दासबोधाचा अभ्यास करतांना पहिल्या दशकात “नित्यविचार”, दुसर्या दशकात त्याग करण्यासाठी “अनित्य विचार”, तिसऱ्या दशकात “संसारातील दु:खाबद्दल वैराग्य”, चौथ्या दशकात “नवविधा भजन”, पाचव्या दशकात “सत्शिष्य, गुरुपदेश” व सहा ते आठ दशक देवशोधन ते देवदर्शन असे आहेत.
देवाची गरज सामान्यांना “इच्छापूर्ती”साठी वाटते. समर्थ म्हणतात, “आरंभींच म्हणती देव | म्हणिजे मला कांहीं देव | ऐसी वासना ||” संसारात सुख मिळत गेले तरी तृप्ती होत नाही, देहसुखासाठी धडपड केली तरी, खरं सुख मिळत नाही. तेव्हा खर्या देवाचा शोध सुरू होतो. दशक १८ स. ८-११ मध्ये समर्थ म्हणतात, “तो अंतर्देव चुकती | धांवा घेऊन तीर्था जाती | प्राणी बापुडे कष्टती | देवास नेणतां ||” “विचारें देव शोधावा”, सत्संगें देव सांपडला” या समर्थ वचनांमुळे देव शोधण्याचा मार्ग आपल्याला सापडतो.
खरा देव शोधण्यासाठी “मी म्हणजे देह व देहसुख हेच खरे सुख” व दिसणारी सृष्टी नित्य आहे, हे ममत्व या दोन्ही गोष्टी अंत:करणातून हद्दपार करून देहाने साधना करत सृष्टीतच रहावे लागते. कल्पना, मनोराज्य, भ्रम दूर करावे लागतात. असार बाजूला टाकून सार स्वीकारावे लागते.
या गोष्टींसाठी दशक ६ मध्ये वेगवेगळे समास आहेत. ब्रह्म व माया यांचे स्वरूप जाणून तुलना करावी व मायेला कसे दूर करावे याचे ज्ञानही यात मिळते. स्वत:मधील ‘आत्मस्वरूपी देव’ शोधण्यासाठी सगुणाचा आधार घेत निर्गुणापर्यंत प्रवास करावा लागतो. प्रतिमा, मूर्ती, माळ, ही आलंबने देहाला व मनाला शिस्त लावायला उपयोगी पडतात. ‘राम सावळा सुंदर | कासे मिरवी पितांबर’ किंवा ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ या रूपात मूर्ती पहावी. तिला कोमट पाण्याने स्नान, उत्तम तलम वस्त्रे, अलंकार, सुवासिक फुले वहावी. पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. गोविंद विडा द्यावा. आरती, कथा-कीर्तन करावे. या सगुण उपासनेने देवाचे रूप, गुण, पराक्रम आपल्या मनात रुजतात. संत तुकाराम म्हणतात, “बोलावा विठ्ठल | पहावा विठ्ठल | करावा विठ्ठल | जीवभाव ||” इथे जीवभाव होण्यासाठी निर्गुण उपासना करावी. देहबुद्धी क्षीण झाली; देहाहंकार गेला; ममत्व; आसक्ती; वासना नष्ट झाली; गुरुकृपा झाली की, ध्यानात आत्म्याचा अनुभव येतो. यालाच “निर्गुणब्रह्म तें निश्चळ | अंतरीं बिंबलें” असे म्हणतात. आत्मा, परमात्मा, परब्रह्म हाच खरा देव व “तो मी आहे” असा दृढ, अपरिवर्तनीय अनुभव येणे हेच आत्मनिवेदन होय. अशा साक्षात्कारानंतरही सगुण उपासना देहाला सक्षम ठेवण्यासाठी करावीच.
समर्थांनी पंचमीला तंजावरहून आलेल्या श्रीराम, लक्ष्मण, सीतामाईंच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली, या मुर्तींपुढे निर्याणाच्या अभंगांचे गायन केले व नवमीला त्यांचा अवतार समाप्त झाला. नऊ हा आकडा अद्वैत दर्शविणारा आहे. १० पासून दोन आकड्यांना म्हणजे द्वैताला सुरुवात होते. सज्जनगडावरील या सुरेख मुर्ती आजही प्रेरणा देतात. त्या भावात दर्शन घ्यावे. सगुण-निर्गुण विचार ६-६, ६-७, १०-७, १४-९, १७-१, १८-८, १६-९ या समासांमध्ये पाहायला मिळतो. “सगुणाचेनि आधारें | निर्गुण पाविजे निर्धारें | सारासारविचारें | संतसंगें |” या ओवीचे चिंतन करावे.
समर्थ देहाने अखंड लोककल्याणाचे कार्य करत व आतून स्वरूप स्थितीत रहात. हे स्वरूप नित्य, सुखरूप व आनंद रूप आहे. समर्थ आहे त्या परिस्थितीत आनंदी उत्साही रहात असत.
सारासार विवेकाने मी, माझे, देहसुख, संसारातील आसक्ती, ममत्व, मायावी जग यांचा त्याग करावा. शब्दाचे महत्व अर्थ कळेपर्यंत, अर्थाचे महत्व अनुभव येईपर्यंत व अनुभव आला की शब्द, अर्थ मागे पडतात व साक्षी अवस्था येते तीच “तुर्या” होय. देव शोधताना जागृती ते उन्मनी अवस्थेपर्यंत प्रवास व्हावा व नि:शब्द अवस्थेत एकरूप व्हावे. असा सहाव्या दशकाचा अभ्यास आपण करू या. या अभंगाचेही चिंतन सर्वजण करूया.
मुर्ती त्रैलोकीं संचली | दृष्टी विश्वासाची चुकली ||१||
भाग्य आले संतजन | जालें देवाचे दर्शन || धृ ||
देव जवळी अंतरी | भेटीं नाही जन्मवरी || २ ||
रामदासी योग जाला | देही देव प्रगटला || ३ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||