गुरूची महती

गुरूची महती
सौ. लता फडके
  • December 28, 2025
  • 1 min read

“पुस्तकज्ञानें निश्चये धरणें । तरी गुरु कासया करणें ।

याकारणें विवरणें । आपुल्या प्रत्ययें ।। १२-६-३० ।।”

अर्थ : “अनुभवाशिवाय जर केवळ पुस्तके वाचून परमात्मस्वरूपाचा निश्चय होत असता तर सद्गुरू करण्याची आवश्यकताच राहिली नसती. पुस्तकी ज्ञान हे लटके असते. त्यामुळे आधी स्वतः अनुभव घ्यावा, त्यावर सारासार विचार करावा.” 

आपला विवेक आपल्या प्रत्ययावर आधारित असावा, असं श्रीसमर्थ या ओवीतून सांगत आहेत. १२-६ या समासातील पहिल्या तीन ओव्यांमधून परब्रह्म कसे आहे याचे वर्णन श्रीसमर्थांनी केले आहे. ते निर्गुण, निर्मळ, शाश्वत, विमल असे आहे. त्याला जन्म-मरण नाही. शून्यातीत, मायातीत, निरंजन असे ते आहे. त्यातून संकल्प उठला व मूळमाया निर्माण झाली. त्याला षड्गुणेश्वर किंवा अर्धनारीनटेश्वर म्हणतात. त्यातून पुढे गुणमाया प्रसवली. सत्व, रज, तम हे तीन गुण निर्माण झाले. विष्णू म्हणजे सत्वगुण, तो सर्वांचा पालन कर्ता झाला. ब्रह्मा जाणीव नेणीव मिश्रित आपल्या कर्तृत्वाने त्रिभुवनांचा उत्पत्ती कर्ता झाला आणि पुढे संहारकर्त्या तमोगुणाचे कर्तेपण शंकराकडे आले. यातूनच पुढे पंचमहाभूते व्यक्त दशेला आली.

पुढे १२ ते १६ या ओव्यांमध्ये पंचमहाभूते कशी निर्माण झाली ते सांगितले आहे. आकाश म्हणजे अंतरात्मा. त्यात चळण झाले तो वायू. शीतल वायूपासून चंद्र, तारका निर्माण झाल्या आणि उष्ण वायूपासून अग्नी निर्माण झाला. शीत उष्ण दोन्ही मिळून तेज निर्माण झाले. त्या तेजापासून पाणी निर्माण झालं आणि या पाण्यापासून पृथ्वी म्हणजेच वनस्पती, औषधी, अन्न आणि ८४ लक्ष जीवयोनी निर्माण झाल्या.

आता अशा क्रमाने विश्वाची रचना झालेली आपण पाहिलं. याचा साधकाने प्रत्यक्ष अनुभव, प्रचिती पाहून मग त्याचा संहार कसा होतो तेही पहावं व अनुभवावं. यालाच सारासार विचार म्हणतात. संहाराच्या वेळी देखील ज्याच्यातून जे निर्माण झालं ते त्यातच पुन्हा विलीन झालेलं प्रत्ययाला येतं. शेवटी महाप्रलयाच्या वेळी सर्व विश्वाचा संहार होतो. 

विश्व अवतरताना आणि संहारताना शाश्वत, निरंजन ब्रह्म आरंभापासून अखेरपर्यंत जसेच्या तसे रहाते. उत्पत्ती, स्थिती आणि लय या सर्व गोष्टी उपाधीमय असतात; तात्पुरत्या असतात; भ्रमरुप असतात हे ओळखता आलं पाहिजे आणि शाश्वत ब्रह्माचे अनुसंधान राखता आलं पाहिजे. आणि हे साधण्यासाठी जो सूक्ष्म विवेक लागतो तो केवळ ग्रंथ वाचनाने, पुस्तकी ज्ञानाने करता येत नाही तर त्यासाठी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या सद्गुरूलाच अत्यंत तळमळीने शरण जाणे अत्यंत आवश्यक आहे. अंतरात्मा हा केवळ साक्षी आहे. त्याचा महिमा सगळे सांगतात. पण तो शुद्ध ब्रह्म नाही याचा प्रत्यय येण्यासाठी सर्वसाक्षिणी अवस्थेचा अनुभव घ्यावा लागतो. विश्वाच्या निर्मितीपासून ते संहारापर्यंत सर्व मायेचा प्रांत आहे. सर्व उपाधीरूप आहे. या उपाधींमध्ये जो गुंतून रहातो त्याला बाहेर काढणं महाकठीण आहे. सारासार विवेक विचाराच्या आधाराने, या गुंत्यातून बाहेर पडून प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्यालाच परब्रह्माची प्राप्ती होते.

अनेक ब्रह्मांडे निर्माण करणारी जी मूळमाया आहे, जी अपूर्ण आहे पण तिलाच विवेकहीन लोक पूर्णब्रह्म समजतात. ते मायेमध्येच अडकून रहातात. काही लोक इथेच वल्गना करत आपल्या जन्माचे नुकसान करून घेतात. स्वतःला मोठे म्हणवून घेणारे लोक या जगात पुष्कळ आहेत. परंतु विवेकी पुरुष खरा मोठा कोण हे बरोबर ओळखतात. अशा या टप्प्यावरती श्रीसमर्थ आपल्याला या तुर्येला ओलांडण्याचं साधन काय आहे ते १२-६-३० आणि ३१ या केवळ दोन ओव्यातून सांगतात. ती एकतीसावी ओवी पुढिलप्रमाणे –

“जो बहुतांच्या बोलें लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला।

एक साहेब नस्तां कोणाला । मुश्यारा मागावा ।। १२-६-३१ ।।”

अर्थ : “प्रत्येकाची मतं वेगवेगळी असल्यामुळे मत मतांतर ही असतातच.  त्यामुळे अनेकांच्या नादी लागतो तो आणखीनच गोंधळून जातो. ज्याला एकच एक मालक नाही, त्याने आपल्या कामाचा मोबदला मागावा तरी कोणाकडे ?”

आपण जे काम करणार आहोत त्या कामाचं स्वरूप तरी  काय आहे ? त्या कामाला लागणारा अवधी किती ? त्याचा मिळणारा मोबदला किती ? तसेच ज्याचं काम करतो आहोत तो मालक कोण आहे ? कसा आहे ? हे सर्व व्यवहारात पहावं लागतंच ना ?

आता आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करतो तेव्हा त्यासोबत मॅन्युअल दिलेलं असतं. तरीही त्यातील मार्गदर्शन करायला कोणीतरी लागतंच ना ? सीए, इंजिनियर्स यांना आर्टिकलशिप, इंटर्नशिप करावी लागतेच ना ? मग आपल्याला तर या मायेच्या जाळातून बाहेर पडायचं आहे, त्यासाठी योग्य विचार; योग्य धारणा; योग्य दिशा दाखवायला तसाच त्यातला ज्ञाता हवा ना? आपल्याला श्रीसमर्थांनी या समासात सृष्टीक्रम सांगितला आहे. या सृष्टीचा स्वामी म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक. या पदापर्यंत जायचं असेल तर त्याची किल्ली देखील सूक्ष्म आहे आणि ती म्हणजे गुरुकृपा.

तुर्येला ओलांडण्यासाठी करायला लागणारं सुंदर साधन, जिथे आपला अहम्; सूक्ष्मतम भावाने स्वाभाविक प्रवृत्ती घेऊन जिवंत आहे; त्याला नेमकं कशा पद्धतीने विलीन करायचं ते कुठलं पुस्तक शिकवणार ? प्रवचनातून कोण सांगू शकणार ? पुस्तकातील ज्ञानाच्या आधाराने कदाचित शब्द असतील, पण या शब्दांत लपलेला लक्ष्यांश गुरुची वाक्येच आपल्याला समजावून देतील.

दासबोध वाचताना देखील आपल्याला हा अनुभव येतो ना की गुरुकृपेने ओवी वाचताना प्रत्येक वेळी ओवीच्या आत दडलेलं रहस्य वरती येत असतं, उलगडत असतं. त्यातून विलक्षण ऊर्जा, आनंद मिळत असतो. सद्गुरुकृपेचं बोधांजन लक्ष्यांश लक्षात आणून देतं. त्यांच्या कृपेशिवाय हे शक्य नाही. हे जीवन घडवणारे, जीवनाचे परम ध्येय गाठून देणारे शास्त्र आहे. गुरूचरणी जाऊन त्यांच्या कृपाशीर्वादाने ग्रंथ वाचावा.

हे ज्ञान होण्यासाठी तेवढीच साधना, उपासना, सद्गुरू भेटणं, त्यांचा अनुग्रह मिळणं, त्यांचं मार्गदर्शन लाभणं, त्याचं आचरण होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता एकच गुरू, एकच ग्रंथ, एकच साधन हे सूत्र आहे. गुरू देहात असोत वा नसोत, ते चेतनेमध्ये असतात. तुमची तळमळ असेल तर ते कृपा करतात, मार्गदर्शन करतात. योग्य व्यक्ती, योग्य ग्रंथ, योग्य साहित्य, योग्य ते सर्व काही ते पुरवतात.

आपणासारिखे करिती तात्काळ” परिसस्पर्शाने लोखंडाचं सुवर्ण होतं पण लोखंडाला परिसपण येत नाही.  आईवडिल आपल्या मुलाला कसं जगावं ते शिकवतात, व्यवहारज्ञान शिकवतात पण सद्गुरूमाऊली मात्र आपल्या अनन्य शरणागत भक्ताला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवतात, मुक्त करतात. आपल्यासारखेच करतात.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language