चिंतामणीची विशेषता ही की, तो ज्याच्या जवळ असेल तो चिंतामणीच्या सहाय्याने इच्छिलेली प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकतो. श्रीसमर्थांच्या दासबोधातील पाचवा दशक हा मुमुक्षुसाठी जणू चिंतामणीच आहे. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा. पाचव्या दशकाची रचना मुमुक्षुला परिपूर्णता यावी या उद्देशानेच केली आहे. पहिल्या दोन समासात गुरू व सद्गुरू यातील फरक सांगितला आहे. जीवनातील विविध शास्त्रांचे, तंत्रांचे, यंत्रांचे ज्ञान देणारे ते गुरु ! मात्र जे भगवंताचे ज्ञान करून देतात ते सद्गुरू. सद्गुरूंवाचून परमार्थ साधन नाही.
सद्गुरू वाचून सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।
सद्गुरूंना शरण जाणे, हाच मुमुक्षुसाठी तरणोपाय आहे. सद्गुरू समजण्यासाठी त्यांची लक्षणे सांगतात,
“मुख्य सद्गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।
निश्चयाचें समाधान । स्वरूपस्थिती ।। ५-२-४५ ।।
याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ ।
विशेष आचारें निर्मळ । स्वधर्मविषई ।। ५-२-४६ ।।”
हे गुणविशेष ज्याच्यात आहेत तेच सद्गुरू असे मुमुक्षुने लक्षात घ्यावे व उत्तम शिष्य बनून सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे आचरण करावे. परमार्थ मार्गात सद्गुरू व सत्शिष्य या खरंतर परस्परावलंबी जोड्या आहेत. जसे जमीन सुपीक असेल आणि पेरलेले बी देखील उत्तम असेल तरच उत्तम पीक येते. तसे गुरू मुखातून अध्यात्म शास्त्रातील विविध संकल्पना नीट समजाउन घेणारा मुमुक्षुच त्यांच्या उपदेशाप्रमाणे उत्तम साधना करील. त्यासाठी मुमुक्षुने नित्य सावध असलेच पाहिजे. त्याने आळसाला जराही थारा देता कामा नये.
अनंत जन्मांचे सुकृत पाठीशी असेल तर सद्गुरू-सत्शिष्याची जोडी जमण्याचा सुयोग जुळून येतो. सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने सत्शिष्य आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. एकदा का आत्मानुभुती व त्याने मिळणाऱ्या आत्मसुखाची गोडी त्याला लागली की, त्या अवीट सुखापासून दूर होण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवणार नाही. सदगुरूंनी सत्शिष्याला समजाविले आहे,
“ऐक शिष्या येथीचे वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म ।। ५-६-४५ ।।
पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ।। ५-६-१ ।।”
आपल्या मधील जो ‘खरा मी’ आहे ते आपले खरे स्वस्वरूप. तो खरा मी आत्मरूपच आहे, ब्रह्मरूपच आहे. ते स्वरूप कायम टिकणारे आहे. श्रीसमर्थ समजावितात,
“आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ ।
जें आदिअंतीं स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ।। ५-६-१५ ।।
जेथून हें सर्व ही प्रगटे । आणी सकळ ही जेथें आटे ।
तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ।। ५-६-१६ ।।”
खरा ‘मी’ आत्मस्वरूप आहे. म्हणून स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चार देहाहून मी वेगळा आहे, हे एकदा कळले की सारा देहाभिमान गळून जातो. हे मनात बिंबविण्यासाठी मुमुक्षुने एकांतात बसावे. श्रवण, मनन व चिंतनाच्या अभ्यासातून हा परम अर्थ दृढ होतो. मग ज्ञानाचा प्रकाश अंतर्यामी फांकतो व अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. हे आत्मबुद्धीचे ज्ञान मायेच्या पलीकडील असल्याने ते निश्चित व संशयरहित असते. त्याने संपूर्ण समाधान मिळते. एकदा हे समाधान लाभले की, काही भोगायची इच्छा बाकी रहात नाही आणि काही मागायचेही मनात येत नाही. अर्थात आत्मज्ञान झाल्यावर ही साधना चालूच रहायला हवी. अखंड आत्मानुसंधानाचा अभ्यास चालूच राहिला पाहिजे. ज्ञानप्राप्तीचे टप्पे श्रीसमर्थांनी फार छान समजाविले आहेत. मी खरा म्हणजे देहबुद्धी बळकट. देव खरा म्हणजे आत्मबुद्धीचा विचार. असा हा प्रवास असतो. हा प्रवास यशस्वी व्हायचा असेल तर तो शिष्य मुमुक्षु तसाच योग्य पहिजे.
“शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष । ५-३-२२ ।।”
तो अति धीर, अति तत्पर असलाच पाहिजे. श्रीसमर्थांनी बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध हे चार टप्पे सांगितले आहेत. आपण येथे बद्धाचा विचार करत नाही आहोत. पण या बद्धाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग येतात की, त्याची प्रपंचाची झिंग एकदम नाहीशी होते. संसाराचा हव्यास त्याला नकोसा वाटू लागतो. अन मग त्या मनस्थितीला बद्धाचा मुमुक्षु बनतो. मुमुक्षुत्व येणे म्हणजे बद्धाच्या जीवनात आलेला टर्निंग पॉइंटच असतो. आतापर्यंत केलेल्या सर्व गोष्टींचा त्याला पश्चाताप वाटू लागतो. अनुताप वाटू लागतो. उपरती निर्माण होते. जी वाल्या कोळ्याला झाली होती. आता काही पुण्य पदरी घ्यावे, सत्संग करावा, संतांना शरण जावे, असे त्याला मनापासून वाटू लागते. मोक्षाची इच्छा मनात बळावते. हीच मुमुक्षु अवस्था. परमार्थात टाकलेले पाऊल पुढेच पडते. भगवंताच्या दिशेने तुम्ही एक पाऊल टाका, तो दहा पावलं तुमच्यासाठी पुढे चालत येईल असे संतसज्जन सांगतात. एकदा मुमुक्षत्व प्राप्त झाले की, हळूहळू त्याचा प्रवास साधकत्वा कडे होऊ लागतो. या दशकात हा पुढचा प्रवासही श्रीसमर्थ वर्णन करतात,
“अवगुणाचा करूनि त्याग । जेणें धरिला संतसंग ।
तयासी बोलिजे मग । साधक ऐसा ।। ५-९-२ ।।”
या साधकावस्थेतील साधनेने, हाच साधक पुढे सिद्ध बनतो. परमार्थ मार्गातील हा अखेरचा टप्पा आहे.
“साधु वस्तु होऊन ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेरि गेला ।
निश्चये चळेना ऐसा जाला । या नाव सिद्ध ।। ५-१०-१० ।।”
अत्यंत संशयरहित असे निश्चयात्मक आत्मज्ञान होणे, वासना संपूर्णपणे नाहीशा होणे व अत्यंत निर्भय होऊन स्वानंदात जगणे ही सिद्धाची लक्षणे त्याच्यात प्रकर्षाने दिसतात. ह्या दशकात बद्ध ते सिद्ध हा अध्यात्म प्रवास फार सुलभतेने उलगडत जातो. त्या प्रवासाचे प्रत्ययकारी वर्णन करणारा हा दशक “चिंतामणी” म्हणून वाखाणला जातो. “मुक्तीचे सोहळे” हे प्राप्तव्य प्राप्त करून देणारा म्हणून तो “चिंतामणी” आहे.
।। जय जय रघवीर समर्थ ।।