वचनें बोलावी करुणेचीं | नाना प्रकारें स्तुतीचीं |
अंतरें निवती सकळांचीं | ऐसें वदावें || ४–७–२६||
सोबतची ओवी सांगते, “देवाच्या दासाचे बोलणे दयेने भरलेले असावे; दुसऱ्यांबद्दल चांगले बोलणारे असावे; ऐकणाऱ्यांचे मन सुखावेल; त्याचे अंत:करण समाधान पावेल असे असावे.” ही ओवी दशक ४ मधील सातव्या समासामध्ये दास्यभक्तीच्या निरुपणात येते. दास्य भक्तीमध्ये नम्रता आणि दुसऱ्यांना आनंद होईल अशी सेवा करणे हे मूलभूत तत्त्व असते. नम्रतेमध्ये मृदु भाषा आपोआपच येते. तिथे कुणी कठोरतेने बोलूच शकणार नाही. कठोर वचनात त्या व्यक्तिचा ताठा, अहंकार,गर्व किंवा अति आत्मविश्वासाचा वास डोकावेल. श्रीसमर्थांनी अन्य ठिकाणी म्हटलेच आहे की, “पेरलें तें उगवते | बोलण्यासारखे उत्तर येते | तरी कर्कश बोलावें तें | काय निमित्यें ||१२–१०–२६||” दास्य भक्तिमध्ये जर सेवाभाव जोपासायचा आहे तर कठोर वचनांना जागाच कुठे मिळणार ?
या दशकामध्ये श्रीसमर्थ नवविधा भक्तींच्या निरुपणात सातवी भक्ती दास्यभक्ती वर्णन करतात. यात श्रीसमर्थ भगवंताची आणि त्याच भावनेने सद्गुरूंची सेवा, कशाप्रकारे करता येईल याची सविस्तर यादी देऊन विवेचन करतात. अशाच प्रकारचा तपशील सत्वगुण लक्षण(द.२.६) तसेच अर्चनभक्ती (द.४. ५) मध्येही येतो. यासाठी श्रीसमर्थांच्या काळाचा विचार लक्षात घ्यायला हवा. त्याकाळी यावनी राजवटीत समाजाची दुर्दशा, भंगलेली तीर्थस्थाने आणि देवालये त्यांनी आपल्या भारत भ्रमणात पाहिली होती, अनुभवली होती. त्यामुळे समाज पुन्हा एकत्र येऊन खंबीरपणाने उभा रहाण्यासाठी देवालये आणि धार्मिक उत्सवांच्या जीर्णोद्धाराचा आग्रह ते पुन्हा पुन्हा धरतात. यासाठी दास्यभक्तीसारखी निरपेक्ष सेवा नाही, हेही ते जाणतात. त्यासाठी जे जे हवे ते ते तत्परतेने आणि आनंदाने करण्यासाठी आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा वा वैभावाचा यत्किंचितही विचार न करता लहानमोठी कामे सेवाभावाने करावीत असे या विवेचनात श्रीसमर्थ सांगतात. कुठलीही कामे अशी करावीत की अतिथी, साधकांची मने प्रसन्न व्हावीत. अर्थातच यासाठी आपली वाचा नम्र, मृदू व प्रेमळच असावी हे ओघानेच आले. श्रीसमर्थ म्हणतात की, “अंतरे निवती सकळांची | ऐसे वदावे ||”
श्रीगजानन महाराजांच्या शेगाव तीर्थक्षेत्रात पावलोपावली सेवक नम्रपणे उभे असतात. कुठेही साधा कागदाचा कपटा दिसू नये याची दक्षता घेतात. शिखांच्या गुरुद्वारांमध्ये कारसेवा म्हणून भाविकांच्या पादत्राणांची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी अनेक सुशिक्षित, उद्योगपती, श्रीमंत तत्पर असतात. सर्वांच्या मुखातून नम्र आणि मृदू भाषाच ऐकू येते. पक्षीेदेखील मंजूळ कुजन करून आपणास रिझवितात त्यात काहीच स्वार्थ नसतो. कोणी ऐकतोय की नाही याचे भानही त्यांना नसते. मृदू बोलणाऱ्याने देखील पलिकडचा कसा बोलतोय, कसा प्रतिसाद देतोय याची चिंता न करता आपली वाचा नम्र व प्रसन्न भावातच राहू द्यावी. हाच बोध आपण घ्यावयाचा आहे. “म्हणोनि दुसर्यास सुखी करावे | तेणे आपण सुखी व्हावें || १४– ६–२३||” असे श्रीसमर्थांचे वचनच आहे. निसर्गातील पक्षीही तेच करतात.
|| जय जय रघुवीर समर्थ ||