दासबोधातील नवविधा भक्ती

दासबोधातील नवविधा भक्ती
रीमा गुमास्ते
  • May 11, 2025
  • 1 min read

आम्हां तुम्हांसी भववारिधिमाजि तारू

जे वाचितां परिसितां मग होय तारू।

ते दासबोधरचना घडली जयाला

वंदूं निरंतर तया गुरुराज याला।।

–कवी रघुनाथ पंडित

        ग्रंथराज दासबोध, ज्याचे वाचन, मनन, चिंतन केले असता वाचकांसाठी तारकठरतोच, पण वाचणाराही इतरांसाठी तारकहोऊन जातो, अशा या ग्रंथाच्या रचनाकाराला म्हणजेचं श्री समर्थांना माझे त्रिवार वंदन!

         श्री समर्थ सांगतातश्रीमद्भागवत या धर्मग्रंथात, स्वतः भगवंताने प्रल्हाद मुखाने भक्तीचे नवविधा प्रकार सांगितले आहेत,

श्रवणं कीर्तनं विष्णोःस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।

  (स्कंध ७।५।२३) 

            प्रसिद्ध निरुपणकार व समर्थ भक्त रविंद्र पाठकजी म्हणतात की, दासबोधातील नवविधा भक्तीचा हा चौथा दशक म्हणजे दिवाळी सणाइतकाचं आनंद स्वरूप मांगल्याच्या प्रकाशाने आपले जीवन भरून टाकणारा दशक आहे.

        नारदांनी सांगितलेल्या भक्तीसूत्रात ते म्हणतात, ”सा तु अस्मिन परम प्रेम स्वरूपा, अमृत स्वरूपा। भगवंताविषयी प्रेम निर्माण होण्याचा पहिला मार्ग म्हणजे भगवंतांबद्दल सतत ऐकत राहणे. यालाच श्री समर्थ श्रवणभक्ती असे म्हणतात. श्रवणातून प्रेम जन्माला येते. श्रवण केल्यानेच मनुष्याला कुठल्याही विषयाचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. भगवंत जर सर्वत्र नटलेला आहे तर प्रत्येक कलेमध्ये आणि प्रत्येक विद्येमध्ये त्याचा आविष्कार पाहता आला पाहिजे, म्हणजेचं त्यातील ईश तत्वाचा शोध घेत आला पाहिजे. बहुश्रुत साधक असेल तर तो त्याच्या साधन मार्गावरचे अडथळे सहजी दूर करू शकतो. श्रवणभक्ती ही परीक्षित राजाप्रमाणे करावी असेही श्री समर्थ सांगतात. श्रवणापूर्वीचा मीव श्रवणानंतरचा मीयात आमूलाग्र परिवर्तन हवे. नुसते श्रवण पुरेसे नाही. आपण जे ऐकतो त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा आणि मग त्याच्या अनुभूतीची तळमळ लागायला हवी यालाच समर्थ मनन आणि निजध्यास म्हणतात. भांडे जसे रोज घासावे लागते तद्वतच चित्तशुद्धी साठी रोज श्रवण साधना हवी. पुढे समर्थ असेही सांगतात की विद्वान लोकांची अनुभवशून्य भाषणे ऐकण्यापेक्षा, गुरुमुखातून आलेल्या शब्दांचे श्रवण करावे. आपण स्वीकारलेल्या साधन पद्धतीला अनुकूल असे वाचन करावे म्हणजे साधनेला खोली प्राप्त होते. अध्यात्म श्रवण हे सर्वश्रेष्ठ होय असेही श्रीसमर्थ म्हणतात.

      साखरेशिवाय गोडीचे गोडपण, नाकाशिवाय नथीचे सौदर्य तसेच आत्मज्ञानावाचून निरूपण श्रवण व्यर्थ आहे. सगुण स्वरूपाची चरित्रे ऐकावी व निर्गुण स्वरूपाच्या अध्यात्म विचारांचा शोध घ्यावा, असे श्री समर्थ सांगतात.

        डोंगरे महाराज किर्तनाबद्दल म्हणतात की, ‘कीर्तनहा शब्द उलटा केला की नर्तकीहोते. आपल्या मनरूपी चंचल नर्तकीला स्थैर्य देणारी, आपलं अस्तित्व विसरावयास लावणारी भगवद्भक्ती म्हणजे कीर्तन! भगवंतांबद्दल सतत ऐकत राहिले, म्हणजे आपोआप भगवंतांबद्दल बोलत राहावेसे वाटते. याला कीर्तनभक्ती म्हणतात. विपुल श्रवणातूनच उत्तम वक्ता जन्माला येतो. सगुण आणि निर्गुण समन्वयाचे बंधन श्रवणाप्रमाणे कीर्तनात देखील आहे. कीर्तनकाराने पूर्वरंगात वेदांताच्या सिद्धांताचे निरूपण करावे तर उत्तर रंगात त्याला अनुलक्षून एखादे संतचरित्र, भगवत्चरित्र म्हणजेचं हरिकथा रंगवून सांगावी. शास्त्राला सोडून पदरचे काही सांगू नये, यांवरही श्री समर्थांचा कटाक्ष आहे. कीर्तन ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मनात विवेक, वैराग्य, साधनप्रीती,ईश्वर प्रीती निर्माण झाली पाहिजे. लोकांना मायेच्या बंधनातून बाहेर काढण्यासाठी कीर्तन भक्ती असली पाहिजे असे समर्थाना वाटते.

नाना नामे भगवंताची। नाना ध्याने सगुणाची। नाना कीर्तने कीर्तीची। अद्भुत करावी।।५।।

राग रंग रसाळ सुरंगें। रत अंतर संगित रागें। रत्नपरीक्षी रत्नामागें। धांवती लोक।।२७।।

(दशक-चौदा, समास-चार)

कीर्तनकार किंवा हरिदास कसा असावा याबद्दलही समर्थ सांगतात, की जर सोन्याला सुगंध येत असेल, तर त्या सोन्याच मोल किती बरं वाढेल? जर ऊसाच्या कांडीलाच फळे लागली तर ती किती बर गोड, रसाळ असतील. नाही का? याची अपूर्वता काही वेगळीच! तद्वतच जर एखादा कीर्तनकार किंवा हरिदास हा जर विरक्त असेल सर्व ज्ञानी, तसेच प्रेमळ भक्तही असेल, व्युत्पन्न असूनही वाद घालीत नसेल, नम्र असेल तर ही सुद्धा एक अपूर्वताच म्हणावी लागेल. आपण जीवनभर देहरूपी घरात राहतो पण या घराचा खरा धनी कोण हे शेवटपर्यंत जाणून घेत नाही. म्हणून मनुष्याने आपली सर्व इंद्रिये, स्वस्वरूपाकडे वळवली तर मनात भक्तीचा उदय होईल व कदाचित आत्मारामाचे दर्शन सुद्धा!

         श्रवणभक्ती व कीर्तन भक्ती ही दोन्ही बहिरंग साधनेचे प्रकार आहेत, तर तिसरी नामस्मरण भक्ती हा मात्र अंतरंग साधनेचा प्रकार आहे. श्रवणभक्तीचा परिणाम नामसाधनेत झाला पाहिजे. महाराष्ट्रातील सारेच संत एकमुखाने आणि एक मताने नामस्मरणाचा महिमा सांगतात, त्याचे समर्थन करतात.

मुखी नाम हाती मोक्ष। ऐसी साक्ष बहुतांची।। असे नाथ महाराज म्हणतात तर, “रामनामें वाट चाली। यज्ञ पावलोपावलीं।। रामनाम ग्रासोग्रासीं तो जेविलाचि उपवासी।।” असे तुकोबाराय म्हणतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, श्री समर्थ या साऱ्यांनीच हरिपाठाचे अभंग लिहिले आहेत. नामसाधनेचे वैशिष्ट्य म्हणजे नाम घेताना कर्माचा अथवा संसाराचा त्याग करावा लागत नाही. नामानुसंधानात राहूनही व्यक्तीला आपले सारे व्यवहार सांभाळता येतात. नामसाधना सर्व जातीच्या आणि वर्णाच्या लोकांसाठी खुली आहे हे सुद्धा श्री समर्थ आवर्जून सांगतात.  गोंदवलेकर महाराज म्हणतात, जसा उंबरठ्यावर लावलेला दिवा हा अंगणात व घरात दोन्हीकडे प्रकाश टाकतो तद्वतच, वैखरीच्या उंबरठ्यावर लावलेला भगवंतनामाचा दिवा, मनुष्याच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनात आनंदाचा प्रकाश भरून टाकतो.

          माणसाने एकट्याने प्रयत्न करून त्याला परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होणार नाही. यासाठी त्याला सद्गुरूंचा सहवास व सत्संग याची आवश्यकता भासते. अध्यात्म शास्त्र हे अत्यंत गूढ आहे तर परब्रह्म ही संकल्पना अतिसूक्ष्म. आत्मज्ञान प्राप्त झालेल्या सत्पुरुषाच्या सान्निध्यात राहून साधना करणे यालाच श्री समर्थ पादसेवनभक्ती असे म्हणतात. शास्त्रकारांनी  याचे माता लक्ष्मीहे उत्तम उदाहरण सांगितले आहे.

रमासेवी पादांबुजे जाण तैसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।     

देहबुद्धी चा संपूर्णपणे त्याग करून काया वाचा मनोभावे सद्गुरूंची सेवा करावी, त्यांनी दिलेला मंत्रजाप करावा, सतत भगवंताच्या अनुसंधानात राहावे. पक्षी आकाशमार्गाने जाताना किंवा मासा पाण्यातून धावताना जसा दिसत नाही तद्वतच अध्यात्म मार्ग हा अमूर्त आहे. पण संतांच्या सहवासात राहून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जाणे, त्यांचे अनुसरण करणे म्हणजे पादसेवनभक्तीहोय, असे समर्थ सांगतात.

पादसेवन चौथी भक्ती। पावन करितसे त्रिजगतीं। जयेकरितां सायुज्यमुक्ती। साधकास होये।।२५।।

(दशक ४,समास४)

          भावपूर्ण अंतःकरणाने भगवंताची पूजा करणे हा ईश्वर प्राप्तीचा अत्यंत साधा, सरळ व सुलभ मार्ग आहे. आपण एखादया धातूच्या मूर्तीची किंवा तसबिरीची पूजा करीत नसून प्रत्यक्ष भगवंतच तिथे आहेत असे समजून पूजा केली पाहिजे. पुढे श्री समर्थ असेही म्हणतात की आपल्या संप्रदायाचे जे तीर्थक्षेत्र आहे तिथे जाऊन षोडशोपचारे पूजा केली पाहिजे. समर्थ सांगतात, काया, वाचा, मन, चित्त, वित्त, जीव आणि प्राण या सात गोष्टींचे एकरूपत्व ज्याला साधले त्याची अर्चन भक्ती फळाला आली. श्री समर्थांची अर्चनभक्तीची कल्पना अतिशय व्यापक आहे आणि मंदिराची संकल्पना ही समाजाभिमुख आहे हेही लक्षात येते. मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ असे ते सांगतात. अनेक गोष्टी आपल्याला देवाला अर्पण कराव्याशा वाटतात पण काही कारणाने आपण त्या अर्पण करू शकत नाही. अशा वेळी मानसपूजा हा उत्तम मार्ग आहे. मनातल्या मनात आपल्या आवडत्या गोष्टीची धारणा करून त्या उपास्य दैवताला अर्पण करणे, भगवंताचा प्रत्यक्ष सहवास घडला नाही तरीही आपल्या मानसिक विश्वात त्याला सामावून घेणे म्हणजे मानसपूजा होय. यामध्ये भक्ताचा भाव अनन्य झाल्यास उपास्य देवतेचे प्रत्यक्ष दर्शन सुद्धा त्याला होऊ शकते. यासाठी आपल्या संत वाङ्मयात अनेक कथा सापडतात. संत नामदेवांच्या लहानपणची गोष्ट. विठ्ठलाने नैवेद्याची खीर खावी म्हणून त्याने बालहट्ट केला आणि विठ्ठलाने त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन ती खीर खाल्ली. भगवान रामकृष्ण देवीशी सतत बोलत. असे म्हणतात की तिने त्यांना प्रत्यक्ष दर्शनही  दिले होते. त्यांचे जीवन म्हणजे मानसपूजा कशी करावी याचे उत्तम उदाहरण आहे.

          भक्ती मध्ये लीनता किंवा नम्रपणा याला फार महत्त्व आहे. माऊली म्हणतात, “जगी धाकुटा होईजे। तया जवळीक माझी||” वंदनभक्ती हे त्याचेच प्रतीक आहे. ईश्वर प्राप्तीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार! म्हणून देव, साधुसंत, सज्जन, तापसी, योगी यांना वंदन केले पाहिजे असे श्री समर्थ सांगतात. समर्थ पुढे असेही म्हणतात,

पशुपती श्रीपती आणि गभस्ती। यांच्या दर्शने दोष जाती। तैसाचि नमावा मारुती। नित्यनेमे विशेष।।६।।

( दशक ४,समास ६)       

 भगवंताने विभूती योगात आपले विभिन्न आविष्कार सांगितले आहेत. त्याचाच पुरस्कार करताना समर्थ म्हणतात, आपण नमस्कार करताना गुणांची अभिव्यक्ती पाहून नमस्कार करतो, त्याच्या सद्गुणांद्वारे भगवंतच तिथे प्रकट होतो. वंदन भक्तीतील परमोच्च अवस्था म्हणून अक्रूराचे उदाहरण दिले जाते. दिव्यांच्या अभिव्यक्तीत त्याच्या मेगावेटनुसार जरी तरतम भाव असला तरी विजेमध्ये कुठेही तरतमभाव नाही. जो साधक अत्यंत भावपूर्णतेने नमस्कार करतो, त्याला सद्गुरू जेंव्हा प्रेमाने स्पर्श करतात, तेंव्हा शक्तीपाता प्रमाणे त्या साधकाचे रूपांतरण होते. म्हणून नाईलाजास्तव कधीच नमस्कार करू नये, तर मनापासून आणि श्रद्धापूर्वक करावा. आकाशातून पडलेले पाणी जसे समुद्रालाच जाऊन मिळते, तसेच सर्व देवांना केलेला नमस्कार हा शेवटी केशवालाच जाऊन पोचतो.

आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं | सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति।।

          भक्ती मध्ये भाव हा अतिशय महत्वाचा. मी दास आहे आणि भगवंत माझा धनी, हा झाला दास्यभाव! वंदनभक्ती मध्ये सुरू झालेली लीनता दास्य भक्तीमध्ये पूर्ण फळाला येते. तुकोबा म्हणतात,”तरीच जन्माला यावे। दास विठ्ठलाचे व्हावे।।” सर्वच संतांनी स्वतःला भगवंताचे दास म्हणवून घेण्यात धन्यता मानली. हनुमंत हा दास्य भावाचे प्रतीक मानला जातो. हनुमंत हा पराक्रमी तर आहेच पण तो बुद्धिमान पण आहे, ‘बुद्धिमतां वरिष्ठंआहे. म्हणजे दास हा निर्बुद्ध किंवा दुबळा असतो असे नव्हे. भाव हा तात्पुरता नसतो तर अखंड असतो. भावना तात्पुरती असू शकते, पण भाव हा अखंडचं असला पाहिजे. एकीकडे स्वतःला देवाचा दास म्हणवून घ्यायचे आणि दुसरीकडे लोकांशी उर्मटपणाने बोलायचे हा विरोधाभास झाला. म्हणून दासाने सदैव नम्रच असले पाहिजे. पावसाची वृष्टी होत असताना, आकाशातून पडलेली गार जशी थोड्याच वेळात पाण्यात परिवर्तित होते तसेच दास्य भक्तीमध्ये लीन झालेला दास हा कालांतराने स्वतः स्वामीचं बनून जातो. दास्य भावात कुठलेही काम श्रेष्ठ कनिष्ठ असे द्वैत मनात ठेवू नये. छत्रपती शिवाजी महाराज चाफळच्या रामनवमी उत्सवात भोजने झाल्यावर शेणगोळा फिरवित असत. स्वतः भगवान श्रीकृष्ण घोड्याना खरारा करीत असत, युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात त्यांनी पत्रावळी उचलल्याचे सर्वश्रुत आहेच. अनेकदा भक्तांचा भाव पाहून भगवंतच त्याचे दास्यत्व पत्करतो. एकनाथांच्या घरी पाणी भरणारा श्रीखंड्या आणि जनाबाईची लुगडी धुणारा पांडुरंग ही त्याची बोलकी उदाहरणे नव्हेत काय? म्हणूनचं समर्थ म्हणतात,

दास्य सख्य भक्तीमिसे। संतसंगे श्रवण होतसे। अर्थास जीवी धरिजे मानसे। या नाव श्रद्धा।।(२०-कुबडी४)

          सख्यभक्ती म्हणजे अहंकार विसर्जनाचा अंतिम टप्पा. अर्जुन हे सख्यभक्ती चे उत्तम उदाहरण. सख्यभक्ती मध्ये शरीरे दोन असली तरी मन एकच असते. भगवंत व भक्त असे द्वैत उरतच नाही. माझे सर्व जावो। तुझे सर्व राहो।।असे श्री समर्थ म्हणतात. ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याला जे आवडते तसे आपण करायचे आणि त्याला जे आवडत नाही त्या गोष्टी टाळायचा हेच सख्य भक्तीचे लक्षण आहे. आपली इच्छाच संपणे हेच खरे सख्य भक्तीचे रहस्य आहे.

म्हणूनच असे म्हणतात की,

जैसे जयाचे भजन। तैसाचि देव आपण। म्हणौन हे आवघें जाण। आपणाची पासीं ।१४।।(दशक ४, समास८)       

 आकाशात मेघ नाहीत म्हणून चातक पक्षी नदीचे पाणी प्यायला किंवा चंद्र उगवला नाही म्हणून चकोराने दुसरा आहार घेतला असे होणे शक्य नाही. भक्ती सूत्रात नारद मुनी सांगतात, ‘तद् विस्मरणे परम व्याकुलता। तदर्पित अखिल आचारिता।।असा भक्त हा आईच्या कडेवरील लहान मुलासारखा असतो. या लहान मुलांचे सारे काही आई करते तसेच या भक्ताचे सारे जीवन भगवंत चालवतो. त्याच्या जीवनाचे सारथ्य स्वतः भगवंत करतो.

          आत्मनिवेदन भक्तीचे दोन प्रकार समर्थ सांगतात. पहिला, आपली सारी सुखदुःखे भगवंताला सांगणे, तर भगवंतापेक्षा स्वतःचे वेगळे अस्तित्वच शिल्लक न ठेवणे हा दुसरा! इथे भक्तच भगवत्स्वरुप होऊन जातो. सख्यभक्ती हा नदी सागरात मिळण्याचा टप्पा असेल तर आत्मनिवेदन म्हणजे नदी प्रत्यक्ष सागरात विलीन होण्याचा टप्पा आहे. जसे समुद्रात विलीन झालेली नदी नंतर वेगळी दाखवणे शक्य नाही, तसेच ज्याने भगवंताला जाणले तो त्याच्यापासून वेगळा राहूच शकत नाही. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत जीव आणि शिव निराळे आहेत. जीव शिवात विलीन झाल्यावर जीव शिल्लक राहात नाही आणि जीवाचे अस्तित्वच नसल्याने शिव म्हणण्याचे प्रयोजन उरत नाही. आत्मनिवेदन ही ज्ञानाची अवस्था असून हे ज्ञान ग्रंथाच्या अध्ययनाने नव्हे तर नवविधा भक्तीच्या यात्रेने प्राप्त झाले आहे. आत्मनिवेदन म्हणजे भक्तीतून जन्मलेले ज्ञान होय. मिठाची बाहुली जशी समुद्राची खोली बघण्यास जाते आणि त्यातच विरघळून जाते, तसेच भगवंत भेटीसाठी अधीर झालेला जीव स्वरूपाचे ज्ञान होताच आत्मसमर्पणाने शिवमय होऊन जातो. “देव पाहण्यासि गेलो, देव होवोनिया ठेलो” अशी त्याची अवस्था होऊन जाते. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “गायीबरोबर वासरू आणि आईबरोबर तान्हे मूल जसे आपोआप येते तसेच भक्तीबरोबर ज्ञानही आपोआपच येते.” साधकाच्या मनात भक्तीची तन्मयता, व्याकुळता वाढली की , आत्मज्ञान होऊ लागते.

      म्हणूनच, तेजस्वी साधकाने आपल्या परमार्थाची वाटचाल श्रवण भक्तीपासून सुरू करावी, आणि अंती आत्मनिवेदन भक्तीद्वारे स्वानंदसुख अनुभवून, स्वस्वरूपात विलीन होऊन जावे म्हणजेच सायोज्यमुक्ती प्राप्त करावी असे महापुरुष (श्रीसमर्थ) आज्ञा करतात..!!

****************************

संदर्भ : १) सार्थ श्री दासबोध- ह. भ. प. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, सद्गुरू नारायण महाराज रामदासी संपादित, श्रीसमर्थ भक्त सुनीलजी चिंचोळकर लिखित, समास परिचय (सारांश)

२) दासबोधातील रहस्य: मारुतीबुवा रामदासी

३) दासबोध चिंतनसार: डॉ. विजय लाड

४) समर्थ भक्त निरूपणकार श्री रवींद्र पाठक यांचे ऑडिओ / सार लेखन लक्ष्मीकांत खांडके

****************************

Language