राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांनी माघ वद्य नवमी या तिथीला सज्जनगडावर देह ठेवला. महाबळेश्वर मठाचे अनंतकवी लिहून ठेवतात,
सोळाशेवरी तीन दुर्मती पहा संवत्सरा अंतरी |
माध्यान्ही शुभ माघ वद्य नवमी त्या मंद वारांतरी|
रामी आत्मनिवेदनी करी वपु सत्कीर्तीची हे ध्वजा |
स्वानंदे सुसमाधी सज्जनगडी श्री रामदासा भजा ||
त्यालाच आपण दासनवमी असे म्हणतो. संतांचे निजधामी जाणे म्हणजे पुण्य पर्वाचा सोहळा असे संप्रदायातील साधकांनी मानले पाहिजे. त्याचे कारण म्हणजे असे अवतारी पुरुष विशेष कार्यासाठी पृथ्वीतलावर जन्माला येतात. समर्थ प्रताप या ग्रंथांमध्ये गिरीधर स्वामी असे वर्णन करतात
समर्थांशी शिष्य पुसती निर्धारे|
संत साधु ब्रह्मरूप केवी अवतारे |
अरे अवतार धरीजे सर्वेश्वरे|
माया पूर्वपक्ष निरासावया || “
यावरून आपल्याला संताच्या जन्माचे रहस्य समजेल. समर्थ हृदय नानासाहेब देव यांनी तीन शब्दांमध्ये समर्थांचे बृहत चरित्र समास रूपाने वर्णन केले आहे, ते म्हणजे “तप, व्याप आणि त्याग”. पू. अक्कास्वामी वेलणकर यांनी ४० वर्षांपूर्वी बिजारोपण केलेला दासबोध सखोल अभ्यास परिवार याच तीन शब्दांभोवती आणि रामदास स्वामींनी निर्याणाच्या वेळी केलेल्या उपदेशाप्रमाणे कार्यरत आहे. ग्रंथराज दासबोध , समर्थ रामदास स्वामींचे चरित्र , मनाचे श्लोक आणि गीता या चतु:सूत्रीवर मार्गक्रमण करीत साधनेतील उत्कटता अंगी बाणवण्याचा प्रयत्न दासबोध सखोल अभ्यास करतो आहे. करारी शिस्तीचे पालन, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास आणि दातृत्व संपन्नतेचा अलौकिक सेवाभाव साधकांच्या ठाई व्यवच्छेदक लक्षण म्हणून प्रसिद्ध झाला आहे. समर्थ आज्ञा झाली बरवी | श्रीराम कथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी ||” या आदेशाप्रमाणे अयोध्या मठात परिवारातर्फे दासबोध पारायण करण्यात आले. श्रीरामाचे सगुण लीला संकीर्तन करण्यासाठी श्रीरामकथेचे आयोजन साधक करीत आहेत.
धन्य तू गा रघोत्तमा |कोण ते द्यावी उपमा |
सुखाचिया सुखधामा | मी काय जाणे महिमा ||
सोडविले ब्रह्मादिक | तू रे त्रैलोक्य नायक |
दास म्हणे तुझे रंक | सांभाळी आपले लोक ||
समर्थांनी “आधी केले, मग सांगितले” या उक्ती प्रमाणे आपले जीवन दीपस्तंभा प्रमाणे समाजासमोर ठेवले. दासबोधामध्ये ते सांगतात,
धन्य धन्य हा नरदेहो| याची अपूर्वता पाहो |
जो जो की जे परमार्थ लाहो| तो तो पावे सिद्धीते ||“
तर श्री समर्थ प्रतापकार लिहितात,
समर्थे श्रीराम काजी दिव्य देह समर्पिले |
श्री रामदास्य श्री गुरुरूपे केले |
आधी केले मग सांगितले | दासबोध ग्रंथार्थे ||
याच मार्गावरून दासबोध सखोल अभ्यास परिवार ब्रह्मांडाचे फळ असे मिळालेला दुर्लभ नरदेह त्याला हरी भजनी लावून समाजाचे संघटन आणि ज्ञानाचा प्रसार, प्रचार करतो आहे. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे ” नरदेहाचेनी साधने|सच्चिदानंद पदवी घेणे | ऐसा अधिकार “नारायणे”| कृपावलोकने दिला असे ||” याची प्रचिती परिवारातील सदस्य घेत असतात. सोळाशे तीनच्या चैत्र वद्यात श्री कल्याण स्वामींनी वीस दशकी दासबोध पुरा करून समर्थांना दाखवण्यासाठी आणला. रामदास स्वामींनी हा ग्रंथ पाहून १२_१० मध्ये एक ओवी समाविष्ट केली,
आमची प्रतिज्ञा ऐसी | काही न मागावे शिष्यासी |
आपणामागे जगदीशासी | भजत जावे ||
ही श्रीसमर्थांची शेवटची आज्ञा दासबोध सखोल अभ्यास परिवार उरी शिरी बाळगतो आहे.
फ्रेंच विचारवंत रुसोने १८ व्या शतकात सामाजिक करारातून राज्य निर्मिती व्हावी हा विचार मांडला. समर्थ रामदास स्वामींनी सोळाव्या शतकात सामूहिक सत्संकल्प हेच राज्याचे अधिष्ठान आहे आणि लोककल्याण हे त्याचे मुख्य कार्य आहे ही संकल्पना हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरली. समर्थांनी हा विषय आपल्या विशेष शैलीमध्ये तपशीलाने मांडलाच पण समाज संघटनेचा स्वतंत्र उद्योगही केला.
श्री रविकिरण साने यांनी आपल्या “आधुनिक राष्ट्रवादाचे उद्गाते समर्थ रामदास या ग्रंथांमध्ये हा विषय साकल्याने मांडला आहे. ते म्हणतात, महाभारतानंतर एवढ्या आग्रहपूर्वक बुद्धीयोग, अभ्यास योग फक्त समर्थांनीच पुरस्कारला आहे. म्हणून ते या दोन्ही योगाचे श्रेष्ठ प्रणेते ठरतात. क्षमतेनुसार काम हा व्यावसायिक बाणा समर्थांनी संघटनेत उत्पन्न केला.
आज दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या परिवारात वेगवेगळ्या क्षेत्रातले स्त्री, पुरुष साधक समर्थांना अभिप्रेत असलेल्या महंताप्रमाणे ब्लॉग लिहिणे, ग्रंथलेखन, समर्थांच्या पद्यांना संगीताची जोड देणे, व्याख्याने, प्रवचने, संकेतस्थळ आणि त्यावरील शब्द शोध सारखी अद्भुत कार्ये अशा अनेक आयमांवर कार्यरत आहेत ही समर्थ कृपाच होय. या व्यापामुळे समर्थ वांग्मय विश्वातल्या पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये पोचले आहे. समर्थांनी घालून दिलेला ” सामाजिक विषमतेला नकार पण विविधतेचा साधन म्हणून उपयोग ” या आदर्श पंथाचा वापर आज हा परिवार करीत आहे.
भारतीय ग्राहक चळवळीची मुळाक्षरे देशाला देणारे ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी एका ग्रंथात म्हणतात, ” रामदासांचा विचार दैववादी नाही. प्रयत्न, अफाट प्रयत्न आणि त्यासाठी चळवळ , मात्र त्या चळवळीला धर्माचे अधिष्ठान आणि पारदर्शक व्यवहाराचे आचरण तसेच ’ मी नाही रामकर्ता ’ ही साधकाची भूमिका दासबोध सखोल अभ्यास परिवारात जागोजागी दिसून येते. एक्केहळी मठाचे, श्रीरामदास पंथ क्रमसार या ग्रंथाचे कर्ते श्री आत्माराम महाराज यांच्या वचनाप्रमाणे
“समाधी पादुका की प्रसादाते | प्रत्यक्ष गुरु चि मानिजे त्याते ||“
समर्थ संप्रदायातील इतिहासात पहिल्यांदा दासबोध सखोल अभ्यास परिवारातर्फे समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यपर्वकाळात एक अद्भुत आणि अलौकिक प्रसंग घडला. श्री रामदास स्वामी स्थापित महाबळेश्वर मठातील समर्थांच्या चरण पादुका, कुबडी आणि तुंबा या सद्गुरु रूपात असलेल्या दुर्मिळ वस्तू सध्याचे मठपती आदरणीय श्री दिवाकर देशपांडे गोसावी यांनी पुण्यातील किवळे येथे आणल्या. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पहाटे काकड आरती, मनाच्या श्लोकांची प्रभात फेरी, भजन, प्रवचन, ग्रंथ प्रकाशन, कीर्तन आणि शेजारती असा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला.
500 पेक्षा जास्त धर्मप्रेमी भक्तांनी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले. महाबळेश्वर मठासाठी एक लाख ऐंशी हजार एवढा निधी जमा झाला. अत्यंत देखणा आणि भव्य दिव्य असा हा सोहळा दासबोध सखोल अभ्यास परिवारासाठी परिवाराच्या कारकिर्दीत एक मानाचा तुरा म्हणून शोभून दिसेल .
श्री समर्थ रामदास स्वामींच्या सेवेच्या एक अनोखा प्रसंग यानिमित्ताने समाजाच्या पुढे उभा राहिला .
|| जय जय रघुवीर समर्थ ||