रामायणात श्रीराम-लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताजवळ सीतामातेच्या शोधासाठी येतात व त्यांची व हनुमंताची भेट होणे या क्षणापासून रामायणात हनुमंताचे महत्व प्रगट होते. ब्राह्मण वेशात हनुमंत श्रीरामांसमोर आले. स्वत:च्या मधुर बोलण्याने त्यांनी श्रीरामांबरोबर सख्यत्वाचे नाते जोडले व श्रीरामांनी त्यांचे गुण तात्काळ ओळखले. हनुमंत ब्रह्मज्ञानी, जितेंद्रिय, चारही वेदांचा अभ्यास केलेले, शास्त्रविचार जाणणारे, महायोगी आहेत. हनुमंताचे सूक्ष्म व विशाल रूप पाहून त्यांना अष्ट सिद्धि प्राप्त आहेत हे पण त्यांनी ओळखले.
बालपणीच हनुमंताला इंद्राच्या वज्रापासून अभय, सूर्याकडून उत्तम वक्ता म्हणून आशिर्वाद, यमाकडून, यमदंडापासून अभय, शंकराकडून भगवान शंकराच्या आयुधांपासून अभय, ब्रह्मदेवाकडून ब्रह्मास्त्रांपासून संरक्षण असे अनेक वर प्राप्त झाले पण त्याचा अहंकार हनुमंतामध्ये नव्हता.
चारही युगात हनुमंताचे प्रताप आहेत. सत्य युगात ते शिवरूपात पार्वतीला रामकथा सांगतात. व्दापार युगात अर्जुनाच्या रथावर बसून त्याचे रक्षण करतात त्रेतायुगात वानर रूपात श्रीरामाचे दास्यत्व करतात व आजच्या कलियुगात जिथे रामकथा, रामाच्या नामाचे संकीर्तन असते तेथे नतमस्तक होऊन श्रवण करतात.
हनुमंत चारही वेदांचा ज्ञाता, व्याकरणाच्या नऊ शाखांचा विद्वान, संस्कार संपन्न भाषा असलेला ज्ञान संपन्न व बलसंपन्न दास होता. अचूक निर्णय घेण्याची क्षमता, सूक्ष्म निरीक्षण शक्ती असल्यामुळे रामायणात अत्यंत अवघड कार्य त्यांनी सहजपणे पार पाडले. रामचरीत मानस म्हणते, “हनुमंताने रावणाला मान, भ्रम, वैर, मोह, मद व तमोगुण सोडून ईश्वराचे भजन, सीतेला परत करणे, श्रीरामांना शरण जाणे व श्रीराम कृपेला पात्र होण्याचा आग्रह केला. हनुमंताला मैनाक पर्वताचे काही काळ विश्रांती घेण्याचा आग्रह केला तो त्याने नम्रपणे नाकारला. श्रीराम कार्यात तत्पर राहाणे, अखंड कार्य करणे हीच त्याची विश्रांती होती. लक्ष्मणाच्या प्राणासाठी द्रोणागिरी आणण्यात हीच तत्परता आपल्याला दिसते.
समर्थ रामदास जांब सोडून टाकळीला आले. अंत:करणात प्रभू रामाचे आस्तित्व जाणवत नाही म्हणून दु:खी व निराश झाले, त्यांची व्यथा हनुमंताने ओळखली व मनाने त्यांच्याशी हितगुज केले. “रामकृपेसाठी साधना हवी. नाम साधना, सूर्योपासना, सूर्यनमस्कार, गायत्री जप, बलोपासना करायला हवी. विवेक, वैराग्य, या गुणांनी देहबुद्धीचा निरास करायला हवा. त्या पूर्ण पुरुषाची लक्षणे अभ्यासून अंगी बाणायला हवीत. निराश होऊ नको मी तुला सहाय्य करीन. दुष्टांच निर्दालन, सज्जनांच रक्षण करायला रामदासी पंथ भविष्यात तुला स्थापन करायचं आहे.
समर्थांनी अशीच साधना १२ वर्षे केली. श्रीरामायणाचे लेखन केले, हनुमंताच्या चरित्रापासून १)त्याचे शारीरिक बळ व ब्रह्मचर्य २)संकटाचे वेळी दाखवलेली निर्भयता ३)दुष्टांची कपटनीती ओळखण्याचे बुद्धीचातुर्य ४)श्रीराम चरणी समर्पित केलेले दास्यत्व हे चार गुण समर्थांनी आत्मसात केले.
समर्थांनी गोमयाचा मारुती टाकळीला साकारला ते महारुद्र स्वरूप टाकळीच्या ग्रामस्थांचे प्रेरणा स्थान होते. देशाटनात गावोगावी मारुतीची मंदिरे उभी केली. चाफळ परिसरातील ११ मारुति प्रसिद्धच आहेत. “आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तयावीण आमुचा परमार्थ, सिद्धि ते न पावे सर्वथा” या समर्थ वचनात समर्थांच्या पारमार्थिक प्रवासात हनुमंताचे सहाय्य व मार्गदर्शन किती महत्वाचे आहे हे कळते.
श्रीरामांनी हनुमंताला तू कोण आहेस? असे विचारले तेव्हा हनुमंत म्हणाला “देहा जे मी तुमचा दास आहे, जीवने मी तुमचं अंश आहे व आत्मरूपात तुम्ही व मी एकरूप आहोत” या तीन रूपांचे आपण अखंड चिंतन करू या समर्थ रामदासांनी तेच केले.
नांव मारूतीचे घ्यावे | पुढे पाऊल टाकावे |
अवघा मुहूर्त शकुन | हृदयी मारूतीचे ध्यान |
जिकडे जिकडे जाती भक्त |पाठी जय हनुमंत |
राम उपासना करी | मारुती वसे त्याचे घरी |
दास म्हणे ऐसे करा | सदा मारुती हृदयी धरा ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||