाग २
डॉ. सदानंद चावरे
  • June 20, 2026
  • 1 min read

“माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले।

कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते।।१४।।

केशर रेखिलें भाळीं मुख सूहास्य चांगलें।

मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित।।१५।।

चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती।

कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू।।१६।।”

मुकुट दैदिप्यमान असा आहे. कोटी सूर्य चंद्राचे तेजही फिके पडेल असे हे अद्वितीय दर्शन श्रीसमर्थांनी शब्दबद्ध केले आहे. कानातील कुंडले दिव्य आहेत. मोत्यांची माळ गळ्यात रुळते आहे. भाल प्रदेश, केशरी टिळा सुशोभित करीत आहे. सुहास्य वदन, बोटात मुद्रिका म्हणजे अंगठ्या; हनुमानाचे रूप लोभस; दैदिप्यमान करीत आहेत. भक्ताची असते, तशी मृदू; कोमल; भावविभोर मनस्थिती आहे. हरीची भेट घ्यायची तळमळ असलेली ही अवस्था आहे. पायात वाळे, तोडर मोठा आवाज करत आहेत; असे हे अनुपम रूप आहे. दीनांचा कैवार घेणारा, त्यांचे रक्षण करणारा मारुती, हा मोक्षदाता आहे. हे दीन होणे म्हणजे भक्तीने लीन होणे आहे.

“स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो।

कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिया बळें।।१७।।”

त्याचे केवळ स्मरण मात्र, मोक्ष दायक आहे. म्हणजे प्रभावी आहे. त्याचा भुभूःकार ऐकून दैत्य घाबरतात,  हे लंका दहन प्रसंगी श्रीसमर्थांनी वर्णन करून सांगितले आहे. सज्जनांचा, सबळ आत्मविश्वासाने केलेला प्रतिकार; हा प्रभावी असतो असा विश्वास देणारे हे वर्णन आहे. सज्जनांनी ते बलपूर्वक केले पाहिजे. म्हणजे त्यासाठी शक्ती कमावली पाहिजे, आणि अन्यायाचा प्रतिकार करायला एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असा संदेश श्रीसमर्थ हनुमानाच्या शक्ती स्वरूपाचे वर्णन करून सांगत आहेत. अन्यायाचा प्रतिकार, नेटाने; बळाने; हिम्मत राखून करायला हवा; हा आदर्श ते आपल्या पुढे ठेवत आहेत. ते त्याकाळी जितके महत्त्वाचे होते, तितकेच आणि तसेच आजही महत्त्वाचे आहे.

“पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा।

सौमित्रप्राणदाताचि कापिकूळांत मंडणू।।१८।।

दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले।

सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनत्रयीं।।१९।।”

राक्षसांचा पाडाव, हा नेटाने म्हणजे प्रयत्न पूर्वक; चिकाटीने आणि शक्तीचा वापर करूनच करावा लागतो. त्यांना उचलून आपटलेच पाहिजे. हनुमानाचा पराक्रम आणि वेळेला आवश्यक असेल ते त्वरित करण्यामुळे, लक्ष्मण प्राण संकटातून वाचले. अहिरावण व महिरावण यांचे मायाजाल ओळखून ते जिथे होते तिथे जाऊन; हनुमानाने त्यांचा निप्पात केला. राम व लक्ष्मण यांना देवी समोर बळी जाण्यापासून वाचवले. दैत्य हे कुटील असतात व त्यांच्या कुटील नीतीचा त्रास अगदी अवतारांना सुद्धा होतो. अशा वेळी हनुमानाप्रमाणे बुद्धीमानतेत वरिष्ठ असलेल्या व कूट नीतीत तज्ञ असलेल्यांना सज्ज व्हावे लागते व जशास तसे सज्जड उत्तर त्वरित व त्वेषाने द्यावे लागते हा बोध घेण्यासारखा आहे. 


“विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी।

कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती।।२०।।”

मारुतीरायांचे ब्रीद कोणते ? तर भक्तांना मोक्ष मिळवून देणे, व हे रामाने नेमून दिलेले काम हनुमान युगानुयुगे करीत आहेत. त्यांच्या नावाचा भक्तीपूर्वक उच्चार हा कल्याणकारक आहे. भूत-पिशाच्चे म्हणजे अनिष्ट प्रवृत्ती दूर ठेवण्याचे कार्य, मारुतीची भक्ती सद्भक्तांसाठी घडवून आणते. भूत-पिशाच्चे, विंचू, साप; हे बाहेरून होणारे जे ताप आहेत; त्यांचे प्रतीक आहेत. त्यांचा प्रतिकार करायचा तर मन, मनगट आणि धैर्य मजबूत हवे. मारुतीरायांच्या कार्याचे स्मरण, हे शक्ती; स्फूर्तीदायक आहे. दुष्टांना सुष्टांची जरबच बसायला हवी. शिवाजी राजे, संभाजी राजे, धनाजी, संताजी, थोरले बाजीराव पेशवे आणि सुभाषचंद्र बोस, इ. यांच्या कार्यातून श्रीसमर्थांना अपेक्षित अशी जरब नक्की निर्माण झाली होती. या साऱ्यांवर मारुतीची कृपा असणारच.

“सर्पवृष्चिकपश्वादी विषशीतनिवारण।

आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो।।२१।।”


कृतांत काळ म्हणजे ज्याला बिलकुल दया माया नाही, असा काळ सुद्धा मारुतीसमोर चळचळा कापतो.


“संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्यनाशका।

ब्रह्मग्रहपिडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें।।२२।।”

संकट हे अचानक येते. त्याचे निवारण सावध राहून करता येते. आधी बल संपादन करून, बलाची उपासना करून होते. त्याकडे दुर्लक्ष करून होत नाही. जिथे लढा द्यायचा, तिथे तो द्यावाच लागतो. नाहीतर आपण सर्वनाश ओढवून घेतो, हा इतिहास आहे. याच कारणाने आपण परतंत्र बनतो, आपल्याच भूमीत बंधक बनतो हे आपण अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवे आहे. दु:ख आणि दारिद्र्य हे तर आपल्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे. मारुतीसारखे अत्यंत उद्योगी असावे, विचाराने नियोजनपूर्वक गोष्टी करीत गेल्यास कुठल्याही बाह्य संकटांपासून आपण आपले रक्षण करू शकतो, हा विश्वास आपल्या मनात मारुती उपासनेने जागवला जातो. ब्रह्महत्या हे महा पातक आहे, पण मारुती उपासना त्यापासून आपले रक्षण करते. याचा अर्थ मारुतीचा आदर्श ठेवला, विवेकाने काम केले, नीती-न्याय यांच्या मर्यादा सांभाळल्या, तर; हातून नंतर पश्चात्ताप होईल असे वर्तन घडणारच नाही. मारुतीने लंकेत जाळपोळ केली, पण त्याने मंदिरे आणि जिथे सज्जन होते; देव होते; सीतामाई होत्या त्या भागाला सुरक्षित ठेऊन कार्य केले. हा विवेकाचा अंकुश आपल्या बुद्धीला मारुती उपासनेमुळे प्राप्त होतो असा याचा अर्थ घ्यायला हवा. 

“पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू।

त्रिकाळीं अपठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं।।२३।।”

स्तोत्र त्रिकाळ म्हणावे असे श्रीसमर्थ म्हणतात. आपल्या विचारांना सतत आदर्शाचे स्मरण नाही राहिले, तर ते मन अतिशय चंचल असल्याने भरकटू शकते. मारुती उपासना त्याला सतत योग्य मार्गावर स्थिर रहायला सहाय्यक ठरते. याचीच तर अत्यंत आवश्यकता आहे आणि आपण ते करावे, अशी श्रीसमर्थांची इच्छा आहे. 

“परंतु पाहिजे भक्ती संधे काहीं धरूं नका।

रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं।।२४।।”

प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, जे जे इष्ट आहे, म्हणजे हितकारक आहे, ते ते सारे विवेकपूर्ण दृढ भक्तीने साध्य होते, हे मारुतीरायांनी आपल्या उदाहरणाने दाखवून दिले आहे. जी रामाची इच्छा, तीच मारुतीची कृती असे हे दिसते. रामाच्या भक्तीने हे सारे साध्य होते, हा विश्वास श्रीसमर्थ आपल्याला देत आहेत. श्रीसमर्थांना हनुमान हे नित्य दर्शन देत असत व त्यांच्या संकटात मदतीसाठी धावून येत असत. श्रीरामांनी अनुग्रह देतानाच, श्रीसमर्थांना सर्वतोपरी सांभाळावे, रक्षावे असे मारुतीरायांना सांगितले होते. त्यांच्यासारखी अनन्य भक्ती आपण ठेवली, तर हनुमान आपल्यालाही तसेच सहाय्य करतील अशी खात्री श्रीसमर्थ आपल्याला देत आहेत. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

संदर्भ – सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)

5 3 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Sanjay Joglekar
Sanjay Joglekar
1 month ago

मोजके आणि छान निरुपण केले आहे.

surekha mahajan
surekha mahajan
15 days ago

५व्या भिमरूपी स्तोत्राचे विवरण खूप छान आहे

Language