ज्ञानाचा दीपोत्सव

ज्ञानाचा दीपोत्सव
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • November 22, 2025
  • 1 min read

दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिव्यांची ज्योत शुभ, कल्याण करणारी, धनसंपदा व आरोग्य देणारी, शत्रुबुद्धीचा नाश करणारी असते. दीपज्योत परब्रह्म स्वरूप असते. म्हणून पापाचा नाश करते. दिवा अज्ञानाचा अंध:कार नष्ट करतो. तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्याची ज्योत मंद प्रकाश देते म्हणून डोळ्यांना सुखकारक असते. एका दिव्याच्या ज्योतीने अनेक दिवे लावता येतात तसेच एक ज्ञानाचा दिवा अनेकांच्या अंत:करणात ज्ञानाचा दिवा प्रज्वलीत करू शकतो. समर्थ म्हणतात,

 

“तैसें ज्ञानें तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जनास सांगावें ।

तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ।। १२-१०-२ ।।”

 

दीपोत्सव आनंद, उल्हास, प्रकाश व प्रसन्नता देणारा उत्सव असून दिवाळीत धनलक्ष्मी, विष्णुपत्नी महालक्ष्मी, विद्येची देवता सरस्वती यांची पूजा आपण करतो. नरकासुरा सारख्या क्रूर दैत्याचा संहार श्रीकृष्णाने केला. म्हणून नरकचतुर्दशीला श्रीकृष्णाचे स्मरण करतो. लक्ष्मीपूजनाला व्यापारी लक्ष्मीचे पूजन करतात. हिशोबाच्या वह्यांचे पूजन करतात. लक्ष्मी चुकीच्या मार्गाने मिळवली तर दूराचाराकडे खेचते व कष्ट करून मिळवली तर हातून सदाचार होतो. बलिप्रतिपदेला आपण बळीराजाचे आत्मनिवेदन आठवतो. भाऊबीजेला स्त्रीकडे माता किंवा बहिणीच्या नात्याने पाहायला आपली संस्कृती शिकवते. दीपावली शुभ संकल्प करण्याचा दिवस आहे.

 

ज्ञानाचा दिवा साधकाच्या स्थूल देहाची शुद्धी करतो. समर्थांसारखे संत “सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती” असे असतात.  संत चरित्र श्रवणाने व नाम साधनेने देह शुद्ध होतो. संत तुकाराम म्हणतात “पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ” वाणी वर्तनाशी जोडलेली असावी म्हणजे सत्कर्म होते. ज्ञानाचा दिवा विकार, मोह, अहंता व अज्ञान नष्ट करतो. ज्ञानदेवांनी २१व्या वर्षी समाधी घेतली पण त्यांचे ज्ञान इतके व्यापक झाले की आज अनेक वर्ष त्यांच्या वाङ्मयरूपी ज्ञानाचा दिवा भक्तांना पांडुरंगाच्या चरणावर स्वशक्तीने नेतो.

 

“काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ।” या संत तुकारामांच्या  वचनाप्रमाणे ज्ञानाचा दिवा म्हणजेच नित्य आत्मस्वरुपाचा दिवा भक्तांच्या अंत:करणात आत्मज्ञान प्रज्वलीत करतो. हा दिवा अनित्य, अशाश्वत गोष्टी, काम; क्रोध; लोभ; मोहादी; षड्रिपू नष्ट करतो. अंत:करणात नित्यानित्य विवेक, सारासार विचार जागा होतो. समर्थ या विवेक वैराग्याला स्थिर स्वरूप देतात, अशा स्थिर विचारालाच धारणा म्हणतात. “देव माझा मी देवाचा” ही तुकोबांची धारणा होती. “शोभे सिंहासनी राम माझा” ही समर्थांची धारणा होती. दासबोधासारखा ग्रंथ अज्ञान नष्ट करतो ही निरंतर जागृती आहे.

 

ज्ञानाचा दिवा अंतरंग जागृतीही करतो. शांती, सख्य, वात्सल्य, दास्यत्व, माधुर्य या निष्ठा निर्माण करतो; संशय नष्ट करतो व भगवत प्रेमाचा दीप अंत:करणात सतत तेवत ठेवतो. संतांचे ज्ञान भक्ताला निरंतर सांभाळते. ते आत्मधनाचे दान लक्ष्मीपूजनाला भक्ताला देतात. आपणही आपला वेळ त्यांच्या चरणी अर्पण करावा आणि पुढील वर्षभर “रिकामा जाऊ नेदि एक क्षण” हे समर्थ वचन आठवावे. 

 

या वर्षी कोजागिरीच्या आधीपासूनच आपण ज्ञानाची दिवाळी साजरी केली. आपल्या संसाररूपी भवसागरात समर्थांचा ज्ञान दीपस्तंभ सतत सदाचाराचा मार्ग दाखवतो. हा अंतरीचा ज्ञानदीप भक्तीची प्रेरणा देतो, मिथ्याचा नाश करून सत्याची प्राप्ती करून देतो, अंध:काराचा नाश करून स्वयंप्रकाश देतो, मृत्यू पासून सोडवून आत्मस्वरुपात विलीन होण्याची शक्ति देतो. आनंद हे आपले खरे स्वरूप आहे. आत्मज्ञानाने कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहाणे ही कला आत्मसात करता येते आणि श्रीगुरु सेवा मनोभावाने, निरलसपणे करता येते.

 

Language