दासबोधात प्रतीत होणारी ईश्वर संकल्पना :- उगम विस्तार आणि विकास….

दासबोधात प्रतीत होणारी ईश्वर संकल्पना :- उगम विस्तार आणि विकास….
डॉ. सदानंद चावरे
  • June 8, 2025
  • 1 min read

सनातन धर्म, वैदिक हिंदू संस्कृतीत ईश्वर ही संकल्पना महत्वाची आहे. पूजनीय, चिंतनीय आहे. ईश्वर म्हणजे सृष्टी निर्माता, रक्षणकर्ता, संचालक आणि विनाशकर्ता अशी संकल्पना आहे. (ईश म्हणजे राज्य व नियंत्रण करणे + वर) विश्वाचा निर्माता, त्याचे आणि आपले सत्य स्वरूप काय ? त्या जग नियंत्याचा-विश्वाचा-माझा संबंध कसा आहे ? ही जिज्ञासा माणसाला आहे. तो कार्यकारण भाव समजून घ्यायचा आहे.ही संकल्पना ग्रंथराज दासबोधात निरनिराळ्या टप्प्यावर कशी विकसित होत गेली आहे हे पहाणे उद्बोधक ठरेल.

ईश्वराचे विस्मरण झाले म्हणून जन्म घ्यावा लागला. जीवाला मीपणा चिकटला. ज्यांनी ईश्वर समजून उमजून आपलासा केला ते भाविक निजसुखाचा स्वानंद सोहोळा उपभोगतात असे समर्थ सांगतात. ईश्वराची शक्ती म्हणजे माया. तिची निर्मिती म्हणजे हे दृश्य विश्व, जे प्रत्यक्ष दिसते. (माया हे अनादि असे| शक्ती ईश्वराची | ८-२-२९) आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण लागते म्हणून समर्थ इथे हा दाखला देत आहेत. परब्रह्माच्या ठिकाणी जे स्पंदन उठले त्याला, त्या ‘अस्तित्व’ जाणीवेलाच, ‘माया किंवा ईश्वर’ म्हटले गेले आहे (मायाब्रह्मीं जो समीर | त्यांत जाणता तो ईश्वर १०-४-१६). मूळ मायेत त्रिगुण सूक्ष्म अव्यक्त दशेत होते. पुढे त्या गुणांना व्यक्त स्वरूप आले. त्रिगुण भेदातून ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव उत्पन्न झाले. (तोचि ईश्वर गुणासी आला | त्याचा त्रिगुणभेद जाला |१०-४-१७). निर्माता, पालनकर्ता आणि विनाशकर्ता अशी ही कर्म विभागणी झाली. सृष्टी उत्पत्ती, स्थिती व लय ही व्यवस्था सुरु रहावी या परब्रह्माच्या इच्छेनुसार ही व्यवस्था झाली. त्रिगुणात्मक ईश्वरापासून ही पंचमहाभूतात्मक सृष्टी झाली. त्यातील तमोगुणापासून आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही तत्वे निर्माण झाली. या तत्वांच्या मिश्रणाने सारे दृश्य आकारास आले. (पंचीकरण) “वायोमध्यें जाणीव गुण | तेंचि ईश्वराचें लक्षण | तयापासून त्रिगुण | पुढें जाले || १०-९-११ ||”

वायू म्हणजे स्पंदन. वा-याची झुळूक. विद्युत लहर हे स्पंदनाचे परिचित असे शक्ती स्वरूप आहे. त्या शक्तीला स्वत:ची जाणीव नाही. तिचा वापर सृजनासाठी आणि विनाशासाठीही होउ शकतो. तो कसा व्हावा हे ठरवणारी ‘नियामक सत्ता’ म्हणजे ईश्वर. ही सत्ता अदृश्य आहे (ऐसा जो गुप्तेश्वर | त्यास म्हणावें ईश्वर |११-८-५). तिला ईश्वर म्हटले आहे. सृष्टीत जे जे वैविध्य दिसते ते सारे कोणाचे ऐश्वर्य आहे तर ते ईश्वराचे आहे. राज्याची सारी मालमत्ता, ऐश्वर्य राजाचे असते तसे. राजसत्ता त्याच्यात एकवटलेली असते. आपण राजाचे उदाहरण जरी घेतले तरी तो वेषधारी आहे, देहधारी आहे. त्याच्या सत्तेला सामर्थ्याला मर्यादा आहे. ईश्वराची सत्ता ही कितीतरी मोठी आहे. अमर्याद आहे हे लक्षात घ्यायचे आहे. (ईश्वराची बराबरी | कैसा करील वेषधारी |१२-७-२०) या सत्तेची विभागणी ध्यानात यावी म्हणून समर्थ सांगतात..

पिंडीं देहधर्ता जीव | ब्रह्मांडीं देहधर्ता शिव |

ईश्वरतनुचतुष्टये सर्व | ईश्वर धर्ता |(१३-१-२४)

शरीरात सत्ता आत्म्याची, ब्रह्मांडात म्हणजे विश्वात शिवात्मा हे चैतन्य तत्व आहे. विराट हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ माया यांना ‘ईश्वर तनु चतुष्टय’ म्हटले आहे. (पिंडाचे स्थूल; सूक्ष्म; कारण; महाकारण असे चार देह कल्पिले आहेत.) ब्रह्मांडाचे चार देह व त्यांना धारण (धर्ता) करणारा तो ईश्वर असा हा विचार समर्थ मांडतात. 

आत्ता पर्यंत आपण ब्रह्मा; विष्णू; महेश हे त्रिगुणात्मक ईश्वरी स्वरूप पाहिले. इथे समर्थ आणखी पुढे नेत त्रिगुणा ‘पर्ता’ म्हणजे या व्यक्त ईश्वरा पलीकडे जी सत्ता आहे, त्याकडे निर्देश करतात. अर्धनारी नटेश्वर, माया-ब्रह्म, शिव-शक्ती असेही त्या चैतन्याला म्हणतात. तिथून सृष्टीचा विस्तार झाला. “त्रिगुणापर्ता जो ईश्वर | अर्धनारीनटेश्वर | सकळ सृष्टीचा विस्तार | तेथून जाला ||१३-१-२५||”

निर्गुण निराकार परब्रह्म, त्यात ‘एकोSहम’ असे झालेले स्फुरण ही मूळ माया. ती परब्रह्मा इतकीच अव्यक्त आहे; पण परब्रह्माला नसलेली जाणीव मूळ मायेत आहे. मूळ माया त्या स्फुरणाला/संकल्पाला (मी एक आहे, बहु व्हावे) प्रत्यक्षात आणण्यासाठी शक्ती ‘कार्यान्वित’ करते. मूळ मायेत सूक्ष्म; सम असलेले गुण, व्यक्त दशेला येताना त्यांचा समतोल ढळतो. त्याला ‘गुणक्षोभिणी माया’ असे म्हटले आहे. त्रिगुण म्हणजे सत्व-रज-तम व्यक्त दशेत आले की त्यांना आपण सगुण साकार रूपात  ब्रह्मा-विष्णू-महेश या स्वरूपात जाणतो. आपण ‘सगुण’ आहोत, म्हणून आपण तशी ‘कल्पना’ करतो हे समर्थ सांगतात. 

मी तूं हा भ्रम | उपासनाहि भ्रम |

ईश्वरभाव हाहि भ्रम | निश्चयेंसी || १०-६-११ ||

समर्थ आपल्याला कोणत्याही संकल्पानेबाबत ‘जरासाही’ भ्रम बाळगू देत नाहीत. ज्याची ज्याची कल्पना करतो ते सारे मायिक !! असे समर्थ सांगतात. त्या पर्ता तो ‘खरा’ ईश्वर, ‘थोरला देव’.ईश्वर आपली सत्ता कशी राबवतो ? 

ईश्वरी गुण असलेले ‘अवतार’ उत्पन्न करून ईश्वर हे कार्य अव्याहत चालवतो. उदाहरणार्थ – समर्थांचे उपास्य दैवत म्हणजे हनुमंत. (हनुमंत ईश्वरी अवतार | याचा पुरुषार्थ सुरवर |  पाहातचि राहिले || १६-६-२९) रामांचा बहिस्थ प्राण म्हणून त्याने राम लक्ष्मण यांचे संकटात रक्षण केले. रावणासारख्या खल पुरुषाचे सैन्य-पुत्र-बंधू यांच्यासहित विनाश करण्यात हनुमंताने ‘अतुलनीय’ योगदान दिले. हे ईश्वरी शक्तीचे विराट प्रदर्शन होते. ईश्वराचे अस्तित्व, महानत्व आपल्याला अशा प्रसंगातून व उदाहरणातून जाणवते. रावणाने सर्व देवांना बंदी बनवून ठेवले होते. त्यांना हलकी कामे दिली होती. हनुमानाच्या विराट पराक्रमामुळे सर्व देव सुखावले. ज्यांनी ज्यांनी धर्म स्थापनेसारखे उदात्त कार्य हाती घेतले आणि तडीस नेले, त्यानां सुद्धा ईश्वरी अवतार मानले जाते. (श्रीराम, कृष्ण, शिवाजे राजे)

“यदा यदा हि धर्मस्य…” या भगवंताच्या वचनानुसार हे ईश्वरी अवतार होत असतात.  (धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार || १८-६-२०) जे जे धर्म स्थापना करतात, उत्तम गुणांचे चाहते असतात व अनेक गुण धारण करून असतात, विवेकी असतात; पुण्यवान असतात ते ‘ईश्वरी कृपेस’ पात्र झालेले असतात. ते आपल्यासाठी ‘ईश्वर स्वरूपच’ असतात असे समर्थ सांगतात. 

सकळ करणें ईश्वराला | म्हणोनी भेद निर्माण केला |

ऊर्धमुख होतां भेदाला | ठाव कैंचा |(२०-८-१६)

हेतू – ईश्वराला ही सकळ सृष्टी रचायची होती व ती सुविहित चालावी म्हणून एवढे भेद, एवढी विविधता त्याने निर्माण केली. मूळ स्वरूपापाशी कसलाच भेद नाही. प्रकृतीपुरुष, शिवशक्ती आणि शड्गुणईश्वर हे सारे मूलत: एकच आहे. हे ऐक्य आपण समजून घेतले की काही भ्रम रहात नाही. तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे | शिवशक्ती वोळखिजे | शड्गुणईश्वर बोलिजे | तया कर्दमासी || २०-९-२६ ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language