वैशिष्ट्य

उत्तम साधक घडविणे हेच ध्येय

ज्येष्ठ समर्थभक्त आणि भागवताचार्य अंबरनाथ येथील पू.अक्कास्वामी वेलणकर तथा आशालता चिंतामणराव वेलणकर यांनी १९८४ मध्ये दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. अक्का उपक्रमाच्या संयोजिकाच! १९८४ – १९९७ पर्यंत या उपक्रमाच्या सर्वेसर्वा पू.अक्काच होत्या. १९९७ – २०१२ पर्यंत ती. वसंतराव तथा तात्या गाडगीळ, नागपूर यांचेकडे पू.अक्कांनी उपक्रम सुपूर्द केला. २०१२ – २०१८ याकाळात पुण्याचे ती.सुहास आगरकर यांनी ही जबाबदारी सांभाळली. २०१८ पासून ही धुरा संचालक म्हणून नांदेडहून संभाजीनगर (औरंगाबाद) येथे स्थायिक झालेले डाॅ.श्री. विजय लाड यांचेकडे आहे आणि ही जबाबदारी ते समर्थपणे सांभाळत आहेत. पू. अक्कांनी योजून दिलेल्या शिस्तीबरहुकूम हा उपक्रम चालू असून यशस्वीपणे वाटचाल करत आहे.

तीन वर्षाचा प.दा.अ. हा अभ्यास झाल्यानंतर काय? या मागणीतून उपक्रमाची अभिनव कल्पना पू.अक्का वेलणकरांना सुचली आणि दासबोधातील प्रत्येक समासावर आधारित एक स्वाध्याय अशा २०० प्रश्नपत्रिका आक्कांनी तयार केल्या. दासबोधाच्या अभ्यासाबरोबर मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि समर्थचरित्र याची उत्तम सांगड अक्कांनी घातली आहे. याद्वारे उत्तम साधकाची जडण-घडण सहज होते हे पू.अक्कांचे शिक्षकी पेशातील कौशल्य होय!
समस्त समर्थ संप्रदायामध्ये हा उपक्रम आपली एक आगळी-वेगळी छबी घेउन उज्वल वाटचाल करत आहे.

या उपक्रमाची वैशिष्ट्ये

• सरसकट प्रवेश दिला जात नाही.
• प्रवेशासाठी कोणतेही प्रवेश मूल्य आकारले जात नाही.
• उपक्रम पूर्ण झाल्यानंतर गौरव पत्र मिळते.
• प्रवेश घेताना ठराविक वयोमर्यादेची अट आहे.

या उपक्रमात प्रवेशासाठी प.दा.अ. किंवा समर्थ विद्यापीठाची प्राज्ञ परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. परंतु जाहिरात करुन अभ्यासार्थी वाढविणे हे आमचे उद्दिष्ट नाहीच मुळी! पू.अक्कांनी घालून दिलेला हा दंडक आजही कायम आहे. उत्तम साधक होणे हाच या उपक्रमाचा प्रधान हेतू होय.

Language